गरजेनुसार कडधान्य वाण विकसित करण्याची गरज

उशिरा पेरणीसाठी स्थिर उत्पादन देणारे व अधिक तापमानास प्रतिकारक हरभऱ्याचे वाण विकसीत करणे गरजेचे आहे.
उशिरा पेरणीसाठी स्थिर उत्पादन देणारे व अधिक तापमानास प्रतिकारक हरभऱ्याचे वाण विकसीत करणे गरजेचे आहे.

कडधान्य पिकांचे आहारातील महत्त्व व वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने जागतिक कडधान्याची गरज भागविण्यासाठी दरवर्षी १० फेब्रुवारी हा जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कडधान्य पिकांची सद्य:स्थिती व पुढील संशोधनाची दिशा याबाबत सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. 

हवामान बदलामुळे शेतीपुढील आव्हाने वाढली  आहेत. अशा परिस्थितीमध्ये वाढत्या तापमानात अन्नसुरक्षेच्या दृष्टीने कडधान्य पिकांच्या संरक्षणासाठी पर्याय शोधणे आवश्यक आहे.   कडधान्य पिकांची सद्य:स्थिती व पुढील संशोधनाची दिशा 

  • राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कडधान्य संशोधन प्रकल्पाव्दारे झालेल्या संशोधनामुळे नवीन वाणनिर्मिती, कृषिविद्या, कीटकशास्त्र व रोगशास्त्र या विषयांच्या विविध पिकांनुसार शिफारशी प्रसारित करण्यात आल्या त्याची परिणीती/राज्याचे कडधान्य पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढण्यास मदत झाली. 
  • सर्वात जास्त कडधान्याखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता यावरुन विद्यापीठांनी विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर अवलंब करुन तसेच पाऊसमान वेळेवर व समप्रमाणात पडला तर हमखास कडधान्यांचे उत्पादन वाढते असे आढळून आले आहे.  
  • तुलनात्मक अभ्यास केला तर, सन २०१७-१८ देश प्रथमच कडधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. परंतु, भविष्याची गरज पाहता व हवामान बदलामुळे कडधान्य पिकांचे उत्पादन साध्य करण्यासाठी महत्त्वाची जी आव्हाने किंवा समस्या निर्माण झाल्या आहेत त्यांचा कडधान्य पीकनिहाय अभ्यास पुढीलप्रमाणे. 
  • हरभरा 

  • महाराष्ट्रात हरभरा पिकाचे क्षेत्र आणि उत्पादनावर पाऊसमानाचा मोठा परिणाम झालेला दिसून येतो. हे पीक मोठ्या प्रमाणावर जिरायत क्षेत्रावर पडलेल्या पावसाच्या ओलीवर घेण्यात येते. सन १९८०-८१ मध्ये हरभरा पिकाचे क्षेत्र ४.१० लाख हेक्टर, उत्पादन १.३७ लाख टन आणि उत्पादकता ३३५ किलो/हेक्टर इतके कमी होते. 
  • कडधान्य सुधार प्रकल्प, म.फु.कृ.वि., राहुरी येथून प्रसारित करण्यात आलेल्या सुधारित वाणांच्या लागवडीमुळे या पिकाखाली सन २०१६-१७ मध्ये १९.२९ लाख हेक्टर क्षेत्र, उत्पादन १९.४१ लाख टन तर उत्पादकता प्रथमच १००६ किलो/हेक्टर आढळून आली. 
  • परंतु सन २०१८-१९ मध्ये पाऊस फक्त २८९.६ मि.मी. इतका कमी झाला म्हणजेच सरासरी पेक्षा ४८ टक्के कमी झाला व परतीचा मॉन्सूनचा पाऊस पडलाच नाही म्हणजेच सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये पाऊस पडलाच नाही यामुळे रब्बी पिकांखालील लागवडीचे क्षेत्र कमी झाले पर्यायी हरभऱ्याखालील क्षेत्र २०.०० लाख हेक्टर वरून १२.९३ लाख हेक्टर क्षेत्रावर आले व उत्पादकता सुद्धा ८९२ लाख टन वरून ९.८६ लाख टन इतकी कमी आली. यासाठी अवर्षण प्रतिकारक्षम आणि बदलत्या हवामानास स्थिर उत्पादन देणाऱ्या वाणाची निर्मिती करणे ही पुढील संशोधनाची दिशा असेल. 
  • हवामानातील बदलांचा पिकावर येणाऱ्या रोग व किडींच्या प्रादुर्भावावर देखील परिणाम होतो. पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत जमिनीत ओलावा व तापमान जास्त असल्यास मानकुजव्या व ओली मुळकूज रोगांचा प्रादुर्भाव होऊन रोपांची मोठ्या प्रमाणात मर होते. याउलट जर फुले व घाटे लागण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसला व तापमान जास्त असल्यास कोरडी मुळकूज रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो व झाडे अचानक वाळण्यास सुरुवात होते. 
  • महाराष्ट्र राज्याचा विचार करता, पीकवाढीच्या काळात पाण्याचा ताण पडणे, तापमानात अचानक वाढ होणे व कोरडी मुळकूज, रोगाचा वाढता प्रादुर्भाव हे घटक हरभरा पिकाच्या उत्पादनावर प्रभाव टाकतात असे निदर्शनास आले आहे. यासाठी कमी पाण्यावर येणाऱ्या व जास्त तापमान सहन करू शकणाऱ्या तसेच कोरडी मुळकूज रोगप्रतिबंधक जाती विकसित करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने संशोधन कडधान्य सुधार प्रकल्पाव्दारे हाती घेण्यात आलेले आहे. 
  • प्रकल्पाकडे उपलब्ध असलेल्या विविध जनुकीय वाणांची या घटकांसाठी पडताळणी करण्यात येत आहे. हरभरा संशोधित वाणाच्या घेण्यात येणाऱ्या चाचणी प्रयोगात अवर्षणप्रवण वर्षामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही वाणांना पाण्याचा जास्त ताणामुळे फुलोरा सुध्दा येऊ शकला नाही तर अशा परिस्थितीमध्ये काही आशादायक वाणांनी आहे त्या परिस्थितीत समाधानकारक उत्पादन दिले. अशा वाणांची योग्य चाचणी प्रयोग झाल्यावर निश्चितच कोरडवाहू लागवडीस प्रसारित होऊ शकतात. त्यामुळे निश्चितच कोरडवाहू हरभऱ्याचे उत्पादन वाढेल यात कुठलीही शंका नाही. 
  • राज्यात रब्बी हंगामात बहुतांश शेतकरी ऊस तोडणी झाल्यानंतर म्हणजेच नोव्हेंबरच्या शेवटचा आठवडा किंवा डिसेंबरचा तिसऱ्या आठवड्यापर्यंत हरभऱ्याची लागवड करतात. अशा परिस्थितीत उशिरा पेरलेला हरभरा फुलावर येत असताना नेमका ज्यावेळेस जास्त तापमान असेल त्यावेळेस फुलावर व घाट्यात दाणे भरण्याच्या अवस्थेत येतो. जास्त तापमानामुळे परागकण नपुंसक होतात व परागीभवन होत नाही त्यामुळे घाटे पोकळ राहतात व पर्यायाने उत्पादनात घट येते. यासाठी उशिरा पेरणीसाठी स्थिर उत्पादन देणारे व अधिक तापमानास प्रतिकारक असणारे वाण निर्माण करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कडधान्य सुधार प्रकल्पाने संशोधन हाती घेतले आहे.  
  • डॉ. नंदकुमार कुटे, ७५८८५१३३९८,  (कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com