म्हशीचे प्रमुख आजार, प्रतिबंधात्मक लसीकरण

रोगप्रतिबंधाकरिता संसर्गजन्य आजारावरील लसीकरण नियमित करणे महत्त्वाचे आहे.
रोगप्रतिबंधाकरिता संसर्गजन्य आजारावरील लसीकरण नियमित करणे महत्त्वाचे आहे.

प्रत्येक म्हैसपालकाने म्हशीचे दूध उत्पादन नियमित व योग्य राहण्याकरिता म्हशींना निरोगी व सुदृढ ठेवणे आवश्‍यक आहे. म्हशींना कोणत्या प्रकारचे आजार विविध अवस्थांमध्ये होतात, याबाबतची माहिती असावी. कोणते आजार हे सामान्य असतात. तसेच, गंभीर आजारामध्ये किती नुकसान होणार याचा अंदाज असणेही गरजेचे आहे. सामान्य आजार जसे अपचन, भूक न लागणे, पोटफुगी, रवंथ न करणे इ.च्या नोंदी ठेवून घरगुती योग्य औषधांचा उपचार करण्यास हरकत नाही. म्हशीच्या चयापयाचे आजार जसे दुग्धज्वर, किटोसीस, प्रसूतिपश्चात हिमोग्लोबिन कमतरता हे कोणत्या घटकामुळे होतात व यासाठी प्रतिबंधक उपाययोजना काय अाहेत, याचीही माहिती असणे उत्पादनावर विपरीत परिणाम न होण्याकरिता आवश्‍यक आहे. वातावरणात विविध जिवाणू व विषाणूंचा वावर असतो. अयोग्य व्यवस्थापनामुळे म्हशीची रोगप्रतिकार शक्ती घटते, त्यामुळे म्हशी विविध संसर्गजन्य रोगांना बळी पडतात. काहीवेळेस म्हशींचा गर्भपात होतो, तसेच उत्पादन व प्रजननावरही विपरीत परिणाम होतो. पर्यायाने मोठा आर्थिक फटका बसतो. संसर्गजन्य आजार व यावरील लसीकरण नियमित करणे हे प्रतिबंधाकरिता महत्त्वाचे आहे. म्हशींच्या आरोग्य व्यवस्थापनामध्ये म्हशीचे प्रमुख चयापयाचे संसर्गजन्य आजार, जंत व गोचीड निर्मूलन व रोगाचे लसीकरण इ.चा समावेश होतो.

म्हशीमधील विविध अाजार १) दुग्धज्वर (दूध ताप) अधिक दूध उत्पादन असणाऱ्या म्हशीमध्ये हा आजार प्रामुख्याने दिसून येतो. मुख्यत्वे नुकत्याच विलेल्या म्हशीमध्ये प्रसूतिपश्चात ४८-७२ तासांत दिसतो. म्हशीच्या दुधावाटे शरीरातील कॅल्शिअम बाहेर पडल्यामुळे, आहारामध्ये कॅल्शिअमची कमतरता (गाभणकाळामध्ये) इ. महत्त्वाच्या कारणांमुळे हा आजार होतो. प्रमुख लक्षणे

  • शरीराचे तापमान कमी होते.
  • म्हैस सुस्त, मान आडवी करून पडून राहते.
  • म्हैस डोके छातीच्या बाजूस ओढून घेते.
  • रवंथ, लघवी, संडास बंद होते, तसेच चारा खाणे बंद होते.
  • कास व सड थंड लागतात. उपाय
  • पशुवैद्यकाद्वारे रक्तातून कॅल्शिअम बोरोग्लुकोनेट इंजेक्‍शन त्वरित द्यावे.
  • खाद्यामध्ये कॅल्शिअमयुक्त खनिजद्रव्यांचा व जीवनसत्त्वांचा पुरवठा करणे.
  • आजार पुन्हा न होण्याकरिता तोंडावाटे कॅल्शिअम व ऊर्जा असणारी औषधे दिवसातून दोन वेळा चार-पाच दिवस द्यावीत.
  • म्हशींना जीवनसत्त्व इ व फॉस्फरसचे इंजेक्‍शन द्यावे.
  • अधिक दूध उत्पादन देणाऱ्या म्हशीमध्ये सौम्य स्वरूपाचा (Subclinical) दुग्धज्वर दिसून येतो. यामध्ये वरील लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु, दुग्ध उत्पादन अपेक्षित मिळत नाही, किंवा कमी होते व प्रजननक्षमता कमी होते. याकरिता रक्तातील कॅल्शिअमची तपासणी करावी व प्रमाणापेक्षा ८-१२ मिलिग्रॅम प्रति डेसीलिटर कमी असल्यास आहारातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढवावे व पशुवैद्यकांकडून उपचार करावा.
  • २) किटोसीस जास्त दूध देणाऱ्या म्हशीमध्ये आहारातील ऊर्जेच्या कमतरतेमुळे प्रसूतिपश्चात दोन ते चार आठवड्यांत प्रामुख्याने हा आजार दिसून येतो. गर्भावस्थेत संतुलित आहाराची कमतरता, प्रथिनांचे जास्त प्रमाण इ. प्रमुख कारणांमुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी झाल्यामुळे हा आजार होतो. प्रमुख लक्षणे

  • दूध उत्पादन अचानक किंवा हळूहळू कमी होते किंवा दूध देणे बंद होते.
  • म्हशीच्या श्‍वासाचा किंवा मूत्राला गोड वास येतो.
  • म्हैस प्रामुख्याने पशुखाद्य किंवा आंबवण खाणे कमी किंवा बंद करते.
  • तीव्र आजारामध्ये लाळ गळते, म्हशीची अनैसर्गिक हालचाल होऊन तोल जातो. तसेच, कठीण वस्तूचा चावा घेण्याचा प्रयत्न करते.
  • उपचार

  • पशुवैद्यकाकडून शिरेद्वारे ग्लुकोज (२५ ते ४० टक्के) नसेतून वजनाच्या प्रमाणात द्यावे. शरीरामध्ये दररोज ग्लुकोज तयार होण्यासाठी जास्त ऊर्जेचे पदार्थ ५-७ दिवस द्यावेत. जसे गूळ, बाजारातील औषधी इ.
  • गाभण कालावधी, तसेच विल्यानंतर संतुलित खुराक किंवा पिष्टमय पदार्थयुक्त खुराक द्यावा. भरडलेला मका किंवा गव्हाचा कोंडा हे ऊर्जेचे चांगले स्रोत आहेत.
  • जास्त दूध उत्पादन देणाऱ्या म्हशीमध्ये ऊर्जेच्या कमतरतेमुळे सौम्य किटोसीस दिसून येतो. यामध्ये दूध उत्पादन अपेक्षित मिळत नाही किंवा कमी होते.
  • म्हशीच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण तपासल्यास किटोसीस अाजाराचे निदान होते.
  • ३) घटसर्प म्हशीमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा व तीव्रता जास्त असणारा हा संसर्गजन्य रोग पाश्‍चुरेल्ला मल्टोसिडा जिवाणूंमुळे प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरवातीस किंवा पावसाळ्यात होतो. लक्षणे

  • म्हशीला १०३ - १०५ अंश फॅरनहाइट ताप येतो.
  • घशात, जिभेला व गळ्यावर सूज येते.
  • घशातून घर घर आवाज येऊन श्‍वासोच्छ्‍वासाला त्रास होतो.
  • श्‍वसननलिकेवर सूज येते व श्‍वसन संस्थेत दाह निर्माण होतो व तीव्र स्वरूपाच्या आजारात म्हैस मृत्युमुखी पडते.
  • उपचार व प्रतिबंध

  • म्हशीला वेदनाशामक, ताप कमी करणारे, सूज कमी करणारे, प्रतिजैविके, ग्लुकोज व लिव्हर टॉनिक इ. औषधोपचार पशुवैद्यकाकडून करावेत.
  • आजारी म्हशीला इतर म्हशींपासून वेगळे बांधावे. खाद्य व पाणी वेगळे द्यावे.
  • प्रतिबंधाकरिता पावसाळ्यापूर्वी लसीकरण करावे.
  • ४) तोंडखुरी किंवा लाळ खुरकूत हा एक अतिशय संसर्गजन्य विषाणूजन्य रोग असून, मरतुकीपेक्षा आर्थिक नुकसान जास्त होते. अाजारी जनावरामार्फत दूषित हवा, चारा, पाणी इ.मार्फत प्रसार होतो. लक्षणे

  • म्हशीच्या तोंडात (जिभेवर, हिरड्यावर) व खुरांमध्ये फोड येतात व जखमा होतात.
  • जास्त ताप येऊन म्हशी सतत लाळ गाळतात.
  • जखमांमुळे खाणे-पिणे कमी होते किंवा बंद होते. परिणामी दूध उत्पादन कमी होते.
  • गाभण म्हशीमध्ये गर्भपात होऊ शकतो.
  • जखमा १ टक्का पोटॅशियम परमॅग्नेट किंवा २ टक्के सोडिअम बायकार्बोनेटच्या द्रावणाने स्वच्छ कराव्यात.
  • जखमांवर बोरोग्लिसरीन व हळद लावावी.
  • पायांना २ टक्के कॉपर सल्फेट द्रावणाने धुवावे.
  • म्हशींना वेदनाशामक औषधी, प्रतिजैविके, टॉनिक व ग्लुकोज पशुवैद्याकडून द्यावे.
  • रोगी म्हशींना वेगळे करून चारा, पाणी द्यावे.
  • मार्च किंवा एप्रिल, तसेच सप्टेंबर किंवा ऑक्‍टोबर महिन्यामध्ये सहा महिन्यांच्या अंतराने लस द्यावी.
  • ५) सर्रा (ट्रिपॅजोसोमीयासीस) ः रक्तातील एकपेशीय परोपजीवी ट्रिपायनोसोमा हिन्ससीमुळे रोगाचा प्रादुर्भाव होतो. परोपजीवींची वाढ ही टीबानस जातीच्या माश्‍यांमध्ये होते व माश्‍या चावल्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव होते. रोगाचा प्रादुर्भाव साधारणपणे पावसाळ्यामध्ये होतो.

    लक्षणे ः

  • श्‍वसनाचा वेग वाढतो. जास्त ताप येतो.
  • म्हशीला चक्कर येऊन स्वतःभोवती गोल गोल फिरते.
  • तात्पुरता आंधळेपणा येऊन, बुब्बुळे पांढरी होतात.
  • म्हशी टणक जागेवर किंवा वस्तूला डोके आदळतात.
  • उपचार मिळाला नाही तर म्हशीचा मृत्यू होतो.
  • सौम्य प्रकारामध्ये मधून मधून ताप येतो. भूक न लागणे, दूध उत्पादन कमी होते. ॲनिमिया होणे व वजन कमी होते.
  • निदान व उपचार ः

  • सौम्य प्रकारामध्ये निदान अवघड असते. कारण लक्षणे योग्य दिसून येत नाहीत. प्रयोगशाळेमध्ये रक्तपट्टीद्वारे रक्ताची चाचणी केल्यानंतर जंतूंचा प्रादुर्भाव दिसून येतो व निदान करता येते.
  • पशुवैद्यकाकडून रोगावर प्रभावी औषधाचा योग्य मात्रेमध्ये उपचार करून घ्यावा.
  • गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी.
  • माश्‍या व गोचीड यांचे नियमित नियंत्रण करावे.
  • म्हशींमधील जंत निर्मूलन

  • नवजात रेडके, पारडे, तसेच म्हशींना प्रामुख्याने चपटे कृमी, गोलकृमी आणि पर्णाकृती कृमी अशा जंतांचा प्रादुर्भाव होतो.
  • जंत म्हशीच्या पोटात, आतडे, यकृतामध्ये असतात.
  • भूक मंदावते, हगवण लागते.
  • शेण पातळ होऊन दुर्गंधीयुक्त वास येतो.
  • दूध उत्पादन कमी होते.
  • कातडी खडबडीत व निस्तेज होते.
  • म्हशी अशक्‍त होऊन रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
  • रेडकामध्ये अपेक्षित वाढ होत नाही व वजन घटते.
  • एॅनिमिया होऊन अशक्तपणा येतो.
  • प्रतिबंध

  • रेडकांना जन्मल्यानंतर १० दिवसांनी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशक द्यावे.
  • कोणत्या जंताचा प्रादुर्भाव अाहे याचे निदान करण्यासाठी शेणाची प्रयोगशाळेत तपासणी करावी व औषध द्यावे. याचा चांगला परिणाम होतो.
  • १ वर्षाखालील म्हशींना दर दोन महिन्यांतून जंतनाशक द्यावे.
  • गाभण म्हशींना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाचा वापर करावा.
  • लसीकरण करण्याअगोदर १० दिवस जंतनाशक द्यावे, यामुळे रोगप्रतिकारकशक्ती उत्तम मिळते.
  • संपर्क ः डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२ स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com