देशी गोपालन व्यवसायातून घेतली नव्याने उभारी

संसारे यांनी उभारलेला देशी गायांचा गोठा
संसारे यांनी उभारलेला देशी गायांचा गोठा

इमूपालन व्यवसायात काही लाख रुपयांचा आर्थिक फटका सहन केला. तरीही जिद्द व संयमाने  मांगवली (जि. सिंधूदुर्ग) येथील महेश संसारे आणि सतीश जागृष्टे यांनी देशी गोपालन व्यवसाय सुरू केला. काळजीपूर्वक पावले उचलत, उत्तम व्यवस्थापनाची कास व बाजारपेठेचा अभ्यास केला. आज तूप व गोमूत्र-शेणावर आधारित उत्पादनांची निर्मिती व विक्रीतून त्यांनी बाजारपेठेत वेगळी ओळख तयार करताना आर्थिक स्थैर्य कमावले आहे.    मांगवली (ता. वैभववाडी, जि. सिंधूदुर्ग) येथे महेश संसारे राहतात. त्यांचे मेहुणे सतीश जागृष्टे यांचेही जवळच घर आहे. दोघांचाही बांधकाम उभारणीचा व्यवसाय आहे. सतीश व्यवसायाच्या निमित्ताने पालघर येथे असतात. दोघांची अतूट मैत्री आहे तेवढीच शेतीचीही प्रचंड आवड आहे. विचार व आचारदेखील बहुतांशी सारखेच आहेत. शेतीत त्यांनी अनेक प्रयोग एकत्रित केले.  इमूपालनात प्रचंड फटका  सुमारे सहा वर्षांपूर्वी या दोघांनी इमूपालन व्यवसाय सुरू केला. त्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. परंतु संबंधित कंपनी, व्यापारी यांनी मोठी फसवणूक केली. विक्रीचे सारे व्यवस्थापन फसले. या व्यवसायात गुंतलेले अनेक तरुण कर्जबाजारी झाले. त्यात या दोघांचाही समावेश होता. दोघांनाही सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचा मोठा फटका सहन करावा लागला.  गोपालनातून पुन्हा उभारी  इमूपालनातून संसार विस्कटला. परंतु खचून न जाता दोघांनाही त्यातून बाहेर पडण्याचे ठरवले.  चर्चा केली. अभ्यास केला. नव्याने देशी गोपालनात उतरायचा निर्धार केला. आर्थिक जुळवाजुळव केली.  ऑगस्ट २०१५ मध्ये मांगवली येथेच आधुनिक पद्धतीचा गोठा बांधला. गायी आणण्यापूर्वी आवश्‍यक चारा उपलब्ध होईल अशी तरतूद केली. सुरवातीला दहा आणि त्यानंतर पाच अशा १५ गीर गायी खरेदी केल्या.  व्यवसाय वृद्धी  दुग्धव्यवसाय सुरू केल्यानंतर त्यातील खाचखळगे लक्षात लक्षात येऊ लागले. दूध, गोमूत्र, शेण यावर प्रकिया करून उत्पादने तयार करता येतात हे समजले. मग संसारे यांच्यातील अभ्यासूपणा स्वस्थ बसू देईना. त्यांनी पंचगव्य अभ्यासक्रमाला सुरवात केली. आवड असल्यामुळे बऱ्याच गोष्टींचे आकलन केले. एक वर्षाचा या विषयातील अभ्यासक्रम सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे पूर्ण केला. काही दुधाची किरकोळ स्थानिक विक्री करायची व तूपनिर्मितीवर अधिक भर दिला.  अन्य उत्पादने  गोमूत्र व शेणापासून उत्पादने तयार करण्यासाठी स्वतंत्र इमारतीची उभारणी केली. आवश्‍यक यंत्रसाम्रगी खरेदी केली. गोमूत्र अर्क व अन्य वनस्पतींचे अर्क तयार करण्यास सुरवात केली. आज सुमारे अठरा अर्क संसारे यांच्याकडे उपलब्ध आहेत. अर्क तयार करताना कुकर विशिष्ट तापमानाला उष्ण करून त्यामधील अमोनिया वेगळा केला जातो. उर्वरित गोमूत्रातील ५० टक्के हिस्सा अर्क बनविण्यासाठी वापरला जातो. शेणापासून गांडूळखत तयार केले जाते. महिन्याला सुमारे पाच टन निर्मिती केली जाते. सध्या प्रती टन ९००० रुपये दराने त्याला मागणी येऊ लागली आहे.  याशिवाय सुगंधी साबण, दंतमंजन, भस्म पावडर, शाम्‍पू, मलम, फेस पॅक आदींचीही निर्मिती केली जाते.  या व्यवसायात संपूर्ण कुटुंब उतरले असल्याने श्रमाची विभागणी होऊन कामाचा ताण हलका झाला आहे.  निर्मितीपासून ते विक्री करण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यत कुटुंबाची धडपड सुरू असते. त्यामुळेच बाजारपेठेत विक्री व्यवस्था उभी करणे शक्य झाले.  आर्थिक स्थैर्य लाभतेय  पूर्वी १५ गायींचा गोठा होता. आता गायींची संख्या ६५ पर्यंत गेली आहे. यात गीर गायींबरोबर  कांकरेज गायीदेखील आहेत. गोठ्यातच अधिकाधिक पैदास होत असल्याने गायी खरेदी करण्याची गरज कमी झाली आहे. दुधाची विक्री स्थानिक पातळीवर ५० रुपये प्रतिलिटर दराने होते. तूप महिन्याला ३० किलोपर्यंत तयार होते. त्याची विक्री २२०० ते २५०० रुपये प्रतिकिलो दराने होते. दर्जेदार तुपाला स्थानिकसह मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या शहरातून मागणी आहे. ‘फूड सेफ्टी’ विषयातील परवाना प्रक्रियाही केली असून लवकरच तो हाती येईल असे संसारे यांनी सांगितले.  अन्य उत्पादनांची विक्रीही स्थानिक पातळीवर होऊ लागली आहे. महिन्याला सुमारे ७० हजार रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे. तीन कामगार जोड्या तैनात केल्या आहेत. त्यांनाही रोजगार मिळाला आहे.  एकेकाळी इमूपालनात झेललेले प्रचंड मोठे संकट भेदण्याचा संसारे व जागृष्टे यांनी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश येऊ लागले आहे. संसारे हा व्यवसाय सांभाळून शेतीही पाहतात. आंबा, काजू, भाजीपाला, शेवगा आदी विविध पिके त्यांनी घेतली आहेत.  देशी गोपालक संघाची स्थापना  देशी गायींचे संगोपन आणि त्यांच्या संख्येत वाढ व्हावी या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हाभरातील सव्वादोनशे  जण एकत्र येत देशी गोपालक संघाची स्थापना करण्यात आली आहे. संघाचे महेश संसारे अध्यक्ष आहेत.  या माध्यमातून उत्पादनाला बाजारपेठही मिळणे शक्य होणार आहे.   संपर्क- महेश संसारे- ७७४४०५७७३१ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com