वाढताहेत लिंबू निर्यातीच्या संधी

अर्जेंटीना देशातील लिंबाचा हंगाम काही महिन्यांपूर्वीच संपला असून, पाऊस आणि धुक्यामुळे काढणीचा हंगाम लांबला.
अर्जेंटीना देशातील लिंबाचा हंगाम काही महिन्यांपूर्वीच संपला असून, पाऊस आणि धुक्यामुळे काढणीचा हंगाम लांबला.

जागतिक लिंबू बाजारपेठेचा आढावा

फ्रेंच मोटार रस्ते बंद असल्याने तेथून येणाऱ्या लिंबाची आवक कमी झाली आहे. स्पेनमध्ये सध्या लहान आकाराचे लिंबू उपलब्ध असून, त्याला तुर्कस्थान येथून येणाऱ्या लिंबांची चांगली स्पर्धा होत आहे. अर्थात, टर्किश निर्यातदारांना जितक्या चांगल्या हंगाम सुरवातीची अपेक्षा होती, तेवढा चांगला दर मिळालेला नाही. अमेरिकेमधील चित्र वेगळे आहे. येथील कॅलिफोर्नियामध्ये तीन महत्त्वाचे हंगाम घेतले जातात. त्यामुळे वर्षभर चांगली आवक होत असते. परिस्थिती फारच चांगली नसली तरी कोणाचीही फारशी तक्रार दिसत नाही.

इस्राईल ः मोठ्या काढणीमुळे दर तणावाखाली

  • इस्राईलच्या निर्यात उद्योगामध्ये लिंबू हा काही मुख्य घटक नसला तरी स्थानिक बाजारपेठेसाठी लिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या वर्षी ६४,५०० टन लिंबू बाजारात येण्याचा अंदाज आहे. त्यातील ६० हजार टन स्थानिक बाजारपेठेमध्ये ताज्या स्वरूपात विकली जातील आणि ४ हजार टन प्रक्रिया उद्योगामध्ये वापरली जातील. केवळ ५०० टन लिंबे निर्यात होतील, असा अंदाज आहे. येथून सामान्यतः फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, इंग्लंड आणि जपान येथे निर्यात होते.
  • या साऱ्या स्थितीचा बाजारातील दरावर परिणाम होणार आहे.
  • येथे वर्षभरात अनेक वेळा लिंबाची काढणी होते. मात्र, विविध ठिकाणांहून प्रामुख्याने स्पेन, इटाली, दक्षिण आफ्रिका किंवा अर्जेंटिना यांच्या स्पर्धेमुळे आव्हानामध्ये वाढ झाली आहे. अर्थात, स्पेन आणि मेक्सिको येथील फळांचा आकार इस्रायली लिंबाच्या तुलनेमध्ये कमी आहे. मोठ्या आकाराचा फायदा इस्रायली लिंबाना मिळू शकेल, असा दावा येथील निर्यातदार करत आहेत.
  • तुर्कस्तान ः हंगाम धोक्यात

    २० ऑगस्टला मेयेर लिंबाच्या साह्याने हंगामाने एकदम उचल खाल्ली, चांगली किंमत लिंबांना मिळाली. मात्र, सप्टेंबरच्या मध्यावर लहान आकार आणि अयोग्य मार्केटिंगमुळे दर कमी मिळाले. विविध टर्किश निर्यातदारातील स्पर्धा त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे मत येथे व्यक्त होते. त्याचप्रमाणे डॉलर आणि युरो या चलनातील विनिमय दरातील घसरणीमुळे निर्यातदारांचा नफा वेगाने कमी होत गेला. त्यामुळे अनेक निर्यातदारांनी हा हंगाम खराब गेल्याचे मत व्यक्त गेले.

  • पुढील वर्षाच्या निर्यातीसाठी युरोप हे मुख्य लक्ष्य आहे. त्याचप्रमाणे पूर्वेतील आणि अरब राष्ट्रामध्ये निर्यात करण्यात येईल.
  • टर्किश लिंबे हे स्पॅनिश लिंबाच्या तुलनेमध्ये स्वस्त असून, त्याचा स्पर्धेमध्ये फायदा होतो.
  • सध्या मेयेर लिंबाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, दर्जा आणि आकारानुसार त्याला ०.२८ ते ०.३८ युरोच्या दरम्यान दर मिळत आहे.
  • लामाज लिंबाच्या किमती अद्याप स्पष्ट झाल्या नाहीत. अर्थात, त्यांच्या किमतीवर युरोपातून दबाब राहण्याची शक्यता असली तरी अद्याप सारे अनिश्चित असल्याचे निर्यातदार सांगतात.
  • स्पेन ः लहान आकार आणि तुर्कस्थानची स्पर्धा

    सध्या बाजारपेठेमध्ये ख्रिसमसच्या हंगामाची तयारी सुरू आहे. प्रिमोफियोरी येथील हलक्या वसंताच्या चाहुलीने विक्रीच्या कॅम्पेनची सुरवात झाली असली तरी फार मोठे बदल दिसत नाहीत. त्यात फळांचा लहान आकार आणि टर्किश लिंबांची स्पर्धा जाणवत आहे.

  • मर्सिया येथील हंगाम नेहमीपेक्षा दोन आठवड्याने उशिरा सुरू झाली आहे. फळे अद्याप योग्य आकाराची झाली नसल्याने उशीर झाला आहे. लहान आकाराच्या कॅलिबर लिंबाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. पावसामुळे हंगामामध्ये उशिरापर्यंत या लिंबाची आवक होत राहिला असा अंदाज आहे.
  • पहिल्या टप्प्यामध्ये लिंबांचा आकार योग्य नसल्यामुळे मागणी इतका पुरवठा करताना सर्वांची तारांबळ उडाली.
  • त्यानंतरच्या आठवड्यामध्ये अनेक युरोपियन सुपरमार्कटने आपल्या प्रमाणित निकषापेक्षा काही मिलिमीटर लहान लिंबांनाही मान्यता दिल्याने काही प्रमाणात निर्यात सुरू झाली. अर्थात, त्यामुळे परिस्थितीमध्ये सुधारणा असली तरी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये झालेल्या पावसामुळे परिस्थितीवर लक्ष ठेवून राहावे लागत आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंत मोठ्या प्रमाणात काढणी होऊन चांगल्या आकाराची लिंबे बाजारात येतील, ही आशा आहे.
  • स्पेनमधील हंगामाच्या सुरवातीला तुर्कस्तानी लिंबाची स्पर्धा झाली. त्यांच्याकडे या वर्षी मोठ्या प्रमाणात लिंबे उपलब्ध आहेत. या लिंबामुळे दूरवरून म्हणजेच अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिकेतील लिंबे बाजारात येण्याची शक्यता आणखी दुरावली आहे.
  • हंगामाची सुरवात सामान्य दराने झाली असली तरी टर्किश लिंबाच्या स्पर्धेचा ताण आहे. त्यांच्याकडील लिंबे स्वस्तामध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे.
  • इटाली ः हंगामाची उशिरा सुरवात

    उत्तर गोलार्धातील इटालीमध्ये लिंबाच्या हंगामाला सामान्यपेक्षा काही दिवस उशिराने म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरवात झाली. त्यासाठी उन्हाळ्यातील कोरडे वातावरण कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. २०१७ च्या तुलनेमध्ये कमी उत्पादन येण्याची शक्यता असली तरी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मागणीइतके पुरेसे असेल. सिसिली भागांमध्ये नवी लागवड वाढली असून, येत्या काही वर्षांमध्ये उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये लिंबाचा दर्जा चांगला असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

    फ्रान्स ः रस्तेबंदीमुळे मर्यादित पुरवठा

    सध्या फ्रान्समध्ये जिलेट्स जॅऊन्स चळवळीमुळे (दी यलो वेस्टस) बंद आणि रस्त्यावर निदर्शने सुरू आहेत. त्याचा फटका भाज्या आणि लिंबांच्या वितरणाला बसत आहे. त्यामुळे लिंबांची कमतरता भासत असून, उत्पादक आणि वाहतूक कंपन्यांकडून साठा संपत आहे. उशीर होत असल्याने दर्जा घसरत असून, त्यामुळे दर कमी राहिले आहेत. त्यात स्पेन येथील लिंबांना अधिक फटका बसला आहे. येथील लिंबाचा आकार लहान ते मध्य असून, तेथील पावसामुळे आवक कमी होत आहे. येथील व्यापाऱ्यांच्या मतानुसार लिंबांना चांगली मागणी असली तरी तुलनेने किंमती नियमितपणे कमी होत आहेत.

    अमेरिका ः निर्यातीसाठी कमी पर्याय

    सध्या अमेरिकेतील मध्य खोरे (डिस्ट्रिक्ट१) आणि वाळवंटी विभाग (डिस्ट्रिक्ट ३) येथे लिंबाची काढणी सुरू आहे. अधिक उष्ण शरद ऋतूमुळे डिस्ट्रिक्ट१ मधील काढणी सामान्यपेक्षा थोडी लवकर सुरू झाली आहे. किनाऱ्याकडील विभाग (डिस्ट्रिक्ट२) येथेही काही प्रमाणात उत्पादन होत असले तरी तेथील काढणीला अद्याप वेग आलेला नाही. आवक झालेली लिंबे बाजारात अद्याप उपलब्ध असून, निर्यातीच्या संधी मर्यादित असल्याचे दिसत आहे. अहवालानुसार, जपान येथील लिंबाचे प्रमाण कमी राहणार असून, अमेरिकन निर्यातदारांना उत्तम संधी निर्माण होऊ शकते. या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मध्यम आकाराच्या लिंबांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार आहे. अर्थात, सर्व आकाराच्या लिंबांचा पुरवठा पुरेसा असेल, अशी स्थिती आहे.

    ऑस्ट्रेलिया ः निर्यातीच्या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत

    लिंबे ही वर्षभर उपलब्ध असतात. हॉर्ट इनोव्हेशन यांच्या माहितीनुसार, लिंबे आणि लिंबूवर्गीय फळे एकाच संवर्गात मोजण्यात आली आहेत. एकूण प्रमाणे ४१,४३६ टन असून, त्यातील सुमारे ७६ टक्के भाग हा केवळ लिंबाचा आहे. लिंबाखालील क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. आयात केलेल्या लिंबू आणि लिंबूवर्गीय फळांचे प्रमाण २१ टक्क्याने वाढले असून, ते ७८१२ टनापर्यंत पोचले आहे.

  • येथील कोलेस या सुपरमार्केट चेनने या वर्षाच्या सुरवातीलाच आयात लिंबाची विक्री थांबवली आहे.
  • सध्या केवळ ४ टक्के लिंबांची निर्यात होते, तर ९ टक्के लिंबे ही स्थानिक प्रक्रिया उद्योगामध्ये जातात. म्हणजेच एकूण उत्पादनामध्ये ८७ टक्के उत्पादन हे स्थानिक बाजारपेठेत येते.
  • उत्पादकांच्या मतानुसार, चीन, इंडोनेशिया, जपान, कॅनडा, अमेरिका येथे निर्यातीसाठी उत्तम संधी राहू शकतात. त्यातही हाॅँगकाॅँग आणि सिंगापूर या सहजशक्य बाजारपेठा राहू शकतील. इंडोनेशिया बाजारपेठेतील कोटा पद्धतीमुळे ही बाजारपेठ तुलनेने अधिक अवघड राहू शकते.
  • चिली ः निर्यातीमध्ये वाढीची नोंद

    ऑक्टोबर अखेरीला येथील लिंबांचा हंगाम संपला. या वर्षी चिलीतून ८७९०९ टन लिंबांची निर्यात झाली. ती गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. बहुतांश निर्यात (सुमारे ६३.३ टक्के) ही अमेरिकेमध्ये झाली. येथील हंगाम साधारणपणे मे ते नोव्हेंबरपर्यंत चालतो. या काळात येथील गिनोव्हा, युरेका, फिनो आणि मेसिना या वाणांची विक्री होते. उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये चिली देशाने जपान येथे लिंबू फळांविषयी विशेषतः त्याचे आरोग्यासाठीचे फायदे पोचविण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

    अर्जेंटिना ः अधिक निर्यात रशियाकडे

  • येथील हंगाम काही महिन्यांपूर्वीच संपला असून, तो दरवर्षीप्रमाणेच राहिला. हवामानातील स्थिती विशेषतः यावर्षीचा उष्ण शरद ऋतू, पाऊस आणि धुक्याच्या वातावरणामुळे हंगामामध्ये बरेच चढ उतार राहिले. फारसे नुकसान नोंदवले गेले नसले तरी काढणीचा हंगाम लांबला. कीडरोग संदर्भातील समस्यांमुळे निर्यातदारांनी युरोपियन देशांऐवजी अन्य देशांना प्राधान्य दिले. त्यात रशियाला लिंबांची मोठी निर्यात झाली.
  • -सध्या दक्षिण आफ्रिकेतील लिंबांची स्पर्धा वाढत असल्यामुळे अर्जेंटिना निर्यातदार नवीन देशांचा शोध घेत आहेत. या वर्षी चिली आणि कोलंबिया यांचा निर्यातीच्या यादीमध्ये समावेश झाला असून, जपानमधील निर्यात अपेक्षित होती. अर्थात, अमेरिकेतील बाजारपेठेवरच अनेक निर्यातदारांचे लक्ष असल्याचे येथे सांगितले जाते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com