agriculture story in marathi, integrated family from Parbhani has made progress through horticulture farming with great efforts. | Agrowon

एकी, प्रयोगशीलता, कष्टातून व्यावसायिक शेतीचा आदर्श

माणिक रासवे
गुरुवार, 9 एप्रिल 2020

परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील सोगे संयुक्त परिवाराने फळबाग व भाजीपाला अशी व्यावसायिक शेती विस्तारली आहे. दोन भावांची एकी, संकटातून मार्ग काढण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, प्रयोगशीलता, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी या बलस्थांनामुळेच त्यांनी शेतीतून कौटुंबिक व आर्थिक विकास साधला आहे.

परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील सोगे संयुक्त परिवाराने फळबाग व भाजीपाला अशी व्यावसायिक शेती विस्तारली आहे. दोन भावांची एकी, संकटातून मार्ग काढण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, प्रयोगशीलता, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी या बलस्थांनामुळेच त्यांनी शेतीतून कौटुंबिक व आर्थिक विकास साधला आहे.

परभणी तालुक्यातील महसूल मंडळाचे ठिकाण असलेल्या सिंगणापूरची जिल्ह्यातील प्रमुख भाजीपाला उत्पादक गाव म्हणून ओळख आहे. गावात अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याव्दारे शेतकऱ्यांना पाणी मिळते. परंतु धरण दरवर्षी भरण्याची खात्री नसते. आजवरच्या अनुभवातून सिंगणापूरच्या अनेक शेतकऱ्यांनी शेततळे, विहिरीच्या माध्यमातून सिंचन सुविधांचे बळकटीकरण केले आहे. त्यामुळे दुष्काळातही येथील शेतकरी भाजीपाला, फळपिकांचे प्रयोग करताना दिसतात.

सोगे यांची प्रयोगशीलता
गावात बाजीराव शंकरराव सोगे आणि बंधू बालासाहेब यांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांची सिंगणापूर शिवारात वडिलोपार्जित दोन एकर तर ताडपांगरी शिवारात हलक्या ते मध्यम प्रतीची २५ एकर अशी एकूण २७ एकर जमीन आहे. सिंचनासाठी विहिरीची सुविधा आहे. फळबाग व भाजीपाला अशी त्यांची मुख्य पीकपद्धती आहे. सध्या प्रत्येकी अडीच एकर अंजीर आणि लिंबू आहे. दोन एकर क्षेत्र भाजीपाला पिकांसाठी राखीव असते. उर्वरित क्षेत्रावर ऊस, कापूस, तूर, गहू, ज्वारी, उन्हाळी भुईमूग असे नियोजन असते. ताडपांगरी शिवारातील शेतापासून सुमारे साडेतीन किलोमीटर दूर जायकवाडी धरणाच्या कालव्यावरुन पाईपलाईनव्दारे पाणी आणले. फळपिके तसेच उसासाठी ठिबकचा अंगीकार केला.

अंजिराचे किफायतशीर उत्पादन

सुरुवातीच्या काळात सोगे केळीचे उत्पादन घेत. पाण्याची टंचाई सुरू झाल्यापासून अंजीर हे मुख्य पीक झाले आहे. एके वर्षी बाजीराव आळंदी यात्रेला गेले असता पुणे जिल्ह्यातील पुरंदर भागातील अंजीर उत्पादकांची शेती पाहण्यात आली. त्यानंतर बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथील अंजीर उत्पादकाकडून दिनकर वाण घेतले. सुमारे ११ वर्षांपूर्वी लावलेली अंजीर बाग तीन वर्षांपूर्वी काढली. सध्याचे नवे अडीच एकर क्षेत्र तीन वर्षांपूर्वीचे आहे.

व्यवस्थापनातील बाबी

  • सध्या नव्या बागेतून दररोज दीड ते दोन क्विंटलपर्यंत उत्पादन
  • पूर्वीच्या अनुभवानुसार तिसऱ्या वर्षी प्रति झाड ३० किलोपर्यंत तर त्यापुढील वर्षापासून प्रति झाड ४० किलोपर्यंत उत्पादन
  • अंजिराचा विक्री हंगाम जानेवारी ते मार्च.
  • दरवर्षी ऑगस्टच्या दुसऱ्या वा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात छाटणी. ऑक्टोबरमध्ये फळधारणा.
  • दहा ते पंधरा फळे लागल्यानंतर फांदीचे शेंडे खुडले जातात. फळांचा आकार वाढतो. नवीन फळफाद्यांची संख्या वाढते.
  • पाण्याच्या उपलब्धतेनुसार मार्च ते जून या कालावधीतही उत्पादन घेता येते.

व्यापाऱ्यासोबत करार
फळे सकाळी लवकरच बाजारपेठेत पोचवावी लागतात. त्यानंतर प्रतवारी होते. क्रेटमध्ये झाडाची पाने रचून फळे भरण्यात येतात. गावातून भाजीपाला नेणाऱ्या वाहनातून परभणी येथे पोचवली जातात. एका व्यापाऱ्यासोबत प्रति किलो ६० रुपये दराने खरेदी करण्याचा करार केला आहे. त्यामुळे दरात घसरण झाली तरी नुकसान होत नाही.

दुष्काळात जगवल्या फळबागा
सन २०१८ मध्ये कमी पाऊस झाल्याने २०१९ च्या उन्हाळ्यात पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे महिनाभर दररोज टॅंकरव्दारे पाणी आणून अंजीर आणि लिंबाला दिले. एक लाख रुपये खर्च झाला. परंतु पाच एकरांवरील फळबाग जजिवंत ठेवता आली याचे समाधान आहे. लिंबाचे उत्पादन अद्याप सुरु झालेले नाही.

बारमाही भाजीपाला
दोन एकर क्षेत्र भाजीपाला शेतीसाठी राखीव ठेवले आहे. परभणी शहर सुमारे १० किलोमीटरवर असल्याने विक्री करणे सोपे होते. या कुटुंबाची भाजीपाला उत्पादनाची अनेक वर्षांची परंपरा आहे. बारा महिने आलटून पालटून प्रत्येकी १० गुंठे क्षेत्रावर पालक, फ्लॅावर, कांदापात असे विविध प्रकार असतात. उन्हाळ्यात पाणी असेल तरच हंगाम साधता येतो. या शेतीतून दररोजचे उत्पन्न मिळते. यंदा दोन एकरांत खरबूज घेतले. मात्र केवळ एक एकरांतच उत्पादन शक्य झाले. आजवर ४० क्विंटलची विक्री झाली. कोरोना संकटात लॅाकडाऊनमुळे व्यापाऱ्यांनी केवळ १० रूपये प्रति किलो दर दिला
आहे.

जमीन सुधारणा
ताडपांगरी शिवारातील जमिनीत झाडे झुडूपे वाढली होती. सलग पट्टा असल्यामुळे माती वाहून जात होती. बाजीराव यांनी दीड- दोन एकर क्षेत्र निश्चित करुन बांध टाकले. उतारानुसार उभे आडवे चर खोदले. त्यामुळे जमिनीची धूप थांबली. जास्त पाऊस झाल्यानंतर पाण्याचा निचरा होऊ लागला आहे.

शेतीतून प्रगती
अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ आदी नैसर्गिक संकटांतही सोगे बंधू हिंमत हारले नाहीत. संकटातून मार्ग काढण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, प्रयोगशीलता, चिकाटी, स्वतः कष्ट करण्याची तयार या बलस्थानांमुळे ते शेतीत टिकून आहेत. दररोज कोणता ना कोणता माल विक्रीसाठी उपलब्ध व्हावा असे नियोजन असते. वडिलोपार्जित दोन एकरांतील उत्पन्नातील बचतीतून सोगे बंधूंचे वडील शंकरराव यांनी टप्प्याटप्प्याने २५ एकर जमीन खरेदी केली. दोन मुलींची लग्ने, टुमदार घर, दोघा भावांची मुले, मुलीं मिळून आठ जणांचे उच्च शिक्षण या बाबी शेतीतील उत्पन्नातून शक्य झाल्या. बालासाहेबांचा मुलगा श्रीधर अभियांत्रिकी विषयातील शिक्षणानंतर रेल्वे सेवेत रुजू झाला. परिवारात १४ सदस्य आहेत. सर्वजण शेतीत श्रमांची देवाणघेवाण करतात. एक सालगडी आणि बैलजोडी आहे.

बाजीराव सोगे- ९८५०९१४१०५

v


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...