रोग, किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी यंत्रांचा वापर केला जातो.
अॅग्रो विशेष
उत्पादन, थेट विक्री, पूरक व्यवसायांतून समृद्धी
संघटनात्मक काम
विविध प्रयोगांची माहिती घेण्यासाठी शेतकरी शेगोकार यांच्या शेताला भेटी देतात. यश अर्णव नावाचा शेतकरी उत्पादक गट स्थापन करून त्याची ‘आत्मा’ कडे नोंदणी केली आहे. शेगोकार गटाचे अध्यक्ष असून ११ सभासद आहेत.
कृषी विद्यापीठ, तज्ज्ञ, वाचन, ज्ञान, विविध प्रयोग करण्याची आवड, विक्री व्यवस्था, संघटनात्मक कार्य करण्याची धडपड आदी गुणांच्या आधारे सोनाळा (ता. अकोला) येथील सेवानिवृत्त कर्मचारी मनोहर शेगोकार यांनी व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर एकात्मीक शेती उभारली आहे. हळद, गहू, ज्वारी यांची पॅकिंगमधून विक्री, जोडीला दुग्धव्यवसाय, परसबागेतील कोंबडीपालन, बीजोत्पादन अशी विविध वैशिष्ट्यांनी त्यांची शेती समृध्द झाली आहे.
सोनाळा (ता. जि. अकोला) येथील मनोहर बळीराम शेगोकार यांची सुमारे २८ एकर शेती आहे.
सोयाबीन, उडीद, मूग, हरभरा आदी हंगामी पिके घेताना बाजारपेठेतील मागणीनुसार भाजीपाला पिकांची घडीदेखील त्यांनी बसवली आहे. त्यातून उत्पादन व उत्पन्नात सातत्याने भर घालण्याचे प्रयत्न ते करताहेत. शेगोकार राज्य परिवहन महामंडळाच्या नोकरीतून सुमारे सात वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यापूर्वीही ते नोकरी सांभाळून शेती करायचे. निवृत्तीनंतर शेतीत विविध प्रयोग सुरू केले.
गुणवैशिष्ट्ये
- अभ्यास, शिकण्याची आवड, तंत्रज्ञान व तज्ज्ञांचे मार्गदर्शन
- कृषी विभाग, अात्मा यंत्रणा, सरकारी व खासगी बियाणे कंपन्यांसोबत सातत्याने संपर्कात
- अॅग्रोवनचे अत्यंत जुने वाचक. त्यातील यशकथा, पीक सल्ले यांचे नियमित वाचक
उत्पन्नस्त्रोत सांगणारी शेतीची घडी
हंगामी पिके, भाजीपाला पिके, दुग्धव्यवसाय, परसबागेतील कोंबडीपालन, बीजोत्पादन
पीकपद्धती
- दरवर्षी १६ एकरांत सोयाबीन
- उर्वरीत क्षेत्रावर हळद, फ्लॉवर, मिरची
- रब्बीत गहू, हरभरा, कांदा, बीजोत्पादन
पीक प्रयोगशीलता
- बीजोत्पादन- कांदा, हरभरा, तूर, उडीद, मूग, गहू
- बीजोत्पादन करीत असल्याने त्या-त्या वाणाला बाजारभावापेक्षा किमान सव्वा ते दीडपट अधिकचा दर ते पदरात पाडून घेतात.
- महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले संगम या सोयाबनीच्या वाणाचे बीजोत्पादन.
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उडीदाच्या नव्या वाणाचे बीजोत्पादन
- इक्रिसॅट संस्थेच्या १३० दिवसांत येणाऱ्या तुरीच्या वाणाचा प्रयोग
- पायाभूत व मूलभूत बियाण्यांची उपलब्धता करून घेतात.
- कृषी विद्यापीठाने पूर्व प्रसारीत केलेल्या वाणाची लागवड करून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न
- उन्हाळ्यात लग्नसराईस असलेली मागणी पाहून वांग्याची दरवर्षी जानेवारीत लागवड.
- त्याचे एकरी २० टनांपर्यंत उत्पादन
- फ्लॉवर पिकास मजुरांची कमी गरज लागते. हे अभ्यासून दर पावसाळा व रब्बीत त्याची लागवड
- कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ. त्या दृष्टीने पॅकहाऊस, पेरणीयंत्र.
- पाण्याचे स्त्रोत कायम टिकवण्यासाठी उताराला अाडवी पेरणी
- शेताजवळील नाल्याचे खोलीकरण करण्यासाठी, शेतरस्ते बनविण्यासाठी पुढाकार
- उत्पादन वाढीसाठी विविध उपाययोजना करतानाच शेतीतील खर्च कमी करण्याचा प्रयत्न
- रासायनिक खतांचा वापर कमी करून शेणखताचा अधिकाधिक वापर. निंबोळी अर्क व गोमूत्राची फवारणी
घरबसल्या बाजारपेठ मिळवली
- शेगोकार यांनी बहुतांश मालाला खात्रीशीर बाजारपेठ मिळवली अाहे.
- हळद, मोहरी, गहू, रब्बी ज्वारी, मोहरी आदी माल ते पॅकिंगद्वारे विकतात.
बाजारपेठ
प्रदर्शने
उदा. अकोला येथील वावर प्रदर्शन- तीन दिवसीय
होणारी विक्री -
हळद, गहू - सुमारे ५० हजार ते त्याहून अधिक
अकोला येथील कृषी विद्यापीठाचे प्रदर्शन (तीन दिवसीय)
तयार झालेले ग्राहक
प्रदर्शनाद्वारे अनेक ग्राहक तयार केले. ते एक किलो, पाच किलो आदी पॅकिंगमधून घरून माल घेऊन जातात.
उदा. गहू १२ एकरांवर असतो. एकरी १८ क्विंटलपासून ते कमाल २४ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे. त्याची हंगामात एकूण ८० ते कमाल १५०, २०० क्विंटल विक्री होते.
हळद-१४० क्विंटल (घरून तसेच प्रदर्शनाद्वारे )
ग्राहकांचा दरवर्षी वाढता प्रतिसाद
पूरक व्यवसायांची जोड
- भाकड म्हशी खरेदी करून दुभत्या झाल्यानंतर त्यांची विक्री करायचा अशी शेगोकार यांची पद्धती होती. पूर्वी १२ म्हशी होत्या. दहांची विक्री केली. आज दोनच म्हशी ठेवल्या आहेत.
- दररोजचे संकलन सुमारे ९ लिटर
- स्थानिक डेअरीला ४५ रुपये प्रति लिटर दराने विक्री
- दरवर्षी शेतीसाठी शेणखत उपलब्ध होते. पाच ते सहा एकरांत त्याचा वापर होतो.
परसबागेतील कुक्कुटपालन
- चार वर्षांपासून परसबागेतील कुक्कुट पालन
- सध्या ७५ गावरान कोंबड्या अाहेत. पैकी १० कडकनाथ पक्षी आहेत.
- अंडी अाणि कोंबडी विक्रीतून वर्षाकाठी ५० ते ५५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
मुलांना दिले उच्चशिक्षण
शेगोकार यांनी हलाखीच्या परिस्थितीतून कुटुंबाला उभारी दिली अाहे. राज्य परिवहन महामंडळात वाहकाची नोकरी करतानाच त्यांनी कुटुंबाचा गाडा व्यवस्थित चालविला. मुलांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. एक मुलगा आत्मा विभागात तर दुसरा महावितरण येथे कार्यरत आहे. एका मुलीने बीएएमएसची पदवी घेतली असून ती प्रॅक्टीस करते आहे. तर दुसरी कला विषयातून पदव्युत्तर झाली आहे. शेतीची संपूर्ण जबाबदारी शेगोकार स्वतः सांभाळतात.
संपर्क- मनोहर शेगोकार - ९४०४२६३१३१
फोटो गॅलरी
- 1 of 656
- ››