अडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन

उसाच्या चांगल्या वाढीसाठी एकात्मिक खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
उसाच्या चांगल्या वाढीसाठी एकात्मिक खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

अडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन पीक फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय खतांची कमतरता, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अवर्षण परिस्थिती किंवा पाण्याचा जास्त वापर आणि निचऱ्याचा अभाव यामुळे क्षारयुक्त चोपण जमिनीची वाढती समस्या या बाबींमुळे राज्यात ऊस उत्पादकता घटलेली दिसून येते. जमिनीची व पिकाची अन्नद्रव्याची गरज रासायनिक, सेंद्रिय अथवा जिवाणूजन्य खते यांच्या एकत्रित वापरातूनच पूर्ण होऊ शकते. त्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करणे आवश्यक आहे.   अडसाली उसासाठी किमान तीन वर्षांतून एकदा तरी शेणखत अथवा कंपोस्टखत देण्याची शिफारस असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक कमी-जास्त होत आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटले आहे. परिणामी, जमिनीमधील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची संख्या घटली आहे. अशा सर्व घटकांचा परिणाम ऊस उत्पादकतेवर झाला आहे. हे टाळण्यासाठी मातीपरीक्षण करून, सेंद्रिय, रासायनिक व जिवाणू खतांचा योग्य वेळी व योग्य प्रमाणात वापर करण्याची आवश्यकता आहे. ऊस लागवडीचे अडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू असे  प्रमुख तीन हंगाम आहेत. प्रत्येक हंगामातील ऊसवाढीचा कालावधी हा वेगळा आहे. हंगामनिहाय ऊस जातींची निवड आणि खतांचा वापर केला पाहिजे.

  • अडसाली हंगामातील उसाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत केली जात असली तरी अद्याप काही ठिकाणी सुरू आहे.
  • या हंगामासाठी लागवड योग्य, मध्यम व उशिरा पक्व होणाऱ्या जाती निवडाव्यात. उदा. को ८६०३२, कोएम ०२६५, कोव्हीएसआय ९८०५, कोएम ८८१२१, कोएम ७७१४.
  • अडसाली हंगामातील ऊसवाढीचा कालावधी १६ ते १८ महिन्यांचा असतो. एक ते दोन खोडवे घेतल्यास हे पीक एकाच जमिनीत जवळपास तीन वर्षे राहते. त्यासाठी जमिनीत तीन वर्षांच्या दृष्टीने सेंद्रिय, रासायनिक खतांचा समतोल वापर आवश्यक आहे.
  • सेंद्रिय खत व्यवस्थापन ः  

  • पहिली फणपाळी देऊन ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर एकरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किवा कंपोस्ट खत पसरून टाकावे. ते रोटाव्हेटरच्या साह्याने जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर ऊस लागवडीआधी एकरी उर्वरित ५ टन शेणखत आणि रासायनिक खताचा पहिला हप्ता सरीमध्ये मातीत मिसळावा.
  • सेंद्रिय खतामुळे जमिनीत हवा व पाणी यांचे संतुलन राखले जाते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. निचरा सुधारतो. जिवाणूंची वाढ होते. रासायनिक खतांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. शेणखत किवा कंपोस्टखत पुरेसे नसल्यास प्रेसमड केक, कोंबडीखत, बायोकंपोस्ट, उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी अशा अनेक पर्यायांनी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळता येतात.
  •   रासायनिक खतांचा वापर :

  • अडसाली हंगामातील उसाचे उत्पादन जास्त असल्यामुळे अन्नद्रव्यांची गरजही जास्त असते. अडसाली ऊस पिकास ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद व १७० किलो पालाश प्रति हेक्टरी वापरण्याची शिफारस आहे. माती परीक्षण करून, त्यातील जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण जाणून तज्ज्ञांच्या साह्याने रासायनिक खतांची मात्रा ठरवावी.  
  • शिफारशीत खत मात्रा देते वेळी नत्र चार हप्त्यांत विभागून द्यावा. जमीन हलकी असल्यास नत्र ५ ते ६ वेळा विभागून द्यावा. उगवण ते फुटवे येईपर्यंत उसास नत्राची गरज फार कमी असते. त्यामुळे  १० टक्के नत्र लागवडीपूर्वी उगवणीसाठी, मुळांच्या व अंकुरांच्या जोमदार वाढीसाठी द्यावा. लागवडीवेळी स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० टक्के देणे फायदेशीर ठरते.
  • फुटवे फुटताना आणि त्यांच्या वाढीसाठी नत्राची गरज असते. लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी नत्राचा ४० टक्के दुसरा हप्ता व १२ ते १४ आठवड्यांनी ऊस कांड्यांवर आल्यानंतर नत्राचा १०  टक्के तिसरा हप्ता जमिनीत पेरून द्यावा.
  • उसाच्या जोमदार वाढीच्या वेळी सर्व अन्न घटक जास्त प्रमाणात शोषले जातात. मोठ्या बांधणीच्या वेळेस नत्राचा शेवटचा ४० टक्के हप्ता, स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० टक्के दुसरा हप्ता देणे आवश्यक आहे.
  • लागवडीनंतर ४ ते ५ महिन्यांपर्यंत रासायनिक खतांचे सर्व हप्ते पूर्ण करावेत.
  • जिवाणू खते व त्याचे प्रकार     जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जैविक खतांचा वापर करणे आवश्यक आहे. घनरूप व द्रवरूप स्वरूपातील जिवाणू खतांची तुलना करता द्रवरूप जिवाणू खते अनेक बाबतीत सरस असतात. द्रवरूप स्वरूपातील ॲसिटोबॅक्टर, अ‍ॅझोटोबॅक्टर, अ‍ॅझोस्पिरिलिअम, स्फुरद विरघळवणारे जिवाणू, पाचट कुजविणारे जिवाणू अशा जिवाणू खतांचा वापर करावा.

    नत्र स्थिर करणारे जिवाणू     वातावरणामध्ये ७८  टक्के नत्र वायूरूपात आहे. अ‍ॅसिटोबॅक्टर, अ‍ॅझोटोबॅक्टर, अ‍ॅझोस्पिरिलिअम व रायझोबिअम असे नत्र स्थिर करणारे जिवाणू हवेतील वायुरूप नत्र शोषून घेतात. त्याचे रूपांतर जमिनीमध्ये किंवा वनस्पतीमध्ये अमोनिया नत्रामध्ये करतात. नायट्रीफिकेशन क्रियेमध्ये अमोनिया नत्राचे रूपांतर नायट्रेट नत्रात होऊन ते पिकास मुळावाटे उपलब्ध होते. १ हेक्टर जमिनीत अ‍ॅझोटोबॅक्टर द्रवरूप जिवाणू खताची मात्रा २.५ लिटर इतकी द्यावी. जिवाणू खत ७५० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किंवा १५०० किलो शेणखत/ कंपोस्ट / मातीमध्ये मिसळून ते जमिनीत सर्वत्र समप्रमाणात पसरले जाईल असे मिसळावे. अ‍ॅसिटोबॅक्टर या जिवाणू खताची ऊस लागवडीआधी १ लिटर प्रति २५० लिटर पाणी याप्रमाणे बेणेप्रक्रिया करावी किंवा लागवडीनंतर ६० दिवसांनी उसाच्या पानांवर फवारणी केल्यास शिफारशीत नत्र खत मात्रेत ५० टक्के बचत करता येते.

    स्फुरद विरघळवणारे जिवाणू

  • जमिनीतील अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळविण्यासाठी स्फुरद विरघळवणारे द्रवरूप जिवाणू खत हेक्टरी २.५ लिटर प्रति १ बैलगाडी शेणखतात मिसळून लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे. या जिवाणू खतामुळे एक प्रकारचे आम्ल तयार होते. त्या आम्लामध्ये अविद्राव्य स्वरुपातील स्फुरदाचे विद्राव्य स्वरुपात रूपांतर होते.
  • अडसाली हंगामासाठी ऊसवाढीच्या अवस्थेमध्ये सेंद्रिय, रासायनिक, एकात्मिक आणि जैविक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे. उत्पादकता वाढीसोबत जमिनीची सुपीकताही जपणे शक्य होईल.
  • संपर्क ः महेश लांडगे, ९८२२५८४४६३ (श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड. ता. संगमनेर, जि. नगर)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com