गहू, हरभरा पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

गहू पिकांना मानवणारी थंडी आता सुरू होत आहे. या पिकाच्या उत्तम वाढीसाठी अन्नद्रव्याची पूर्तता शिफारशीप्रमाणे करावी.
गहू पिकांना मानवणारी थंडी आता सुरू होत आहे. या पिकाच्या उत्तम वाढीसाठी अन्नद्रव्याची पूर्तता शिफारशीप्रमाणे करावी.

या वर्षी परतीच्या पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने जमिनीच्या पूर्वमशागतीला तुलनेने उशीर झाला आहे. गहू व हरभरा पिकाची पेरणी करताना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. संतुलित अन्नद्रव्ये मिळाल्यामुळे शाश्वत उत्पादन मिळू शकेल. 

पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रथम माती परीक्षण करून घेणे आवश्यक असते. त्याद्वारे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक शिफारशीप्रमाणे संतुलित अन्नद्रव्ये पुरवता येतात. सेंद्रिय कर्बासाठी सेंद्रिय खतांच्या शिफारशीप्रमाणे शेणखत, गांडूळखत किंवा कंपोस्ट खत वापरावे. जमिनीतील कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. लागवडीपूर्वी बियाण्यांवर जीवाणू खतांची प्रक्रिया करावी. जमिनीच्या पोताप्रमाणे लागवड पद्धती व पाणी व्यवस्थापन करावे.  जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांचा वापर करावा. उदा. जमीन चोपण असल्यास गव्हाचे बियाणे एकरी ४० किलो ऐवजी ५० किलो पेरावे. तसेच नत्राचे प्रमाणसुद्धा २५ टक्क्यांनी वाढवावे. हरभरा भारी काळ्या जमिनीमध्ये पेरावयाचा असल्यास सरी वरंबा पाडून वरंब्याच्या बगलात टोकण पद्धतीने बी टोकावे. सर्वसाधारणपणे जमिनीमध्ये दोन चाड्याच्या पाभरीने हरभरा व रासायनिक खत पेरून द्यावे. 

गहू एकात्मिक   अन्नद्रव्य व्यवस्थापन

  • शेणखत : ४ टन/एकरी  
  • बीजप्रक्रिया : अ‍ॅझोटोबॅक्टर १ किलो प्रति ४० किलो बियाण्यास चोळावे.  
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये : जस्त कमतरता जमिनीत (०.६ पीपीएमपेक्षा कमी असल्यास) ८ किलो झिंक सल्फेट पेरणीच्या वेळी बेसल डोस बरोबर द्यावे. शिफारशीप्रमाणे गहू पिकास नत्र ४८ किलो, स्फुरद २४ किलो 
  • व पालाश १६ किलो प्रति एकरी द्यावे. 
  • जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांचा वापर पुढीलप्रमाणे ः  काळी चोपण भारी जमिनी किंवा तांबड्या रंगाच्या जमिनी (प्रति एकरी) अ) पेरणीवेळी : युरिया : ५० किलो (१ गोणी) सिंगल सुपर फॉस्फेट : १५० किलो (३ गोणी) म्युरेट ऑफ पोटॅश : २७ किलो (अर्धी गोणी) ब) पेरणीनंतर एका महिन्याने :  युरिया : ५० किलो (१ गोणी) 

    क्षारयुक्त जमीन (पृष्ठभागावर पांढरे क्षार असल्यास) (प्रति एकर)  अ) पेरणीवेळी : १०:२६:२६ : ६१ किलो (१ गोणी) सिंगल सुपर फॉस्फेट : ३१ किलो (अर्धी गोणी) युरिया : ४६ किलो (१ गोणी) ब) पेरणीनंतर एका महिन्याने : युरिया : ४५ किलो (१ गोणी)

    भुरकट जमिनी (चुनखडीयुक्त जमिनी) एकरी : अ) पेरणीवेळी : १८:४६:०० : ५२ किलो (१ गोणी) किंवा २४:२४:०० : १०० किलो (२ गोणी) म्युरेट ऑफ पोटॅश: २७ किलो (अर्धी गोणी) युरिया : ४२ किलो (१ गोणी) ब) पेरणीनंतर एका महिन्याने: युरिया : ४२ किलो (१ गोणी)

    सर्वसाधारण जमिनी (एकरी) : २०:२०:०० : ८३ किलो (२ गोणी) म्युरेट ऑफ पोटॅश (MOP): ३३ किलो  किंवा  पेरणीवेळी -१९:१९:१९ : १२६ किलो (अडीच गोणी) पेरणीनंतर एका महिन्याने - युरिया : ६३ किलो (एक गोणी) किंवा  पेरणीवेळी - १५:१५:१५ :१०० किलो (२ गोणी) आणि  सिंगल सुपर फॉस्फेट : ५६ किलो (१ गोणी) पेरणीनंतर एका महिन्याने- युरिया ७१ किलो (१ गोणी)

    टीप ः  माती परीक्षण अहवालानुसार वरील खतांमध्ये बदल करावेत. उदा. नत्राचे प्रमाण जमिनीत मध्यम असल्यास वरीलप्रमाणे शिफारशीप्रमाणे द्यावे.

  • नत्र जास्त असल्यास खतमात्रा २५ टक्क्यांनी कमी करावी, कमी असल्यास खतमात्रा २५ टक्क्यांनी जास्त वापरावी. 
  • फुले द्रवरूप मायक्रोग्रेड २ ची फवारणी दोन वेळा पेरणीनंतर ३५ व ४५ दिवसांनी करावी. (प्रमाण ः १०० मिली/१० लिटर)
  • गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या काळात पाणीटंचाई भासल्यास २ टक्के युरियाची फवारणी करावी.
  • हरभरा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन 
  • शेणखत : २ टन/एकरी  
  • बीजप्रक्रिया : रायझोबियम ७५० ग्रॅम प्रति ३० किलो बियाण्यास चोळावे. 
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये कमतरतेनुसार : जस्त कमतरता जमिनीत (०.६ पीपीएम पेक्षा कमी असल्यास) ८ किलो झिंक सल्फेट आणि लोहाची कमतरता असल्यास १० किलो फेरस सल्फेट पेरणीच्या वेळी बेसल डोस बरोबर द्यावे. शिफारशीप्रमाणे हरभरा पिकास नत्र १० किलो, स्फुरद २० किलो व पालाश १२ किलो प्रती एकरी द्यावे. 
  • जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांचा वापर 

  • काळी जमीन किंवा तांबड्या रंगाच्या जमिनी (एकरी)
  • युरिया : २२ किलो (अर्धी गोणी)
  • सिंगल सुपर फॉस्फेट : १२५ किलो (अडीच गोणी)
  • म्युरेट ऑफ पोटॅश : २० किलो (अर्धी गोणी)
  • भुरकट चुनखडीयुक्त जमिनीत (एकरी)  १८:४६:०० : ४४ किलो (१ गोणी)  म्युरेट ऑफ पोटॅश : २७ किलो (अर्धी गोणी)

  • सर्वसाधारण जमिनीत (एकरी)
  • २४:२४:० - ८३ किलो (दीड गोणी)
  • म्युरेट ऑफ पोटॅश: २७ किलो (अर्धी गोणी)
  • किंवा १५:१५:१५- ८० किलो (अर्धी गोणी)
  • किंवा १९:१९:१९- ६३ किलो (दीड गोणी)
  • किंवा १०:२६:२६- ७६ किलो (दीड गोणी) 
  • किंवा २०:२०:००- १०० किलो (२ गोणी)
  • म्युरेट ऑफ पोटॅश: २० किलो (अर्धी गोणी)
  • टीप :  शिफारशीत खतमात्रा पेरणीच्या वेळी एकाच वेळी पेरून द्यावी.

  • हरभऱ्यावर फुले सुरू होताच फुले द्रवरूप मायक्रोग्रेड २ ची फवारणी आठ दिवसाच्या अंतराने दोन वेळा करावी. (प्रमाण ः १०० मिली/१० लिटर)
  • हरभऱ्याला दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी कमी पडल्यास पिकावर पोटॅशियम नायट्रेटची (१३:००:४५) १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  •  डॉ. प्रकाश तापकीर, ९४२१८३७१८६  डॉ. अनिल दुरगुडे, ९४२०००७७३१ (डॉ. दुरगुडे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे तर डॉ. तापकीर हे खासगी कंपनीमध्ये कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com