एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी नियंत्रण सुकर

कामगंध सापळ्यांची शेतकऱ्यांच्या शेतात उभारणी
कामगंध सापळ्यांची शेतकऱ्यांच्या शेतात उभारणी

नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील २० गावांत ‘आयपीएम स्कूल’ हा एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन प्रकल्प यशस्वी पार पाडला. अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण हा त्यामागील उद्देश होता. त्यातून कामगंध सापळ्यांची उभारणी, प्रात्यक्षिके, प्रशिक्षण, जैविक घटकांचा वापर, पक्षीथांबे आदी घटकांविषयही प्रात्यक्षिके देण्यात आली. महाविद्यालय, शेतकरी, खाजगी कंपनी व विद्यार्थ्यी अशा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे उद्दीष्ट साध्य करता आले. त्यातून सहाशेवर शेतकरी जागरूक झाले. एकात्मीक कीड नियंत्रण पद्धतींचा वापराला अधिक चालना मिळाली. अळीचे नियंत्रण सुलभ होण्यास मदत झाली.   अमेरिकन लष्करी अळीने मका पिकात संपूर्ण राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. अळीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने तातडीची पाऊले उचलली. महाविद्यालयातील कीटकशास्त्र विषयातील प्राध्यापकांनी आपल्या सुमारे १३२ विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यांच्या मदतीने तीन तालुक्यांतील २० गावांत ‘आयपीएम स्कूल’ नावाने एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन प्रकल्प राबवला. त्यातून सहाशे ते आठशे शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व प्रबोधन झालेच. शिवाय त्यांच्या शेतात प्रात्यक्षिके राबवून पुढील कीड नियंत्रणाचा मार्गही सुकर करण्यात आला. अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) अळीने राज्यातील मका, ज्वारी, बाजरी, ऊस पिकांत मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे. त्यामुळे मक्याचे ४० टक्क्यांपासून ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना मक्याचे प्लॉट सोडून द्यावे लागले. परिस्थितीचे गांभीर्य वेळीच ओळखून नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने तातडीने पाऊले उचलण्यास सुरवात केली. केवळ सल्ला व मार्गदर्शन करून हे संकट आटोक्यात येणारे नव्हते. शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवून अळीचे नियंत्रण यशस्वी होऊ शकते, असा आशादायी संदेशही दिला. असा राबविला प्रत्यक्ष कृती कार्यक्रम नाशिक जिल्हा - मका क्षेत्र -

  • जिल्ह्यातील एकूण मका लागवड - २ लाख, ९ हजार, ८५६ हेक्टर
  • अळीमुळे प्रादुर्भाव झालेले क्षेत्र - ४९ हजार ९९३ हेक्टर
  • बाधित शेतकरी : - ३६ हजार ६७५
  • जिल्ह्यातील प्रादुर्भावग्रस्त गावे - ७६६
  • या कार्यक्रमात चांदवड, निफाड व दिंडोरी असे तीन तालुके व त्यातील २० गावे निश्‍चित केली.
  • महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाचे तज्ज्ञ व सहायक प्राध्यापक तुषार उगले यांनी कार्यक्रमाची संकल्पना तयार केली.
  • यंदाच्या जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (रावे) विद्यार्थ्यांना गावे व शेतकरी वाटप केले. अळी विषयीची संपूर्ण माहिती व नियंत्रणाचे प्रशिक्षण त्यांना दिले.
  • खासगी कंपनीच्या प्रतिनिधींचे लेक्चर आयोजित केले.
  • कार्यक्रमाचे ‘आयपीएम स्कूल’ (एकात्मिक कीड व्यवस्थापन) असे नामकरण केले.
  • नाशिक येथील अनंतवर्षा फाउंडेशनचे अनंत व सौ. वर्षा या बनसोडे दांपत्याने
  • अळी नियंत्रण विषयातील भित्तीपत्रके, घडीपत्रिका साहित्य प्रसिद्धीचा खर्च उचलला.
  • अळीच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळे व ल्यूर्स पुरवण्याची जबाबदारी नाशिक येथील उद्योजक महेश सोनकुळ यांनी स्वीकारली.
  • कामगंध सापळ्यांची उभारणी प्रत्येक गावात पाच असे वीस गावांमध्ये शंभर सापळे लावण्यात आले. त्यामध्ये निवडलेल्या २० गावांतील प्रत्येक समूहातील एक विद्यार्थी गटप्रमुख म्हणून नेमण्यात आला. विद्यार्थ्यांनी दर चार दिवसांनी सापळ्यात अडकलेल्या पतंगांच्या नोंदी ठेवल्या. सापळा कोणत्या क्षेत्रात लावला आहे ते पाहण्यासाठी ‘जीपीएस’ तंत्रज्ञान व विशिष्ट ॲपचा वापर झाला. या बाबी ठरल्या महत्त्वाच्या

  • विद्यार्थ्यांनी गावागावात जाऊन भित्तीपत्रके, घडीपत्रिकांचे वितरण केले.
  • अ‍ॅग्रोवनमध्ये प्रकाशित एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि लष्करी अळी नियंत्रणासंबंधीचे लेख व कात्रणे शेतकऱ्यांपर्यंत पुरविली.
  • पक्षी थांबे, प्रकाश सापळे, निंबोळी अर्कनिर्मिती व फवारणी यांचीही प्रात्यक्षिके त्यांनी शेतकऱ्यांना दाखविली. किडींच्या विविध अवस्था प्रत्यक्ष शेतात शेतकऱ्यांना दाखवल्या.
  • कार्यक्रमातील तंत्र, दैनंदिन नोंदी व माहितीची देवाणघेवाण होण्यासाठी ‘IPM School for FAW’ (लष्करी अळीसाठी आयपीएम स्कूल) नावाने व्हॉटसॲप ग्रुप तयार केला.
  • कार्यक्रमातून साध्य झालेल्या बाबी

  • मक्याच्या काही प्लॉटसमध्ये लष्करी अळीचे नियंत्रण मित्रबुरशींद्वारे झाल्याची नोंद घेण्यात आली.
  • सापळ्यात तसेच सायंकाळी ६ ते रात्री १० या दरम्यान अनेक पतंग प्रकाश सापळ्यात अडकले.
  • पक्षी थांबे लावल्याने अळीचा प्रादुर्भाव कमी आढळला.
  • सुमारे ६०० ते ८०० शेतकरी लष्करी अळी नियंत्रणाविषयी जागरूक झाले.
  • सुमारे १३२ विद्यार्थ्यांमध्यही ज्ञानवृध्दी होऊन त्यांनी प्रॅक्टीकलचा अनुभव घेतला.
  • गंध सापळ्यांचे तंत्र शेतकऱ्यनी आत्मसात केले. एका शेतकऱ्याने स्वखर्चाने सापळे घेऊन त्यांचा वापर केला.
  • एकात्मिक कीड व्यवस्थापन संकल्पना शेतकऱ्यांत रुजण्यास मदत झाली.
  • रासायनिकसह जैविक कीडनाशकांचाही वापर झाला.
  • संपर्क- तुषार उगले-  ९४२०२३३४६६ (सहायक प्राध्यापक, कीटकशास्र विभाग, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com