फळबागांसह एकात्मिक शेतीने जोडले उत्पन्नाचे स्रोत

गंजेवाडी (जि. उस्मानाबाद) येथील सुदर्शन जाधव हे प्रयोगशील, निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार म्हणून ओळखले जातात. त्या व्यतिरिक्त पडजमीन, प्रत्येक बांध याप्रमाणे विविध फळपिकांची समृद्धी त्यांनी उभारली आहे. पूरक व्यवसायांची जोड व उत्पन्नाचे स्रोत जोडत एकात्मिक शेती त्यांनी यशस्वी केली आहे.
सुदर्शन जाधव आणि कुटुंबीय.
सुदर्शन जाधव आणि कुटुंबीय.

गंजेवाडी (जि. उस्मानाबाद) येथील सुदर्शन जाधव हे प्रयोगशील, निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार म्हणून ओळखले जातात. त्या व्यतिरिक्त पडजमीन, प्रत्येक बांध याप्रमाणे विविध फळपिकांची समृद्धी त्यांनी उभारली आहे. पूरक व्यवसायांची जोड व उत्पन्नाचे स्रोत जोडत एकात्मिक शेती त्यांनी यशस्वी केली आहे.   सोलापूर-तुळजापूर महामार्गावर तुळजापूर तालुक्यात गंजेवाडी हे छोटेसे गाव आहे. गंजेवाडी, सावरगाव, माळुंब्रा हा फार पूर्वीपासून द्राक्षपट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. विहीर, बोअर, शेततळे यांसारख्या स्रोतांवरच या भागातील शेती तग धरून आहे. एकट्या गंजेवाडीत द्राक्षाचे क्षेत्र ५० एकरांहून अधिक आहे. पाण्याची जेमतेम उपलब्धता असतानाही द्राक्षासारख्या संवेदनशील फळपिकाकडे या भागातील शेतकरी वळले, त्यावरूनच त्यांच्यातील प्रयोगशीलता दिसून येते. एकत्रित कुटुंबाची शेती गावात सुदर्शन, रामदास आणि संभाजी या बंधूंची एकत्रित शेती आहे. आई, वडील, बहीण, घरच्या सुना असा सुमारे १५ सदस्यांचा संयुक्त परिवार गुण्यागोविंदाने एकत्र नांदतो. वडील शिवाजी एसटीच्या सेवेतून वाहक म्हणून निवृत्त झाले आहेत. गावानजीक जळकोटवाडीत सुदर्शन यांचे मामा आबासाहेब बोबडे यांची द्राक्ष बाग होती. त्यांच्या आग्रहानेच २००५ मध्ये एक एकर द्राक्ष बाग घेतली. उत्पादन व दरही चांगला मिळाला. त्यातून उत्साह वाढला. पुढील दोन-तीन वर्षांत पाच एकरांपर्यंत द्राक्षक्षेत्र विस्तारले. दरम्यान रामदास बी.ए.डी.एड. तर संभाजी यांनीही बी.ए.बी.एड.डी.एड.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या शोधात वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी थेट शेतीत लक्ष घातले. हाच त्यांच्या शेतीतील प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा ठरला. तिघा भावांची ताकद तयार झाली. त्यातून नऊ एकरांपर्यंत द्राक्षक्षेत्र वाढले. निर्यातक्षम उत्पादन ते घेऊ लागले. आज वर्षाला ५० टनांपर्यंत निर्यात होते. शेतीतील बाबी

  • एकूण शेती- ३७ एकर, द्राक्ष- नऊ एकर
  • द्राक्ष वाण- ३ एकर थॉम्पसन, ३ एकर क्लोन टू, दोन एकर एसएसएन, एक एकर सुपरसोनाका
  • बाकी क्षेत्रावर भुईमूग, ज्वारी, हरभरा, कांदा
  • बाकी अन्य क्षेत्रावर गोठा व अन्य पिके.
  • द्राक्षाचे एकरी १२ ते १४ टन उत्पादन. त्यातील ८ टन निर्यातीसाठी.
  • प्रामुख्याने १५ ऑक्टोबरनंतर गोडी छाटणी
  • प्रत्येकी दहा दिवसांनी एकर ते सव्वा एकराचे टप्पे
  • काढणीपर्यंत कीडनाशक व अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे शेड्यूल
  • शेण, गोमूत्राचाही वापर
  • पडजमीन, बांधावर मिश्रफळे द्राक्ष बागांच्या चोहोबाजूंना बांधावर, पडजमीन, मोकळ्या जागांवर विविध फळांची विविधता तयार केली आहे. केसर आंबा ६०, देशी १०, बदाम-नीलमची १० झाडे, ईडलिंबू २०, रामफळ १२५, ‘एनएमके’ सीताफळ ६०, कालीपती चिकू २५, नारळ २५, पेरू आणि मोसंबीची प्रत्येकी १५ अशी ही समृद्धी आहे. काही नवी लागवड आहे. काहींचे उत्पादन सुरू आहे. ईडलिंबू वर्षभर, जानेवारीत चिकू, फेब्रुवारी- मार्चमध्ये द्राक्ष, एप्रिलमध्ये रामफळ, एप्रिल ते मे आंबा, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सीताफळ असे वर्षभर उत्पादन मिळत राहील असा प्रयत्न असतो. घरी आणि पै पाहुण्यांनाही फळांची मेजवानी देण्यातही जाधव कुटुंबाला वेगळा आनंद मिळतो. बांधावरील फळांसाठी वेगळे व्यवस्थापन काही करावे लागत नाही. सर्व झाडांना ठिबक संचाची लाइन सोडली आहे. कमी खर्च व देखभालीत ही झाडे उत्पन्नस्रोत म्हणून तयार झाली आहेत. उत्पादन

  • सर्व मिळून आंब्याचे- एक ते दीड टन. दर- किलो १०० ते १२५ रु.
  • ईडलिंबू प्रति झाड ३० ते ५० नग. दर- प्रति नग ३० ते ४० रुपये दर
  • सीताफळ- प्रति झाड १५ ते २० किलो- दर- प्रतिकिलो ७० ते ९०, १०० रु.
  • चिकू- दर- प्रति किलो ३० ते ४० रु.
  • मार्केट युरोपीय देशांसह अन्य देशांना द्राक्ष निर्यात होते. निर्यातदार कंपनीला माल पुरवला जातो. बांधावरील फळे सोलापूर मार्केटला पाठवतात. काही वेळा बांधावरूनही विक्री होते. लोणच्याच्या आंब्यासाठी, केसर आंब्याला अनेक वेळा ग्राहक थेट शेतात येतात. ईडलिंबूसाठीही कायम ग्राहक उपलब्ध असतो. पाणी, विजेचा शाश्‍वत पर्याय पाण्यासाठी सामूहिक शेततळे योजनेतून सव्वा एकरात सुमारे एक कोटी लिटर साठवण क्षमतेचे शेततळे घेतले आहे. त्यात विहीर आणि गावानजीकच्या लघू तलावातून पाणी आणून साठवले जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विजेचा वापर अत्यंत कमी वेळा होतो. त्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री कृषिपंप सौर योजनेतून पाच पंप घेतले आहेत. अशा रीतीने एकीकडे शेततळ्यातून पाण्याचा आणि दुसरीकडे विजेचा शाश्‍वत स्रोत तयार केला आहे. उल्लेखनीय बाबी

  • खरड छाटणीनंतर विरळणीमध्ये काड्यांची संख्या जास्त ठेवतात. तयार झालेल्या काड्यांची ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रोपवाटिका व्यावसायिकांना कलमांसाठी विक्री.
  • प्रति डोळा एक ते दोन रुपये असा दर. त्यातून ३५ ते ४० हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवतात.
  • पॅकहाउस, विहीर, जनावरांचा गोठा, विहीर पुनर्भरण, ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, बीबीएफ पेरणी यंत्र, कडबाकुट्टी, ठिबक संच, फायटर इंजिन, कांदा चाळ आदी विविध सुविधा.
  • शासनाच्या सर्व योजनांचा लाभ
  • शेतातील वस्तीवर कुटुंबांसाठी चार ते पाच गुंठ्यांची परसबाग. त्यात मिरची, कांदा, टोमॅटो, गवती चहासह अन्य भाजीपाला. संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने उत्पादन.
  • अर्धबंदिस्त शेळीपालन. २५ लहान-मोठ्या शेळ्या. शिवाय कोंबडीपालन. तेवढ्याच संख्येने पक्षी.
  • संपर्क- सुदर्शन जाधव, ९७६५९१९५८१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com