शेतकरी गट ते कंपनी चांगदेवच्या शेतकऱ्यांची भरारी

 कृषी विज्ञान मंडळाचे सदस्य आपल्या क्लिनिंग, ग्रेडिंग युनिटमध्ये
कृषी विज्ञान मंडळाचे सदस्य आपल्या क्लिनिंग, ग्रेडिंग युनिटमध्ये

चांगदेव (जि. जळगाव) येथे शेतकऱ्यांनी सातत्याने विविध उपक्रम राबवत बचत गट, कृषी मंडळ व आता शेतकरी कंपनी स्थापन करण्यापर्यंत भरारी घेतली आहे. अवजारांचा पुरवठा, बियाणेनिर्मिती व प्रक्रिया यांच्या माध्यमातून वार्षिक काही लाख ते दोन कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंतचा यशस्वी टप्पा गाठला आहे. जळगाव जिल्ह्यातील चांगदेव (ता. मुक्ताईनगर) हे तापी नदीच्या काठी वसलेले गाव आहे. गावच्या काळ्या, कसदार जमिनीत केळी, कपाशी, मका आदी पिके घेण्यात येतात. केळी बागायतदार गावात अधिक संख्येने आहेत. तुटपुंजे मजूरबळ, वाढते खर्च पाहता नगदी पिकांमध्ये अवजारांचा वापर वाढला आहे. मात्र, सर्वच शेतकऱ्यांना ती घेणे परवडतही नाही. हा कळीचा मुद्दा लक्षात घेऊन गावातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वीर गुर्जर शेतकरी बचत गटाची स्थापना केली. कमी दरात कृषी अवजारे व अन्य साहित्य भाडेतत्त्वावर देण्याचे त्यात उद्दिष्ट ठेवण्यात आले. गोकुळ श्रावण पाटील यांच्यासह त्यांच्या सुमारे ११ शेतकऱ्यांचा गटात समावेश झाला. अवजारे उपलब्धता कार्यपद्धती

  • सुरुवातीला गटाने बैलजोडीचलित अवजारे घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी प्रत्येक सदस्याने २०० रुपये प्रतिमहिना निधी संकलित केला. सहा महिने हे काम सतत सुरू होते. सोबतच अवजारे वापरापोटी शेतकऱ्यांकडून भाडेशुल्कही येत होते. हळूहळू उत्पन्नात भर पडत गेली. आजघडीला एकूण २५ लाख रुपयांची अवजारे या गटाकडे आहेत.
  • गटाकडे कीडनाशके फवारणीसंबंधीचे ५० पंप. २० रुपये प्रतिदिन प्रतिपंप त्याचे भाडेशुल्क.
  • बैलजोडीचलित कोळपे, वखर, हरभरा, मका व गहू पेरणी यंत्र, केळीच्या झाडांना माती लावण्याचे अवजार, सायकलचलित कोळपे
  • पाण्याचे दोन टँकर (प्रति टँकर पाच हजार लीटर क्षमता), प्लॅस्टिकच्या मोठ्या ८० टोपल्या, ५०० व २०० लिटर क्षमतेच्या २० प्लॅस्टिक टाक्‍या. लग्न व अन्य कार्यात स्वयंपाकासाठी गॅसचलित शेगड्या.
  • बैलजोडीचलित अवजारांचे ५० रुपये प्रतिदिन तर ट्रॅक्टरचलित अवजारांचे २०० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत भाडेशुल्क प्रति दिन
  • टँकर ३०० रुपये प्रतिदिन
  • ट्रॅक्‍टरचलित अवजारांत सऱ्या पाडणी यंत्र, केळीची खोडे काढण्यासाठी यू पास, कपाशी काढणीसाठी व्ही पास, कलिंगडासाठी गादीवाफे तयार करणारे यंत्र, जमीन सपाटीकरण, वरंबा तयार करणारे,
  • केळीची खोडे काढून जमीन भुसभुसीत करणारे आदींचा समावेश.
  • कृषी विभागाकडून अनुदान तत्त्वावर ट्रॅक्‍टर व अवजारे घेतली.
  • या शुल्कातून मिळणारे उत्पन्न शेतीविकास उपक्रमांवर खर्च करण्याकडे गटाचा कल.
  • कृषी विज्ञान मंडळाचे गोदाम व प्रक्रिया युनिट

  • बचत गटातील गोकूळ श्रावण पाटील व अन्य तिघांनी पुढाकार घेऊन श्रीकृष्ण कृषी विज्ञान मंडळाची २००८-०९ मध्ये स्थापना केली. हरभरा बीजोत्पादन उपक्रम त्यामार्फत राबवण्यात येतो.
  • दरवर्षी किमान ३०० क्विंटल प्रमाणित बियाण्याची विक्री खासगी कृषी केंद्र व मंडळाकडून केली जाते. शासन निर्देशित किंवा माफक दरात हे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात येते. मंडळाकडे बीज प्रक्रिया युनिटही आहे.
  • अन्य शेतकऱ्यांना साठ रुपये प्रतिक्विंटल दरात धान्याची स्वच्छता, प्रतवारीदेखील या युनिटद्वारे करून दिले जाते. चांगदेवनजीकच्या चिंचोल, मेहूण, वाढवा, कासारखेडा या गावांमधील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो.
  • यांत्रिकीकरण योजनेतून मंडळाने ट्रॅक्‍टर व ट्रॅक्‍टरचलित अवजारेही घेतली आहेत. अडीच लाख रुपये त्यासाठी खर्च केला. त्यात ट्रॅक्‍टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र उपलब्ध झाली. त्याचा उपयोग मंडळातील सदस्यांना आपल्या शेतीतही होतो.
  • मंडळाने गावातच युरिया- डीएपी मिश्रित ब्रिकेटसनिर्मितीचा उपक्रम सुरू केला आहे. यात २.८ ग्रॅमची ब्रिकेट बनविण्याचे तंत्र असून केळी उत्पादकांना त्याचा लाभ होतो.
  • शेतकरी कंपनीची स्थापना

  • बचत गट व मंडळाचा पुढील टप्पा म्हणून या शेतकऱ्यांनी २०१५ मध्ये संत चांगदेव तापी पूर्णा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. आरती राजेंद्र चौधरी कंपनीच्या अध्यक्ष आहेत.
  • ११ संचालक असून पाच गावांमध्ये त्या अंतर्गत १० शेतकरी गट स्थापन केले आहेत. १५ शेतकरी प्रत्येक गटात आहेत.
  • एकूण ५३६ सदस्य शेतकऱ्यांनी ८ लाख १३ हजार भागभांडवल उभे केले आहे.
  • अठरा लाख रुपयांच्या निधीतून मका ड्रायर घेतले आहे. गटाला आत्मा अंतर्गत साडेतेरा लाख रुपये अनुदान मिळाले आहे. सुमारे १,६५० चौरस फुटात गोदाम उभारले आहे. माल साठवणुकीच्या गोदामासह धान्य प्रक्रिया युनिटचे कामही साडेचारहजार चौरस फूट जागेत वेगात सुरू आहे. साठ लाख रुपये खर्च त्यास अपेक्षित आहे. ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार आहे.
  • गावात खते, कीडनाशके, पीव्हीसी, ठिबक लॅटरल्स व किरकोळ साहित्य विक्रीचे दुकानही सुरू केले आहे. माफक दरात शेती उपयोगी साहित्य, निविष्ठा या त्याद्वारे उपलब्ध केल्या जातात.
  • शासनाकडून सात लाख रुपये अनुदानाच्या मदतीने धान्य साठवणूक गोदामही गावातच उभारले आहे.
  • रोजगाराची हमी या उपक्रमातून १५ जणांना रोजगार मिळाला आहे. प्रक्रिया युनिटमध्ये कायमस्वरूपी ४० जणांना रोजगार मिळू शकेल. बीजोत्पादनासंबंधीच्या उपक्रमात १५ महिलांना जून ते ऑगस्ट कालावधीत काम मिळते. उलाढाल (रुपयांत)

  • शेतकरी बचत गट (प्रति महिना)
  • २०१८- ३५ हजार, प्रतिमहिना
  • २०१९- ३८ हजार, प्रतिमहिना
  • कृषी विज्ञान मंडळ (वार्षिक)
  • २०१८- ४८ लाख
  • २०१९- ४९ लाख
  • शेतकरी उत्पादक कंपनी (वार्षिक)
  • २०१९- दोन कोटी ४० लाख
  • यंदा- तीन कोटी अपेक्षित
  • गोकुळ पाटील-९१३०९१५५२५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com