अर्थकारण उंचावण्यासाठी मोसंबीसह पेरू, द्राक्षशेती

अर्थकारण उंचावण्यासाठी  मोसंबीसह पेरू, द्राक्षशेती
अर्थकारण उंचावण्यासाठी मोसंबीसह पेरू, द्राक्षशेती

अस्मानी, सुलतानी संकटे आली तरी त्यातून मार्ग काढत आपल्या फळबागा, शेतीपद्धती जपून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची कमतरता नाही. जालना जिल्ह्यातील सागरवाडी येथील दिलीपसिंह नागोसिंह बहुरे त्यापैकीच एक. खडकवाडी शिवारात २१ एकर बागायती शेती करताना मोसंबी सोबतच अलीकडेच पेरू व द्राक्षाची जोड त्यांनी दिली आहे. तीस वर्षांपूर्वी थेट शेतात वास्तव्यास दाखल झाल्यानंतर पाचटाच्या घरापासून आता काँक्रीटचं घर बांधण्यापर्यंतचा प्रवास या कुटुंबाने यशस्वी केला आहे.   जालना जिल्ह्यात बदनापूर तालुका मोसंबी पिकासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील सागरवाडी येथील बहुरे कुटुंबाची शेती आहे. १९९० मध्ये वाटणीला आलेली शेती कसण्यासाठी नागोसिंह बहुरे तीन मुलांसह गाव सोडून सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावरील शेतात वास्तव्यासाठी आले. निवाऱ्याचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी पाचटाच्या झोपडीचा मार्ग निवडला. शेतीत राबताना शिक्षण घेणारी दिलीपसिंह, संजय आणि प्रताप ही त्यांची मुलं शेतीकामात जमेल ती मदत करायची. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर २००१ च्या दरम्यान दिलीपसिंह पूर्णवेळ शेतीत उतरले. तर संजय व प्रताप या दोन भावंडांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. आज पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. दिलीपसिंह यांच्याकडे सुमारे २१ एकर शेतीची संपूर्ण जबाबदारी आहे. शेतीचा विस्तार सुरुवातीला कपाशी व तूर ही मुख्य पिके होती. १९९७-९८ मध्ये एक एकर मोसंबी लागवडीतून फळपिकांकडे वळलेल्या बहुरे यांच्याकडे आता १५ एकरांपर्यंत मोसंबी बागेचा विस्तार झाला आहे. आंबे व मृग असे दोन्ही बहार ते घेतात. केवळ मोसंबीवर अवलंबून राहणे शक्य नव्हते. त्यातच दुष्काळाचे संकट मराठवाड्यावर कायम घिरट्या घालते आहे. अशा वेळी तुलनेने पाणी कमी लागेल अशा पेरू पिकाची जोड दिलीपसिंह यांनी दिली. त्यानुसार २०१५-१६ मध्ये अडीच एकरांत पेरूच्या लखनौ ४९ जातीची लागवड केली. ही बाग आता उत्पादनक्षम झाली आहे. बागेत मोठ्या प्रमाणात पेरू लगडले आहेत. पहिल्यांदाच ही बाग मोसंबीप्रमाणे व्यापाऱ्याला दोन लाख ७० हजार रुपयांत दिली आहे. आत्तापर्यंत सुमारे ७०० क्रेटपर्यंत तोडणी झाली आहे. दीड एकरांत द्राक्षबाग मोसंबी आणि पेरूला आणखी एक जोड देण्याचे विचाराधीन असताना फळपिकांचे अर्थकारण समजून घेऊन द्राक्षाची निवड केली. त्यानुसार दीड एकरांत २०१८ मध्ये बाग उभी केल्यानंतर आता ती यंदा उत्पादन देण्यास तयार आहे. व्यवस्थापनासाठी आवश्‍यक ज्ञान जाणकारांकडून घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सुरू आहे. तीनही पिकांमध्ये दरवर्षी जानेवारीत शेणखत वापरण्यात येते. मोसंबीच्या आंबे बहारासाठी १० ते २० डिसेंबर दरम्यान उपलब्धतेनुसार मोकळे वा ठिबकने पाणी देऊन ताण तोडला जातो. चारशे ते पाचशे झाडांचा टप्पा पाडून ठिबकने पाणी देण्याचे तंत्र अवलंबितात. मोसंबीचे अर्थकारण आंबे बहरातून एकूण जवळपास ६० ते ७० टन, तर मृग बहरातून जवळपास ३० ते ११० टनांपर्यंत उत्पादन घेणे बहुरे यांना शक्य झाले आहे. यंदा मोसंबीचा मृग बहर २९ लाख ५० हजार रुपयांना त्यांनी बागवानाला दिला. आंबे बहराची फळे साडेदहा लाख रुपयांचे उत्पन्न देऊन गेली. दरवर्षी मोसंबीची बाग १८ लाख रुपयांपर्यंत एकूण उत्पन्न देऊन जाते. बांधावर फुलवली झाडे बहुरे यांनी बांधावरही विविध फळपिके व अन्य झाडे लावण्याला प्राधान्य दिलं आहे. खडकवाडी शिवारातील बागायती असलेल्या या २१ एकरांतील बांधावर सीताफळ, नारळ, चिंच, बांबू आदींची लागवड केली आहे. त्यात सीताफळाची शंभर, नारळाची तीस, चिंचेची वीस तर बांबूची शंभर झाडे आहेत. सात एकर कोरडवाहू शेती सागरवाडी गाव शिवारात आहे. त्यात बाजरी व ज्वारी असते. कुटुंबासाठी लागणारी बाजरी खरिपात तर रब्बीत जमिनीतील ओलावा पाहून ज्वारीचे नियोजन असते. शेतीतील ठळक बाबी

  • बागायती क्षेत्र ठिबक सिंचनावर
  • सिंचनासाठी दोन विहिरी व दोन मोठी शेततळी
  • फेब्रुवारी- मार्चपर्यंत विहिरीतून व नंतर शेततळ्यातील पाण्याचा वापर
  • बदनापूर संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या संपर्कातून घालतात शेतीज्ञानात भर.
  • संपर्क - दिलीपसिंह बहुरे - ९९२३५२४२६६  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com