फुलांनी घेतला आकार घडले सजावटीचे प्रकार

मद्दलवार यांच्याकडील फुलांचे बुके, हार व सजावट
मद्दलवार यांच्याकडील फुलांचे बुके, हार व सजावट

जालना जिल्ह्यातील पानशेंद्रा येथील मद्दलवार या एकत्रित कुटुंबाने फुलशेतीतून आपले घरचे अर्थकारण मजबूत केले आहे. हार, बुके, स्टेज व कार डेकोरेशन याप्रकारे फुलांचे मूल्यवर्धन व शॉपीद्वारे थेट विक्री करून व्यवसायातील नफा वाढवला. इतरांनाही रोजगार दिला. पानशेंद्रा (ता. जि. जालना) येथील मद्दलवार कुटुंबाचे नाव पंचक्रोशीत फुलशेतीमध्ये प्रसिद्ध झाले आहे. अनेक वर्षांपासून या कुटुंबाने फुलशेती टिकवून धरताना फुलांचे विविध प्रकारदेखील हाताळले आहेत. अशी आहे मद्दलवार यांची शेती कृष्णराव यांच्या तीन मुलांपैकी मोठा धर्मेंद्र फूल व अन्य शेतीची जबाबदारी सांभाळतो. दुसरा मुलगा अर्जुन नोकरी सांभाळून मार्केटिंगची तर तिसरा किरण फूल विक्री केंद्राची जबाबदारी सांभाळतो. कृष्णकांत यांचे बंधू चंद्रकांत यांचा मोठा मुलगा रोहित स्टेज डेकोरेशनची जबाबदारी सांभाळतो तर लहान ऋषभ किरण यांना फूल विक्री केंद्रात मदत करतो. फुलांचे विविध प्रकार

  • पानशेंद्रा शिवारात डोंगराला लागून मद्दलवार बंधूंची सुमारे ३२ एकर शेती.
  • एके ठिकाणी २६ एकर तर उर्वरित ८ एकर दुसरीकडे. बरीचशी शेती डोंगरदऱ्यांत.
  • एकूण क्षेत्रापैकी ८ ते १० एकरांत १९८५ पासून कायम फुलशेती.
  • पूर्वी जाई, जुई व मोगऱ्याची शेती. ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन आता निशिगंध, शेवंती, गलांडा, बिजली, गुलाब, कामिनी, डेझी, झेंडू, ग्लॅडिलोलस, ॲस्टर आदींची कास धरली.
  • विक्रीचे सुरुवातीचे प्रयत्न पूर्वी पुणे, नागपूर, हैदराबाद, मुंबई, औरंगाबाद आदी बाजारात थेट फुले विक्रीला न्यायचे. कोणत्या शहरात सर्वाधिक दर मिळतो आहे? त्याची चाचपणी करून धर्मेंद्र ते शहर गाठायचे. तेथे लॉजवर रहायचे. मग घरच्यांशी फोनवरून संपर्क करून लक्‍झरी बसमधून फुले पाठवली जायची. त्या शहरात दर कमी झाले की मग दुसऱ्या शहरात जायचे, तेथे मुक्‍काम अशी व्रिकी व्यवस्था २०१४ पर्यंत राबविली. स्वतःची विक्री व्यवस्था या निमित्ताने राज्यातील विविध फुलबाजारांचा अंदाज व ग्राहकांची मागणी लक्षात आली. मग जालना येथे स्वतःच विक्री करण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी ‘केएम’ फ्लॉवर शॉप सुरू केले. येथील ग्राहकांच्या गरजेनुसार फुलांचे मूल्यवर्धन सुरू केले. ग्राहकांशी नाळ जुळायला व व्यवसाय बऱ्यापैकी स्थिरस्थावर व्हायला तीन ते चार वर्षे जावी लागली. गतिमान झाला फूल उद्योग सन २०१४ नंतर व्यवसायाने गती पकडली. आधी केवळ फुले व साध्या हारांची होणारी विक्री पुढे वेणी, गजरे, पाच ते सहा प्रकारचे बुके, विविध नैमित्तिक सजावटी, घरांच्या सजावटी आदींपर्यंत जाऊन पोहचली. फुलांचेच नव्हे तर पाकळ्यांच्या हारांचे असंख्य आकार, गरजेनुसार लांबीचे उच्च दर्जाचे हार (व्हीआयपी) आदींची निर्मिती सुरू झाली. बाजाराची गरज ओळखून विविध सजावटीच्या व आकर्षक प्रकार देण्यास सुरुवात केल्याने उलाढाल वाढू लागली. मद्‌दलवार यांच्या फुलशेतीविषयी

  • वर्षभर हंगामनिहाय फुलांचे उत्पादन
  • सर्व मिळून दररोज २०० किलोपर्यंत फुले उपलब्ध
  • सर्व क्षेत्र ठिबकखाली
  • सिंचनासाठी तीन शेततळी व एक विहीर
  • आवश्‍यक रोपनिर्मिती व विक्री
  • उत्पादन खर्च व मूल्यवर्धनानुसार किमान नफा ठरवून निश्‍चित होतात दर
  • ग्लॅडिओलसचे कंद सुप्तावस्थेत जाण्यासाठी तीन महिने शीतगृहात ठेवतात.
  • शेवंतीचे दोन, झेंडूच्या चार प्रकारांचे संगोपन
  • प्रत्येक फुलाचे अर्धा, एक ते कमाल दोन एकर क्षेत्र
  • डोंगराला लागून फुलशेतीत सिंचनाची गरज भागविण्यासाठी डोंगराचे पाणी चर खोदून एका ठिकाणी वळविले. त्याला तीन ठिकाणी थांबे देऊन पाणी जमिनीत मुरण्यात व विहिरीची पाणी पातळी सुधारण्यास मदत झाली.
  • आश्‍वासक उलाढाल फुलांच्या सजावटीपर्यंत मर्यादित न राहता स्टेज व कार डेकोरेशनमध्येही कुटुंबाने उडी घेतली. रोहित यांच्याकडे ही जबाबदारी आहे. त्यासंबंधीचे प्रशिक्षणदेखील त्यांनी हैदराबाद येथे घेतले आहे. पाच स्टेज एकावेळी उभे करता येतील एवढे साहित्य व कौशल्य त्यांनी मिळवले आहे. स्टेज डेकोरेशन चारहजारांपासून ते एक लाख व कार डेकोरेशनही चारहजार रुपयांपर्यंत दरांत ते करून देतात.  

  • गरजेनुसार वा सणासुदीला उच्च मागणीच्या काळात बाजारातूनही फुले घ्यावी लागतात.
  • दीपावलीच्या काळात किलोला शेवंती ५० रुपये, झेंडू ३० रुपये, ॲस्टर ६० रुपये, निशिगंध १०० ते १५० रुपये, गुलाब ८० ते १०० रुपये व ग्लॅडिलोएस प्रतिफूल पाच रुपये असे दर.
  • 'केएम’ फ्लॉवर शॉपमध्ये दररोज शंभर प्रकारचे बुके, फूल व पाकळ्यांपासून तयार होणारे किमान तीनशे हार व खुल्या फुलांची सुमारे एक क्‍विंटलपर्यंत विक्री.
  • या फुलव्यवसायातून वार्षिक आठ ते दहा लाख रुपयांपुढे उलाढाल.
  • १९८५ पासून दुग्धव्यवसायाचीही जोड. दहा म्हशी व चार गायी जोडीला आहेत. दररोज एकावेळी २० ते २५ लिटर दुधाची घरून विक्री.
  • विस्तारली फुलशेती मद्‌दलवार यांच्या प्रेरणेतून गावात तिरूपती शेती स्वयंसहायता गटाची स्थापन झाली आहे. यात १५ शेतकरी सहभागी असून पिवळ्या व पांढऱ्या शेवंतीची १५ एकरांपर्यंत शेती त्याद्वारे होते. जालन्यासह नागपूर, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद आदी बाजारात विक्री होते. धर्मेंद्रही या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करतात. व्यवयासात कल्पकता महत्त्वाची सजावटीचा कोणताही प्रकार करण्यास हाती घेतल्यानंतर त्याला आकार किंवा कलात्मक रूप देण्यावर त्याची आकर्षकता व दर अवलंबून असतात. त्यादृष्टीने शेतात फुलांचे उत्पादन, दर्जा व प्रतवारी ठेवण्यात येते. कल्पकतेतून आकर्षक विविध आकार देण्यामध्ये सुमारे ८ ते १० कारागीर पश्‍चिम बंगालचे तर तेवढेच स्थानिक असतात. व्यवसायातून तेवढ्या मजुरांना कायम रोजगार मिळतो. धर्मेंद्र मद्दलवार- ९९२३३४०८७३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com