agriculture story in marathi, Kadam family from Jalna Dist. is doing integrated farming system for sustainable income source. | Agrowon

एकात्मिक शेतीतून अर्थकारण केले सक्षम

संतोष मुंढे
शनिवार, 17 जुलै 2021

रेवगाव (ता. जि. जालना) येथील आनंदराव कदम यांनी कुटुंबाचा एकोपा जपताना शेती व त्यास विविध पूरक व्यवसायांची जोड दिली आहे. त्यातून अर्थकारण सक्षम करताना एकात्मिक शेतीचे आदर्श उदाहरण त्यांनी तयार केले आहे.

रेवगाव (ता. जि. जालना) येथील आनंदराव कदम यांनी कुटुंबाचा एकोपा जपताना शेती व त्यास विविध पूरक व्यवसायांची जोड दिली आहे. त्यातून अर्थकारण सक्षम करताना एकात्मिक शेतीचे आदर्श उदाहरण त्यांनी तयार केले आहे.
.
रेवगाव (ता. जि. जालना) येथील आनंदराव काशिनाथ कदम यांनी कष्ट, धडपड करण्याची वृत्ती आणि कुटुंबाचा एकोपा यातून एकात्मिक शेतीचे उदाहरण तयार केले आहे. सन १९९५ मध्ये विहिरीवर मजुरीचे काम ते करायचे. त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरण्याची संधी आली. पुढे दहा वर्षे सरपंचपदाची धुरा व पंधरा वर्षे ग्रामपंचायतीचे सदस्यपद त्यांनी सांभाळले. हे करीत असताना कुटुंबाकडे लक्ष आणि शेतीतील कष्ट कमी होऊ दिले नाहीत. कुटुंबाच्या अर्थकारणाला हातभार देण्यासाठी लव, अंकुश या मुलांनी जालना येथे ग्राहक सेवा केंद्र चालविण्याची जबाबदारी स्वीकारली. उपलब्ध वेळेत तेही शेती करू लागले. तिसरा मुलगा भरत याने शेती व पूरक व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली. घरातील सर्व महिला सदस्य देखील शेतीत राबतात. कुटुंबाच्या या एकोप्यातूनच हंगामी पिकांची शेती, शेळीपालन, कुक्कुटपालन, रेशीम आणि दुग्ध व्यवसायाने व्याप्ती वाढवली आहे. त्यातील उत्पन्नातूनच वडिलोपार्जित सात एकर कोरडवाहू शेतीचा २५ एकरांपर्यंत विस्तार झाला आहे.

शेतीचे व्यवस्थापन
कपाशी ८ ते ९ एकर, मका ४ ते ५ एकर, सोयाबीन पाच ते सहा एकर, चार वर्षांपूर्वी लावलेली मोसंबीची एक हजार झाडे, दोन वर्षांपूर्वी एक एकरात लागवड केलेली बांबूची ५०० झाडे असे शेतीचे नियोजन आहे. दोन एकर क्षेत्र चारा पिकांसाठी राखीव आहे. त्यात दशरथ घास, मेथी, पवण्या, नेपियर, मका व एक एकरात तुती अशी विभागणी आहे. मका पूर्णतः चारा म्हणून वापरात आणला जातो. आधी कोरडवाहू असलेली शेती हंगामी बागायती झाली आहे. त्यासाठी पाच विहिरी, शेततळे व ठिबक व तुषार सिंचनाची जोड आहे.

शेळीपालन
स्वउत्पन्नातील दोन लाख रुपये गुंतवून २०१३ मध्ये उस्मानाबादी जातीच्या २५ शेळ्या व बोकड खरेदी केला. साध्या शेडमध्ये शेळीपालन सुरू केले. दोन पिले दिलेल्या शेळ्यांची निवड केल्याने सोबत ५० पिलेही मिळाली. व्यवसायाचे परिपूर्ण ज्ञान असावे म्हणून कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी (जालना) येथून शेळीपालन प्रशिक्षण घेतले. शेळ्या सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत गावशिवारातील पडीक जागेवर चराईसाठी नेल्या जातात. प्रत्येक शेळीला ३०० ग्रॅम खाद्य दरदिवशी दिले जाते. त्यात पावसाळ्यात मका, हिवाळ्यात सोयाबीन तर उन्हाळ्यात गव्हाचा समावेश होतो. घरचाच मका १० क्‍विंटल, सोयाबीन पाच क्‍विंटल व १० क्‍विंटल गहू असतो. त्याचाही वापर होतो. दरवर्षी साधारण ५० लहान- मोठ्या शेळ्या विकायला मिळतात. त्यातून दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. आजघडीला ४४ मोठ्या शेळ्या व ३५ पिले आहेत.

कुक्कुटपालन
वर्षातील किमान ८ महिने ब्रॉयलर जातीचे कुक्कुटपालन केले जाते. सन २०१६ पासून व्यवसायात सातत्य आहे. सुमारे एक हजार ते १२०० पक्ष्यांची एक अशा वर्षाला तीन ते चार बॅच या कालावधीत उत्पादन घेण्यात येते. अडीच ते तीन किलो वजनाचा पक्षी होईपर्यंत त्यांचे संगोपन करणे आणि त्याची विक्री करणे असा नित्यक्रम असतो. प्रति बॅच २० ते २५ हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळते.

कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्याने देशी व सुधारित ग्रामप्रिया, वनराज, कडकनाथ व राजश्री या कोबड्यांचेही काही प्रमाणात संगोपन होते. त्यांच्यापासून दररोज मिळणाऱ्या १५ ते २० अंड्यांची विक्री होते. १० रुपये प्रति अंडी दर मिळतो. कुटुंबातील तीन सूनबाईंपैकी सौ. रुख्मीना भरत कदम यांनी केव्हीकेमधून या विषयातील प्रशिक्षण घेतले आहे.

दुग्ध व्यवसाय
सन २०१७ मध्ये दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. अडीच लाख रुपये खर्चून ६० बाय १२ फूट आकाराचा गोठा किमान खर्चात बांधला. चार संकरित गायी आहेत. सुमारे ४० ते ५० लिटर दूध दररोज उपलब्ध होते. पैकी घरच्यांसाठी काही ठेवून उर्वरित डेअरीला पुरवठा होतो. त्यास सध्या २४ रुपये प्रति लिटरचा दर मिळतो. वाढलेल्या खाद्य दरांमुळे एकूण खर्च वाढला आहे. तरीही शेणासह दररोज २०० ते ३०० रुपये उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न असतो.

लेंडीखत व कोंबडीखत
शेळीपालनातून वर्षाला जवळपास २२ ट्रॉली लेंडीखत तर दोन ट्रॉली कोंबडीखत मिळते. घरच्या शेतीसाठीच त्याचा वापर होतो. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला आहे. मातीचे आरोग्य चांगले राहिल्यामुळे कापूस, सोयाबीन, मका ही पिके चांगल्या प्रकारे उत्पादन देतात.

रेशीम व्यवसाय
दोन वर्षांपासून शेती व पूरक व्यवसायांना रेशीम उद्योगाचीही जोड दिली आहे. प्रति १५० अंडीपुंजांच्या वर्षातून दोन बॅचेस दिवाळीनंतर घेतात. प्रति बॅच ७० ते ८० किलो कोष उत्पादन मिळते. कोषांना २५० ते ३०० रुपये प्रति किलो दर मिळतो. तुतीचा वापर चारा म्हणून शेळ्यांसाठी व दुभत्या जनावरांसाठीही होत असल्याने बॅचेस घेण्याचे प्रमाण कमी आहे.

प्रतिक्रिया
शेतीला जोडव्यवसायांची सांगड घातल्यास आर्थिक सक्षमता मिळवता येते. आनंदराव यांचे त्यासाठी उत्तम उदाहरण आहे.
- एस. व्ही. सोनुने
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी- जालना

संपर्क- आनंदराव कदम, ८८०६२३५९१४


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...
श्रमदानातून ‘चुंब’ गाव झाले जल...स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदी विविध पायाभूत...
‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
शास्त्रीय, उत्कृष्ट व्यवस्थापनातून बीटल...सातारा जिल्ह्यातील शेळकेवाडी येथील जितेंद्र शेळके...
कांदा- लसूण शेतीत जरे यांचे देशभर नावबहिरवाडी (ता. जि. नगर) येथील कृषिभूषण...
नगदी पिकांना हंगामी पिकांची जोड देते...आपली शेती प्रयोगशील ठेवत मुदखेड (जि. नांदेड)...
कुक्कुटपालन, पोषण बागेतून प्रगती न्यू राजापूर (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील २४...