खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली शेती तंत्र

शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे यांनी सुमारे अडीच एकराचे प्लॉट निश्‍चित करून एकाचवेळी पाच ते नऊ पिके घेत तीनमजली शेतीचे तंत्र यशस्वी केले आहे.
कैलास नागरे यांची तीनमजली शेती व हरभरा उत्पादन.
कैलास नागरे यांची तीनमजली शेती व हरभरा उत्पादन.

शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे यांनी सुमारे अडीच एकराचे प्लॉट निश्‍चित करून एकाचवेळी पाच ते नऊ पिके घेत तीनमजली शेतीचे तंत्र यशस्वी केले आहे. मुख्य पिकातील खर्च कमी करणे, शेतीतील जोखीम कमी करणे व बारमाही ताजे उत्पन्न मिळवीत राहणे असे अनेक फायदे त्यातून ते मिळवीत आहेत.   बुलडाणा जिल्ह्यात शिवणी आरमाळ (ता. देऊळगाव राजा) हे १८०० लोकसंख्येचे गाव आहे. तालुक्यापासून ४५ किलोमीटरवर असलेल्या या खेड्यात कैलास अर्जुनराव नागरे यांची शेती आहे. डीएड झाल्यानंतर त्यांना शिक्षकपदाची नोकरी मिळाली. मात्र आईला २००६ मध्ये दुर्धर आजाराचे निदान झाले. तिचे निधन झाले. मग कैलास यांना नोकरी सोडावी लागली. शेतीत पूर्णवेळ त्यांनी झोकून दिले. त्यातही कधी अतिपाऊस, कधी दुष्काळी स्थिती असे निसर्गाचे आघात सहन केले. तब्बल १६ लाख रुपये कर्जाचा डोंगर उभा राहिला. तरीही ज्ञान, अनुभव यांची सांगड घालत हिमतीने वाटचाल सुरू ठेवली. सुधारित, व्यावसायिक शेती पध्दतीचा अंगीकार करताना बहुस्तरीय किंवा मजले पध्दतीचे तंत्र आत्मसात केले. सन २०१३ मध्ये विहीर खोदली. एकाच ठिकाणी १३ व्हॉल्व्ह्‍ज बसवले. तेथून संपूर्ण शेतीत डबल तीन इंची पाइपलाइन केली. त्याद्वारे २०१३ मध्येच  संपूर्ण १५ एकरांला फर्टिगेशन (ठिबकद्वारे पाणी व खते) सुरू केले. कैलास यांच्या खांद्याला खांदा लावून पत्नी गीतादेखील वखरणी, कोळपणी, निंदण, फवारणी, बेड तयार करणे अशी बहुतांश कामे उत्स्फूर्तपणे करतात. असे आहे तीन मजली शेतीचे तंत्र

  • शेती - १५ एकर, भाडेतत्त्वावरील क्षेत्र - ४ एकर
  • शेतीतील अनुभव - १५ वर्षे
  • जमीन- मध्यम काळी, हवामान - मध्यम कोरडे
  • सिंचन - दोन विहिरी
  • गादीवाफा (बेड) पद्धतीचा वापर.
  • सुमारे अडीच एकराच्या प्लॉटमध्ये पाच ते नऊपर्यंत एकाचवेळी (आठवड्याच्या फरकाने) पिकांची लागवड.
  • पहिला मजला म्हणजे जमिनीखाली येणारी पिके (उदा. भुईमूग, लसूण, कांदा, गाजर, बटाटा, रताळे, आले, हळद आदी)
  • दुसरा मजला म्हणजे जमिनीपासून साडेतीन फुटांपर्यंत वाढणारी किंवा जमिनीवर पसरणारी पिके (मेथी, कोथिंबीर, गहू, सोयाबीन, उडीद, मूग, चवळी, मिरची, वांगी, खरबूज, टरबूज, दुधी भोपळा, काकडी)
  • तिसरा मजला म्हणजे चार फुटांपेक्षा अधिक उंचीवर वाढणारी पिके (कापूस, तूर, पपई, केळी, शेवगा, पेरू, सीताफळ, डाळिंब)
  • पीककालावधी शक्यतो -
  • पहिला मजला- ६० ते ९० दिवस, दुसरा मजला- १२० ते १५० दिवस.
  • तिसरा मजला- २१० दिवसांपुढे.
  • तीन मजली पीक पद्धतीचे फायदे

  • कमी क्षेत्रात एकाच वेळी मुख्य पिकाबरोबर एकाच बेडवर, ठिबकवर विविध आंतरपिके घेता येतात.
  • मुख्य पिकाचा खर्च निघून जातो वा कमी होतो.
  • एका पिकाचा दुसऱ्या पिकाच्या वाढीला अडथळा होत नाही. आंतरपिके एकमेकांना पूरक ठरतात.
  • त्यामुळे चांगले उत्पादन हाती येते.
  • ठरावीक कालावधीत चक्राकार पद्धतीने पिके तयार होत राहतात. शेती व घरखर्च चालवण्यासाठी नियमित खेळते भांडवल उपलब्ध होत राहते.
  • विविध पिकांचे अवशेष एक दुसऱ्यासाठी मिळत राहतात.
  • ‘तीन मजली’ चे प्रयोग सन २०१९-१०

  • २२ ऑक्टोबरला दोन एकरांत पपईच्या दोन हजार रोपांची ८ बाय ६ फूट अंतरावर लागवड केली.
  • आंतरपिके लसूण, कांदा, बन्सी गहू आणि मका होती.
  • उत्पादन - पपई ६०० क्विंटल, गहू - २० क्विंटल, कांदा - १४ क्विंटल, लसूण -१५ क्विंटल, मका १ क्विंटल
  • पपईची विक्री ९ रुपये प्रति किलो दराने जागेवरून विक्री. साडेपाच लाख रुपये.
  • गहू बियाणे जागेवरच ७५ रुपये प्रति किलो दराने विकले.
  • लसणाची २५० रुपये, तर कांद्याची १० रुपये प्रति किलो दराने विक्री.
  • मका विक्री १५०० रुपये प्रति क्विंटल.
  • २०१९-२० मध्ये खरिपात केडीएस ७२६ सोयाबीन वाण - साडेचार एकरांत ६५ क्विंटल उत्पादन,
  • सन २०२०-२१

  • नोव्हेंबरमध्ये ३५०० झाडे पपईची घेतली.
  • अस्सल गावरान लसूण ७५ किलो बियाणे लावले. उत्पादन २० क्विंटल. २०० रुपये प्रति किलोने विक्री. चार लाखांचे उत्पन्न.
  • गावरान कांदा - तीन किलो बियाणे टोकण पद्धतीने - ३० क्विंटल कांदे झाले. २० रुपये प्रति किलोने विक्री.
  • टीएजी २४ भुईमुगाचे २० किलो बियाणे लावले - आठ क्विंटल वाळलेल्या शेंगा. ५४०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री.
  • काही भाजीपालाही घेतला.
  • अन्य एक हेक्टरमध्ये एकाच वेळी केळीची ४ हजार, कलिंगडाची २५ हजार, मिरची व वांगी प्रत्येकी चार हजार व ५०० टोमॅटो रोपांची लागवड केली. याशिवाय अन्य चार एकरांत ४५ हजार खरबूज व
  • त्यात ५०० रोपे कोबीची लावली.
  •  २०२०-२१ मध्ये साडेसहा एकरांत खरबूज व टरबूज घेतले. दोन वेळा गारपीट होऊनही खरबुजाचे चार एकरांत ३० टन, तर अडीच एकरांत ५० टन कलिंगड उत्पादन मिळाले. लॉकडाऊनमध्ये जागेवरून थेट विक्री केली.
  • सेंद्रिय शेतीवर भर नागरे बहुतांशी सेंद्रिय तर काही प्रमाणात रासायनिक पद्धतीचा वापर करतात. त्यांच्याकडे चार देशी गायी आहेत. जिवामृत व गोमूत्राचा शेतीत वापर होतो. गोमूत्र संकलनात मुले संचिता, सार्थक आणि स्वरा मदत करतात. शेतकरी, कवी, लेखक कैलास कविता करतात. लेख लिहितात. हार्मोनिअम वाजवतात. बहुविध पीक पद्धती, जैविक शेती, गोपालनाचा प्रचार करतात. तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. ते जय गोपाल सेंद्रिय शेती गटाचे अध्यक्ष व देऊळगावराजा शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आहेत. कैलास ‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक आहेत. प्रयोगशील शेतीला ॲग्रोवनने दिशा दिल्याचे सांगतात. विविध कृषी प्रदर्शनांना ते भेटी देतात. शेतकऱ्यांकडील प्रयोगांना प्रत्यक्ष भेटी देतात. यापूर्वी साध्य केलेले उत्पादन (एकरी) भुईमूग - १६ ते १८ क्विं. मका - ४० क्विं. हरभरा - १२ ते १४ क्विं. तूर - १५ क्विं. गहू - २२ क्विं. खरबूज - १४ टन कलिंगड - २५ टन सोयाबीन - १५ क्विं. पपई - ३० ते ४० टन संपर्क- कैलास नागरे, ९०४९८१६०९०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com