चिकाटीतून नावारूपाला आणला गूळ उद्योग

हिंगोली जिल्ह्यातील देवजणा येथील कैलासराव कल्याणकर यांनी सुमारे २२ वर्षांपूर्वी गुऱ्हाळघर सुरू केले. टप्प्याटप्प्याने सुधारणा व विस्तार करीत दर्जेदार निर्मिती साध्य करीत पंचक्रोशीतआपल्या गुळाला ‘मार्केट’ तयार केले आहे.
गुळाच्या तयार ढेपा
गुळाच्या तयार ढेपा

हिंगोली जिल्ह्यातील देवजणा येथील कैलासराव कल्याणकर यांनी सुमारे २२ वर्षांपूर्वी गुऱ्हाळघर सुरू केले. टप्प्याटप्प्याने सुधारणा व विस्तार करीत दर्जेदार निर्मिती साध्य करीत पंचक्रोशीत आपल्या गुळाला ‘मार्केट’ तयार केले आहे.   हिंगोली-नांदेड महामार्गावर कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर हे प्रमुख बाजारपेठेचे गाव आहे.तेथून काही अंतरावर दीड हजार लोकसंख्येचे देवजणा गाव आहे. शिवारातून कयाधू नदी वाहते. नदीकाठच्या गाळाच्या खोल काळ्या, भारी जमिनी आहेत. सोयाबीन, हरभरा आदी पिके होतात. उत्पादकताही चांगली आहे. मात्र जमिनीत पुराचे पाणी शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचे. गूळ उद्योगाचा पर्याय कैलासरावांकडे हीच समस्या होती. एकत्रित कुटुंबातील १८ एकर शेती होती. मात्र हाती काही लागत नव्हते. त्यात गाव अत्यंत दुर्गम. वाहतुकीला अडचणी यायच्या. परिसरातील साखर कारखाना गावातील शेतकऱ्यांकडील ऊस गाळपासाठी नेण्यास तयार व्हायचा नाही. प्रतिकूल परिस्थितीवर कैलासराव पर्याय शोधत होते. अभ्यास सहली काढल्या. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत (परभणी) अन्न तंत्र महाविद्यालयातील तत्कालीन अन्न व व्यापार विभागप्रमुख पांडुरंग सत्वधर यांच्याकडून गुऱ्हाळघराविषयी माहिती मिळाली. बाजारपेठेचा अभ्यास केला. उद्योगाचा श्रीगणेशा अखेर गूळनिर्मिती करायचे नक्की केले. बोअर खोदून १९९४ च्या दरम्यान बेण्यासाठी अर्धा एकरात ऊस लागवड केली. घरचे बेणे उपलब्ध झाल्यानंतर पुढील वर्षी पाच एकरांत लागवड केली. दरम्यान कुटुंब विभक्त झाल्यानंतर वाट्याला सहा एकर जमीन आली. सन१९९५ मध्ये शेतातील जागेत पाच एचपी क्षमतेच्या जुन्या क्रशर आधारे गूळनिर्मितीचा श्रीगणेशा केला. दररोज सुमारे सहा टन ऊसगाळप व्हायचे. आखाडा बाळापूर बाजारपेठेत विक्रीसोबतच अनेक व्यापारी थेट शेतातून खरेदी करू लागले. रोखीच्या व्यवहारामुळे फायदा होऊ लागला. वेळेवर ऊसतोड होत असल्याने उताराही चांगला मिळू लागला. कल्याणकर यांनी सुरू केलेले गावातील हे पहिले गुऱ्हाळ ठरले. क्षमतेत वाढ गूळ उत्पादन, विक्री व्यवसायातील अनुभवातून आत्मविश्‍वास दृढ झाला. दरम्यानच्या काळात परिसरातील साखर काराखानाही बंद होता. ऊस उत्पादक अडचणीत सापडले होते. स्वतःच्या शेतातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांचा ऊसगाळप करता यावा यासाठी गुऱ्हाळाची क्षमता वाढविण्याचे ठरवले. सन १९९७ मध्ये १० एचीपी क्षमतेचे क्रशर घेतले. आता दररोज १२ टनांपर्यंत ऊसगाळप करणे शक्य झाले. १२ ते १५ क्विंटल गूळ उत्पादन मिळू लागले. रसायनमुक्त गुळाची निर्मिती सन २०१२ मध्ये २० एचपी क्षमतेचे क्रशर बसविले. त्यामुळे उसाची उपलब्धता वाढवली. आज दररोज ५० क्विंटलपर्यंत गूळनिर्मिती क्षमता तयार केली आहे. मात्र सुमारे १५ टन व त्यापुढे गाळप होते. प्रति टन उसापासून सव्वा क्विंटलपर्यंत गूळ मिळतो. ऊसशेतीत रासायनिक व्यवस्थापन असले तरी गूळनिर्मिती रासायनिक घटकांशिवाय केली जाते. रानभेंडीच्या पानांचा रस वापरला जातो. बाजारपेठ

  • साधारण चार महिने कालावधीत उद्योग
  • ग्राहक, व्यापाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन ५०० ग्रॅम, एक किलो, पाच किलो वजनाच्या ढेपा
  • अर्धा व एक किलो वजनाचे कागदी बॉक्समध्ये पॅकिंग
  • हंगामात दररोज ५ ते ७ क्विंटल काकवी उत्पादन. २५ ते ३० रुपये प्रति किलो दराने विक्री.
  • शेतकऱ्यांकडून २२०० ते त्याहून अधिक रुपये प्रति टन दराने ऊसखरेदी
  • महिन्याला सुमारे ४०० क्विंटल तर चार महिन्यांत १५०० ते १६०० क्विंटल गूळ उत्पादन.
  • गुळाचा दर ३२ रुपये प्रति किलो
  • उलाढाल हंगामात- ४५ ते ५० लाख रुपये.
  • ‘प्रमोशन’ कैलासरावांचे संपर्कजाळे मोठे आहे. दर्जेदार गूळ उत्पादक म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर झाली आहे. उत्पादनातील ५० टक्के माल किरकोळ व्यापारी जागेवरून घेऊन जातात. हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातील भोकर, हिमायतनगर येथील व्यापारी खरेदी करतात. नांदेड, औरंगाबाद येथील सुपर मार्केटकडून अर्धा व एक किलो वजनी गुळाला मागणी असते. प्रगती

  • गूळ हंगामानंतर टोमॅटो, कलिंगड व भाजीपाला उत्पादनावर लक्ष
  • भाजीपाला शेतीतून दहा मजुरांना रोजगार
  • सुरुवातीला छोट्या स्वरूपात गूळनिर्मिती, त्यातून पैसा आल्यानंतर पुन्हा विस्तार, असे करीत टप्याटप्याने जमीन खरेदी केली. सध्या १२ एकर क्षेत्र. पैकी सात एकरांत ऊस.
  • कैलासरावांकडून प्रेरणा घेत तीन शेतकऱ्यांनी गुऱ्हाळे सुरू केली. दर्जेदार उत्पादनामुळे गुळाचे देवजणा अशी गावाला ओळख मिळाली.
  • कैलासरावांच्या तीन मुलांपैकी मोठा शुभम कृषी पदवीधर, मधला वैभव अन्न तंत्र पदवी अभ्यासक्रमाचे तर छोटा सौरभ शिक्षण घेत आहे. प्रक्रिया उद्योगात भविष्यात मुलांची मदत होणार.
  • कुशलता तयार केली सुरुवातीच्या काळात गुऱ्हाळासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ गावात उपलब्ध नव्हते. अन्य राज्यातील मजुरांकरवी गुऱ्हाळ चालवावे लागे. परंतु गेल्या काही वर्षांत कैलासरावांनी गावातील मजुरांना कामाची संधी दिली. त्यांच्यात गूळनिर्मितीचे कौशल्य विकसित केले. त्यातून स्थानिक ५० व्यक्तींना हंगामी रोजगार मिळाला. गुऱ्हाळ देखभाल दुरुस्तीची कामे कैलासराव स्वतः देखील करतात. त्यामुळे खर्चात बचत होते. गूळ पावडर निर्मिती होणार कैलासराव, त्यांचे सहकारी व परिसरातील शेतकऱ्यांनी मिळून शंभूराजे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. दहा गावांतील २५० शेतकरी सभासद आहेत. ‘नाबार्ड’ च्या सहकार्याने गूळ पावडर प्रकल्प उभारून ब्रॅंडिग करून विक्री केली जाणार आहे.

    संपर्क-   कैलासराव कल्याणकर, ९१५८१५६९८२, ७३८७६३८१८१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com