agriculture story in marathi, Kanchan Choudhari is doing cold pressed edible oil process business successfully. | Agrowon

लाकडी घाण्याद्वारे दर्जेदार तेल, खाद्य व सौदर्यप्रसाधनेही

गोपाल हागे
शनिवार, 9 ऑक्टोबर 2021

अकोला जिल्ह्यातील अकोट येथील कांचन अशोकराव चौधरी या उच्चशिक्षित महिलेने लाकडी तेलघाणीच्या साह्याने विविध प्रकारच्या तेलांची निर्मिती केली आहे. गुणवत्तेशी तडजोड न करता उत्पादित होणाऱ्या तेलाला अल्पावधीतच त्यांनी ग्राहकांची पसंती मिळवली आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट येथील कांचन अशोकराव चौधरी या उच्चशिक्षित महिलेने लाकडी तेलघाणीच्या साह्याने विविध प्रकारच्या तेलांची निर्मिती केली आहे. गुणवत्तेशी तडजोड न करता उत्पादित होणाऱ्या तेलाला अल्पावधीतच त्यांनी ग्राहकांची पसंती मिळवली आहे. एक पाऊल पुढे जाऊन सौंदर्यप्रसाधने व खाद्य पदार्थांच्या माध्यमातून आर्थिक उलाढालही वाढवण्यास सुरुवात केली आहे.

संघर्षातून घडलेल्या यशकथा वाचायला सर्वांनाच आवडतात. मात्र तसा संघर्ष करण्यास सहजासहजी कोणी तयार नसतं. अकोला जिल्ह्यातील अकोट येथील कांचन अशोकराव चौधरी यांनी मात्र हा
मार्ग निवडला व त्यात निर्धाराने वाटचाल केली. ‘बीएसस्सी- ॲग्री’ व ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ (एमबीए) या पदव्या प्राप्त केल्या. त्या जोरावर खरं तर मोठ्या शहरात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती. पण कुटुंबीयांना विश्‍वासात घेऊन उद्योजक होऊन स्वतः पायावर उभे राहण्याचा निर्धार केला. अर्थात, सुरुवात नक्की कुठून करायची हे निश्‍चित नव्हते. एकदा पुणे शहरात बहिणीकडे गेल्या असताना लाकडी घाण्यावरील तेल पाहण्यात आले. त्यातून हाच उद्योग ‘क्लिक’ झाला.

उद्योगाची जुळवाजुळव
लाकडी तेलघाणा उद्योगातील उत्पादनापासून ते विक्री व्यवस्थेबाबत काहीच माहिती नसल्याने त्याबाबत ‘होमवर्क’ सुरू केले. स्वतः काही घडवायचे तर तेवढे कष्ट करण्याचीही तयारी ठेवली. आवश्‍यक साधनांची जुळवाजुळव सुरू केली. भांडवल बँकेच्या माध्यमातून उभे केले. अकोट हे मध्यम लोकसंख्येचे शहर आहे. अशा शहरात बाजारपेठेत ब्रॅंड असलेल्या तेलांच्या तुलनेत काहीसे महागडे वाटणारे हे तेलघाणीचे तेल ग्राहकांच्या पसंतीस किती उतरेल याबाबत काही अंदाज नव्हता. या सर्व प्रक्रियेत कुटुंबीयांचे पाठबळ महत्त्वाचे ठरल्याचे कांचन सांगतात.

घरीच थाटला उद्योग
कांचन यांच्या वडिलांचे अकोटमध्ये घर आहे. याच घरातील १५ बाय १५ फूट आकाराच्या खोलीत तेलघाणी बसवली. बदाम तेल बनविण्यासाठी स्वतंत्र छोटे यंत्र घेतले आहे. ज्यांना तेल काढण्याची पद्धती, दर्जा पाहण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी ही प्रक्रिया खुली, पारदर्शक ठेवली आहे. तेलघाणीच्या ठिकाणी स्वच्छता, नीटनेटकेपणा पाहण्याजोगा आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला येथे वेगळा अनुभव मिळतो.

तयार केली बाजारपेठ
‘रक्षा’ या ब्रँडनेमखाली उत्पादननिर्मिती सुरू केली. पहिल्या दिवसापासूनच गुणवत्तेत तडजोड न करण्याचे धोरण स्वीकारले. हे पथ्य पाळल्यानेच आज उत्पादित तेल अकोट शहरातच नव्हे तर अन्यत्रही विकले जात आहे. अकोला, अमरावती, नागपूर, मुंबईसारख्या शहरांमधूनही नियमितपणे मागणी असते. शेंगदाणा, करडई, खोबरेल, तीळ, सूर्यफूल, मोहरी, जवस आदी तेले लाकडी घाण्यावर तयार केली जातात. त्यासाठी लागणारा कच्चा माल उच्चतम दर्जाचाच वापरतात. त्यावर दोन पैसे अधिक खर्च झालेत तरी मागे-पुढे पाहिले जात नाही. बॉटल्सचे पॅकिंगही आकर्षक केले आहे. लाकडी घाण्याचे तेल खाण्याचे किती व कसे फायदे होतात याची माहिती देणारे फलक, पत्रकेही या ठिकाणी ग्राहकांना दिली जातात. सुरुवातीला पाच ते दहा लिटर तेलाचाही खप होईल की नाही याची खात्री न वाटणाऱ्या कांचन यांचा हा व्यवसाय आता महिन्याला सरासरी १२०० लिटर विक्रीपर्यंत पोहोचला आहे. यातून मासिक सुमारे दोन ते अडीच लाखांवर उलाढाल होत असल्याचे त्या सांगतात. तेल आणि अन्य पदार्थ विक्रीसाठी स्वतंत्र ‘आउटलेट’ही सुरू केले आहे. ग्राहकांना घरपोच सुविधाही देण्यात आली आहे. तेलघाणीवर कामासाठी तरुण तर ‘आउटलेट’च्या कामकाजासाठी तरुणी अशी रोजगारनिर्मितीही केली आहे.

कांस्य थाळी मसाज
लाकडी घाण्यावरील तेल घेणारा ग्राहक हा आरोग्याविषयी अधिक जागरूक समजला जातो. त्यामुळे येथे येणाऱ्यांसाठी आणखी एक सुविधा कांचन यांनी तयार केली. काश्‍याच्या थाळीने मसाज करण्यासाठी यंत्र बसविले. त्याच्या मदतीने पायांना विविध तेल, तुपाने मसाज करण्याची सुविधा मिळते.
त्यातून वाताचे प्रमाण कमी होणे, शरीरात वाढलेली उष्णता कमी करणे, डोळ्यांच्या स्नायूंना चालना मिळणे असे फायदे होतात. तळव्यांना भेगा पडणे तसेच पायाची जळजळसारख्या समस्या कमी होतात. मसाजची सुविधा नाममात्र दरात मिळत असल्याने दररोज अनेक जण त्याचा लाभ घेतात.

सौंदर्यप्रसाधने
विविध तेलनिर्मितीनंतर सेंद्रिय गूळ, नाभी बॉल (नाभीवर ठेवण्यासाठी कापसाचा बोळा), शुद्ध सैंधव यांचीही विक्री सुरु केली आहे. सोबतच व्हिटॅमीन सी क्रीम, रोझ क्रीम, कॉफी क्रब, हेअर जेल, अंडर आय जेल, मॅजिक क्रीम, फेसिअल कीट, कलौंजी ऑइल, कढीपत्ता ऑइल, ऊबटन सोप, फेसियल बॉम्ब, एलोवेरा शाम्पू, हेअर डाय, बाथ सॉल्ट, ब्लॅक मेहंदी अशा विविध प्रकारांवर काम हाती घेतले आहे. उत्कृष्ट दर्जाच्या पॅकिंगमधून विक्री होते. उत्पादनासह ‘मार्केटिंग, ई-कॉमर्स, सोशल मीडियाद्वारे प्रचार, आर्थिक नियोजन अशी विविध कामे कांचन एकहाती लीलया सांभाळतात. पती अन्य शहरात नोकरीस असल्याने घरच्या जबाबदाऱ्या, मुलांचे शिक्षण- संगोपनाकडेही दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारीही घेतात. सर्वच आर्थिक स्तरावरील कुटुंबांपर्यंत घाणीवरील तेलाचे महत्त्व पोहोचवण्यासाठी अकोटमध्ये तेल महोत्सव भरविण्याचे नियोजनही कांचन करीत आहेत.

संपर्क- कांचन चौधरी, ७२१९४४७११०


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
ट्रॅक्टरचलित विविध यंत्रांद्वारे वेळ,...ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी...
योग्य व्यवस्थापनातून वाढविला १९०...गोठा, म्हशींचे संगोपन व दूध विक्री या स्तरांवर...
दुग्धव्यवसायातून संयुक्त फोलाने...नगर जिल्ह्यात कुकाणे येथील संयुक्त फोलाने...
संघर्षातून फुलले शेतीमध्ये 'नवजीवन'अवघी दोन एकर जिरायती शेती. खाण्यापुरती बाजरी...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ...लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
दुग्ध व्यवसायातून बसविली आर्थिक घडीसातारा जिल्ह्यात कोपर्डे (हवेली) येथील कैलास...
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात देशमुख...सुलतानपूर (जि. नगर) येथील विजय देशमुख यांनी नऊ...
डाळ निर्मिती उद्योगातील ‘अनुजय' ब्रॅण्डढवळी (ता.वाळवा,जि.सांगली) येथील सौ.चारुलता उत्तम...
महिला गटाने दिली कृषी,ग्राम पर्यटनाला...पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेने मार्गासनी (ता....
वांगे भरीत पार्टीद्वारे व्यवसाय...डांभुर्णी (ता. यावल, जि. जळगाव) येथील राणे...
लाकडी घाण्याद्वारे दर्जेदार तेल, खाद्य...अकोला जिल्ह्यातील अकोट येथील कांचन अशोकराव चौधरी...
भिडी गावाने उभारल्या अवजारे बॅंका,...काळाची पावले ओळखत विदर्भातील अनेक गावांनी...