agriculture story in marathi, Kanchan Goture from Karnataka State has gained name as Mahila Gulvya. | Agrowon

‘महिला गुळव्या’ अशी मिळवली दुर्मीळ ओळख

राजकुमार चौगुले
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

कोल्हापूर जिल्ह्यापासून नजीक मात्र कर्नाटक सीमाभागातील कोथळी येथील कांचन गोटूरे यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या गुऱ्हाळघरात महिला गुळव्या म्हणून समर्थपणे जबाबदारी पेलून ती दीर्घकाळ यशस्वी पेलली. 

कोल्हापूर जिल्ह्यापासून नजीक मात्र कर्नाटक सीमाभागातील कोथळी येथील कांचन गोटूरे यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या गुऱ्हाळघरात महिला गुळव्या म्हणून समर्थपणे जबाबदारी पेलून ती दीर्घकाळ यशस्वी पेलली. त्यातून वैशिष्ट्यपूर्ण, दुर्मीळ ओळख तयार केली. पतीच्या मदतीने याप्रकारे हातभार उचलून कुटुंबाचे अर्थकारण त्यांनी चांगल्या प्रकारे उंचावले आहे.

उसाचा रस काहिलीत टाकला की तिचं काम सुरू होतं. रसातील मळी काढण्यापासून ते चुलवाणाच्या ज्वाळांकडे तिची काटेकोर नजर असते. उकळणाऱ्या रसाबरोबरच काहिलीत रंग बदलणाऱ्या रसावर ही नजर खिळून राहते. तोंडावर वाफा येत असतात. पण त्याची तिला पर्वा नसते. हातातील फावड्याची जलद हालचाल करत काहिलीत रसाला गती देण्यात ती गुंग झालेली असते. अशातच तिची तीक्ष्ण नजर गूळ तयार होण्याचा क्षण पकडते. ‘जाळ थांबवा’ असा आपसूक आदेश दिला जातो. मग कोणताही वेळ न दवडता रस गूळ करण्यासाठी मधल्या साच्यात ओतला जातो. इतका वेळ असलेला दबाव काही क्षण दूर होतो आणि तयार होणारा मऊ सूत गूळ परिश्रमाचा गोडवा वाढवतो.

नऊ वर्षांपासूनची तपश्‍चर्या
कर्नाटक सीमाभागातील बोरगाव (ता. चिक्कोडी) येथील सिद्धेश्‍वर गुऱ्हाळात ‘महिला गुळव्या’ म्हणून कार्यरत असलेल्या कांचन धनपाल गोटूरे या महिलेची ही कहाणी आहे. कोणत्याही गुऱ्हाळघराचा ‘गुळव्या’ हा महत्त्वाचा घटक असतो. गूळ तयार करण्याची प्रक्रिया किचकट असते. रस काहिलीत ओतल्यापासून मळी बाहेर काढून तो योग्य तापमानात उकळविणे, गुळाचे रवे करण्यास योग्य स्थिती निर्माण करणे हे कौशल्याचे काम असते. त्यात प्रसंगावधान, तत्परता, काटेकोरपणा या बाबींचीही गरज असते. यात जराही चूक झाली, की गुळाचा दर्जा बिघडलाच म्हणून समजा! गुळव्याची ही मुख्य जबाबदारी बहुतांशी पुरुषच पार पाडत आलेले आहेत. कांचनताई मात्र त्यास अपवाद असून, महिला गुळव्या म्हणून नऊ वर्षांपासून ही जबाबदारी त्या आनंदाने व यशस्वीपणे पार पाडत आहेत हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

कांचनताई झाल्या आधार
बोरगाव हे कांचनताईंचे माहेर तर चिकोडी तालुक्‍यातीलच कोथळी हे त्यांचे सासर. कमी वयात लग्न झाल्याने लवकर संसाराची जबाबदारी आली. शेती केवळ नऊ गुंठे. त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने पती धनपाल यांना शेतमजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. पदरी दोन मुले. संसाराचा गाडा कसा हाकायचा या विवंचनेतून मग कांचनताईंनीच पुढाकार घेतला. माहेरी बोरगावात येऊन त्यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या गुऱ्हाळघरात पतीसोबत काम करण्यास सुरुवात केली. बोरगावातील राजेंद्र माळी हे जुने गुऱ्हाळमालक. तब्बल वीस वर्षांपासून त्यांना या व्यवसायातील अनुभव आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते बारमाही गुऱ्हाळ चालवतात. त्यासाठी वर्षभर उसाची उपलब्धता त्यांच्याकडे असते. याच गुऱ्हाळाचा मोठा आधार कांचनताईंना झाला.

अनुभवांची शिदोरी
वीस वर्षांपूर्वी कांचनताईंनी गुऱ्हाळात चिपाडे गोळा करणे व गुळव्याला सहायक म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. कष्टाने व मन लावून सर्व कामे शिकून घेतली. चांगला गुळव्या मिळवणे हे गुऱ्हाळमालकांसाठी आव्हान असते. अनेक वेळा अव्वाच्या सव्वा मेहनताना देऊन गुऱ्हाळ चालवावे लागते. हीच परिस्थिती गुऱ्हाळमालक माळी यांच्यावरही आली. कोणत्याही कामासाठी तत्पर कांचनताईंसाठी ही नामी संधी होती. अनपेक्षितपणे त्या गुळव्या म्हणून उभ्या राहिल्या. ही बाब खरंच धक्कादायक आणि भुवया उंचावणारी होती. गुऱ्हाळघरात डझनभर मजूर असताना ही जबाबदारी कांचनताईंनी आनंदाने अंगावर घेतली. सुरुवातीला दडपण आले. समस्या उद्‍भवल्या. पण आतापर्यंतचा अनुभव व पारंगत केलेले कौशल्य यांच्या जोरावर त्यांनी ही जबाबदारी यशस्वी पेलली.

कायम कार्यरत
सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत गुऱ्हाळ सुरू असते. पाच, दहा किलो वजनाचे रवे (ढेपा) तयार करायचे असतील, तर पाच तर अर्धा व एक किलोचे आधण असेल तर तीन आधणे होतात. कांचनताईंना एका काहिलीमागे १४ रुपये मजुरी मिळते. पती गुऱ्हाळात अन्य कामे करतात. सकाळी सातच्या सुमारास गुऱ्हाळात आलेल्या कांचनताई सायंकाळी सातच्या सुमारास मात्र प्रचंड व्यस्त असतात. जेवण व नाश्‍त्याचा कालावधी वगळता त्यांना काहिलीपासून दूर जाऊन चालत नाही.

कमावलेला आत्मविश्‍वास
कांचनताईंचा गुळव्या म्हणून आत्मविश्‍वास पाहण्यासारखा असतो. गुऱ्हाळावर सर्व जातींचा गूळ येतो. पण ज्या जाती साखरेसाठी अधिक चांगल्या आहेत त्यांचा गूळ तयार करणे हे आव्हान असल्याचे त्या सांगतात. जातींमध्ये बदल झाला किंवा रस उकळताना काही उणिवा जाणवू लागल्यास कांचनताईंच्या चेहऱ्यावरचा दबाव स्पष्ट दिसून येतो. रसामध्ये आवश्‍यक पदार्थ कमी जास्त करण्यासाठीही त्यांची दुसरीकडे लगबग सुरू असते. रसाचे तपमान मोजण्याची यंत्रणा अथवा तो रस गुळासाठी तयार झाला का यासाठीची प्रभावी यांत्रिक व्यवस्था नाही. यामुळे अनुभवकौशल्य हाच गुण महत्त्वाचा ठरतो. काहिलीच्या एका बॅचचे नुकसान झाले तरी हजारो रुपयांचा फटका गूळ उत्पादक व गुऱ्हाळमालकाला बसतो. यामुळे एखादे आधण बिघडल्यास किंवा गुळाची प्रत मनाप्रमाणे न बनल्यास समाधानाने झोपही लागत नसल्याचा अनुभव कांचनताई प्रकट करतात. कोल्हापूर जिल्हा किंवा लगतच्या कर्नाटक भागात शेकडो गुऱ्हाळे आहेत. पण महिला गुळव्या असणे हे दुर्मीळ उदाहरण आहे. यातील शंभर टक्के कसब आत्मसात केल्यास अन्य महिलांनाही हे काम करणे अशक्‍य नसल्याचे त्या सांगतात.

आथिॅक स्थैर्य आले
सुरुवातीचे दिवस हलाखीचे होते. पण गुऱ्हाळघराद्वारे कांचनताईंनी आर्थिक स्थैर्य मिळविले आहे.
कुटुंबाने रक्कम साठवून अडीच गुंठे जागा घेऊन आटोपशीर घर बांधले. दोन्ही मुलांना चांगल्या प्रकारे वाढवून व्यवसायात स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले. कांचनताई आज्जी म्हणूनही भूमिका पार पाहताहेत. कुटुंब एकत्रपणे नांदत असल्याचे समाधान आज कांचनताईंना आहे.

संपर्क- कांचन गोटूरे, ९८४४६४९७८४


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पॅलेट स्वरूपातील कोंबडी खतनिर्मितीनाशिक जिल्ह्यातील बल्हेगाव (ता. येवला) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनाचा आले शेतीतील आदर्शमौजे शेलगाव (खुर्द) (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद)...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
कडक जमिनींसाठी ठरतोय ‘व्हायब्रेटिंग...खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच...
पूरक व्यवसायांतून ‘नंदाई’ ने उभारले...साधारण अठरा वर्षांपूर्वी भावाने रक्षाबंधनाला शेळी...
शेतीचे शास्त्र अभ्यासून आदर्श बीजोत्पादनसवडद (जि. बुलडाणा) येथील विनोद मदनराव देशमुख या...
विषाणूजन्य रोग अन् ‘कीडमुक्त क्षेत्रा’...मागील वर्षी राज्यातील टोमॅटो पट्ट्यात कुकुंबर...
पुन्हा जोडतोय शेतीशीपुणे शहराजवळील पडीक शेत जमिनीवर ‘अर्बन फार्मिंग'...
देवरूख भागात फुलली स्ट्रॉबेरीमहाबळेश्‍वरसारख्या थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणात...
मांस उत्पादनांची ‘ऑनलाइन’ विक्रीकोरोना संकटाच्या कालावधीत अनेकांच्या नोकरीवर गदा...
साठे यांचे लोकप्रिय पेढेयवतमाळ जिल्ह्यातील लोणीबेहळ (ता. आर्णी) येथील...
जलसमृद्धीतून मिळवली संपन्नता नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव (ता.चांदवड) गावाने...
फळबाग शेतीतून गवसला शाश्‍वत उत्पन्नाचा...कौडगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील अरुण बाबासाहेब...
गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनात ‘मास्टर’सांगली जिल्ह्यातील नेहरूनगर (निमणी) (ता. तासगाव)...
विद्यार्थी बंधूंनी उभारला जैविक स्लरी...पुणे जिल्ह्यातील नानगाव येथील प्रतीक व प्रवीण या...
स्वादिष्ट हुरड्याचे उत्पादन अन् ‘...परभणी जिल्ह्यातील लिमला येथील तरुण शेतकरी...
भाजीपाला, फळबागेतून बसवली आर्थिक घडीसांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील सोमनाथ...
काटों पे चलके मिलेंगे साये बहार के...रुक जाना नहीं तू कहीं हार के काटों पे चलके...