आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात सेंद्रिय गूळनिर्मिती

कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी मठाच्या कृषी विज्ञान केंद्राने केवळ सहा मजुरांचा वापर होणारे यांत्रिकी पध्दतीचे आधुनिक गुऱ्हाळघर उभारले आहे. त्यातून पारंपरिक गुऱ्हाळासाठी जिथे पाऊण ते एक एकरपर्यंत जागा लागते, तिथे केवळ चार गुंठ्यात सेंद्रिय पद्धतीने गूळनिर्मिती शक्य केलीआहे.
अशा पद्धतीने गूळनिर्मिती होते.
अशा पद्धतीने गूळनिर्मिती होते.

कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी मठाच्या कृषी विज्ञान केंद्राने केवळ सहा मजुरांचा वापर होणारे यांत्रिकी पध्दतीचे आधुनिक गुऱ्हाळघर उभारले आहे. त्यातून पारंपरिक गुऱ्हाळासाठी जिथे पाऊण ते एक एकरपर्यंत जागा लागते, तिथे केवळ चार गुंठ्यात सेंद्रिय पद्धतीने गूळनिर्मिती शक्य केली आहे. कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवर प्रसिद्ध कणेरी मठ आहे. मठाचे कृषी विज्ञान केंद्रही (केव्हीके) आहे. कोल्हापूर हा ऊस व दर्जेदार गुळासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. साहजिकच कृषी विज्ञान केंद्रानेही हे महत्त्व व ग्राहकांची मागणी ओळखून गूळनिर्मिती सुरू केली आहे. त्यासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून आधुनिक गुऱ्हाळघर उभारले आहे. पारंपारिक गुऱ्हाळासाठी चिपाड वाळविण्यासह साठवणुकीसाठी किमान पाऊण एकर ते एक एकरपर्यंत जागा तर १५ पर्यंत मजुरांची गरज भासते. मठाने विविध ठिकाणाहून यंत्रांचा ‘सेटअप’ उभारत ६० बाय १८ फुटात गुऱ्हाळ उभारले आहे. यात ‘क्रशिंग’साठी अतिरिक्त दोन गुंठे जागा लागते. म्हणजेच सुमारे चार चे पाच गुंठ्यात केवळ सहा मजुरांची मदत घेऊन गूळनिर्मिती शक्य केली आहे. अशी होते यांत्रिक पद्धतीने गूळनिर्मिती टप्पा १- प्रक्रिया निर्मिती

  • गुऱ्हाळाची रचना दोन पद्धतीची.
  • रस गाळल्यानंतर ओले चिपाड तातडीने वाळविण्यासाठी सुमारे ४० फूट लांबीचा लोखंडी ड्रायर बसविण्यात आला आहे. तो चुलवाणातील उष्णता ओढून घेऊन २० ते ३० मिनिटात चिपाड वाळवितो. तेच जळण पुन्हा वापरले जाते.
  • घाणा (क्रशर) ते ड्रायर असा चढतीच्या टप्प्याने ‘सेटअप’ बसविला आहे. ड्रायरला समांतर तीन काहिली बसविल्या आहेत. घाण्यात ऊस गाळल्यानंतर रस व चिपाड वेगळे होतात.
  • तयार होणारा रस एक एचपी क्षमतेच्या इलेक्र्टिक मीटरच्या साहाय्याने उचलून पहिल्या कढईत नेला जातो. तर चिपाड बाजूला न काढता कन्व्हेअर बेल्टच्या साह्याने ड्रायरकडे नेले जाते.
  • पहिल्या काहिलीत सुमारे पंधरा टक्क्यापर्यंत रस तापविला जातो. गेट व्हॉल्व्हच्या साह्याने तो पहिल्या काहिलीतून दुसऱ्या व तिसऱ्या काहिलीत पाठविला जातो.
  • दुसऱ्या काहिलीत सुमारे ३० टक्क्यापर्यंत रस तापविला जातो.
  • काही दुसऱ्या तर काही तिसऱ्या काहिलीतून मळी काढली जाते.
  • )त्यानंतर गूळ निर्मिती होते.
  • टप्पा २
  •  आधण तापते. तिसऱ्या कढइला गेट व्हॉल्व्ह बसविण्यात आला आहे. रवे तयार होण्यापूर्वी रस उतारावर असणाऱ्या गेट वॉल्व्हमधून स्टीलच्या छोट्या पन्हाळीच्या साहाय्याने डोनीमध्ये घेतला जातो.
  • तिथे थंड केल्यानंतर घोटलेला रस बकेटमध्ये घेतला जातो.
  • तीन बाय दोन फुटाच्या लाकडी साच्यामधून गुळाच्या वड्या तयार केल्या जातात. सागवानी लाकडापासून साचा तयार केला आहे.
  • साच्यातून एक किलो वजनाच्या चोवीस वड्या तर अर्धा किलोच्या ३६ वड्या तयार होतात.
  • दीड बाय दोन फुटाच्या साच्यातून २५ ग्रॅमचे क्यूब्स तयार होतात. एका वेळी सुमारे १०४ क्‍यूब तयार होतात.
  • गूळ निर्मितीची संपूर्ण पध्दत सेंद्रिय स्वरूपाची आहे.
  • टप्पा ३ चिपाडाचा इंधन म्हणून वापर ऊस गाळलेले ओले चिपाड वाळविण्यासाठी ड्रायर महत्त्वाची भूमिका बजावतो. ड्रायरच्या एका टोकाला ब्लोअर बसविण्यात आला आहे. तो काहिलीच्या खाली असणाऱ्या चुलवाणाची उष्णता शोषून घेऊन ड्रायरमध्ये ढकलतो. या उष्णतेने ओले चिपाड वीस मिनिटांच्या कालावधीत कोरडे होते. ड्रायर फिरत असल्याने चिपाड आत चिकटून बसत नाही. त्याचा वापर त्वरित करणे शक्‍य होते. अध्या तासात चिपाड वाळविल्यानंतर ते पुन्हा चुलवाणाकडे बेल्टद्वारे नेले जाते. तिथे आवश्‍यक त्या प्रमाणात थेट चुलवाणात घातले जाते. येथे कोणत्याही मजुरांची गरज लागत नाही. आधणे संपेपर्यंत ही प्रक्रिया निरंतर चालते. यामुळे चिपाड गोळा करण्यासाठी देखील मजुरांची गरज भासत नाही. गुंतवणूक गुऱ्हाळ उभारणीसाठी सुमारे ३५ लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. यंत्र साम्रुग्रीसाठी अठरा लाखांपर्यंत भांडवल लागले. उर्वरित खर्च बांधकामासाठी झाला. गुऱ्हाळाच्या रचनेत बदल करण्यासाठी खासगी व्यावसायिकाकडून यंत्रे तयार करून घेतली.   आधुनिक गुऱ्हाळाचे फायदे -ऊस गाळल्यानंतर चिपाड गोळा करणे, ते वाळविण्यासाठी लांबवर नेऊन टाकणे, वाळलेले चिपाड पुन्हा पाटीतून चुलवाणाजवळ टाकणे, त्यात ते घालणे यासाठी प्रचलित गुऱ्हाळात मजुरांची संख्या पंधरापर्यंत लागते. परंतु आधुनिक गुऱ्हाळघरात प्रामुख्याने यंत्रांचा वापर केल्याने सहा मजुरांमध्ये काम होते. -साधारणतः: एका आधणासाठी तीन तासांपर्यंत वेळ लागतो. मात्र तीन काहिलींचा वापर केल्यास प्रक्रिया सुटसुटीत होऊन वेळेत बचत होते. प्रति काहीलीत १२५ ते १५० किलो गूळ तयार होऊ शकतो. एका दिवसात सहा ते आठ काहिली रस तयार करून गूळ तयार करता येतो. )पारंपारिक गुऱ्हाळात पाऊण ते एक एकरपर्यंत जागा लागते. आधुनिक पद्धतीत ६० बाय १८ फूट जागेत तसेच क्रशिंगसाठी दोन गुंठे अशी चार ते पाच गुंठे जागा पुरेशी होते. -पारंपरिक पद्धतीत चिमणीतून ज्वाला वाया जाते. हीच ज्वाला नव्या पद्धतीत ड्रायरसाठी वापरली जाते. -जुन्या पद्धतीत चिपाड त्वरित इंधन म्हणून वापरता येत नाही. नव्या पद्धतीत ड्रायरच्या साहाय्याने वाळवून त्वरित उपयोगात आणले जाते.

    संपर्क- पांडुरंग काळे-७३५०८४४१०१ विषय विशेषज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कणेरी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com