संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचाल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध पुरुषोत्तम करंदीकर (ता. कुडाळ) यांनी जांभूळ या पिकावर अधिक भर देत उत्पन्नस्रोत वाढविण्यासाठी आंबा, काजू, बांबू, साग अशी विविधता तयार केली आहे. यापुढे जाऊन अलीकडील काळात जांभळावर प्रक्रिया करून विविध उत्पादने निर्मिती व त्यास बाजारपेठ देण्यास सुरुवात केली आहे.
जांभूळ ज्यूस बनविण्याची प्रकिया सुरू असताना.
जांभूळ ज्यूस बनविण्याची प्रकिया सुरू असताना.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध पुरुषोत्तम करंदीकर (ता. कुडाळ) यांनी जांभूळ या पिकावर अधिक भर देत उत्पन्नस्रोत वाढविण्यासाठी आंबा, काजू, बांबू, साग अशी विविधता तयार केली आहे. यापुढे जाऊन अलीकडील काळात जांभळावर प्रक्रिया करून विविध उत्पादने निर्मिती व त्यास बाजारपेठ देण्यास सुरुवात केली आहे.   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात करंदीकर वाडीत अनिरुद्ध पुरुषोत्तम करंदीकर राहतात. त्यांचे चार भावांचे मिळून संयुक्त कुटुंब आहे. एकूण जमीन १५० एकरांपर्यंत आहे. मुंबई येथील नामांकित महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. प्रचलित पद्धतीप्रमाणे घरून नोकरी करण्याचा आग्रह सुरू झाला. पण अनिरुद्ध यांना शेतीची पहिल्यापासूनच आवड होती. क्षेत्रही मोठे असल्याने नोकरी न करता शेतातच राबण्याचा धाडसी निर्णय घेत त्यांनी गाव गाठले. शेतीतील वाटचाल बहुतांशी जमीन डोंगराळ भागात असल्यामुळे फळपिकांची लागवड करणे खर्चिक होते. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेत टप्प्याटप्प्याने लागवड करण्यास सुरुवात केली. आंबा, काजू, जांभूळ या फळपिकांसोबत हमखास उत्पन्न देणाऱ्या बांबू लागवडीवर भर दिला. सागवान रोपांचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली. पॉवर टिलर खरेदी केले. निरुखे पंचक्रोशीतील गावांमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरासमोर जाऊन भात भरडून देण्याचा व्यवसायही केला. काही वेळा मध्यरात्रीपर्यंत हे काम चालायचे. या व्यवसायातून नफा झाला. गावांमध्ये ओळखी झाल्या. त्याचा फायदा पुढे झाला. जांभूळ शेती, विक्री व्यवस्था आंबा, काजू ही कोकणातील लोकप्रिय फळपिके असल्यामुळे बाजारपेठ मिळविताना अडचण येत नव्हती. परंतु जांभळाच्या विक्री व्यवस्थेची पद्धत वेगळी होती. एखादा व्यापारी गावात येऊन टोपली पाहून दर द्यायचा. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे करंदीकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी विक्री व्यवस्थेचा अभ्यास केला. मुंबई, पुण्यासारख्या बाजारपेठांत जांभळे पाठविणे सुरू केले. अंदाज आल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांकडून किलोवर जांभूळ खरेदी सुरू केली. त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होऊ लागला. बहुतांशी शेतकरी त्यांना माल देऊ लागले. या व्यवसायात चांगला जम बसला. मग विविध शहरांत बाजारपेठ मिळवायला सुरुवात केली. प्रकिया उद्योगाची उभारणी जांभूळ व्यवसाय करीत असताना करंदीकर यांच्या एक बाब निदर्शनास आली. हे फळ नाशीवंत असते. त्यामुळे स्वतःकडील व शेतकऱ्यांकडून घेतलेला माल बाजारपेठेत वेळेत पोहोचला नाही तर नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यातच जांभळावर प्रकिया केलेल्या उत्पादनांना बाजारपेठेत चांगली मागणी असल्याचेही जाणवले. ही संधी लक्षात घेऊन अलीकडील दोन वर्षांत जांभळावर आधारित प्रकिया प्रकल्प सुरू केला. विविध फळपिकांची लागवड असल्याने देखभाल आणि व्यवस्थापनासाठी कामगारांची गरज भासते. त्या दृष्टीने दहा कुटुंबांना बारमाही, तर हंगामात ५० हून अधिक स्थानिकांना रोजगार लाभला आहे. प्रक्रियेच्या रूपाने त्यात भर पडली आहे. करंदीकर यांची शेती

  • सुमारे ४५ एकरांत काजू लागवड. सुमारे साडेचार हजार झाडे.
  • २५ एकरांत बांबू तर बारा एकरांत सागवान.
  • पाच एकरांमध्ये आंबा.
  • अडीच एकरांत जांभूळ. आठ बाय आठ मीटरवर लागवड. क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ केली जात आहे.
  • जांभळाचा हंगाम कालावधी-मार्च ते जून.
  • सध्या जांभळाची एकूण १५० झाडे.
  • विक्री व्यवस्था करंदीकर सांगतात, की निरुखे भागातील जांभळाचा आकार, चव आणि रंग दर्जेदार आहे. त्यामुळे त्याला मागणीदेखील आहे. मुंबई येथे मुख्य विक्री करतो. उत्पादनाच्या प्रमाणावर दर अवलंबून असतात. प्रति किलो ५० रुपयांपासून ७०, १०० ते १५० रुपये दर मिळतो. प्रति झाड उत्पादन एकहजार रुपये ते त्याहून अधिकही मिळते. सर्व झाडे स्थानिक वाणाची आहेत. यंदा फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथून स्थानिक जातीपासून विकसित केलेल्या कलमांची लागवड केली आहे. बांबूसाठी पनवेल येथील व्यापारी आहेत. प्रति १२ फुटाच्या दोन बांबूंना ७५ रुपये दर मिळतो. काजूचे बी विकले जाते. त्यास किलोला ११० ते १३० रुपयांपर्यंत दर मिळतो. प्रक्रिया प्रकल्प सुमारे ३७ लाख रुपये गुंतवणूक करून जांभूळ प्रकिया उद्योग उभारला आहे. त्यासाठी २८ लाख रुपये कर्ज घेतले. ड्रायर, पल्पर, पॅकिंग यंत्र आदींची खरेदी केली आहे. सध्या ज्यूस, जांभूळ पोळी, पावडर, बियांपासून साखरविरहित पावडर आदी पदार्थ बनवायला सुरुवात केली आहे. मुंबई व पुणे येथे बाजारपेठ मिळविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना लॉकडाउनमुळे विक्री व्यवस्था कोलमडली आहे. ती सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. एकत्र कुटुंब असल्याने सर्व सदस्यांची साथ मिळते. पहिल्या अपयशानंतर नव्याने उभारी जांभूळ खरेदी व्यवसाय सुरू केल्यानंतर दळणवळणाची अपुरी सोय, बाजारपेठांचा चुकलेला अंदाज यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मोठे नुकसान झाले. जांभूळ खरेदी ज्यांच्याकडून केली त्यांचे पैसे चुकते केले. त्यानंतर व्यवसायातील खाचखळग्याचा अभ्यास करीत त्यात नव्याने उभारी घेतली. वादळाने दिला तडाखा यंदा १४ मे रोजी तौक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा जिल्ह्याला बसला. अन्य गावांप्रमाणे निरुखे गावातील वीजखांब उन्मळून पडले. सुमारे १५ दिवस वीजपुरवठा खंडित झाला. ऐन जांभूळ हंगामात ही बाब घडल्याने मोठे नुकसान झाले. जांभळावर प्रकिया करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. तरीही मार्ग काढून न खचता पुढे वाटचाल करण्याची हिंमत करंदीकर यांनी ठेवली आहे. संपर्क- अनिरुद्ध करंदीकर, ९४२३५१११५०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com