करपे यांची सुपीक, समृद्ध, संपन्न एकात्मिक शेती

आले पिकात करपे यांचा एकत्रित परिवार
आले पिकात करपे यांचा एकत्रित परिवार

बीड जिल्ह्यातील जवळबन येथील करपे कुटुंबाने नियोजनबद्ध शेतीतून वाट्याला आलेले १५ एकर क्षेत्र ३६ एकरांवर नेले. हंगामी व नगदी पिकांची विविधता, दुग्धव्यवसाय, देशी जनावरांचे संगोपन, बांधावर पाचशेहून अधिक वृक्षांची लागवड, जलसंधारण, भाडेतत्त्वावर रोपवाटिका अशा विविध स्रोतांनी व वैशिष्ट्यांच्या आधारे या कुटुंबाने आपली शेती सुपीक, समृद्ध व आर्थिकदृष्ट्या सक्षम केली आहे.   बीड जिल्ह्यात जवळबन (ता. केज) येथे अंकुशराव व कौशल्या हे करपे दांपत्य राहते. संदीप व रमेश ही त्यांची विवाहित मुले सध्या शेतीची मुख्य जबाबदारी सांभाळतात. वाटण्या झाल्यानंतर या कुटुंबाच्या वाट्याला १५ एकर शेती आली. मात्र, सुयोग्य पद्धतीने शेतीची आखणी व व्यवस्थापन करून या कुटुंबाने आपली शेती ३६ एकरांवर विस्तारत प्रगतीकडे वाटचाल केली. बहुविध पीकपद्धती करपे यांच्याकडे हंगामी, नगदी व बहुविध पीकपद्धतीची रचना आहे. ऊस व आले ही मुख्य पिके, तर जोडीला कापूस, तूर, सोयाबीन, रब्बी ज्वारी, गहू, हरभरा अशी पिके असतातच. दुष्काळाची वर्षे वा कालावधी वगळता या पीकपद्धतीतून सुमारे दहा लाख रुपयांच्या पुढे उत्पन्न घेण्याचा कुटुंबाचा प्रयत्न असतो. बहुतांश पिकांत आंतरपिके असतात. आले पिकात मिरची किंवा कोबी किंवा मूग, तर कपाशीत तूर असते. जलसंधारण पाण्याची सोय व्हावी म्हणून चार विहिरी, दोन बोअर घेतले. जलस्रोतांचे पुनर्भरण करण्याला प्राधान्य दिले आहे. वाहून जाणारे पाणी जिरवण्यासोबतच प्रत्येक शेतात बांधबंदिस्ती व बांधावर जास्तीत जास्त झाडे लावण्याचे काम केले आहे. गावशिवारातील मध्यम प्रकल्पाशेजारी ११ गुंठे जमीन घेऊन तीन पाइपलाइन्स केल्या आहेत. सुमारे ३० एकरांत ठिबक सिंचन आहे. या सर्व बळावर बहुविध पीकपद्धतीचा पाया बसवला आहे. ट्रॅक्‍टरसह रोटावेटर, बीबीएफ पेरणी यंत्र, नांगर, मोघडा, सरी पाडणी यंत्र, टिलर, ढेकळे फोडण्यासाठी आदी विविध यंत्रांची भक्कम जोड शेतीला दिली आहे. बांधावर बहुविध फळझाडं वृक्ष लागवडीकडे विशेष लक्ष देणाऱ्या रमेश यांच्या संकल्पनेतून शेताच्या प्रत्येक बांधावर आजवर पाचशेवर बहुविध झाडांची लागवड झाली आहे. त्यात साग, निंब, लिंबू, आंबा, चिंच, आवळा, रामफळ, सीताफळ, नारळ, पेरू, जांभूळ, हिरडा, बेहडा, मेहंदी, रिठा, कांचन, खैर, करंजा आदींचा समावेश आहे. बांधावरची झाडे वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न देतात, असे संदीप यांनी सांगितले. दुग्धव्यवसायाची जोड सन २००५ मध्ये दुग्धव्यवसायाची जोड दिली. चार लालकंधारी गायी, सहा गीर गायी, एक गावरान गाय व तीन म्हशींची जोड असे पशुधन आहे. सरासरी १२ ते १५ लिटर दूध दररोज डेअरीला दिले जाते. सरासरी ३० रुपये प्रतिलिटर दर मिळतो. वर्षाला एक गोऱ्हा विक्रीसाठी उपलब्ध होतो. वर्षाला २५ ते ३० ट्रॉली शेणखत मिळते. त्याआधारे जमिनीची सुपीकता वाढविली आहे. गुऱ्हाळातून अतिरिक्त उत्पन्न करपे यांचे गुऱ्हाळघरही आहे. दुष्काळामुळे गेल्यावर्षी गूळनिर्मिती साधली नाही. एरवी तीन लाख रुपयांचे उत्पन्न हा व्यवसाय देतो. यंदा पाऊस व झालेल्या ऊस लागवडीमुळे गुऱ्हाळ पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मध्य प्रदेशातून मजूर आणण्याची जुळवाजुळव सुरू केली आहे. नर्सरीतून उत्पन्न दोन एकर जागा सामाजिक वनीकरण विभागाला नर्सरीसाठी भाडेतत्त्वावर दिली आहे. त्याचबरोबर आपल्याप्रमाणेच इतरांनी विविध झाडे लावावीत, ती त्यांना परिसरात सहज उपलब्ध व्हावीत हादेखील त्यामागे हेतू आहे. विभागाने ३२ प्रकारच्या झाडांची रोपे तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हमखास उत्पन्नाची पिकं काशीफळ व कलिंगड ही दोन हुकमी पिकं. साधारण ७० दिवसांत काशीफळ दोन एकरांत मेमध्ये घेण्यात येतं. एकरी तीस टनांपर्यंत उत्पादन मिळतं. त्याला किलोला साडेआठ रुपयांपर्यंत दर मिळतो. नागपूर बाजारात त्याची विक्री होते. पंधरा वर्षांपासून दोन ते अडीच एकरांत कलिंगड घेतात. डिसेंबर २० तारखेपर्यंत लागवड केल्या जाणाऱ्या या पिकाचे एकरी २५ ते ३० टनांपर्यंत उत्पादन मिळतं. पाच ते सहा रुपये प्रतिकिलो दर मिळतो. व्यापारी जागेवरून खरेदी करतात. दोन्ही पिकांमधून प्रत्येकी ७५ हजार रुपये उत्पन्न मिळतं. सातत्याने मातीपरीक्षण

  • करपे बंधू डिघोळआंबा (ता. अंबाजोगाई) येथील कृषी विज्ञान केंद्राचे सदस्य
  • तेथील तज्ज्ञांकडून विविध शास्त्र समजून घेताना सातत्याने मातीपरीक्षण
  • त्यानुसार रासायनिक खतांचा वापर
  • चौदा वर्षांपासून गोबरगॅस करपे कुटुंबाकडे जवळपास २००५ पासून गोबरगॅस यंत्रणा आहे. त्यातील स्लरीचा वापर शेतीसाठी होतोच, शिवाय वीजभारनियमनात प्रकाश, तसेच स्वयंपाकासाठीही त्याचा वापर होतो. वर्षभराची सिलिंडरची गरज त्यांनी कमी केली आहे. पहिल्या दिवसापासूनचे ‘ॲग्रोवन’ अंक संग्रहित करपे कुटुंब ‘ॲग्रोवन’चे पहिल्या दिवसापासूनचे वाचक आहेत. मध्यंतरीचे काही अंक वगळता त्यांच्याकडे पहिल्यापासूनचे सारे अंक संग्रहित आहेत. त्यातील यशकथा, लेख, सल्ले आदी माहितीनुसारच शेतीचे व्यवस्थापन नेटके करणे सोपे झाल्याचे संदीप म्हणाले. करपे यांच्या शेतीची काही वैशिष्ट्ये

  • प्रत्येक हंगामाआधी कुटुंबातील सर्वजण बसून शेतीचे नियोजन करतात
  • मूग, गावरान भुईमूग यांचे जतन
  • गावाला पिण्याचे पाणी कमी पडले तर पुरवठा करतात
  • सेंद्रिय शेतीवर अधिक भर. स्लरी, जीवामृत, निंबोळी अर्क यांचा वापर
  • आजीनं जपलेल्या बन्सी गव्हाचं पुढेही जतन
  • यंदा ड्रीपवर गहू घेणार
  • निंबोळी भरडण्यासाठी यंत्राची खरेदी
  • पिकाला माती लावण्याचं अवजार तयार केलं
  • पाणी बचत करून आले स्वच्छ धुण्याची जाळी तयार केली
  • प्रतिक्रिया रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापराने जमीन कडक बनत चालली होती; परंतु शेणखत व अन्य सेंद्रिय घटकांचा वापर वाढवला. आता जमीन मऊ व सुपीक बनली आहे. पाण्याचे स्रोत वाढविण्यासोबतच शेतातलं पाणी शेतातच मुरविण्याची व्यवस्था केल्याने शेती शाश्‍वत झाली आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब ०.७ टक्के आहे. संदीप करपे संपर्क- ९४२३२२९४०, ७७९८६२६०४५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com