अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी दिल्ल
यशोगाथा
विद्यार्थी बंधूंनी उभारला जैविक स्लरी निर्मिती प्रकल्प
पुणे जिल्ह्यातील नानगाव येथील प्रतीक व प्रवीण या विद्यार्थीदशेतील युवा खळदकर बंधूंनी मनुष्यबळाचा कमीतकमी वापर सांगणारा यांत्रिक पध्दतीचा जैविक स्लरी व कीडनाशक अर्क निर्मिती प्रकल्प उभारला आहे. महिन्याला सुमारे दहाहजार लिटर स्लरी विक्रीचा त्यांचा प्रयत्न असतो.
पुणे जिल्ह्यातील नानगाव येथील प्रतीक व प्रवीण या विद्यार्थीदशेतील युवा खळदकर बंधूंनी मनुष्यबळाचा कमीतकमी वापर सांगणारा यांत्रिक पध्दतीचा जैविक स्लरी व कीडनाशक अर्क निर्मिती प्रकल्प उभारला आहे. महिन्याला सुमारे दहाहजार लिटर स्लरी विक्रीचा त्यांचा प्रयत्न असतो. परिसरातील विविध पिकांतील शेतकऱ्यांकडून या स्लरीला मोठी मागणी मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
पुणे जिल्ह्यात दौंड हा बागायती तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील नानगावातील संजय खळदकर यांची वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. ते नोकरी सांभाळून शेतीही करतात. त्यांना प्रतीक आणि प्रीतम अशी दोन मुले आहेत. प्रतीक बीई केमिकल शाखेच्या तिसऱ्या तर प्रीतम बीएस्सी बायोटेक शाखेच्या प्रथम वर्षात शिकत आहे. दोघांनाही शेतीची आवड आहे. साहजिकच घरची शेती सांभाळताना विद्यार्थिदशेतच त्यांनी शेतीत उपयोगी तंत्रज्ञान तयार करण्यावर भर दिला.
जैविक स्लरी निर्मिती प्रकल्प
- आपल्या तांत्रिक शिक्षणाचा उपयोग दोघा बंधूंनी घरच्या सेंद्रिय शेतीत चांगल्या प्रकारे केला आहे.
अलीकडील काळात शेतकऱ्यांकडून जीवामृत, शेणस्लरी आणि घरगुती कीडनाशक अर्क यांचा वापर वाढला आहे. काळाची ही गरज दोघा बंधूंनी ओळखली. त्यांनी मनुष्यबळाचा कमीतकमी वापर करून यांत्रिक पद्धतीने जैविक स्लरी व कीडनाशक अर्क निर्मिती करण्याचे ठरवले. - त्यानुसार लागणाऱ्या घटकांचा आराखडा तयार केला.
- स्लरी बनविण्यासाठी ५० बॅरेल्सची (प्रत्येक ओळीत पाच अशा दहा रांगा) साखळी व त्याची बॅच असे स्वरूप ठेवले आहे.
- मिश्रण ढवळत ठेवण्यासाठी १६ व २० वॅट क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे.
- तयार होणाऱ्या वायूचे उत्सर्जन करण्यासाठी पाइपचा वापर केला आहे.
- प्रकल्प ६०० चौरस फूट जागेत उभारला आहे.
अशी होते निर्मिती
- रात्री नऊच्या सुमारास यांत्रिक पद्धतीने मिश्रण ढवळण्यास सुरवात होते. सकाळी नऊ वाजेपर्यंत ही बॅच चालते. यातून पाचशे लिटर द्रावण उपलब्ध होते. यात अर्क २०० लिटर तर स्लरी ३०० लिटर असे उत्पादन होते.
- या पद्धतीमुळे मनुष्याचे श्रम मोठ्या प्रमाणात वाचले आहेत.
- स्लरी बनविण्यासाठी प्रामुख्याने देशी गोमूत्र, शेण, कोंबडी खत, गांडूळ खत, शेळी- मेंढीची लेंडी, ‘किचन वेस्ट’ यांचा वापर होतो.
- बहुतांश कच्चा माल आपल्या शेतातच उपलब्ध होतो. चार देशी गायी आहेत. शंभरपर्यंत कोंबड्याही होत्या. लेंडी खत अन्य शेतकऱ्यांकडून घेतले जाते.
- कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी परिसरातील उपलब्ध वनस्पतींचा वापर होतो.
- मिरची, लसूण, आले, कडुनिंब यांचाही वापर होतो.
सहा प्रकारच्या स्लरी
स्लरीचा वापर मुख्यत्वे पीकवाढीसाठी आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी होत असल्याने शेतकऱ्यांकडून त्यास चांगली मागणी आहे. या प्रकल्पात जीवामृत स्लरी, शेळी-मेंढी लेंडी स्लरी, कोंबडीखत स्लरी आदी विविध प्रकारच्या स्लरी तयार केल्या जातात. त्याचबरोबर दशपर्णी अर्क, ठेचा (मिरची, लसूण, आले) अर्क, कडुनिंब असे विविध अर्क तयार केले जातात.
परिसरातील शेतकरी जोडले
परिसरातील ऊस, फळबागा, भाजीपाला, कांदा आदी पिकांतील शेतकऱ्यांकडून स्लरी व अर्काला चांगली मागणी आहे. गेल्या दोन वर्षांपासून ३०० हून अधिक शेतकऱ्यांसोबत संपर्कजाळे तयार केल्याचे प्रतीक सांगतात. शेतकऱ्यांनी आपला प्लॅस्टिक कॅन आणला असल्यास त्यात द्रावण भरून दिले जाते.
अर्थकारण होतेय मजबूत
सुरवातीला कमी प्रमाणात स्लरीचे उत्पादन व्हायचे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना संकट काळात फटका बसण्याचा अंदाज होता. मात्र याउलट अनुभव आला. महिन्याला सुमारे दहा हजार लिटरपर्यंत विक्रीचा प्रयत्न सुरू आहे. स्लरी १२.५० रुपये तर अर्क १५ रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. प्रकल्प उभारणीसाठी सुमारे साडेतीन लाख रुपये आला. सध्या दर महिन्याला कच्चा माल, वीज, वाहतूक व अन्य असा सुमारे ९० ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च असतो.
विक्रीच्या नोंदी मोबाईलवर
शेतकऱ्यांना विक्री केलेल्या नोंदी ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने मोबाईलवरील खाते बुकचा अवलंब होतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी संकलित होते. हाताळणी सोपी होते.
उप उत्पादनाचा वापर
प्रकल्पामध्ये स्लरी व अर्कातील चोथा दररोज ५० किलोपर्यंत उपलब्ध होतो. त्याचा वापर घरच्या गांडूळ खत निर्मितीसाठी होतो. दोन बेडसमध्ये पॉलीथीनमध्ये हे खत तयार होते. घरच्या शेतीत ते वापरले जाते. दोघा भावांनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. प्रीतम मुख्यतः निर्मिती तर प्रतीक मार्केटिंगचे काम पाहतात. उमेश जांभळे, कृषी विभाग- आत्माचे अधिकारी महेश रूपनर व डॉ. . सुदर्शन खळदकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
प्रतिक्रिया
सध्या आमचे शिक्षण सुरू आहे. ते संपल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा उद्योग व्यवसाय व स्वतःची शेती विकसित करून स्वयंपूर्ण होण्याचा आमचा दोघा बंधूंचा प्रयत्न आहे.
-प्रतीक खळदकर
७५१७२८२५५५, ९०९६६२६३३३
फोटो गॅलरी
- 1 of 94
- ››