पॉलिबॅग आणि प्लॅस्टिक साहित्य जनावरांच्या कोठीपोटमध्ये जाते.
यशोगाथा
शेतीपेक्षा ठरले वराहपालन फायदेशीर
तळणी (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील जनार्दन व चंद्रकांत या किनगे बंधूंनी दहा एकर शेतीला पूरक असा वराहपालन व्यवसाय सुरू केला आहे. जिल्ह्यासाठी हा तसा नवा किंवा दुर्मीळ प्रयोग म्हणायला हवा. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसायाचे ‘प्रमोशन’ करून उत्पादित वराहांना बाजारपेठ मिळवण्यात व त्यातून अर्थकारण उंचावण्यात हे बंधू यशस्वी झाले आहेत.
तळणी (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील जनार्दन व चंद्रकांत या किनगे बंधूंनी दहा एकर शेतीला पूरक असा वराहपालन व्यवसाय सुरू केला आहे. जिल्ह्यासाठी हा तसा नवा किंवा दुर्मीळ प्रयोग म्हणायला हवा. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसायाचे ‘प्रमोशन’ करून उत्पादित वराहांना बाजारपेठ मिळवण्यात व त्यातून अर्थकारण उंचावण्यात हे बंधू यशस्वी झाले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात तळणी (ता. मोताळा) हे संपूर्णतः शेती आधारित अर्थव्यवस्थेचे गाव आहे. गावातील जनार्दन व चंद्रकांत या किनगे बंधूंची दहा एकर शेती आहे. त्यातील तीन एकर शेती बागायती आहे. या शेतात कापूस, मका तसेच काही भाजीपालावर्गीय पिके ते घेतात. चंद्रकांत यांनी १५ वर्षे वेल्डिंग वर्कशॉप’ संबंधीचा व्यवसाय केला. परंतु आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना तो बंद करावा लागला. आता ते पूर्णवेळ भावासोबत शेती करतात.
वराहपालनाचा पर्याय
अर्थकारण उंचावण्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय असावा या हेतूने किनगे यांनी शोध सुरू केला. यू-ट्यूबवर त्यांनी अनेक व्हिडिओ पाहिले. त्यातून नगर जिल्ह्यात एकजण वराहपालन करीत असल्याची माहिती मिळाली. वराहांचे संगोपन, त्याची बाजारपेठ, अर्थकारण तपासले. पूर्ण विचारांती २०१८ मध्ये वराहपालनात पाऊल ठेवले. नगर जिल्ह्यातील संबंधित वराहपालकाकडून अमेरिकन यॉर्कशायर जातीची २० पिले आणली.
वराहपालनातील बाबी
- किनगे सांगतात, की वराहपालन सुरू केले. सुरुवातीला काहीच अनुभव नसल्याने नुकसान झाले.
- मात्र हळूहळू त्यात शिकत गेलो. तंत्र आत्मसात करण्यास सुरुवात केली. पालनासाठी अमेरिकन
- व्हाइट यॉर्कशायर जातीची निवड केली. ही जात भारतात अधिक प्रमाणात वापरण्यात येते. पांढरा रंग व त्यावर थोडे काळे ठिपके पाहण्यास मिळतात. ही जात मिश्र प्रजननासाठी उपयुक्त असल्याचे किनगे सांगतात.
- सुरुवातीला गावाशेजारी वराहपालन सुरू केले. आता शेतात पालन करीत आहेत. यासाठी १०० बाय २ फूट आकाराचे मोठे शेड उभारले आहे. त्यामध्ये लहान-मोठी धरून सुमारे ४०० जनावरे मावू शकतात.
- पिंजरा स्वरूपात बांधणी केली आहे. प्रत्येक पिंजऱ्यात दोन जनावरे ठेवण्यात येतात.
- शेडच्या अवतीभोवती वर्षभर हिरवळ राहील याची खबरदारी घेतात. याचे कारण म्हणजे शेडमध्ये उन्हाच्या झळा थेट पोचत नाहीत. शेडमधील वातावरण, आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत होते. झळांपासून वाचविण्यासाठी उन्हाळ्यात शेडवर पाणी फवारतात. आच्छादन टाकतात. अशा छोट्या छोट्या बाबींचे काटेकोर नियोजन केल्याने पालन यशस्वी होते.
- काही प्रमाणात जनावरांची मरतुकही होते.
- खाद्य म्हणून मका, सोयाबीन, गहू, तांदूळ, शेंगदाणा पेंड तसेच मिनरल मिक्श्चरचा वापर होतो. सोबतच भाजीपाला वर्गीय पिके उदा. पालक, मेथी, चुका शेतात पिकवून खाऊ घालतात. यामुळे जनावरांना पोषणमूल्ये मिळण्यास मदत होते. शेतात मकाही पिकवतात. त्याचाही वापर होतो.
- परदेशी जातीच्या वराहांचे पालन करताना स्वच्छतेवर जोर देतात. शेडमध्ये सिमेंट क्राँक्रीटचा वापर केला आहे. जनावरांना उन्हाळ्यात दिवसातून चार वेळा पाण्याने धुतले जाते. यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी शेडमध्ये प्रकाशाची (लाइट) व्यवस्था केली आहे.
स्वतः राबणे ठरले महत्त्वाचे
किनगे बंधूंनी वराहपालनात पाऊल टाकले तेव्हा सुरवातीला काही लोकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत व्यवसायात चिकाटी व सातत्य राखले. जसजसा काळ लोटला तसे समाजाचा दृष्टिकोन बदलत गेला. आज हेच वराहपालन शेतीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देत असल्याचे किनगे बंधू ठामपणे सांगतात. आम्ही दोघे भाऊ स्वतः राबतो. शेडची स्वच्छता, जनावरांना धुणे, त्यांचा आहार, आरोग्यविषयक समस्या असल्यास औषधोपचार, इंजेक्शन देण्याचे काम स्वतःच करतात. कुठलाही मजूर यासाठी ठेवलेला नाही. शेतातच शेड असल्याने शेतीतील दैनंदिन कामे करून या व्यवसायाकडे लक्ष देतात.
यू-ट्यूबच्या माध्यमातून मार्केटिंग
विक्री व्यवस्था सर्वांत महत्त्वाची होती. त्यामुळे यू-ट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड करून
आपल्या वराहपालनाचे ‘प्रमोशन’ करण्यास सुरुवात केली. भुसावळ, नगर, पुणे, बारामती येथील व्यापारी संपर्क साधू लागले. जागेवरून खरेदी करू लागले.
विक्री
- आतापर्यंत टप्प्याटप्प्याने १००, ५०, ६० अशा प्रमाणात विक्री.
- सध्या संख्या ३० ते ४०
- विक्रीवेळचे वजन- २५ ते ३० किलो
- दर १०० ते ११५ रु. प्रति किलो
- नगावरही विक्री- ५००० रुपये प्रति नग
- दोन ते अडीच महिन्यांचे पिलू- दोन ते अडीच हजार रुपये दर
अर्थकारण
सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास ३५० च्या संख्येपर्यंत विक्री झाली आहे. वराहांची पैदास जलद होते. त्यामुळे विक्रीस ती लवकर उपलब्धही होतात.
वर्षाला खर्च वजा जाता दोन ते अडीच लाख रुपये नफा मिळतो असे किनगे सांगतात.
खाद्य बहुतांशी घरचेच असल्याने त्यावरील खर्च बऱ्याच अंशी कमी झाला आहे.
प्रतिक्रिया
बुलडाणा जिल्ह्यात वराहपालनाचा प्रयोग आमचाच एकमेव असावा. खरे तर मागणी चांगली आहे. मात्र या व्यवसायाला अद्याप म्हणावी तशी प्रतिष्ठा नाही. त्यामुळेच तिकडे वळण्याचे प्रमाण कमी आहे.
मात्र शेतीपेक्षा या व्यवसायाने आमचे अर्थकारण उंचावले आहे यात शंका नाही.
चंद्रकांत किनगे
संपर्क- जनार्दन ज्ञानदेव किनगे- ७०३८६२७५७२
चंद्रकांत ज्ञानदेव किनगे-९४२२०१७१९४
फोटो गॅलरी
- 1 of 91
- ››