बॅंक सांभाळणार तुमचे पैसे

बॅंक सांभाळणार तुमचे पैसे
बॅंक सांभाळणार तुमचे पैसे

बचत गट प्रमुख असणाऱ्या राधासोबत तिच्या गटात असणारी भामाबाई बँकेत गेली. राधाने बँकेमध्ये स्वतःचे बचत खाते काढायचे ठरवले होते. भामा राधासोबत गेली, कारण तिलाही खाते काढायचे होतेच, पण राधाला म्हणाली, ‘आधी मी तुझ्यासोबत बँकेत येते, मग काढू माझे खाते’. पहिल्यांदाच बँकेत गेलेली भामा बँकेत गेल्यावर एकदम अवघडून गेली. बँकेत खूप गर्दी होती, जिकडे तिकडे कागदच कागद, टेबलावर कागद समोर ठेवून लिहित असणारी माणसं बघून तर भामाला मनातल्या मनात घाबरायला झालं! भामा राधाचं काम होईतो नुसती बसली होती बँकेतल्या बाकड्यावर इकडे तिकडे बघत....पण कधी एकदा बाहेर जातो असं झालं होतं तिला. तेवढ्यात राधाने खाते काढायचा अर्ज भरून साहेबाच्या टेबलावर दिला नि भामाकडे आली ‘चला आत्या, उरकल माझं’ असं गोड हसून म्हणाली. भामा म्हणाली, ‘चल बाई लवकर कधीची बसून बसून अवघडले होते.’ दोघी बँकेतून बाहेर पडून झपझप चालत गावाकडे निघाल्या. भामाला राधाचा फारच अभिमान वाटायला लागला. बँकेत सगळी बापी माणसं असली तरी किती धिटाईने करते सगळं अस वाटून गेलं तिला! तेवढ्यात एक कागद हातात ठेवून राधा म्हणाली, ‘हा तुमचा खातं काढायला अर्ज आणलाय साहेबाकडनं. पुढच्या महिन्याला जाऊ तोवर भरून ठेवा.’ ‘आता गं बाया मला अडाणीला येणार का ग भरता. तूच भर पण राहू दे....बघू या कधी भरायचा तो अर्ज’....अजूनही भामाच्या मनातलं बँकेत आलेलं दडपण गेलं नव्हतं. राधानं भामाबाईच्या हालचाली वरून हे आधीच ओळखलं होतं पण काहीच न बोलता तिनं ठरवलं होतं की भामाबाईला बँकेत खातं काढायला लावायचंच. एवढी घरासाठी राबराब राबणारी भामाबाई पण तिच्या नावाने बँकेत काही चार पैसे बाजूला पडले नव्हते. नि त्यामुळे भामाबाईच्या गरजेला नेहमीच कोणा पुढे तरी कायम हात पसरावे लागत होते. वेळेला कोणी पैसे दिले की भामाबाईला त्या माणसानं तिच्यावर किती उपकार केले असंच वाटायचं. भामाबाईची राधा नात्याने सून असली तरी तिला हे नेहमी अवघड वाटायचं. कमावलेले चार पैसे अडीनडीला तिच्या पाशी हवेत ते सुद्धा हक्काचे अस राधाला वाटायचं. भामा गरजेला पैसे लागलेच तर असूदे म्हणून तांदळाच्या डब्यात लपवायची नाहीतर कौलात ठेवायची. पण सारखं भ्या वाटायचं पैसे कुणाच्या हाती तर नाही लागणार?... आणि असे चोरून चोरून किती पैसे ठेवता येणार होते? पण काय करणार बाया माणसांना त्या शिवाय काही दुसरा मार्गाच नव्हता! हे सगळं राधा जवळून बघत होती. अचानक मोठ्ठा पाऊस आला की भामाबाईला कौलातले पैसे भिजतील अशी भीती असायची नाहीतर ती माहेरी गेल्यावर जावेने भात घातला तर धान्यात दडवून ठेवलेले पैसे तिच्या हाती तर लागणार नाहीत ना असं वाटून ती माहेरी जाणंच टाळायची. करणार काय म्हणून तर बँकेची ओळख करून घ्यायची होती भामालासुद्धा! राधा नेहेमी गोड वागायची म्हणून तिला मनातलं काहीपण विचारायला भामाला काही वाटायचं नाही, आजही त्यामुळेच राधा सोबत ती बँकेत गेली होती. शेवटी भामाने राधेला विचारलंच, ‘माझे पैसे बँक सांभाळेल का? किती सांभाळेल? का म्हणून सांभाळेल?..... मी बँकेच्या ना नात्याची ना गोत्याची!’ राधाला प्रश्न ऐकूनच मज्जा वाटली. ती म्हणाली, ‘आत्या बँक आपल्या कडून पैसे घेते नि दुसऱ्याला कर्ज देते म्हणून बँकेला आपले पैसे हवेच असतात. आपण कितीपण पैसे ठेवले तरी बँक कध्धी नाही म्हणत नाही. तुम्ही ठेवून तर बघा एकदा!’...... ‘आणि परत नाही मिळाले तर’ भामाने विचारले... राधाला आनंद झाला कारण तिच्या लक्षात आलं कि भामा बँकेत पैसे ठेवायच्या मनःस्थितीत जायला लागली आहे म्हणून असे प्रश्न पडायला लागले आहेत! गप्पा मारता मारता गाव आलं. राधा म्हणाली, ‘आता मला स्वयंपाकाला लागावं लागेल. आत्या आपण उद्या भेटू या. तुम्हाला सगळं उलगडून सांगते, मगच खातं काढा बँकेत! आधी सारी तपशीलात माहिती करून घ्या नाहीतर होईल तुमचा अभिमन्यू ...पैसे ठेवाल पण काढताच येणार नाहीत. तसं नको व्हायला’ राधानं अगदी मनातलं ओळखलं अस वाटलं भामाला, कधी एकदा उद्या येतो असं झालं!   संपर्क ः सुवर्णा गोखले, ९८८१९३७२०६ लेखिका पुणे येथे ज्ञानप्रबोधिनी येथे कार्यरत अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com