agriculture story in marathi, Komple family of Latur Dist. has made vegetable dehydrated products & trying to find market for that. | Page 2 ||| Agrowon

भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मिती

रमेश चिल्ले
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

लातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले महिला बचत गट व आश्‍विनी व रामदास या कोंपळे दांपत्याने भाजीपाला निर्जलीकरण करून उत्पादने निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.

लातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले महिला बचत गट व आश्‍विनी व रामदास या कोंपळे दांपत्याने भाजीपाला निर्जलीकरण करून उत्पादने निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर मसाले उत्पादनांचीही विक्री साधून स्वकर्तृत्वातून व कष्टातून आपली पत गावात व बँकेत निर्माण करण्यास सुरुवात आहे.
 
प्रगतीची बिजं पहिल्यांदा मनाच्या भूमीत अंकुरतात. मगच त्यांची प्रत्यक्षात रुजवात केली. जाते. स्वप्नं याचसाठी पाहावीत. आपण जे स्वप्नात पाहतो तशी मनाची तयारी करावी लागते. आयुष्यभर पोटापाण्यासाठी रोजंदारी केली तरी हातातोंडाशी गाठ पडणे अनेक वेळा मुश्कील होते. जिवाला सारखं कोसत बसून काही साध्य होत नसते. त्यात आपलीच ऊर्जा अन् वेळ खर्ची पडतो. नकारात्मक विचार अधोगतीच्या गर्तेत लोटायला कारणीभूत ठरतात. चारचौघांत मिसळून त्यांचे ऐकले, शेतीचे नवनवीन प्रयोग पाहिले तरच प्रगतीची पहाट आयुष्यात उजाडण्याची शक्यता असते. त्यातच अनेक हातांची जोड मिळाल्यास एखादा व्यवसाय सुरू करून त्यात चांगला जम बसणेही सोपे होऊन जाते. फक्त असावी लागते कष्ट उपसण्याची जिद्द. मनात उदंड आत्मविश्‍वास अन् एकीचे बळ.

एकमेकांची साथ मिळाली
लातूर शहरापासून अवघ्या पाच-सहा किलोमीटर अंतरावर वासनगाव हे छोटं खेडं आहे.
पिढ्यान् पिढ्या रोजंदारीवर उपजीविका करणाऱ्या ‘सावित्रीबाई फुले महिला बचत गटातील’ हिरकण्यांनी हिंमत दाखवली. त्यातीलच केवळ नववी झालेल्या आश्‍विनी कोंपळे यांना पती रामदास यांची साथ मिळाली. या दांपत्याची सुमारे तीन एकर शेती आहे. शेती सांभाळून रामदास अन्य व्यवसायही सांभाळायचे. पण त्यात मन रमत नव्हते. आश्‍विनी शेतात कष्ट करून भाजीपाला पिकवून विकायच्या. पण त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. दोघांमध्ये या विषयावर चर्चा होई. काहीतरी वेगळं केलं पाहिजे असे ते बोलून दाखवत. तरच मुलांना चांगले शिक्षण देता येईल, घरावरचे गळके पत्रे शाकारता येतील. शेतात पाण्याची सोय करता येईल. अन्यथा, मुलांनाही आपल्यासारखं शेतावर रोजंदारीवरच जावं लागणार अशी भीती त्यांना सतावत होती.

बचत गटातून वाटचाल
आश्‍विनी आठ-दहा वर्षांपासून बचत गटात सामील होत्या. पण तुटपुंज्या कमाईपलीकडे गाडी पुढे सरकत नव्हती. एका बॅंकेकडून गटासाठी पहिल्यांदा पंचवीस हजार रुपये मिळाले. त्यातून काहीजणींनी शेळ्या, कोंबड्या, म्हशी घेतल्या. त्यापासून उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली. कर्ज फेडले. त्यानंतर सात लाख रुपयांचे कर्ज मिळाले. त्यातून एकीने शिलाई मशिन, तर कुणी लातूरहून भाजीपाला घेऊन थेट विकण्यास सुरुवात केली. घरखर्च भागवून व्याजाबरोबर मुद्दल फेडणे यासाठी तारेवरची कसरत करावी लागायची. टप्प्याटप्प्याने साऱ्या जणींनी कर्ज फेडण्याचे प्रयत्न केले. वेळप्रसंगी दागिने गहाण ठेवावे लागले. म्हशीचे रेडकू, कोंबड्या, पिले, शेळीची पिल्ले विकून
उत्पन्न कमावले व कर्ज परतफेड केली. काही वेळा शंभर- दीडशे रुपयांवर मिळेल तेव्हा मजुरीवर जाण्याशिवाय गत्यंतर नसायचे.

भाजीपाल्याचे मूल्यवर्धन
एकदा लातूर येथील सिद्धेश्‍वर देवस्थानच्या यात्रेत कृषी विभागाने भरविलेल्या प्रदर्शनात ‘भाजीपाला मूल्यवर्धन’ हा परिसंवाद रामदास यांनी ऐकला. त्याविषयी अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले. मांजरा कृषी विज्ञान केंद्रात जाऊन तेथील तज्ज्ञांची भेट घेतली. भाजीपाला निर्जलीकरणाचे एकदिवसीय प्रशिक्षण घेतले.

पूर्वी खेड्यात घराच्या पत्र्यावर मिरच्या, खारुड्या, पापड्या, हरभरा भाजी, चवळी-भेंडी आदी घटक वाळत घातले जात. बिगर हंगामात त्यांची भाजी करून खाल्ली जायची. त्या पद्धतीप्रमाणे कोंपळे दांपत्याने कांदा, काकडी, आले, टोमॅटो यांचे काप वाळवण्याचे ठरवले. त्यांची प्रयत्नशील वृत्ती पाहून केव्हीकेने सौरऊर्जेवरील ‘ड्रायर’ दिला. यावर निर्जलीकरण करून पाहण्यास सांगितले. त्यानुसार लसूण, कांदा, वांगी, भेंडी, कोंथिबीर, आले, मेथी, पालक, काकडी यांचे निर्जलीकरण करून पाहिले. ग्राहकांकडून त्यास मागणी होती. गटातील अन्य महिलांत मनीषा, मुद्रिका व शशिकला यांच्याकडे प्रत्येकी एक-दीड एकर शेती होती. पण पाण्याची सोय नव्हती. त्यांनी शेजाऱ्यांकडून विकत पाणी घेऊन भाज्या पिकवल्या. कमी पडणाऱ्या भाज्या बाजारातून आणीत. गटातील सर्व महिला आश्‍विनी यांच्याकडे भाज्या कापणे, स्वच्छ धुणे, निवडणे, सुकवणे व पॅकिंग अशी कामे मजुरीवर करतात. त्यातून हक्काचा रोजगार आणि चार पैसे अधिकचे मिळू लागले आहेत.

विक्रीचे प्रयत्न
याशिवाय गरम मसाला, कांदा-लसूण मसाला, पुलाव मसाला आदी उत्पादनेही तयार केली जात आहेत. पाव किलो, अर्धा व एक किलोच्या पॅकमधून ‘भूमी मसाले’, ‘भूमी भाज्या’ या नावाने मॉल, दुकानात बाजारपेठ मिळवण्याचे व विक्रीचे प्रयत्न केले जात आहेत. दहा किलो ताज्या कांद्यापासून एक किलो वाळलेली पावडर मिळते. लसूण चार किलोपासून एक किलो पावडर, टोमॅटोच्या दोन किलोपासून १८० ग्रॅम वाळलेला टोमॅटो तयार होतो. अशा निर्जलीकरण केलेल्या भाज्यांमुळे ग्राहकांचा वेळ वाचतो. बिगरहंगामातही भाज्या खाण्यास मिळतात. निर्जलीकरणामुळे भाज्यांतील पोषक गुणधर्म रंग व चव यांचा ऱ्हास होत नाही. हलके असल्याने वाहतूकही सोपी करता येते. गेल्या वर्षभरात कोविडच्या काळात व पूर्वीच्या वर्षीही वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने’ जिल्ह्यातील विविध कृषी प्रदर्शनात स्टॉल उभारले. आपल्या उत्पादनांची विक्री करून ग्राहक वर्ग तयार केला.

लॉकडाउन काळात संधी
टोमॅटो, पुदिन्याचे नमुने नाशिकला तपासणीसाठी पाठवले. हॉटेल व मॉलसाठी प्रयत्न सुरू आहेत. एक-दीड वर्षापासून आश्‍विनी व त्यांच्या सहकारी एकदिलाने काम करीत आहे. येत्या काळात भाज्या सेंद्रिय पद्धतीने पिकवून त्यांचा ‘ब्रँड’ तयार करून ग्राहकांना किफायतशीर किमतीत देण्याचा मानस आहे. विशेषतः लॉकडाउनच्या काळात मार्केट बंदच्या काळात पिकलेल्या भाज्यांमुळे नुकसान टाळण्यासाठी सौर निर्जलीकरण करून व योग्य पॅकिंग करून बाजारात विक्री करता येत आहे ही समाधानाची बाब आहे. दीड वर्षाच्या काळात या महिला गटाने जवळपास लाखभराची उलाढाल केली असून, अर्धा अधिक नफा त्यांना मिळाला. शासकीय अनुदानाचा फायदा पुढे प्रत्येक सदस्याकडे सौर ड्रायर देण्याचा रामदास यांचा मानस आहे. त्यामुळे गटाच्या भरवशावर मोठ्या ‘ऑर्डर्स’ वेळेत पूर्ण करता येतील. अशा प्रकारे स्वकर्तृत्वातून व कष्टातून आपली पत गावात व बँकेत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे हे सांगताना या महिलांचा ऊर भरून आल्याचे जाणवते.

संपर्क- आश्‍विनी रामदास कोंपळे, ९०९६५०६६९२, ७४४८२६९६६८

(लेखक निवृत्त कृषी अधिकारी व शेती-पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
सूक्ष्म सिंचन अनुदानात वाढपुणे ः केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन...
मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
भाजपच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने...मुंबई ः या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे...
‘कथनी आणि करणी’त फरक पुन्हा उघडपुणे : आधीच अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या...
बाजाराचा अंदाज घेऊनच सोयाबीन विक्री करापुणे : सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
लातुरात सोयाबीनच्या भावात तीनशेची घसरणलातूर ः खाद्यतेल आयात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर...
आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक...मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
मॉन्सूनचा महाराष्ट्रातून निरोपपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...
रब्बीसाठी बियाणे पुरवठादार म्हणून...अकोला ः येत्या रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न...
खाद्यतेल आयातशुल्कात मोठी कपातपुणे : काही केल्या खाद्यतेलाचे दर कमी होत नाही...
अतिवृष्टिग्रस्तांसाठी १० हजार कोटीमुंबई ः राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे...
‘सीसीआय’ करणार खुल्या बाजारातून कापूस...नागपूर ः आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणामी...
प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ...लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी...
पंढरपुरात पूरस्थितीसोलापूर ः नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेल्या...
कृषी प्रवेशप्रक्रिया ‘सीईटी’कडेच पुणे ः कृषी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी...
साडेतीन हजार कोटींसाठी साखर...पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी थकविलेली...
‘अंतिम अरदास’मध्ये पुन्हा पाणावले डोळे...लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश : येथील तिकोनिया येथे...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सून माघारीपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...