खपली गहू लावणीसह प्रक्रियेला मिळाली चालना

जळगाव जिल्ह्यात पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राने खपली गव्हाची आपल्या प्रक्षेत्रावर लागवड करण्यासह शेतकऱ्यांकडील क्षेत्र वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्राच्या विक्री केंद्राचे व्यासपीठ शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यासह त्याच्या विविध प्रक्रिया पदार्थांच्या प्रसारासही चालना दिली आहे.
-रावेर येथे खपली गव्हाचे प्रक्षेत्र.
-रावेर येथे खपली गव्हाचे प्रक्षेत्र.

जळगाव जिल्ह्यात पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राने खपली गव्हाची आपल्या प्रक्षेत्रावर लागवड करण्यासह शेतकऱ्यांकडील क्षेत्र वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्राच्या विक्री केंद्राचे व्यासपीठ शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यासह त्याच्या विविध प्रक्रिया पदार्थांच्या प्रसारासही चालना दिली आहे.   जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा हे तालुके केळी, बागायतीत अग्रेसर आहेत या कार्यक्षेत्रात पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) पीक व्यवस्थापनासह आरोग्य, जमीन सुपीकतेच्या दृष्टीने जागृती केली. केंद्राने आता आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या व बाजारपेठेत मागणी असलेल्या खपली गव्हाच्या लागवडीला उत्तेजन दिले आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना सक्षम आर्थिक पर्याय देण्याचा हा प्रयत्न आहे. हा गहू भागात तसा नवा होता. त्याचे क्षेत्र आजघडीला जिल्ह्यात अत्यल्प आहे. अनेक शेतकऱ्यांना या गव्हाविषयी माहितीही तशी कमी आहे. मात्र केव्हीकेने पाच एकरांत आपल्या प्रक्षेत्रात सुरुवातीला लावण केली. एमएसीएस २९७१ या खपली गव्हाच्या संशोधित वाणाची निवड केली. शेतकऱ्यांत प्रचार - प्रसार केला. त्यांच्यासाठी प्रक्षेत्रभेट कार्यक्रम घडवून आणला. तांत्रिक व्यवस्थापन मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. क्षेत्र वाढले प्रयत्नांमधून सुरुवातीच्या टप्प्यात १५ एकर, २०२१ मध्ये २२ एकर आणि यंदा ५० एकर याप्रमाणे शेतकऱ्यांकडे हे क्षेत्र विस्तारले आहे. शेतकऱ्यांचा सहभाग वर्षागणिक वाढत गेला. या गव्हाचे प्रक्रिया पदार्थ व आरोग्याच्या दृष्टीने असलेले फायदे परिसरातील ग्रामस्थ, गाहकांच्याही लक्षात आले. यानंतर मागणी जशी वाढली, तसे क्षेत्रही वाढले. रावेर तालुक्यातील रोझोदा, खिरोदा, चिनावल, पाल, दसनूर, निंभोरा, निंबोल, यावल तालुक्यातील यावल, सांगवी बुद्रुक, चोपड्यातील हातेड, अकुलखेडा या भागांतही या गव्हाची रुजवात केव्हीकेने केली. खपली गव्हाचे बियाणे बाजारात महाग आहे. ते शेतकऱ्यांना मोफत देण्यासंबंधी केव्हीके व कृषी विभागाने संयुक्त कार्यक्रम राबविला. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. पीक व्यवस्थापन व उत्पादन (ठळक बाबी)

  • खपली गहू केळी पिकाच्या बेवडसाठीदेखील उपयुक्त ठरल्याचे शेतकरी सांगतात.
  • नोव्हेंबरमध्ये पेरणी. एकरी २० किलो बियाणे लागते.
  • तणनियंत्रण एकदाच करावे लागते. वाफसा कायम राहील असा अंदाज घेऊन सिंचन.
  • काळ्या कसदार जमिनीत चार वेळेस, मध्यम, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत सहा वेळेस सिंचन.
  • बीजप्रक्रियेपासून ते काढणीपर्यंत काही शेतकरी सेंद्रिय, जैविक पद्धतीवर अधिक भर देतात.
  • रसायनांचा कुठलाही वापर करायचा नाही असा चंग काहींनी बांधला आहे.
  • ११० ते ११२ दिवसांत पीक मळणीस येते. त्यासाठी स्वतंत्र मळणी यंत्राची आवश्यकता किंवा राइस मिलचा उपयोग.
  • केव्हीकेला आपल्या प्रक्षेत्रात एकरी १० ते १२ क्विंटल व शेतकऱ्यांनाही जवळपास तेवढेच उत्पादन मिळत आहे.
  • खपली गव्हाची वैशिष्ट्ये

  • चोख व्यवस्थापन व अनुकूल हवामानातून एकरी १५ ते १८ क्विंटल उत्पादन शक्य
  • पीक उंचीला अडीच ते तीन फूट
  • दाणे लालसर, बारीक. पोळी लालसर.
  • शरीर प्रतिकारक्षम ठेवण्यासाठी लाभदायी, सर्व हवामानात आहारासाठी उपयुक्त
  • मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांसह वृद्ध व अन्य रुग्णांना पचण्यासाठी हलका. लोहाचे प्रमाण अधिक. महिलांच्या आहारासाठी वैद्यकीय मंडळीचा आग्रह. पौष्टिक व वातपित्त शामक.
  • ग्लुटेनचे प्रमाण नगण्य
  • हाडांची झीज भरून काढण्यास पूरक
  • धारवाड कृषी विद्यापीठाने केलेल्या अभ्यासाचा केव्हीकेने संदर्भ घेतला आहे. त्यानुसार या गव्हाचा आहारात नियमित समावेश केल्यास मधुमेही रुग्णांच्या लिपीड, ट्रायग्लिसराइड्स व हानिकारक कोलेस्टेरॉल या प्रतिकूल घटकांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा निष्कर्ष.
  • चाऱ्यातही फायदेशीर गव्हाचे काडही शेतकरी उपयुक्त मानतात. त्याची कुट्टी आकाराने लहान, खाण्यास गुळचट असते. त्यात मिठाचे मिश्रण करून पशुधनाला चारा खाऊ घातला जातो. हिवाळ्यात काड बाजरीच्या कुट्टीत मिश्रण करून खाऊ घालण्यात येते. दादरच्या कुट्टीतही काही शेतकरी खपलीचे काड मिसळतात. विक्रीसाठी प्रोत्साहन फैजपूर (ता.यावल) येथे केव्हीकेचे सरस्वती वस्तू भंडार आहे. तेथे आपल्या गव्हासोबत शेतकऱ्यांनाही विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सुरवातीला किलोला ६० रुपये व आता ७० ते ८५ रुपये गव्हाचा दर आहे. ग्राहकांचा त्यास चांगला प्रतिसाद आहे. खपली गव्हाच्या शेवया, बिस्किटे, रवा, पीठ आदींच्या निर्मितीलाही केव्हीकेने महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले आहे. त्यानुसार शिंदखेडा (ता. रावेर) येथील महिला गटाने यात दोन वर्षांपासून काम सुरू आहे. अन्य गटही त्याकडे वळत आहेत. काही शेतकरी आपल्या गावांत, नातेवाईक, मित्रांमध्ये गव्हाची थेटविक्री करतात. काही शेतकरी बियाण्याची १०० रुपये प्रति किलो दराने विक्री करतात. उत्पादन खर्च एकरी सुमारे २० हजार रुपये आहे. उत्पादन एकरी १५ क्विंटल साध्य करता येते. त्यामुळे अर्थकारण सक्षम करण्यास वाव मिळाला आहे. प्रतिक्रिया मी स्व-उत्पादित खपली गव्हाची गावातच विक्री करतो. आरोग्यासंबंधी जागरूक असलेले ग्राहक त्याची मागणी करू लागले आहेत. त्याचे काडही पशुधनासाठी उपयुक्त आहे. -किशोर चौधरी, खिरोदा, जि. जळगाव खपली गहू पीक आमच्या भागासाठी तसे नवे आहे. मळणीसाठी कमी खर्चिक यंत्रणा उभी राहिली तर अजून फायदा होईल. - एम.एन.महाजन, शेतकरी, अकुलखेडा (जि. जळगाव) संपर्क- महेश महाजन, ९९७०६६१५४६ ((विषय विशेषज्ञ, पाल कृषी विज्ञान केंद्र) रावेर, जि. जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com