कुऱ्हा गावाने तयार केली भाजीपाला पिकांत ओळख

कुऱ्हा गावाने भाजीपाला उत्पादनात ओळख मिळवताना आठवडी बाजारपेठेत विक्री व्यवस्थाही तयार केली आहे.
कुऱ्हा गावाने भाजीपाला उत्पादनात ओळख मिळवताना आठवडी बाजारपेठेत विक्री व्यवस्थाही तयार केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच धर्तीवर जिल्ह्यात सिंचनाची सुविधा असलेल्या अनेक गावांनी पारंपरिक पिकांऐवजी व्यावसायिक पीकपद्धतीचे अनुकरण करण्यावर भर दिला आहे. तिवसा तालुक्‍यातील कुऱ्हा हे त्यातीलच वेगळेपण जपणारे गाव आहे. भाजीपाला उत्पादकांचे गाव म्हणून ते नावारूपास आले आहे.   अमरावती जिल्ह्यात जहागीरपूरा, हसनापूर, बोर्डा, भिवापूर, वऱ्हा, मावरा, शेंदूरजना बाजार, घोटा यासह तब्बल ५५ हून अधिक खेड्यांची बाजारपेठ म्हणून कुऱ्हा हे गाव ओळखले जाते. मध्यवर्ती असल्याने या गावातील आठवडी बाजाराला या सर्व खेड्यांमधील ग्रामस्थांची खरेदीसाठी गर्दी राहते. तिवसा तालुक्यात येणाऱ्या या गावची लोकसंख्या सुमारे २५ हजारांपर्यंत आहे. पूर्वी येथील बाजारात अन्य भागांतून भाजीपाला यायचा. परंतु, भाजीपाल्यांना वर्षभर असलेली मागणी लक्षात घेता गावातीलच शेतकऱ्यांनी स्वतःच भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली. आता उत्पादनात कुशलता मिळवत गावाने भाजीपाला शेतीत ओळख तयार करण्यास सुरुवात केली आहे. फ्लॉवर, कोबी, टोमॅटो आदींची लागवड या गावात प्रामुख्याने होत असल्याचे शेतकरी सांगतात. गावचे धार्मिक महत्त्व गावाला अध्यात्मिकतेचा वारसा आहे. विठोबा महाराज संस्थान आहे. पंचक्रोशीत त्यांचा मोठा अनुयाय असून भागवत सप्ताहाला येथे गर्दी राहते असे गावातील भाजीपाला उत्पादक प्रवीण बेहरे यांनी सांगितले. त्यासोबतच बालाजी संस्थान आणि शितला माता मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे वर्षभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहते. यांत्रिकीकरणावर भर गावातील सुवर्णा इखार यांचे माहेर म्हणजे घाटलाडकी. त्यांचे वडील जयराज राजस यांचा संत्रा, केळी, आले, हळद यांसारखी व्यावसायिक पिके घेण्याचा हातखंडा राहिला आहे. लग्न झाल्यानंतर सासरी त्यांनी घरच्या शेती व्यवस्थापनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. आज त्या भाजीपाला शेतीत मास्टर ठरल्या आहेत. भाजीपाला शेती कसणाऱ्या इखार कुटुंबीयांकडे ट्रॅक्‍टर, रोटाव्हेटर, पॉवर टिलर, ग्रास कटर अशी यंत्रे आहेत. मजूरसमस्या लक्षात घेऊन हे कुटुंब यांत्रिक शेतीकडे वळले आहे. त्यांच्याप्रमाणेच गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी देखील भाजीपाला शेतीत यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. शेतीचे नियोजन कोणत्या हंगामात कोणत्या पिकाला चांगले दर मिळतील याबाबत गावातील शेतकरी एकमेकांशी सल्लामसलत करतात. त्या आधारे पिकाची निवड करून लागवड करण्यावर भर राहतो. भाजीपाला बाजारपेठेत मोठी अनिश्‍चितता राहते. त्या धर्तीवरील नियोजन शेतीतील धोका कमी करते. यंदा वांग्याचे पीक भाव खाऊन गेल्याचे गावातील शेतकरी सांगतात. त्यास किलोला ४० रुपये दर मिळाला. बाजारपेठ काही शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील मागणीनुसार भरताची वांगी घेण्यावरही भर दिला आहे. नव्याने लागवड केलेल्या संत्रा बागेत आंतरपीक म्हणूनही भाजीपाला पिके घेण्यात येतात. त्यामध्ये कारली, काकडी, टोमॅटो, वांगी आदींचा समावेश राहतो. लागवड गादीवाफ्यावर (बेड) केली जाते. आर्वी, शेंदूरजनाबाजार, तिवसा, कुऱ्हा, मंगरुळ दस्तगीर येथील बाजारात भाजीपाला पाठविला जातो. हवामान व दर या दोन बाबी साध्य झाल्या तर महिन्याची कमाई काही हजार रुपयांपर्यंत जाते. रोटेशन म्हणजेच चक्राकार पद्धतीने पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर राहतो. कुऱ्हा गावासह नजीकच्या गावांमध्ये भरणाऱ्या आठवडी बाजारात भाजीपाला विकण्यावरही बहुतांशी शेतकऱ्यांनी भर दिला आहे. रविवारी चांदूर, मंगळवारी शेंदूरजना बाजार, गुरुवारी कुऱ्हा, शुक्रवारी तिवसा, शनिवारी तळेगाव असे बाजारांचे पर्याय या शेतकऱ्यांपुढे आहेत. लागवड क्षेत्रानुसार उत्पन्न व ताळेबंदाचे गणित आधारित असले तरी भाजीपाला पीकपद्धतीतून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल या गावात होते असे सांगण्यात आले. अपर वर्धा प्रकल्पाने आणली समृद्धी कुऱ्हा गावाला अपर वर्धा प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध होते. संरक्षित सिंचनाचा पर्याय उपलब्ध असल्याने शेतकरी व्यावसायिक पिके घेण्यास प्रोत्साहित झाले. गेल्यावर्षी पाऊसमान कमी झाल्याने प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता होऊ शकली नाही. त्यासोबतच संरक्षित सिंचनाचे स्रोतही आटले. त्यामुळे पिकांसाठी पाण्याची सोय करण्याचे आव्हान निर्माण झाले. गावातील काही शेतकऱ्यांनी त्याचवेळी केळी लागवडीचा प्रयोग केला होता. परंतु, पाण्याची उपलब्धता न होऊ शकल्याने डोळ्यादेखत केळी बागा जळण्याचे दुःख पचवावे लागले. अशाप्रकारचा अपवाद वगळता गावात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याचे प्रसंग क्‍वचितच घडल्याचे सांगण्यात आले. संत्र्यानेही आणली सुबत्ता गावशिवारात एक हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर संत्रा लागवडही आहे. या पिकाने देखील गावशिवाराच्या अर्थकारणाला बळकटी दिली आहे. तब्बल २५ ते ५० कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल या पिकातून होत असावी अशी शक्यता येथील शेतकरी वर्तवतात. यावर्षी एका संत्रा उत्पादकाच्या बागेचा सौदा तब्बल ४२ लाख रुपयांना झाला. त्यामुळे भाजीपाला पिकांबरोबरच संत्रा अशी दोन्ही पिके कुऱ्हा गावाच्या सक्षमीकरणाचा पर्याय ठरले आहेत. संपर्क- सुवर्णा इखार- ९६८९४७३१२४ प्रवीण बेहरे- ९९२३४२६७९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com