बीबीएफ’ तंत्रामुळे खर्चात बचत अन् उत्पादनात वाढ

ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राकडून तीन वर्षांपासून रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके सोयाबीन व हरभरा पिकांत घेण्यात येत आहेत. त्याद्वारे या पद्धतीचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.
बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी व सोयाबीन पिकात झालेला वापर.
बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी व सोयाबीन पिकात झालेला वापर.

ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राकडून तीन वर्षांपासून रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके सोयाबीन व हरभरा पिकांत घेण्यात येत आहेत. त्याद्वारे या पद्धतीचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. वाफसा, जमीन सुपीकता, मातीचा सुपीक थर टिकविण्यासह बियाणे वापरात सुमारे ४० टक्के बचत, तर उत्पादनात एकरी दीड क्विंटलपर्यंत वाढ मिळविणे त्यातून शक्य झाले आहे.   अलीकडील वर्षांत रुंद वरंबा सरी पद्धत म्हणजेच बीबीएफ पद्धतीचे महत्त्व सर्वत्र वाढल्याचे दिसून येते. जळगावपासून काही किलोमीटरवर असलेल्या ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रानेही (केव्हीके) आपल्या कार्यक्षेत्रात या तंत्रज्ञानाबाबत जागृती करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात खरिपात सोयाबीन व रब्बीमध्ये हरभरा हे महत्त्वाचे पीक आहे. सरलेल्या यंदाच्या रब्बी हंगामात २९ शेतकऱ्यांकडे हरभरा पिकासंबंधी प्रयोग केले. सोयाबीन पिकात दरवर्षी सुमारे २० एकर, तर हरभऱ्यासाठी सुमारे ८० एकरांत ही प्रात्यक्षिके घेण्यात आली. यात भडगाव तालुक्यातील अंतुर्ली, सुसरी (ता. भुसावळ), ममुराबाद (ता. जळगाव) या गावांचा समावेश होता. केव्हीकेचे प्रमुख डॉ. हेमंत बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) वैभव सूर्यवंशी, विषय विशेषज्ञ (विस्तार) विशाल वैरागर यांनी हिरिरीने त्यासाठी पुढाकार घेतला. बीबीएफ यंत्राची रचना

  • हे ट्रॅक्टरचलित यंत्र आहे.
  • पेरणीसाठी चार दाते आहेत. अलीकडे पाच दात्यांचे यंत्रही आले आहे.
  • चार दात्यांचे यंत्र असल्यास १३५ सेंमी रुंदीचा गादीवाफा तयार करता येतो.
  • सुमारे आठ फूट लांबीचे हे यंत्र आहे. त्यात विविध पिकांच्या पेरणीसाठी सुविधा आहे.
  • चार पाती यंत्रासाठी ३५ एचपी, तर पाच दाती यंत्रासाठी ४५ एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर गरजेचा आहे.
  • यंत्रात विविध बियाणे पेट्या (बॉक्स) आहेत. त्याद्वारे एकाच वेळी आंतरपीक पेरणीही शक्य होते.
  • यंत्राद्वारे १८ पिकांची पेरणी शक्य. यात कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, तीळ आदींचा समावेश.
  • कापसात उडीद किंवा मूग तर सोयाबीनमध्ये तूर असे आंतरपीक घेता येते.
  • यंत्राला मागील बाजूस योग्य यंत्राची जुळणी केल्यास आंतरमशागत व फवारणी करता येते.
  • कमी खर्चात आंतरमशागत दिवसभरात चांगल्या वाफसा स्थितीत एक हेक्टरवर आंतरमशागत शक्य झाल्याचे आढळले आहे. बैलजोडीच्या साह्याने सोयाबीन किंवा हरभरा पिकात आंतमशागतीसाठी हेक्टरी पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो. मात्र ‘बीबीएफ’ यंत्राचा वापर केल्यास तो ५० ते ४० टक्के कमी येतो. अलीकडील काळात मजूरटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावते. अशा काळात तर बीबीएफचा वापर अतिशय दिलासादायक ठरल्याचे निरीक्षण केव्हीकेने नोंदविले आहे. मूलस्थानी जलसंधारण जिल्ह्यात काळी कसदार जमीन तापी, गिरणा नदीकाठी आहे. केव्हीकेचे प्रक्षेत्र देखील सुपीक, काळ्या कसदार जमिनीचे आहे. या जमिनीत पाणी साचले, तर पूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती असते. अतिपावसात उत्पादन ६० ते ७० टक्के कमी येते. अनेकदा तर चाराही हाती येत नाही. या समस्येवरही बीबीएफ तंत्र मात करते. पाऊस कमी झाल्यास पाणी सरीत मुरणे शक्य होते. अनेकदा अतिपावसात पाण्याबरोबर मातीचा सुपीक थर वाहून जातो. अतिरिक्त पाणी सरीवाटे काढून टाकणे व मातीचा थर वाचविण्याचे काम या तंत्राद्वारे शक्य होते. बियाणे बचत सोयाबीन पिकाचे उदाहरण घेतल्यास एकरी ३० ते ३५ किलोपर्यंत बियाणे वापरले जाते. ‘बीबीएफ’ तंत्रामुळे ते केवळ २० ते २२ किलो पुरते. असेच प्रमाण हरभऱ्यासाठी देखील आहे. एकरी आठ ते १० किलो बियाणे बचत करणे शक्य झाले आहे. त्यामुळे बियाण्यावरील २५ टक्के खर्चदेखील कमी करणे शक्य झाले आहे. उत्पादन सोयाबीन व हरभऱ्यात एकरी एक ते दीड क्विंटल वाढ या तंत्रामुळे करता आल्याचे केव्हीकेचे निरीक्षण आहे. अतिपाऊस किंवा बियाणे उगवून न येणे अशा समस्या असतानाही जेथे अन्यत्र सोयाबीनचे एकरी दोन ते चार क्विंटल उत्पादन मिळाले तेथे ‘बीबीएफ’ मुळे ते सात क्विंटल मिळाले. हरभऱ्याचे एकरी १० क्विंटल उत्पादन साध्य करता आले आहे. कापूस लागवड प्रयोग यंदा ममुराबाद (ता. जळगाव) येथील मनोज चौधरी बीबीएफ यंत्राच्या साह्याने एक एकरात कापूस पेरणी करणार आहेत. केव्हीके अंतर्गत हा कापूस पिकात पहिलाच प्रयोग असेल असे विषय विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी सांगतात. सोयाबनमध्येही यंदा १०० एकर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवले असून प्रात्यक्षिके कार्यक्रम अधिक व्यापक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रतिक्रिया माझी सहा एकर शेती आहे. मी बीबीएफ यंत्र खरेदी केले आहे. दरवर्षी दीड एकरांत सोयाबीन त्याच्या साह्याने पेरतो. रब्बीत हरभरा पेरणी करतो. सोयाबीनचे एकरी सात क्विंटलपर्यंत, तर हरभऱ्याचे १० क्विंटल एकरी उत्पादन आले आहे. या पद्धतीमुळे बियाण्यात २० टक्के बचत झाली. पेरणी, आंतरमशागतीला असणारा मजूरटंचाईचा त्रास झाला नाही. विशेष म्हणजे अतिपावसात सोयाबीनचे चांगले उत्पादन हाती आले. माझ्याकडील यंत्र भाडेतत्त्वावर ८०० रुपये प्रति एकर दरात अन्य शेतकऱ्यांना देतो. ममुराबाद ‘केव्हीके’चे मार्गदर्शन लाभते. - विक्रम पाटील, सुसरी, ता. भुसावळ दरवर्षी मका, मुगाची प्रत्येकी दीड एकरात बीबीएफ तंत्राद्वारे पेरणी करतो. त्यातून उत्पादन २५ ते २८ टक्के वाढले आहे. सरी काढल्याने अतिपावसात होणारे नुकसान टळले. कमी खर्च व कमी वेळेत पेरणी, आंतरमशागत करता येते. आमच्या गावात आम्ही शिवछत्रपती शेतकरी गटाच्या माध्यमातून बीबीएफ यंत्र आणले आहे. अन्य शेतकऱ्यांना ते भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देतो. विनोद पाटील, अंतुर्ली, ता. भडगाव

    संपर्क-   वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४ विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com