लोकाभिमुख उपक्रमांतून लोणीच्या विकासाला गती

परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रूक गावात लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत.पाणीपुरवठा, सिंचन स्रोतांचे बळकटीकरण झाले आहे. वृक्षसंवर्धनातून गाव हिरवाईने नटले आहे.पीक पध्दतीच्या बदलातून गावाच्या आर्थिक विकासाला गती मिळाली आहे.
गावातील तलाव व फुललेली पिके.
गावातील तलाव व फुललेली पिके.

परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रूक गावात लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. पाणीपुरवठा, सिंचन स्रोतांचे बळकटीकरण झाले आहे. वृक्षसंवर्धनातून गाव हिरवाईने नटले आहे. पीक पध्दतीच्या बदलातून गावाच्या आर्थिक विकासाला गती मिळाली आहे.   परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रूक (ता.पाथरी) गावाची लोकसंख्या २७५० पर्यंत आहे. ग्रामपंचायत अंतर्गंत चार तांड्यांचा समावेश होतो. भौगोलिक क्षेत्र १३७८ हेक्टर, पैकी १३२४ हेक्टर लागवडीयोग्य आहे. १२११ शेतकरी खातेदार आहेत. जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात गावाचा समावेश होतो. मात्र धरण दरवर्षी भरण्याची खात्री नसते. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी गावची मुख्य पिके आहेत. ठळक बाबी

  • अलीकडील वर्षांत सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याने ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ.
  • गेल्यावर्षी सर्व हंगाम मिळून एकूण २६२ हेक्टरवर ऊस.
  • हळद, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, डाळिंब, कांदा, मिरची, वांगे आदी भाजीपाला उत्पादनही होते.
  • नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत चार एकरांवर मोहगनी. एका शेतकऱ्याकडून चंदन वृक्षाची लागवड.
  • सात वर्षांत ठिबक व तुषार अंतर्गत गावशिवारातील क्षेत्र ५७.१५ हेक्टर. १२ हेक्टर प्रस्तावित.
  • पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली २२ गाव नळपाणीपुरवठा योजना, भारत निर्माण योजनेंतर्गत सार्वजनिक नळपाणीपुरवठा आदी योजना कार्यान्वित झाल्या. मात्र पाणीटंचाई थांबेना. मग महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नवीन विहिरी खोदल्या. आता गावाचा पाणी प्रश्न मार्गी लागला असून कुटुंबांना १७५ नळजोडण्या दिल्या आहेत. ग्रामस्थांच्या निरोगी आरोग्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे ‘आरओ’ फिल्टर संयंत्र बसविले .त्याव्दारे प्रति कुटुंबास पाच रुपये शुल्कात वीस लिटर शुध्द पाणी दिले जाते. परिणामी दूषित पाण्याव्दारे प्रसार होणाऱ्या आजारांना प्रतिबंध झाला आहे. गावतलावातील उपयुक्त पाणीसाठा सन १९७२ च्या दुष्काळात गावतलावाचे काम झाले. मात्र पाण्याची उपलब्धता असल्याने अनेक वर्षे त्यात पाणीसाठा केला जात नव्हता. सन २०१५-१६ मध्ये उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. ही बाब लक्षात घेत लोकसहभागातून तलावाची दुरुस्ती झाली. पावसाचे, कालव्याव्दारे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी तलावामध्ये साठविले जाते. सकाळ रिलिफ फंडातून तलावातील गाळ काढण्यात आला. परिणामी साठवण क्षमता वाढली. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावशिवारातील ओढे, नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधले. आता परिसरातील जलस्त्रोतांची पातळी वाढली आहे. तलावाकाठी वृक्षलागवड झाली आहे. शेतरस्त्यांचे मजबुतीकरण.... शेतमालाची वाहतूक (विशेषतः ऊस वाहतुकीसाठी) अडचणी यायच्या.शेतकऱ्यांनी पुढाकार घेत लोकवर्गणी जमा केली. त्यातून एक किलोमीटर तसेच अन्य काही शेतरस्त्यांचे मजबुतीकरण झाले. गावविकासातील ठळक बाबी

  • ग्रामदैवत सिद्धेश्वराचे पुरातन मंदिर. त्यास तीर्थक्षेत्राचा दर्जा. लोकवर्गणी तसेच विविध विकास निधीतून मंदिराचा जीर्णोधार. विविध सभागृहे बांधली आहेत. मंदिराशेजारील जागेत खुला मंच. गावातील समारंभ, उत्सव साजरे करण्याची सोय.
  • आर्थिक आयोगाचा निधी, समाज कल्याण विभाग यांच्याकडून प्राप्त विकास निधीतून सिमेंट रस्ते.
  • गल्ली बोळांतील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक्स.
  • सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था.
  • प्रत्येक कुटुंबातील कचरा संकलनासाठी घंटागाडी. ९० टक्के कुटुंबांकडे स्वच्छतागृहे.
  • सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था.
  • आगामी काळात सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटारे बांधण्याचे नियोजन.
  • समाज मंदिराच्या सुविधांमुळे विविध वस्त्यांमध्ये कार्यक्रम घेण्याची सोय.
  • ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून शाळा, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांच्या दुतर्फा मिळून सुमारे दोन हजार वृक्षलागवड. ट्री गार्डस. वृक्षांचे संवर्धन. त्यास पाणी देण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक.
  • स्मशानभूमीत जनसुविधा योजनेंतर्गत संरक्षण भिंत, निवारा. पेव्हर ब्लॉक्स बसवून रंगरंगोटी.
  • घनवन निर्मिती. गावातील निधन पावलेल्या व्यक्तींच्या स्मृतीदिनी परिसरात वृक्षलागवड.
  • तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत शाळा वर्गखोल्या, पक्के रस्ते, पथदिवे.  
  • शैक्षणिक सुविधा, सांस्कृतिक उपक्रम
  • गावात जिल्हा परिषदेची १ ते ७ इयत्ता पर्यंत शाळा, सहा अंगणवाड्या आहेत. तांड्यावर शिक्षणाची सुविधा आहे. ग्राम शिक्षण समितीच्या पुढाकारातून वर्गखोल्यांची रंगरंगोटी, सजावट होते. डिजिटल वर्गखोली या व्यवस्था केल्या आहेत. खोल्यांना किल्ल्यांची नावे दिली आहेत. फुलझाडांची लागवड करून शाळेचा परिसर सुशोभित केला आहे. विद्यार्थ्याच्या कलागुणांना चालना देण्यासाठी लोणी फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. लॉकडाऊनमध्ये शिक्षण चळवळ सुरू ठेवण्यासाठी ग्रामशिक्षण समिती गावातील घरे, सार्वजनिक इमारतीच्या भिंतीवर मुळाक्षरे, पाढे, विविध सूत्रे लिहिण्यात आली.

    उपक्रमशील ग्रामपंचायत श्याम उत्तमराव धर्मे हे गावचे तरुण सरपंच आहेत. उपसंरपच गोविंद चव्हाण, सर्व सदस्य, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष मुंजाभाऊ धर्मे, पोलिस पाटील रणजित गिराम, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष रामराव सौंदडे आदींसह युवक, ज्येष्ठ ग्रामस्थांचा विकास कामांत सक्रिय सहभाग असतो. गावातील अनेकजण भारतीय सैन्यदल सीमा सुरक्षादलात कार्यरत असून स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनावेळी त्यांचा गौरव केला जातो. रक्तदान शिबिरे घेण्यात येतात.जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सांस्कृतिक सभागृह बांधले आहे. लॉकडाऊन काळात गावात अडकून पडलेल्या ऊसतोड कामगारांची काळजी घेण्यात आली. दर रविवारी आठवडे बाजार भरतो. शेतकरी गट

  • आत्मा अंतर्गत गावात दोन शेतकरी गट. त्यांच्या खात्यावर नियमित ठराविक रक्कम जमा केली जाते. गटातर्फे अवजार बॅक स्थापण्याचे नियोजन. मानव विकास मिशन अंतर्गत गटाकडून धान्य स्वच्छता व प्रतवारी सयंत्र सुरु करण्याचे नियोजन.
  • पंधरा स्वंयसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून महिला एकत्र आल्या. गरजूंना कर्जवाटप.
  • -शेळीपालन, दुग्धव्यवसायातून गावकऱ्यांना उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण झाले आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com