परजिवी वनस्पती यजमानासोबतच वास्पचाही पाडतात फडशा

ओक झाडाच्या पानावर गाठी बनवून त्यात अंडी घालणारी वास्प.
ओक झाडाच्या पानावर गाठी बनवून त्यात अंडी घालणारी वास्प.

राईस विद्यापीठातील उत्क्रांती जीवशास्त्रज्ञांना अनोखी परजिवी वनस्पती आढळली असून, ती यजमान वनस्पतीसोबतच त्यावरील परजिवी कीटकांवरही हल्ला करते. ही अद्वितीय वनस्पती पिकावरील विविध कीटकांच्या नियंत्रणासाठी व कर्करोगाशी लढण्यासाठी उपयोगी ठरू शकेल, असा दावा संशोधक करीत आहेत. राईस विद्यापीठातील उत्क्रांती जीवशास्त्रज्ञ स्कॉट इगान यांना वसंताच्या सुरवातीच्या काळात दक्षिण फ्लोरिडामधील ओक स्क्रब झाडांची पाहणी करताना केशरी रंगाची वेल स्वतःभोवती गुंडाळ्या केलेली दिसली. त्याचप्रमाणे पानाच्या खालील बाजूला वाटाण्याच्या आकाराच्या गाठीभोवतीही वेटोळे घातलेले दिसले. हे वैशिष्ट्यपूर्ण होते. त्याची पृष्टी करण्यासाठी इगान आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी या वेलीचे प्रयोगशाळेतही निरीक्षण केले. त्यातून ही लव्ह वाइन या नावाने ओळखळी जाणारी (शास्त्रीय नाव -Cassytha filiformis) परजिवी वेल केवळ झाडावरच नाही, त्यावर ट्युमरप्रमाणे वाढ करणाऱ्या गॉल वास्पवर उपजीविका करत असल्याचे दिसून आले. गेल्या सतरा वर्षांपासून पानांवर गाठी तयार करणारे कीटकांचा अभ्यास करत असलेल्या स्कॉट इगान यांनी अमेरिकेतील अनेक राज्यांतील ओक जंगलाचा हजारो मैलांचा प्रवास केला आहे. त्याचे नमुने गोळा केले आहेत. स्कॉट इगान यांनी सांगितले, की ओक झाडांच्या पानांवर गाठी करणाऱ्या वास्प आणि या वेलीच्या निरीक्षणासाठी सातत्याने फ्लोरिडा येथील जंगलात जात असते. एकदा या गाठी तुमच्या नजरेला पडल्या, की त्याकडे लक्ष जात राहते. मात्र, या वसंतामध्ये जे आढळले ते अद्वितीय आहे. कारण या वेलीचा आणि कीटकांचा अभ्यास शतकापेक्षा अधिक काळापासून जीवशास्त्रज्ञ करीत आहेत. त्या कोणालाही बाब आढळली नाही. ही वेल ज्या यजमान वनस्पतीवर वाढते, त्यावरील अन्य एका परजिवीवरही हल्ला करीत असल्याचे दिसून आले. हे संशोधन करंट बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधनातील महत्त्वाचे...

  • इगान म्हणाले, की पानावरील गाठी या अनेक अर्थांने ट्यूमरप्रमाणे आहेत. वास्पमुळे त्यांना चालना मिळते. या गाठीमध्ये वास्प आपली अंडी घालते. गाठींच्या पेशींचा डीएनए आणि झाडांचा डीएनए एकच असून, त्या अर्थाने त्या झाडांचाच एक भाग आहेत. मात्र, त्यांच्या वाढीमुळे झाडांना अंतिमतः नुकसान होते.
  • गाठी तयार करणाऱ्या वास्पच्या जगभरामध्ये सुमारे १३ हजार प्रजाती आहेत. त्या जैवरसायनांची मदत घेऊन झाडांमध्ये गाठी तयार करून, त्यात आपली पिले वाढवतात. टेक्सास आणि फ्लोरिडा येथील एक स्थानिक प्रजाती (शा. नाव- Belonocnema treatae) नव्याने वाढलेल्या ओक पानाच्या खालील बाजूला अंडी घालते. अंडीपुंजासोबत विष आणि प्रथिने सोडलेली असतात. त्यामुळे अंड्याभोवती कठीण तपकिरी गोल तयार होतो. त्यामध्ये वास्पची अंडी उबून बाहेर पडलेल्या अळ्या सरळ झाडांच्या रसावर वाढतात. प्रौढ झाल्यानंतर बाहेर पडतात.
  • इगान यांचे विद्यार्थी लिन्यी झांग आणि सहकाऱ्यांना ओक झाडाच्या गाठीभोवती एस आकाराची वेटोळी घातलेली लव्ह वेल सापडली. आपल्या शिक्षिका इगान यांना दाखवले असता, त्यांनी प्रथम वेल आणि त्या गाठीचा काही संबंध असल्याचे नाकारले. मात्र, सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले असता, वेलीने आतपर्यंत जाऊन आतील प्रौढ वास्पचाही फडशा पाडल्याचे दिसते. आतमध्ये ममीफाईड वास्प आढळल्या.
  • मग इगान व त्यांचे विद्यार्थी हूड, झांग, मॅथ्यू कॅमरफोर्ड यांनी आणखी नमुने मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात वेलीने गाठ आणि त्यातील वास्पवर हल्ला केल्याचे वेगवेगळ्या आकाराचे अनेक नमुने मिळाले. ५१ नमुन्यांचे छेदन केले असता, त्यातील २३ नमुन्यांत ममीफाईड वास्प मिळाल्या. १०१ गाठींपैकी केवळ दोन गाठीवर वेलीने हल्ला केला नव्हता आणि त्यातील वास्प मृत आढळले. सरासरीपेक्षा मोठ्या गाठीवर परजिवी वेल हल्ला करीत असल्याचे दिसून आले. किंवा त्याचा व्यत्यासही असू शकेल.
  • परजिवी वनस्पतीच्या सुमारे ४ हजारांपेक्षा अधिक प्रजाती आहेत. हे तथ्य केवळ एकाच परजिवी वनस्पतीबाबत असण्याची शक्यता कमी आहे. अन्य वनस्पतींचाही अभ्यास करण्याची आवश्यकता संशोधक व्यक्त करीत आहेत. जर परजिवी वेल गाठींची ओळख कशाप्रकारे पटवते, याचा शोध घेता आला, तर त्याचा कर्करोगांशी लढण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com