शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली फायदेशीर

करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर मगदूम यांनी द्राक्ष शेतीला जोड म्हणून शेतातच प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. डाळी व बेसन पीठनिर्मिती सुरू करून ‘पार्श्‍व’ नावाचा ब्रॅण्ड तयार केला आहे. स्वतःच मार्केटिंग आणि विक्री व्यवस्था सांभाळून गुणवत्तेच्या जोरावर उत्पादनांना लोकप्रियता व आर्थिक सक्षमताही मिळवली आहे.
डाळनिर्मिती उद्योगात गुंतलेले सुधीर मगदूम आई-वडील व पत्नी यांच्यासह.
डाळनिर्मिती उद्योगात गुंतलेले सुधीर मगदूम आई-वडील व पत्नी यांच्यासह.

करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर मगदूम यांनी द्राक्ष शेतीला जोड म्हणून शेतातच प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. डाळी व बेसन पीठनिर्मिती सुरू करून ‘पार्श्‍व’ नावाचा ब्रॅण्ड तयार केला आहे. स्वतःच मार्केटिंग आणि विक्री व्यवस्था सांभाळून गुणवत्तेच्या जोरावर उत्पादनांना लोकप्रियता व आर्थिक सक्षमताही मिळवली आहे.   सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे सुधीर मगदूम यांची साडेपाच एकर शेती आहे. त्यात दीड एकर द्राक्ष, एक एकर उडीद, एक एकर चिकू, अर्धा एकर शेवगा अशी पिके आहेत. दहावी झाल्यानंतर ‘आयटीआय’ मधून ‘ट्रॅक्टर मेकॅनिक’चा अभ्यासक्रम सुधीर यांनी पूर्ण केला. त्यानंतर थेट पुणे गाठून खासगी कंपनीत २००६ ते २००८ अशी दोन वर्षे नोकरी केली. कंपनीत ‘ब्रेक’ मिळाल्यानंतर ते गावी परतले. पुढे सांगली येथील नातेवाइकांकडील खत कंपनीत नोकरी मिळवली. तेथे सात-आठ वर्षे काम करीत असतानाच घरच्या शेतीची ओढ लागली. अखेर निर्णय घेत ते शेतीत उतरले. शेतीतील धडे पूर्णवेळ शेतीत उतरण्यासाठी आपलीही तयारी तशीच हवी या उद्देशाने सुधीर यांनी परिसरातील महाविद्यालयात कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या वेळी तूर व अन्य हंगामी पिके व्हायची. सुधीर यांनी द्राक्षातून पीकबदल साधला. सोबत भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली. शेती सुरू असतानाच २०१८ मध्ये शेजारी असलेल्या पांढरेवाडी येथील दगडू पवार यांचा डाळ मिलचा उद्योग पाहण्याचा त्यांना योग आला. त्याचे महत्त्व व अर्थकारण अभ्यासल्यानंतर शेतीला हा चांगला जोडव्यवसाय होऊ शकतो हे लक्षात आले. त्याची सविस्तर माहिती घेतली. प्रक्रिया उद्योगाची उभारणी त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे सहकार्य मिळाले. मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, विषयतज्ज्ञ दिनेश क्षीरसागर यांचे मार्गदर्शन मिळाले. गावातील भारतीय स्टेट बँक शाखेकडून चार लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यासाठी एक लाख ४० हजारांचे अनुदान मिळाले. डाळ मिल खरेदी केली. तूर, हरभरा, उडीद आणि मूग या चार प्रकारच्या धान्यांपासून डाळी तयार करून देण्यास सुरुवात झाली. बेसन पीठनिर्मिती बाजारपेठेत बेसन पिठासही मागणी असल्याचे लक्षात आले. डाळी तयार करून देण्याबरोबर हा व्यवसाय देखील सुरू केल्यास उत्पन्नात वाढ होईल असा विचार केला. सुमारे ५० हजारांची गुंतवणूक करून बेसन पिठासाठी स्वतंत्र यंत्र खरेदी केले. स्वतःकडील हरभरा पुरेसा होणार नव्हता. मग परिसरातील शेतकरी तसेच गरजेनुसार बाजारपेठेतील हरभरा घेऊन बेसन पीठ तयार करण्यास सुरुवात केली. गेल्या तीन वर्षांत डाळ व बेसन पीठ असे दोन्ही उद्योग व्यवस्थित सुरू आहेत. उद्योगातील ठळक बाबी सुमारे ३०० हून अधिक हरभरा उत्पादकांचे जाळे सुधीर यांनी जोडले आहे. बाजारपेठेतील मागणी व विक्री ओळखून महिन्याला उत्पादनाचा लक्ष्यांक ठरवला जातो. त्यानुसार साडेतीन टन हरभऱ्याची खरेदी केली जाते. बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना दर दिला जातो. शंभर किलो हरभराडाळीपासून सुमारे ७० किलो बेसनपीठ, अर्थात साडेतीन टन डाळीपासून साधारण अडीच टन बेसन पीठ तयार होते. ‘पार्श्‍वॅ ब्रॅण्डने विक्री ‘एफएसएआयआय’ या संस्थेचा परवाना घेतला आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार पीठासाठी पिशवीचे पॅकिंग आणि पार्श्‍व नावाचा ब्रॅण्ड तयार केला आहे. प्रति किलो ७० रुपये त्याचा दर आहे. करकंब परिसरातील टेंभुर्णी, आव्हे, पेहे, बेंबळे, नेवरे, नांदोरे, जळोली या गावांत विक्री होते. प्रामुख्याने स्वीट होम, किराणा दुकान, हॉटेल व्यवसायिक यांना जागेवर पुरवठा होतो. सुधीर यांनी त्यासाठी स्वतंत्र वाहन घेतले आहे. त्यासाठी कोणताही कर्मचारी न ठेवता ते स्वतः माल पोहोच देण्याचे कष्ट घेतात. सरॉवातीला त्यांनी प्रत्येक दुकानदारास एक किलो नमुना मोफत दिला. त्यास पसंती आल्यानंतर आता बाजारपेठ वाढवली आहे. दोन टन डाळनिर्मिती महिन्याला साधारण दोन टनांपर्यंत धान्ये डाळी करण्यासाठी येतात. प्रत्येकाच्या मागणीनुसार विनापॉलिश, उत्तम दर्जाची डाळ प्रति किलो १० रुपये दराने तयार करून दिली जाते. दोन्ही उद्योगांत सुधीर यांनी कोणीही मजूर तैनात केलेले नाहीत. आई-वडील, पत्नी हे कुटुंबातील सदस्य देखील राबतात. त्यामुळेच उत्पादन खर्च कमी करण्यास मदत झाली आहे. एकूण उद्योगातून महिन्याला दोन लाख रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत सुधीर यांनी प्रगती झाली आहे. कायम मागणी असल्याने तो वर्षभर सुरू ठेवणेही शक्य झाले आहे. द्राक्षापासून बेदाणानिर्मिती प्रक्रियेकडे लक्ष देताना सुधीर यांनी द्राक्ष शेतीकडे जराही दुर्लक्ष केलेले नाही. गेल्या आठ-दहा वर्षांपासून त्यांच्याकडे द्राक्ष बाग आहे. एकरी सरासरी ५ ते ६ टन द्राक्ष उत्पादन ते घेतात. द्राक्षापासून वर्षाला दोन ते अडीच टन बेदाणा तयार केला जातो. यंदा हिरवी मिरची, उडीद, शेवगा आदीही पिके घेतली आहेत. संपर्क- सुधीर मगदूम, ९४०५२४०५०७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com