राहुरीच्या कृषी विद्यापीठात कडधान्य पिकांतील प्रयोग

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वैशिष्ट्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण कडधान्य पिकांचे ३४ वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या कक्षेत व प्रक्षेत्रावर संशोधन व बीजोत्पादन करून शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून दिले जात आहेत.
विद्यापीठाने विकसित केलेले  तुरीचे वाण विपुला
विद्यापीठाने विकसित केलेले तुरीचे वाण विपुला

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वैशिष्ट्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण कडधान्य पिकांचे ३४ वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या कक्षेत व प्रक्षेत्रावर संशोधन व बीजोत्पादन करून शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून दिले जात आहेत. कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाने त्यासंबंधी विकसित केलेले तंत्र व प्रयोग शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरले आहेत.   राज्यात साधारण ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप व रब्बी हंगामात विविध कडधान्यांचे उत्पादन घेतले जाते. यात तूर, मूग, उडीद, मटकी, हुलगा, राजमा, चवळी, हरभरा आदींचा समावेश आहे. अलीकडे बागायती तसेच जास्तीचा कालावधी असलेल्या पिकांतही कडधान्यांचे आंतरपीक घेतले जात आहे. पूर्वी कडधान्याच्या उत्पादनासाठी पारंपरिक वाणांची पेरणी केली जायची. मात्र त्यातून फारसे उत्पादन हाती लागत नव्हते. त्या अनुषंगाने राहुरी (जि.. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात व कडधान्य सुधार प्रकल्पांतर्गत संशोधन केले. त्यातून विविध वैशिष्ट्ये असलेले, कोरडवाहू परिस्थितीला अनुकूल, कमी पाण्यावर तग धरणारे कडधान्याचे ३४ वाण विकसित केले. याशिवाय भारतीय स्तरावरील सात वाण आहेत. विद्यापीठात झालेले प्रयोग पूर्वी तुरीची दोन बाय एक फूट किंवा तीन बाय एक फूट अशी लागवड केली जायची. विद्यापीठाने नव्या तंत्रज्ञानासोबत लागवड पद्धतीचे प्रयोग केले. त्यानुसार शाश्‍वत उत्पादनासाठी तुरीची लागवड चार बाय एक फूट अंतरावर करण्याची शिफारस केली. आंतरपीक पद्धतीसाठी सहा बाय एक फूट पद्धती आदर्श ठरविली. पेरणीनंतर पंचेचाळीस दिवसानंतर झाडांचा वरून पाच सेंटीमीटरवर शेंडा खुडण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यातून उत्पादनात १२ ते १५ टक्के वाढ होते. आंतरपीक पद्धतीत दोन ओळी तुरीच्या व चार ओळी सोयाबीनच्या घेतल्यास या प्रयोगातून पंधरा ते वीस टक्के उत्पादन वाढ झाल्याचे आढळले आहे. या पद्धतीतून रब्बीत गहू पीक फायदेशीर पद्धतीने घेता येते. कोरडवाहू भागात तुरीची लागवड करण्यासाठी पाण्याचा ताण सहन करण्यासाठी पुसा हायड्रोजेल अडीच किलो प्रती हेक्टरी व पाच टन पीक अवशेषांचे आच्छादन करण्याची शिफारस करण्यात आली. त्यामुळे कमी पाऊस झाला तरी पिकांचे नुकसान होत नसल्याचे आढळले. कडधान्याच्या वाणांची विविधता

  • तुरीचे विपुला व राजेश्वरी हे सुमारे १४५ ते १६५ दिवसांत येणारे वाण असून ते मर व वांझ रोगांसाठी मध्यम प्रतिकारक्षम आहेत.
  • मुगामध्ये फुले मूग- २, वैभव व चेतक तर उडीदामध्ये टीपीयू ४ हे वाण विकसित केले आहे.
  • भुरीला ते मध्यम प्रतिकारक असून ६५ ते ८० दिवसांत उत्पादन हाती येते. सर्वसाधारण हेक्टरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळते. मूग व उडीद ही दोन्ही कमी कालावधीची असल्याने कापूस, तुरीत आंतरपीक घेता येते.
  • कुळीथ (हुलगा) पिकात विद्यापीठांतर्गत सोलापूर कोरडवाहू कृषी संशोधन केंद्राने सीना, माण व फुले सकस हे वाण विकसित केले आहेत. पैकी सीना वाण ११५ ते १२० दिवसांत पक्व होणारा आहे.
  • त्यापासून हेक्टरी सात ते आठ क्विंटल उत्पादन मिळते. माण वाण १०० ते १०५ दिवंसात तर फुले सकस ९० ते ९५ दिवसांत पक्व येतो. हेक्टरी १२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. हा वाण पिवळा विषाणू रोगास प्रतिकारक्षम आहे.
  • सोलापूरच्याच कोरडवाहू कृषी संशोधन केंद्राने मटकीचा एमबीएस २७ तर गेल्यावर्षी फुले सरिता वाण प्रसारित केला आहे. तो ११५ ते १३० दिवसांत पक्व होतो. हे वाण खास करून पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित केले आहेत. हेक्टरी ६ चे ७ क्विंटल उत्पादनक्षमता आहे. केवडा रोगास तो मध्यम प्रतिकारक्षम आहे.
  • राजमा (घेवडा)- वरुण, मुठा (एचपीआर ३५), फुले घेवडा. साधारण ७० ते ८० दिवसांत पक्व होतो. हेक्टरी १८ ते २५ क्विंटलपर्यंत उत्पादन. मर रोगासाठी मध्यम प्रतिकारक.
  • चवळी- फुले पंढरी, फुले विठाई, फुले रुक्मिणी, फुले सोनाली वाण. साधारण ६० ते ७५ दिवसांपर्यंत पक्वता कालावधी. बागायती आणि जिरायतीसाठी वापर. हेक्टरी १२ क्विंटलपासून १८ क्विंटलपर्यंत उत्पादन. पिवळा विषाणू व भुरी रोगाला प्रतिकारक्षम.
  • राजमा आणि चवळी कमी कालावधीची पिके असल्याने तूर, कापसात आंतरपीक घेता येते.
  • उत्पादन, विक्री महात्मा फुले कृषी विद्यापीठात सन १९७३ मध्ये कडधान्य सुधार प्रकल्पास सुरवात झाली. सन १९८२ मध्ये अखिल भारतीय समन्वित कडधान्य प्रकल्प, १९९४ मध्ये अखिल भारतीय समन्वित हरभरा प्रकल्पाचे प्रमुख केंद्र, २००० मध्ये तूर प्रकल्पाचे उपक्रेंद्र तर २०१५ मध्ये याच प्रकल्पाचे प्रमुख केंद्र झाले. येथील प्रक्षेत्रावर दरवर्षी कडधान्याच्या सुधारित वाणांचे बिजोत्पादन घेतले जाते. बियाण्यांना मागणीही चांगली आहे. प्रतिक्रिया राज्यात कडधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्या अनुषंगाने आमच्या विद्यापीठासह अन्य विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाणांचे सुधारित बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यावर भर आहे. विविधता असलेल्या सुधारित वाणांद्वारे उत्पादनात २५ ते ३० टक्के उत्पादनवाढ झाल्याचा अनुभव आहे. ’ -डॉ. . नंदकुमार कुटे, ७५८८५१३३५८ प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ बियाणे विक्री केंद्र- ०२४२६- २४३३४५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com