मोहापासून प्रक्रियायुक्त पदार्थ

मोहाची फुले, बिया आणि पेंड
मोहाची फुले, बिया आणि पेंड

मोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे त्यांचा टिकवण कालावधीही अत्यंत कमी आहे. त्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेता, मोहाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या संधी आहेत. वनोत्पादनामध्ये मोह अत्यंत महत्त्वाचा वृक्ष असून, तो औषधी आणि व्यावसायिक उपयोगासाठी प्रसिद्ध आहे. त्याला हिंदी व इंग्रजीमध्ये महुआ या नावाने ओळखले जाते.

  • शास्त्रीय नाव - Madhuca longifolia
  • कूळ - sapotaceae
  • मूळ - भारत, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ येथील विविध प्रांतांमध्ये आढळतो.
  • उपयोग - आहार, पशुआहार, इंधन
  • मोहाची फुले खाण्यायोग्य असून, त्यात मोठ्या प्रमाणात शर्करा, जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, मेद आढळतात. गोडीमुळे फुलांचा वापर नैसर्गिक गोडी आणणारा पदार्थ म्हणूनही होतो. आदिवासी समाज त्वचारोग, डोकेदुखी, पित्त आणि दमा यावरील उपचारामध्ये फुलांचा वापर करतात. स्तनदा मातांच्या दुधात वाढीसाठी फुलांचा रस पूरक म्हणून दिला जातो.

    फुलांची संरचना आदिवासी भागामध्ये मोहाच्या फुलांचा वापर गोडी आणण्यासाठी आणि मद्याच्या निर्मितीसाठी केला जातो. फुलांमध्ये सी जीवनसत्त्व भरपूर असून, प्रतिकारकतेसाठी फायदेशीर आहे. त्यात कॅरेटिन असून अ जीवनसत्त्वाचा मोठा स्रोत आहे. फुलांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस अशी खनिजे, काही प्रमाणात प्रथिने आणि मेदही असतात. अनेक संशोधनांमध्ये मोहाच्या फुलामध्ये जिवाणुरोधक, कृमिघ्न, वेदनाशामक, यकृताच्या व्याधीमध्ये उपयुक्त, कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे पुढे आले आहे. मोहाचे पारंपरिक उपयोग मोहाच्या झाडाला वर्षातून एकदा, साधारणपणे मार्च ते एप्रिल या महिन्यांमध्ये फुले येतात. पक्व झाल्यानंतर फुले झाडापासून गळून पडतात. ताज्या फुलांमध्ये सुक्रोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, अर्बीनोज आणि काही प्रमाणात माल्टोज, ऱ्हामनोज हे घटक असतात. त्यांची चव गोड असते. पारंपरिकरीत्या ताजी फुले झाडाखालून गोळा करून, ती सरळ सूर्यप्रकाशामध्ये दोन ते तीन दिवस वाळवली जातात. सामान्य वातावरणामध्ये पोत्यामध्ये साठवून ठेवली जातात.

  • पारंपरिक पदार्थ उदा. हलवा, खीर, बर्फी यांना गोडी आणण्यासाठी फुले वापरली जातात. भात, नाचणी, ज्वारी किंवा रताळ्यासोबत फुलांचा वापर करून गोड भाकरी किंवा केक बनवले जातात.
  • वाळलेली फुले ही चिंच किंवा साल बियांसह उकळून धान्याला पर्याय म्हणून गरीब आदिवासी लोक खातात.
  • जनावरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने फुलांचा वापर पशुखाद्यामध्ये केला जातो, त्यामुळे दुधामध्ये वाढ मिळते.
  • फुलांच्या किण्वन प्रक्रियेनंतर त्यातून मद्य आणि मद्यआधारित पेयांची निर्मिती केली जाते. वायव्य भारतातील स्थानिक लोक मोहापासून मद्य (त्यात अल्कोहोलचे प्रमाण २० ते ४० टक्के) तयार करतात. त्यात गूळ, अमोनियम क्लोराईडबरोबरच काही वेळेस मिरी मिसळून तीव्र स्वाद मिळवला जातो. मुरवल्यानंतर डिस्टिलेशनद्वारे मद्य मिळवले जाते. एक किलो वाळवलेल्या फुलांपासून ३०० ते ४०० मिलि मद्य मिळू शकते. ओरिसामध्ये मोहाच्या फुलापासून बनवलेल्या मद्याला महुली म्हणतात. त्याची बनवण्याची पद्धत किंचित वेगळी आहे. किण्वनाच्या प्रक्रियेत बाखर गोळ्या टाकल्या जातात. त्यातील अल्कोहोलचे प्रमाण अधिक म्हणजे ३० ते ४० टक्के असते.
  • मद्य बनवल्यानंतर शिल्लक राहिलेले फुलांचे अवशेष हे पशुखाद्य म्हणून वापरतात.
  • भिजवलेल्या तांदळामध्ये मोहाची फुले मिसळून ती दळून घेतात. त्याचे पीठ साल पानामध्ये गुंडाळून आगीमध्ये टाकली जातात. अशा प्रकारे वेगळाच केक बनवला जातो.
  • औषधी उपयोग आयुर्वेदामध्ये मोहाच्या फुलांचा वापर शीतकरणासाठी, वातनाशक, दुग्धवर्धक, स्तंभक म्हणून केला जातो. फुलांचा रस - यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असून टॉनिक म्हणून उपयुक्त. दाह होत असलेल्या त्वचेवर चोळल्यास गुणकारी. डोळ्यांच्या रोगामध्येही उपयुक्त. रक्तपित्तातील रक्तस्राव रोखण्यासाठी फायदेशीर. पित्तामुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी याचे नस्य केले जाते. फुलांची भुकटी - फुलांची भुकटी हगवण, बृहदांत्र शोथावर स्तंभक म्हणून वापरली जाते. कच्ची फुले - स्तनदा मातांच्या दुधामध्ये वृद्धीसाठी उपयुक्त. भाजलेली फुले - कफ, खोकला आणि दम्यासाठी वापरली जातात. वंध्यत्व आणि दुर्बलता विकारांमध्ये दुधामध्ये मिसळून फुलांचा वापर केला जातो. तुपामध्ये तळून फुलांचा वापर मूळव्याधीच्या उपचारामध्ये केला जातो.

    मोहाच्या फुलांचे मूल्यवर्धन बेकरी उत्पादनामध्ये ताज्या फुलांचा रस संपृक्त स्वरूपामध्ये स्वीटनर म्हणून वापरला जातो. ताज्या फुलांच्या गरापासून प्युरी आणि सॉस बनवता येतात. पक्व फुलांच्या गरापासून मध्यम आर्द्रतेचे जॅम, जेली, मार्मालेडसारखे पदार्थ तयार करता येतात.

  • भुवनेश्वर येथील संशोधन केंद्रामध्ये अनेक मूल्यवर्धित पदार्थांमध्ये वाळवलेल्या मोह फुलांचा वापर केला आहे. उदा. कॅण्डी, केक, टॉफी, स्क्वॅश, लाडू इ.
  • काळी मिरी, दालचिनी, लवंग, जिरे, शेंगदाणे यांच्या साह्याने मोहाच्या विविध पदार्थांमध्ये स्वाद आणले जातात.
  • मोहाचे लोणी

  • मोहाच्या बियांपासून मऊसूत घट्ट लोणी तयार केले जाते, त्याला किंचित मेदाचा वास येतो. वनस्पतिजन्य लोण्याप्रमाणे याचा विविध पदार्थांमध्ये वापर करता येतो. हे लोणी त्वचेच्या संपर्कात येताच त्वरित वितळते. हे लोणी हिवाळ्यामध्ये किंवा सुरकुत्या कमी करण्यासाठी त्वचेवर लावले जाते.
  • या लोण्यामध्ये क्रूड लिपीड घटकांचे प्रमाण सर्वाधिक (एकूण लिपीडपैकी ९४.५ टक्के) असते. त्यानंतर त्यात ग्लायकोलिपीड आणि फॉस्फोलिपीड हे घटक असतात.
  • या लोण्याचा उपयोग स्वयंपाकासाठी, चॉकलेटनिर्मितीमध्ये केला जातो.
  • मोहाच्या पानावर टसर रेशीम किड्यांचे पालन करून त्यापासून रेशीम उत्पादन घेतले जाते.
  • मोहाचे तेल व पेंड

  • मोहाच्या बियांमध्ये ५० ते ६१ टक्के तेल, १६.९ टक्के प्रथिने, ३.२ टक्के तंतुमय पदार्थ, २२ टक्के कर्बोदके, ३.४ टक्के राख, २.५ टक्के सॅपोनिन्स आणि ०.५ टक्के टॅनिम हे घटक असतात. तेल काढल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पेंडीमध्ये ३० टक्के प्रथिने, १ टक्का तेल, ८.६ टक्के तंतूमय पदार्थ, ४२.८ टक्के कर्बोदके, ६ टक्के राख आणि ९.८ टक्के सॅपोनिन्स आणि १ टक्का टॅनिन असे घटक असतात.
  • मोहाच्या बियांतील मेद काढून घेतल्यास त्यातील प्रथिनांचे, सॅपोनिन्स आणि टॅनिनची पातळी वाढते. वाढलेली सॅपोनिनची पातळी आयसोप्रोपॅनोलच्या प्रक्रियेने कमी करता येते. या प्रक्रियेनंतर पेंडीची पचनीयता ८१ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे आढळले आहे. अशा विषारीपणा कमी केलेल्या मोह बियांच्या पिठाचा वापर आहार आणि पशुखाद्यामध्ये प्रथिनांचा स्रोत ठरू शकतो. तेल काढल्यानंतर शिल्लक पेंडीमध्ये तेल शोषण्याचे इमल्सिफिकेशनचे गुणधर्म दिसून येतात.
  • एरंड आणि निम तेलाच्या तुलनेमध्ये मोहाच्या तेलामध्ये ओलेईट आम्लाचे प्रमाण अधिक (४५ टक्के) असते. पामतेल, साल मेद किंवा कोकमच्या तुलनेमध्येही ओलेईक आम्लाचे प्रमाण अधिक असल्याने अन्य कोकोआ पदार्थांना पर्याय म्हणून मोहाच्या तेलाचा वापर होतो.
  • मोहाचे तेल हे अखाद्य तेलामध्ये महत्त्वाचे आहे. भारतामध्ये प्रतिवर्ष ६० दशलक्ष टन इतके उत्पादन करण्याची क्षमता आहे. मोहाच्या पेंडीमध्ये कीटकनाशकाचेही गुणधर्म असून, मत्स्यपालनामध्ये वापर करता येऊ शकेल.
  • ई-मेल -ramabhau@gmail.com (माजी संचालक, केंद्रीय काढणीपश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था (सिफेट), लुधियाना, पंजाब.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com