कलमे, रोपबांधणी कलेचे रोजगारात केले रूपांतर 

jकलमीकरणाने आधार दिला सहा एकर शेती असलेले गणेश कापसे म्हणाले, की आमच्या कुटुंबात सहा व्यक्ती असून, सर्व जण शेतीत राबतात. कलमीकरणातून शेतीला पूरक व्यवसायच गवसला आहे. त्यातून कुटुंबाच्या चरितार्थाला मोठा हातभार लागला आहे.
रोपबांधणी व कलमीकरणाचे काम करताना रजापूरचे युवक
रोपबांधणी व कलमीकरणाचे काम करताना रजापूरचे युवक

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्‍यातील रजापूर भागातील सुमारे तेरा युवकांनी दुष्काळापुढे हात न टेकता रोजगाराच्या नव्या संधी शेतीतच शोधल्या आहेत. कलमीकरण, रोपबांधणी या अनेक वर्षांच्या कामांतून त्यांनी त्यात कुशलता मिळवली. फळबाग उत्पादकांच्या या गरजा शोधल्या. आज त्यातून त्यांची कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागली आहेत. वर्षभर त्यांच्या हाताला काम मिळू लागले आहे.  एकतरी अंगी असू दे कला... नाही तर काय फुका जन्मला... राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या ओवी  आपल्यातील कार्यक्षमता किंव सर्जनशीलता जागी करतात. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी त्याचा कसा उपयोग करायचा, ते शिकवतात. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्‍यातील रजापूर भागातील जवळपास तेरा युवकांकडे पाहून त्याची निश्‍चित प्रचिती येते. गरजेतूनच त्यांनी शेतीतून उत्पन्नाची संधी नवी संधी शोधली. कलमीकरण हा फळबागांतील एक अविभाज्य घटकच आहे. शेतकऱ्यांना कलमी रोपांची नितांत गरज असते. याच कलमीकरणात कुशल झालो, तर व्यवसायाच्या रूपाने आर्थिक संधी प्राप्त होईल, असे या युवकांना वाटले.  कलागुण वाढवले, व्यावसायिक संधी मिळवली  दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पूजलेला. सध्याच्या भीषण दुष्काळात तर हाताला काम नाही, अशी सर्वत्र अवस्था. अशात केवळ शेतीवर अवलंबून न राहता कलमीकरणाच्या माध्यमातून स्वतःमधील कलागुण त्यांनी आत्मसात केले. ज्ञान केवळ आपल्यापुरते मर्यादित न ठेवता ते इतरांनाही देण्याची वृत्ती अंगिकारली. रवींद्र बाबूराव सुलताने, अण्णा हरिभाऊ चौधरी, शेख आमिन बाबुमिया, गणेश धोंडिबा कापसे, शेख मुसा रशीद, लक्ष्मण सुखदेव चौधरी, सुरेश दामोदर गोर्डे, रामेश्‍वर सुखदेव चौधरी, शेख अफसर जाफर, शेख शकिल बाबुमिया, लक्ष्मण बारिकराव तांडेकर, शेख कैसर जाफर, रोहिदास सीताराम गांगुर्डे अशी नावं या युवकांची सांगता येतील. एक एकरापासून चार एकरांपर्यंत निम्म्याहून जास्त शेती कोरडवाहू असलेल्या रजापूरच्या या युवकांनी आपल्याच गावातील जुन्या पिढीतील व्यक्‍तींकडून मोसंबी, आंबा, सीताफळ, लिंबू, संत्रा आदी फळझाडांचे कलमीकरण शिकून घेतले. रंगपूर खुंट, गावरान, डोळा कलम आदी पद्धतीने कलम करण्याच्या कामांत हे युवक तरबेज झाले आहेत.  रोजगाराची झाली सोय  कलम बांधणी, रोप लागवडीची कामे अंगावर घेऊन काम करणाऱ्या रजापुरातील युवकांचा गट विस्तारात चालला आहे. प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं, हे पथ्य पाळलं जातं. प्रत्येक वर्षी ऑक्‍टोबर ते मेपर्यंत कलमीकरण, तर पावसाळ्याचे तीन ते चार महिने रोप लागवडीचे काम  सुरू असते. त्यामुळे बाराही महिने रोजगार उपलब्ध असतो. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील शेतकरी व नर्सरीधारक यांच्याकडून त्यांना मागणी असते. लागवडीसाठीचे काम पाचशे रुपये शेकड्याने, तर जंबेरी, रंगपूर खुंटावरील कलम बांधणीचे कामे तीनशे ते चारशे रुपये हजाराने करण्याचे त्यांचे गणित आहे. यामधून किमान चारशे ते पाचशे रुपये मजुरी प्रत्येकाला मिळते. 'स्कील इंडिया'चा नारा देणारे शासनकर्ते व यंत्रणा यांनी आमची दखल घेत प्रोत्साहनपर काही करावे, अशी अपेक्षा हे युवक व्यक्त करतात.  असा आहे युवकांचा अनुभव  पलटीचं रोप नवतीला सोपं, असं म्हणतात. मर रोगाचा त्रास वाचत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी पलटीचे रोप मागत असल्याचे कलम बांधण्यात प्रशिक्षित युवक सांगतात. जंबेरी खोदून काढणे ही एक कला आहे. ती सहजगत्या जमत नाही. सातत्याने केलेल्या सरावातून आम्हाला ते काम जमते आहे.  रवींद्र सुलताने म्हणाले, की दोन भावांत पाच एकर शेती आहे. दोन एकर हंगामी बागायती, तर उर्वरित कोरडवाहू आहे. बहुतांश निसर्गाच्या हाती असल्यानं कुटुंबाचा चरितार्थ केवळ शेतीतून भागविणं शक्‍य नव्हतंच. बारा वर्षांपूर्वी आमच्या गावातील काही मोजके लोक कलमीकरणाचे काम करायचे. मला रोजगाराची, तर त्यांना माझ्यासारख्यांची गरज होती. त्यांच्याकडून हे काम आत्मसात केलं. गेल्या बारा वर्षांपासून जवळपास सहा महिने काम मिळत आहे. त्यातून कुटुंबाचा चरितार्थ भागविण्यासाठी मोठी मदत होते आहे.  संपर्क- रवींद्र सुलताने-९८२३९२३०१८  अण्णासाहेब चौधरी म्हणाले, की दहा ते बारा वर्षांपासून कलमीकरणाची कला अवगत केली आहे. नऊ सदस्य असलेल्या आमच्या कुटुंबाकडे तीन एकर शेती. त्यातील निम्म्यापेक्षा जास्त कोरडवाहू होती. त्यातून चरितार्थ भागणं शक्‍य नव्हतंच. आता कलम बांधणे, रोप लागवडीची कामे मी व माझे सहकारी मिळून करतो. आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो आहे.  संपर्क- अण्णासाहेब चौधरी-९०११५८६१६९  रोहिदास गांगुर्डे म्हणाले, की दोन एकरांत शेती व कुटुंबात आम्ही चार भाऊ, आई-वडील व अन्य मिळून जवळपास बारा लोकांचं कुटुंब. शेती कोरडवाहू. कुटुंबाचा रहाटगाडा चालविण्यासाठी आई-वडिलांना मजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. वडिलांनी मेहनतीने शिकविलं. मीही मजुरीला जायचो. त्या वेळी माझे मित्र कलमीकरण कसे करायचे, ते शिकलो. चार पैसे व सतत हाताला काम मिळत असेल, तर आपण यात अवगत का होऊ नये, असं वाटलं. त्यातून आज साडेचारशे रुपयांची रोजची मजुरी मिळते. रोजगाराचा प्रश्‍न सुटला आहे.  संपर्क- रोहिदास गांगुर्डे-८३०८२३२४३१ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com