निगा सुधारित बायोगॅस संयंत्राची...

हिवाळ्यात बायोगॅस संयंत्राची काळजी घ्यावी.
हिवाळ्यात बायोगॅस संयंत्राची काळजी घ्यावी.

ज्या ठिकाणी दिवसभर सूर्यप्रकाश उपलब्ध होऊ शकेल असे ठिकाण बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी निवडावे. संयत्राची जागा थोडी उंच भागात असावी. पावसाळ्यात सभोवताली पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. बायोगॅसची तपासणी करावी. बायोगॅस संयंत्र मुख्यतः अस्थिर घुमट (टाकी) आणि  स्थिर घुमट (जमिनीखाली) यामध्ये जनता आणि दिनबंधू संयंत्र उपलब्ध आहेत.

जागेची निवड :     बायोगॅस जनावरांच्या गोठ्याजवळच असावा. यामुळे शेण वाहून नेण्यास त्रास होत नाही. तसेच गोबरगॅस संयंत्र शक्‍यतोवर स्वयंपाक घराजवळ असावे, त्यामुळे गॅस वाहून नेणाऱ्या पाइपचा खर्च कमी होऊन आपणास योग्य दाबाचा वायू उपलब्ध होतो.

  • संयंत्र पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणापासून १०-१५ मीटर दूर असावे.
  • निवड केलेल्या जागेमध्ये झाडाची मुळे असू नयेत. ज्यामुळे सयंत्र बांधकामात चिरा पडून, पाचक टाकीचे नुकसान होऊ शकते.
  • ज्या ठिकाणी दिवसभर सूर्यप्रकाश उपलब्ध होऊ शकेल असे ठिकाण संयंत्र उभारणीसाठी निवडावे.
  • बायोगॅस संयत्राची जागा थोडी उंच भागात असावी. पावसाळ्यात सभोवताली पाणी साचणार नाही याची काळजी  घ्यावी.
  • गोबरगॅस संयंत्र संडासाच्या जवळपास बांधले तर ते सुद्धा या सयंत्रास जोडता येते.
  • गोबरगॅस संयंत्राचे व्यवस्थापन ः अस्थिर घुमट (टाकी) असलेले संयंत्र  ः संयंत्राची परीक्षण ः

  • संयंत्र पूर्ण शेणाने भरायच्या अगोदर पाचक, वायुधारक (टाकी), पाइपलाइन छिद्रे पडलेले आहेत काय याचे निरीक्षण करावे. त्यातील त्रुटी दूर कराव्यात.
  • बांधकाम पूर्ण झाले असेल तर आतील पाचक टाकीमध्ये एखादी भरीव काठी घेऊन सभोवार वाजवा. जर एखाद्या ठिकाणी दबक्‍या किंवा ठिसूळ प्रकारचा आवाज आला तर ती जागा दुरुस्त करावी.
  • लोखंडी किंवा स्टील गॅस टाकीमध्ये रात्रभर पाणी ठेवून टाकीला बारीक छिद्र वगैरे आहे का याची तपासणी करावी.  ज्या ठिकाणाहून पाणी बाहेर पडत असेल तेथे खूण करून, वेल्डिंगने दुरुस्ती करावी.
  • टाकीमध्ये फेरोसीनयुक्त कपडा जाळून, निघणाऱ्या धुरामुळे सुद्धा तुम्ही टाकीला छिद्रे आहे की नाही हे तपासू शकता.
  • संयंत्र सुरू करण्याची पद्धत : अ) सयंत्रासाठी लागणारी मळी (शेण + पाणी) ः

  • सयंत्रामध्ये शेण पाण्याचे शक्‍यतोवर १ः१ प्रमाण घ्यावे.
  • यामुळे शेणामध्ये असलेल्या एकूण घनपदार्थाचे प्रमाण ८-९ टक्के होऊन (शेणामध्ये जवळपास २० टक्के घनपदार्थ असतात) त्यामुळे चांगल्याप्रकारे गॅसची निर्मिती होईल.
  • ब) पाचक टाकी शेणाने भरणे ः

  • संयंत्राचे बांधकाम झाल्यावर लवकरात लवकर पाचक टाकी भरावी. यासाठी जवळपास दहा दिवसांअगोदर शेण गोळा करून ठेवावे. गोळा केलेले शेण फार वाळलेले असू नये, ते पाण्यामध्ये सहज मिसळणारे असावे.
  • या प्रकारच्या सयंत्रात शेणपाणी मिश्रण भरताना आतील विभाजक भिंतीच्या दोन्ही बाजू एकाच वेळेस भराव्यात. जर पहिल्यांदा एक बाजू भरली तर भिंतीवर दाब वाढून भिंत कोसळण्याची भीती असते. सयंत्र एकाच वेळेस पूर्ण भरावे.
  • सयंत्राची कार्यप्रणाली :

  • सयंत्राच्या क्षमतेनुसार सयंत्रास शिफारस केल्याप्रमाणे नियमित तेवढेच शेण दररोज टाकण्यात यावे. सयंत्रामध्ये ज्वलनशील गॅस तयार होण्यास ३५ ते ४५ दिवसांचा अवधी लागतो.
  • ज्वलनशील गॅस तयार झाल्यानंतर, दररोज आवश्‍यक शेण पाण्याचे १ः१ प्रमाणात मिश्रण सयंत्रात भरावे. जास्तीचे शेण टाकले तर जास्तीचा गॅस तयार होत नाही. शेण कमी पडणार नाही याचीसुद्धा दक्षता घ्यावी.
  • सयंत्राच्या वापरासंबंधी सूचना : अ) दररोजची निगा ः

  • शेणपाण्याचे प्रमाण १ः१ असावे.
  • शेणाचे मिश्रण शक्‍यतोवर दुपारी करावे.
  • शेणामध्ये रेती, दगड असू नये.
  • दररोज बायोगॅसची टाकी काही वेळ फिरवावी.
  • शेगडीचा कॉक चालू करण्याअगोदर आगकाडी जाळून पहा.
  • ब) आठवड्यातून निगा :

  • वायु टाकीच्या बाजू (जेव्हा वायू भरून असताना) स्वच्छ कराव्यात.
  • वापरात असणारी शेगडी साबणाने धुवावी.
  • गॅस पाईपमध्ये असणारा ओलाव्याचा निचरा करावा.
  • क) वार्षिक निगा ः

  • वायुटाकीला आतून काळा रंग लावावा, यामध्ये प्रायमरसुद्धा वापरावा.
  • रंग लावलेली टाकी पूर्ण वाळल्यानंतरच टाकीचा वापर करावा.
  • गॅस वाहक पाइपमध्ये जर काही छिद्रे असेल तर, शोधून दुरुस्त करून घ्यावीत.
  • स्थिर घुमटाचे सयंत्र (जनता/ दिनबंधू सयंत्र) ः सयंत्राचे परीक्षण ः सयंत्राचे बांधकाम पूर्ण झाल्यावर, एखाद्या लहान काठीने भिंतीवर ठोकून पहावे. जर भिंतीमध्ये दबक्‍या स्वरुपाचा आवाज झाला तर त्याठिकाणी एखादी रिकामी जागा असण्याची दाट शक्‍यता असते. त्या ठिकाणी खूण करून, त्यावरील सिमेंटचा थर काढून नव्याने पुन्हा सिमेंट रेतीने आवरण लावावे.

    संयंत्र सुरू करण्याची पद्धत : अस्थिर घुमट (टाकी) असलेल्या सयंत्रात सांगितल्याप्रमाणे शेणपाण्याचे प्रमाण घेऊन संयंत्र संपूर्ण भरावे.

    संयंत्र वापरासंबंधी सूचना ः अ) दररोजची निगा ः

  • दररोज योग्य शेणपाण्याचे मिश्रण संयंत्रात सोडावे, त्याचे प्रमाण १ः१ असावे.
  • वापरण्यात असणारी शेगडी स्वच्छ ठेवावी.
  • ब) मासिक निगा :     वायु वाहून नेणाऱ्या पाइपची चाचणी करावी. लहान छिद्रे किंवा लिकेज असल्यास दुरुस्त करावीत. क) वार्षिक निगा ः

  • वायू आणि पाणी गळती शोधावी. असेल तर दुरुस्त करावी.
  • काही कालावधीनंतर जर वायू घुमट आणि पाचकमध्ये गळती असेल तर सयंत्र पूर्णपणे रिकामे करून आतून पुन्हा सिलिंग आणि सिमेंट रेतीचा थर द्यावा. यावेळेस शक्‍यतोवर काळजी घ्या.
  •   सयंत्रावर थंड वातावरणाचा परिणाम स्थिर घुमट सयंत्रावर थंड वातावरणाचा विपरित परिणाम होतो. ज्यामुळे वायुनिर्मिती प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन वायु उत्पादन कमी होते. गोबरगॅसचे उत्पादन हे तापमानावर अवलंबून आहे. जवळपास ३०-३५ अंश सेल्सिअस तापमानात वायुनिर्मिती प्रक्रिया वेगात असते.हिवाळ्यात वातावरणातील तापमान कमी होऊन त्यासोबतच वायुनिर्मितीचा वेगसुद्धा मंदावतो. उपाययोजना

  • शक्‍य असल्यास शेणाचे मिश्रण तयार करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा.
  • शेणाचे मिश्रण तयार करून, संपूर्ण दिवस तसेच ठेवून नंतर सयंत्रात सोडावे.
  • जर काही सेंद्रिय पदार्थ उपलब्ध असतील (जसे ज्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त आहे असे) सयंत्रात शेणाबरोबर सोडावे. यामुळे वायुनिर्मिती जास्त होऊन, मिळणाऱ्या शेणाच्या मळीचा दर्जा सुद्धा वाढतो.
  • उपलब्ध असणारे उष्ठान्न, हिरवे गवत, वैरण इत्यादी योग्य प्रकारे बारीक करून वापरावे याचे प्रमाण १०० किलो शेणास एक किलो घेऊन सयंत्रात सोडावे.
  • प्लॅस्टिकच्या पिशव्या संपूर्ण घुमटावर पसराव्यात. ज्यामुळे उष्णता बाहेर जाणार नाही.
  • सयंत्रामधून बाहेर पडणारी शेणाची मळी, पुन्ही नवीन शेणासोबत वापरावी. यामुळे मळीत असणाऱ्या जिवाणूंचा पाचक प्रक्रियेत नव्याने उपयोग केल्या जाऊ शकतो आणि त्यांची संख्या वाढण्यास सुद्धा मदत होते. यासाठी १०० लिटर नवीन शेणपाण्याच्या मिश्रणात जवळपास २ ते ३ लिटर बाहेर पडणाऱ्या मळीचा वापर करावा. यामुळे वायू निर्मितीचा वेग वाढून वायुचे उत्पादन वाढते.
  • संपर्क : डॉ. सुरेंद्र काळबांडे, ७५८८७६३७८७ (अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com