व्यवस्थापन दालचिनीचे...

नवीन कलमांना आधार द्यावा. आळ्यामध्ये आच्छादन करावे.
नवीन कलमांना आधार द्यावा. आळ्यामध्ये आच्छादन करावे.

वाढीच्या टप्यात असलेल्या दालचिनी कलमांना आधार द्यावा. तसेच शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी. आळ्यामध्ये आच्छादन करावे. पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.

दालचिनीच्या नवीन कलमांना आधार द्यावा. सभोवती १५ सें.मी. अंतर सोडून आच्छादन करावे. आच्छादनासाठी गवत, पालापाचोळा यांचा वापर करावा. 

  • लागवडीनंतर योग्य खत पुरवठा न केल्यास उत्पादन मिळण्याकरिता लागणारा कालावधी वाढू शकतो. दालचिनीची प्रतदेखील महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने शक्‍यतो सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. 
  • लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी २ ते ३ किलो शेणखत, २० ग्रॅम नत्र, २० ग्रॅम स्फुरद व २० ग्रॅम पालाश द्यावे. याच प्रमाणात खतमात्रा दरवर्षी वाढवत जावी. दहा वर्षानंतर प्रत्येक दालचिनीला १० किलो शेणखत,२०० ग्रॅम नत्र, २०० ग्रॅम स्फुरद, २०० ग्रॅम पालाश द्यावे. शेणखत वर्षातून दोनदा विभागून द्यावे. खते झाडाच्या सभोवार खोडापासून किमान ३० सें.मी अंतर सोडून उथळ चर खणून त्यात द्यावीत. 
  • नारळ व सुपारी बागेत लागवड केली असल्यास ज्या वेळी पिकांना पाणी दिले जाते त्याच वेळेस पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी. लागवड स्वतंत्रपणे केली असल्यास ३ ते ४ दिवसांनी पाणी द्यावे. दालचिनीची काढणी   
  •  दालचिनीची साल काढण्यासाठी झाडाच्या फांद्या तोडाव्या लागतात. योग्य काळजी घेतली असेल तर लागवडीनंतर दोन ते तीन वर्षानी साल काढण्यासाठी तयार होते. या वेळी झाडाची किमान एक फांदी सुमारे १५० सें. मी. ते १७५ सें.मी. उंच, बुंध्याची जाडी ४ ते ५ सें.मी. व खोडावरील ७० टक्के साल तपकिरी रंगाची झालेली असावी. 
  • सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत साल काढणीचा हंगाम असतो. हा हंगाम जमीन, वातावरण व जातीनुसार बदलतो. आपल्या भागातील हंगामाची निश्‍चिती करून घ्यावी. यासाठी काढणीस तयार फांदीवरील सालीचा एक लहानसा तुकडा चाकूने काप देऊन काढावा. हा सालीचा तुकडा सहजपणे निघून आल्यास साल काढणीसाठी खोड तोडावे. सहजपणे साल न आल्यास १५ दिवसांनी पुन्हा तपासणी करावी. जोपर्यंत सहजपणे साल सुटत नसेल, तोपर्यंत झाड तोडू नये. 
  • साल सहजपणे सुटत आल्याची निश्‍चिती झाल्यानंतर दालचिनीची साल काढण्यासाठी झाड तोडावे. साल सकाळच्या वेळेस काढावी. दालचिनीची निवडलेली फांदी जमिनीपासून २५ ते ३० सें.मी. उंचीवर तोडावी. बाजूच्या हिरव्या लहान फांद्या लगेच तोडून बाजूला कराव्यात. पाने सावलीत वाळवावीत. मुख्य खोडाचे ३० सें.मी. आकाराचे तुकडे वेगळे करून साल लगेच काढण्यास घ्यावी. त्यासाठी खोडाच्या दोन्ही बाजूस उभे खोल काप दयावेत. चाकूची बोथट बाजू या कापांमध्ये घुसवून साल हलवून घ्यावी. त्यानंतर काढावी. साल काढण्याअगोदर सालीवरून ब्रासचा रूळ किंवा चाकूची धार फिरवून साल रगडावी. त्यामुळे वरचा लाकडाचा भुसा सालीवरून निघून जातो. 
  • साल काढल्यावर ती सावलीत, परंतू भरपूर प्रकाशाच्या ठिकाणी वाळवावी. थेट सूर्यप्रकाशात वाळवू नये. साल पूर्ववत चिकटवावी, साल काढलेले खोड मात्र उन्हात वाळवावे. सायंकाळी वाळलेल्या खोडावर साल पूर्ववत चिकटवावी, त्यासाठी ती दोरीने खोडावर बांधून ठेवावी. हे साल बांधलेले खोड दुसऱ्या दिवशी सावलीत वाळवावे. तिसऱ्या दिवशी साल खोडावरून सोडावी व सावलीत वाळविण्यास ठेवावी. साधारण पाचव्या ते सहाव्या दिवशी साल वाळते. साल सावलीत वाळवल्यानंतर एकदा दोन तास उन्हात वाळवावीत. वाळताना ती मलमलच्या पिशवीत घेऊन उन्हात ठेवावीत. वाळलेली साल डब्यात हवाबंद करून ठेवावी. 
  • एका दालचिनीच्या झाडापासून पाचव्या ते सहाव्या वर्षी सरासरी ३०० ग्रॅम वाळलेली साल व २५० ग्रॅम पाने मिळतात. झाड तोडल्यानंतर दालचिनीला असंख्य धुमारे फुटतात. हे धुमारे वाढू द्यावेत. तयार धुमाऱ्यांपैकी सरळ सशक्त ४ ते ५ धुमारे ठेवून बाकीच्यांची छाटणी करावी. 
  • डॉ. वैभव शिंदे, ९५१८९४३३६३ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र,  भाटये, जि. रत्नागिरी)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com