फऱ्या, तिवा, घटसपर् रोगाची लक्षणे अोळखा

जनावरांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंतनाशकाची मात्रा द्यावी.
जनावरांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंतनाशकाची मात्रा द्यावी.

पावसाळ्यात जनावरे आजारी पडण्याचे व त्यामुळे होणाऱ्या मरतुकीचे प्रमाण सर्वाधिक असते. जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर उपचार करण्यापेक्षा या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अधिक काळजी घेणे अधिक हितकारक ठरते. अतिवृष्टीमुळे वातावरणातील ओलावा, सूर्यप्रकाशाचा अभाव, ढगाळ वातावरण गोठ्यातील ओलावा चारापाण्याची ढासळलेली प्रत या एकूणच परिस्थितीमुळे जनावरांच्या शरीर प्रक्रियेवर ताण पडतो. जनावरांमध्ये आजारांचे प्रमाण किंवा साथीचे रोग जसे घटसर्प, फऱ्या इत्यादी उद्‌भवतात. अशा वेळी शक्‍य असल्यास आंबवणाचे प्रमाण वाढवून द्यावे. प्रामुख्याने दुभत्या आणि व्यायला झालेल्या गाई, म्हशींची अन्नघटकांची शारीरिक मागणी पूर्ण करण्याकरिता आंबवण्याचे प्रमाण वाढवणे आवश्‍यक आहे.

  • जनावरांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंतनाशकाची मात्रा द्यावी. त्यामुळे जनावरांच्या पोटातील जंत निर्मूलनाने जनावरांची पचनशक्ती व त्यामुळे एकंदरीत शरीरप्रकृती उत्तम राहण्यास मदत होते. त्याकरिता उपलब्ध असलेल्या विविध कृमिनाशकांपैकी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य कृमिनाशक पाजावे. (उदा. गाभण जनावरासाठी फेनबेंडेझॉल व इतरासाठी अलबेंडेझॉल)
  • पोटातील कृमी किंवा शरीरातील जंताप्रमाणेच अंगावर आढळणाऱ्या डास, गोचीड, गोमाशा, उवा यापासूनही जनावरांचे संरक्षण करणे आवश्‍यक आहे. कारण त्यामुळे जनावरांना गोचीड ताप/डेंगी यासारखे आजार होऊ शकतात. जनावरे दिवसा कोरड्या जागेवर मोकळ्या हवेत बांधावीत. त्यामुळे गोठ्यातील फरशी/जाग कोरडी होण्यास मदत होईल. तसेच गोठ्यात दिवसा भरपूर सूर्यप्रकाश पोहोचेल याची काळजी घ्यावी. गोठ्यातील भिंती व गव्हाण यांना असलेल्या कड्याकपारी दुरुस्त करून बुजवून घ्याव्यात. परजीवींचे प्रमाण जास्त असल्यास पशुवैद्यकाकडून योग्य ते उपचार करावेत.
  • पावसाळ्यात जनावरांना फऱ्या, घटसर्प, लाळ्या खुरकूत, गोचीड ताप हे रोग प्रामुख्याने होतात. या सर्व रोगाकरिता लस उपलब्ध असून याचे लसीकरण करावे. लसीकरणापूर्वी कृमिनाशक औषधे व परजीवी कीटकांचे निर्मूलन केलेले असणे आवश्‍यक आहे.
  • कासदाह सारखे कासेचे आजार जनावरांना पावसाळ्यातच जास्त प्रमाणात होतात. त्यामुळे कासेची स्वच्छता राखणे हाच प्रतिबंधात्मक उपाय सर्वात जास्त परिणामकारकपणे प्रतिबंध करू शकतो. त्याकरिता जनावरांचे दूध काढून झाल्यावर दिवसातून दोन्ही वेळेस सर्व सड जंतुनाशकामध्ये बुडवून धरल्यास फायदा होतो. या पद्धतीला टिट डिपिंग म्हणतात. त्याकरिता लागणारे जंतुनाशक बाजारात विविध नावाने उपलब्ध आहे.
  • अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे किंवा जागोजागी साठलेल्या गढूळ पाण्यामुळे तयार झालेल्या पाणवठ्यातील पाणी दूषित झालेले असते. पिण्याच्या पाण्याद्वारे जनावरांमध्ये रोगराई पसरू नये म्हणून विहिरीचे पाणी किंवा नळाचे पाणी जनावरांचा पिण्यास द्यावे. गोठ्याच्या आसपास छोटे छोटे खड्डे होऊन त्यात पाणी साचू नये यासाठी या खड्ड्यांमध्ये मुरुम टाकावा.
  • गोठ्यामध्ये खाचखळगे असल्यास तेथे पाणी साठून सारखी ओल राहते. त्यातच जनावरांचे शेण व मूत्र खळग्यामध्ये साठून मोठ्या प्रमाणावर दलदल निर्माण होऊन कासदाह होण्याची शक्‍यता जास्त असते. तेव्हा सर्व खाचखळगे मुरमाने भरून घ्यावेत.
  • झपाट्याने वाढणारा कोवळा हिरवा चारा जनावरांना अत्यंत कमी प्रमाणात इतर चाऱ्याबरोबर द्यावा. कारण अशा कोवळ्या चाऱ्यामुळे जनावरांमध्ये अपचन, पोटफुगीचे आजार उद्‌भवतात. तसेच चाऱ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे जनावरे बुळकंडतात.
  • पूर्वी उगवलेले गवत आणि आता झपाट्याने वाढणारे गवतसुद्धा दूषित झालेले असते. या चाऱ्यावर जनावरे न चारता शेतातील बांधाच्या उंचवट्यावरचे गवत आणि वाळलेला कोरडा चारा (साठवून ठेवलेला) जनावरांना द्यावा.
  • कोवळी ज्वारी, टणटणी, घाणेरी व कण्हेर आदी विषारी वनस्पती जनावरांच्या चाऱ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  • पावसाळ्यात जनावरांना होणारे आजार व त्यावरील उपचार

  • फऱ्या : या रोगाची लक्षणे म्हणजे एकाकी ताप येतो, मागचा पाय लंगडतो. मांसल भागाला सूज येते. सूज दाबल्यास चरचर आवाज येतो. या रोगासाठी प्रतिबंधक करण्यासाठी दरवर्षी सुरवातीला जनावरांना लसीकरण करून घ्यावे.
  • घटसर्प : या रोगात जनावर एकाएकी आजारी पडते. खाणे पिणे बंद होते. अंगात ताप भरतो. गळ्याला सूज येऊन डोळे खोल जातात. घशाची घरघर सुरू होते. या रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी निरोगी जनावरांना ऑईल अडज्युव्हट एच. एस. तेलयुक्त लस टोचून घ्यावी.
  • कासदाह : या रोगामध्ये सडाला तसेच कासेला सूज येते. दूध अतिपातळ, रक्त पूमिश्रित येते, जनावर कासेला हात लावू देत नाही. दूध काढण्यापूर्वी जंतूनाशकाने कास धुवावी. अधून मधून कासदाह रोगासाठी दुधाची तपासणी करून घ्यावी. गायी किंवा म्हशी आटविण्याच्या शेवटच्या दिवशी सडात अँटिबायोटिक्‍स ट्यूब्ज सोडाव्यात.
  • थायलेरियाॅसिस : या रोगात जनावरांना सतत एक दोन आठवडे ताप येतो. जनावर खंगत जाते. जनावर आंबवण (खुराक) खात नाही. घट्ट हगवण होते. इलाज न झाल्यास मृत्यू येतो. या रोगात प्रतिबंधक उपाय म्हणजे गोचीड, माशा वगैरेमुळे या रोगाचा प्रसार होतो. म्हणून गोठे स्वच्छ ठेवावेत. जनावरांच्या अंगावरही गोचीड प्रतिबंधक पावडर लावावी.
  • तिवा : या रोगामध्ये जनावरास सडकून ताप येतो. जनावरांचे खाणे मंदावते. जनावर थरथर कापते. एका पायाने लंगडते. मान, पाठ, डोळे व पायाचे स्नायू आकुंचन पावतात. तिवा रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी डासाचे निर्मूलन करावे.
  • पोटफुगी : या आजारात जनावराची डावी कुस फुगते. जनावर बेचैन होते. खाणे व रवंथ करणे बंद करते. सारखी उठबस करते. टिचकीने आवाज केल्यास टमटम आवाज येतो. या रोगात प्रतिबंधक उपाय म्हणजे पावसाळ्यात ओला व कोवळा चारा अतिप्रमाणात देऊ नये.
  • हगवण : या प्रकारात जनावरास एकसारखे साधे अगर रक्त व शेण मिश्रित पातळ दुर्गंधीयुक्त शौचास होते. जनावर मलूल होते. अशुद्ध व घाणेरड्या चाऱ्यामुळे हा आजार उद्भवतो. हा अाजार टाळण्यासाठी जनावरांना शुद्ध पाणी व चांगले खाद्य द्यावे.
  • लिव्हर फ्ल्युक : या रोगात जनावराचे खाणे कमी होते. शेण पातळ होते. जनावराच्या खालच्या जबड्याखाली सूज येते. जनावरे खंगत जातात व दगावतात. या रोगात प्रतिबंधक उपाय म्हणजे सर्व जनावरांना दोन वेळा (पावसाळ्यापूर्वी व नंतर) जंताचे औषध पाजावे. पिण्यास नेहमी स्वच्छ पाणी द्यावे.
  • संपर्क : डॉ. रवींद्र निमसे, ९४२२१७९५२५ (पशुसंवर्धन विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com