वेळीच ओळखा कोंबड्यांतील विविध रोगांचा प्रादुर्भाव 

कोंबड्यांमध्ये होणाऱ्या काही प्रमुख रोगांची लक्षणे, उपचार व प्रतिबंधक उपाय माहित असणे आवश्यक असते
कोंबड्यांमध्ये होणाऱ्या काही प्रमुख रोगांची लक्षणे, उपचार व प्रतिबंधक उपाय माहित असणे आवश्यक असते

कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात असेल, तसेच समतोल आहार, शुद्ध हवेची कमतरता, इ. मुळे रोगजंतूंचा प्रवेश झाल्यावर लगेच रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. कोंबड्यांमध्ये होणाऱ्या काही प्रमुख रोगांची लक्षणे, उपचार व प्रतिबंधक उपाय माहित असणे आवश्यक असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून होणारे नुकसान टाळता येते.  रोगजंतू आणि रोगजंतूंना अनुकूल परिस्थिती या दोन गोष्टी कुठलाही रोग होण्यास कारणीभूत ठरतात. रोगजंतूंनी शरीरात प्रवेश केला तरी अनुकूल परिस्थिती नसल्यास रोग होऊ शकत नाही किंवा रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो. कोंबड्यांमध्ये साधारणपणे पुढील रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. 

रानीखेत  हा रोग विषाणूंपासून होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास १०० टक्के मरतूक होऊ शकते. लहान कोंबड्यांमध्ये घरघर लागणे, श्वास घेण्यास त्रास, थरथरणे, अडखळणे, पाय व पंख टोकाशी लुळे पडणे, वेड्यावाकड्या हालचाली इत्यादी लक्षणे दिसतात. तर मोठ्या कोंबड्यांमध्ये अवघड श्वासोच्छवास, मंद भूक, ताप येणे, पांढरी पातळ हगवण, मान वाकडी होणे, मज्जासंस्थेवर परिणाम, अंडी-उत्पदनात घट, पातळ कवचाची व निकृष्ट दर्जाची अंडी, इत्यादी लक्षणे दिसतात. रोग झाल्यावर या रोगावर उपचार नाहीत. परंतु रोग होऊ नये यासाठी पिल्ले ५ ते ७ दिवसांची असताना 'लासोटा' ही लस नाकात किंवा डोळ्यांत एक थेंब या प्रमाणात द्यावी. तसेच आठव्या आठवड्यात व १८ व्या आठवड्यात 'आर २ बो ही लस (०.५ मिली.) कातडीखाली द्यावी. 

रक्ती हगवण (कॉक्सीडिओसिस)  हा रोग 'कॉक्सीडिया या रक्तातील परजीवींपासून होतो. विष्टेमध्ये रक्त दिसते. विष्ठा लालसर पातळ असते. कोंबड्यांच्या गुदद्वाराजवळ रक्तमिश्रित विष्टा आढळते. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कोंबड्यांचा तुरा कोमेजतो, कोंबड्या पेंगतात, खाणे कमी होते. अंडी-उत्पादनही कमी होते. अशक्तपणा आढळतो. तसेच कोंबड्यांची मरही मोठ्या प्रमाणात आढळते. हा रोग पूर्णपणे नियंत्रित करता येतो. 

देवी  हा रोग विषाणूंपासून होतो. या रोगाची लागण झाल्यास कोंबड्यांचा तुरा व डोळे मलूल होतात. पायावर पिसे नसलेल्या भागावर पिवळे फोड दिसतात. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी फोडांवर खपली धरते व ती पडते. या खपलीतून विषाणूंचा प्रसार होतो. या रोगाची लागण झाल्यावर भूक मंदावते. नाकातून द्रव पदार्थ वाहतो. तोंडात चिकट पदार्थ तयार होतो. त्यामुळे कोंबड्यांचा खाद्य खाता येत नाही व कोंबड्या भुकेने मरतात. या रोगाची लागण होऊ नये म्हणून सहाव्या व सोळाव्या आठवड्यात देवी रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यावी. रोग झाल्यास फोड आलेली जागा पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणाने धुवून घ्यावी व त्यावर कोणतेही प्रतिजैविक मलम लावावे. 

मरेक्स  हा रोग विषाणूंमुळे होतो. कोंबड्यांचे पाय लुळे पडतात. खाद्य खाऊ न शकल्याने कोंबड्या मारतात. हा रोग बहुतांशी लहान पिलांना होतो व त्यामुळे ६ ते १० आठवडे वयोगटातील पिल्ले मारतात. मोठ्या कोंबड्यांमध्ये हा रोग पाचव्या ते सहाव्या महिन्यात आढळून येतो. या रोगामुळे कोंबड्यांचे पाय, पंख, मान लुळी पडते, वजन, श्वसनास त्रास होतो, विष्ठा पातळ पडते व पिसांच्या मुळाशी सूज दिसून येते. या रोगावर उपाय नाही. परंतु प्रतिबंधक उपाय म्हणून पिल्ले एक दिवसाची असताना मरेक्स हि लस द्यावी. 

गंबोरो  हा रोग विषाणूमुळे होतो. कोंबड्या पेंगतात, अडखळत चालतात, पातळ पांढरी हगवण होते व गुदद्वाराजवळची पिसे विष्ठेमुळे घाण होतात. 

जंत  जंतामुळे कोंबड्यांची वाढ खुंटते, अंडी उत्पादन कमी होते, पातळ तसेच बिनकवचाची अंडी मिळतात, जंत झालेल्या कोंबड्यांची खाद्याचे मांसात किंवा अंड्यात रूपांतर करण्याची क्षमता कमी होते. त्यांचे वजन घटते व हगवण लागते. यासाठी कोंबड्यांना जंताचे औषध प्रत्येक महिन्यात द्यावे. औषध सतत २ ते ३ दिवस द्यावे. औषध दिल्यानंतर जे जंत पडतील ते उचलून लांब टाकावेत औषध देण्याआगोदर २ दिवस वऔषध दिल्यानंतर २ दिवस पाण्यातून जीवनसत्त्वे द्यावेत म्हणजे कोंबड्यांवर ताण ना येऊन त्यांच्या उत्पादनावर वाईट परिणाम होणार नाही.  

जीवनसत्त्व 'अ' चा अभाव  कोंबड्यांमध्ये जीवनसत्त्व 'अ'चा अभाव असल्यास त्यांच्या डोळ्यांतून व नाकातून पाणी येते. डोळे सुजतात डोळ्यांचा दाह होतो, डोळ्यांत पांढरा पदार्थ साचतो, वाढ खुंटते. याकरिता बी-कॉम्प्लेक्स १०० कोंबड्यांना १५ ते ३० मि.ली. पिण्याच्या पाण्यातून ४ ते ५ दिवस द्यावे. 

कॅर्लीटोपॅरालिसिस  जीवनसत्त्व 'ब' किंवा रायबोफ्लेवीन कमी पडल्यास कोंबड्यांच्या पायाची बोटे वाकडी होतात व ते गडघ्यावर चालू लागतात. कोंबड्यांमध्ये लांगडेपणा दिसतो. परंतु कोंबड्यांचे खाणे-पिणे व्यवस्थित असते. याकरिता बी-कॉम्प्लेक्स कोंबड्यांना १५ ते ३० मि.लि. पिण्याच्या पाण्यातून ४ ते ५ दिवस द्यावे. 

खाद्यात चुन्याचे प्रमाण कमी असणे  हा प्रकार अंड्यांवरील कोंबड्यांमध्ये दिसून येतो. खाद्यात चुन्याचे प्रमाण कमी असल्यास अंड्याचे कवच पातळ होते. अशा कोंबड्यांना खाद्यातून शिंपलापूड द्यावी किंवा मीठविरहित खनिज मिश्रण द्यावे. 

गोचीड, उवा वगैरेंपासून उपद्रव  हे कीटक कोंबड्यांच्या शेडमध्ये राहून रात्रीच्या वेळी कोंबड्यांचे रक्त शोषण करतात. त्यांच्या चाव्यांमुळे कोंबड्या बेचैन होतात. रक्त कमी होऊन कोंबड्यांना ऍनिमिया होतो. अंडी-उत्पादन, घटते, वाढ खुंटते, तसेच ह्या कीटकांद्वारे रोगप्रसारही होतो. यावर वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना करणे महत्वाचे असते.  टीप ः पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच कोंबड्यांवर उपचार करावेत.    संपर्क ः अजय गवळी ः ७४४७७८२६६६  (लेखक पशुतज्ज्ञ आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com