फळबागेत टिकवा ओलावा

फळबागेत ठिबक सिंचनासह आच्छादनाचा वापर करावा
फळबागेत ठिबक सिंचनासह आच्छादनाचा वापर करावा

सध्याच्या काळात फळबागेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडाच्या आळ्यात गवत, गव्हांडा, पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. याचबरोबरीने प्लॅस्टिक आच्छादन फायदेशीर ठरते. आच्छादनामुळे पाण्याची बचत होते. प्लॅस्टिक आच्छादन केल्याने तणांचे नियंत्रण होते, झाडांच्या मुळांची वाढ चांगल्या प्रमाणात होते.  

  • बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी फळझाडांच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये सेंद्रिय किंवा पॉलिथीन शीटचा वापर करून आच्छादन करावे. सेंद्रिय आच्छादनाचा थर ८ ते १० सें.मी. जाडीचा असावा. बाष्पीभवनाद्वारे ७० टक्के पाणी उडून जाते; परंतु आच्छादनामुळे जमिनीत ओलावा टिकण्यास मदत होते, त्यामुळे पाण्याची बचत होते; तण उगवत नाहीत. कालांतराने सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळतात.
  • आच्छादनासाठी शेतातील काडीकचरा, वाळलेले गवत, निष्कृष्ट प्रतीचा चारा, पालापाचोळा यांचा वापर करावा. अलीकडे एलडीपीई प्लॅस्टिक कागदाचा वापरही आच्छादन म्हणून होत आहे. त्याच्यामुळे १५ ते २० टक्के पाण्यात बचत होते. शिवाय पाण्याची पाळी ४ ते ५ दिवस उशिराने देता येते.
  • फळबागेत पाण्याची स्पर्धा करणारे तण, गवत काढून टाकावे. याशिवाय पानांवर पाण्याचा अधूनमधून फवारा मारल्यास पानांमधून पाण्याचे उत्सर्जन कमी होते. पानाची कर्बग्रहण क्रिया सुधारते.
  • बाष्परोधकांचा वापर : बाष्पोत्सर्जन रोखण्यासाठी केओलीन, पांढऱ्या खडूची भुकटी ८ टक्के या प्रमाणात पानांवर व खोडावर फवारणी करावी. उन्हामुळे पानातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असते. बाष्पीभवन रोखण्यासाठी उन्हाळ्यात केओलीनची ८ टक्के तीव्रतेने मार्च, एप्रिल व मे महिन्यांत फवारणी केल्यास चुन्यासारखा पांढरा थर पानावर तयार होतो. सूर्यप्रकाश पानांवरून परावर्तित होऊन पिकातून बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. पर्यायाने पाण्याची बचत होऊन उन्हाळ्यात पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होते. जमीन व पानांवाटे होणारे बाष्पीभवन सुमारे ६० टक्के असते. महिन्यातून दोन वेळा बाष्परोधकाची फवारणी करावी.
  • १ ते १.५ टक्के पोटॅशियम नायट्रेटची (२ ग्रॅम प्रति लिटर पाणी) झाडावर फवारणी करावी, त्यामुळे झाडाची तग धरून राहण्याची आणि पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
  • उताराच्या जमिनीत फळबाग असेल तर उताराच्या आडव्या-उजव्या बाजूने अर्धवर्तुळाकार जाड बांध घालावेत, त्यामुळे अवकाळी पावसाचे पाणी अडवून जिरवले जाते. त्याचा उपयोग झाडाला होतो.
  • मृग किंवा हस्तबहाराचे नियोजन करावे. म्हणजे बहार धरण्यात बदल करावा.
  • उत्पादनाची अपेक्षा न करता झाडे जगवण्याकडे लक्ष द्यावे. सातत्याने व्ही ब्लेडच्या साह्याने आंतरमशागत करून ओलावा टिकवण्याचा प्रयत्न करावा. खोड गवताने अगर बारदाण्याने झाकून घ्यावे. प्रत्येक झाडाच्या मुळ्याभोवती जमिनीत १०० ते ५०० ग्रॅम पॉलिमरचा वापर करावा. त्यामुळे पाणी शोषून घेऊन जास्त काळ ओलावा टिकतो.
  • छाटणी : अवर्षण-प्रवण भागातील फळबागांमध्ये साधारणतः फेब्रुवारी ते मार्च महिन्यात झाडांवरील पानगळ होत असते. त्यानंतर फळझाडाच्या बुंध्यावर साधारणपणे २ ते २.५ फुटापर्यंत आलेली सर्व फूट काढून टाकावी. झाडावरील दाट व कमकुवत फांद्या कमी कराव्यात. जमिनीला टेकणाऱ्या फांद्या छाटाव्यात. झाडाची हलकी छाटणी करावी. झाडावरील व झाडाखाली पडलेली किडकी, सडकी फळे, फुले वेचून नष्ट करावीत.
  • बोर्डोपेस्टचा वापर : सीताफळ, आंबा या फळझाडांची खोडे उन्हाळ्यात तडकतात. त्यामुळे झाडे वाळू शकतात. वाढत्या उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी या फळझाडांच्या खोडावर तीन ते चार फुटांपर्यंत १० टक्के तीव्रतेची बोर्डोपेस्ट लावावी.
  • झाडाभोवती हलकीशी चाळणी करावी. तण काढून त्याचे आच्छादन करावे. यामुळे जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. भेगा बुजविल्या जातात. पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते. यामुळे १० ते १५ मि.मी. ओलाव्याची बचत होते.
  • फळझाडांना उन्हाळ्यात संध्याकाळी पाणी द्यावे, त्यामुळे फळझाडांना अधिक प्रमाणात पाणी मिळते. ठिबक अथवा मडका सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. संरक्षित पाणी देण्यासाठी मडका सिंचन किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा.
  • केळी

  • फळवाढीच्या व कापणीच्या अवस्थेत असणाऱ्या जुन्या कांदेबागेतील पक्व झालेल्या घडांची २५ ते ३० सेमी दांडा राखून कापणी करावी व कमीत कमी हाताळणी करून घड पॅकिंग हाउसपर्यंत न्यावेत.
  • कापणी झालेल्या झाडांची पाने कापून बागेबाहेर टाकावीत.
  • बागेची सर्वसाधारण स्वच्छता राखावी. तणाचे प्रमाण तुलनात्मकरीत्या कमी असले तरी बागा निंदणी, कुळवणी करून स्वच्छ ठेवाव्यात. मुख्य खोडालगत येणारी पिले धारदार विळीने जमिनीलगत दर २-३ आठवड्यांनी कापावीत
  • मृगबाग केळीबागेस लागवडीनंतर २५५ दिवसांनी प्रतिझाड ३६ ग्रॅम युरिया + ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅशची मात्रा द्यावी. या महिन्यात मृगबाग केळी निसवण्यास सुरवात होईल. अशा निसवलेल्या घडातील पूर्ण फण्या उमलल्यानंतर त्याचे केळफूल कापावे व बागेबाहेर नेऊन नष्ट करावे.
  • केळी फणीवरील केळपत्री अलगद काढावी.
  • कांदेबाग केळीस लागवडीनंतर १२० दिवसांनी प्रतिझाड ८२ ग्रॅम युरियाची मात्रा कोरून द्यावी. आंतरमशागत करून वाफ्यातील जमीन भुसभुशीत ठेवावी. झाडांना मातीने आधार द्यावा.
  • निर्यातयोग्य केळी मिळण्यासाठी घडांवर ६ ते ८ फण्या ठेवून घडाची विरळणी करावी. घडाचे व घडदांड्याचे संरक्षण होण्यासाठी घडावर २ ते ६ टक्के सच्छिद्रता असलेल्या ७५ x १०० सेमी आकाराच्या पांढऱ्या सच्छिद्र प्लॅस्टिक पिशव्यांनी घड झाकावा. पिशवीचे वरील तोंड दांड्याला बांधावे तर खालील तोंड मोकळे सोडावे
  • ब) भाजीपाला पिके

  • टोमॅटो पिकासाठी वाण निवडताना प्रामुख्याने तो वाण अधिक पाने असणारे, उष्ण तापमानात फळधारणा होणारे, लिफ कर्ल या विषाणूजन्य रोगास सहनशील व फळांना तडे न जाणारे निवडावे. म्हणजे अपेक्षित उत्पादन मिळू शकते. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी. कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी होते.
  • मिरचीची लागवड अशी करावी की उन्हाळ्यात (मार्च ते मे) मार्केटमध्ये येईल. मिरचीसाठी वाण हा उंची शाकीय वाढ असणारा, फांद्या जास्त असणारा, पोपटी ते गर्द हिरव्या रंगाच्या लांब मिरच्या असणारा असावा. मिरचीमध्ये फुले ज्योती या जातीमध्ये मिरच्या झुपक्यात येतात व झाडावर दाट पाने असतात.
  • हळद पिकाची काढणी सुरू करावी. काढणी केल्यानंतर जेठे गड्डे, अंगठा गड्डे, सोरा कंद वेगवेगळे साठवावेत.
  • संपर्क ः गजानन तुपकर ः ८२७५४१२०६४ (विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र, अकोला) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com