दूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना

 जनावराला दिल्या जाणाऱ्या अाहारावर दुधातील घटकांचे प्रमाण अवलंबून असते.
जनावराला दिल्या जाणाऱ्या अाहारावर दुधातील घटकांचे प्रमाण अवलंबून असते.

दुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) या घटकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दुधाला कमी दर मिळतो व दुग्धव्यवसाय तोट्याचा होतो. म्हणून प्रत्येक दूध उत्पादकाने दुधातील या घटकांचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.   दुधाला दिला जाणारा दर हा त्यातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर घनघटक) यांच्या प्रमाणानुसार दिला जातो. त्यामुळे दुधात या घटकांचे प्रमाण जितके अधिक तितका दुधाला जास्त दर मिळतो. दुधातील घटक

  • दूध हे पाणी व घनघटक यापासून बनलेले असते. गायीच्या दुधात साधारणत: ८७ टक्के पाणी व १३ टक्के घनघटक असतात.
  • घन घटकामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण साधारणत: ३.५ ते ४ टक्के असते व उर्वरित ८.५ ते ९ टक्के स्निग्धेतर घनघटक असतात.
  • स्निग्धेतर घनघटकामध्ये प्रथिने, दुग्धशर्करा (लॅक्टोज), खनिजे व जीवनसत्वे यांचा समावेश असतो. जनावराला जो आहार दिला जातो त्याचे पचनसंस्थेत पचन होते. त्यातील घटक रक्तात शोषले जातात.
  • रक्त कासेतून फिरत असताना कासेतील पेशी दूध निर्मितीसाठी आवश्यक घटक रक्तातून घेतात व दुधाची निर्मिती करतात. त्यामुळे जनावरास ज्या दर्जाचा आहार दिला जातो, त्यानुसार उत्पादित दुधातील घटकांचे प्रमाण अवलंबून असते. त्याचबरोबर आहारातील घटक व त्यांचे प्रमाण, आहार देण्याची पद्धत, आहाराचे पचन, जनावराचे शारीरिक व मानसिक आरोग्य, वातावरण, ऋतू, गोठा, धारा काढण्याची पद्धत, गाभण जनावरांचे गाभण काळातील शेवटच्या दोन - तीन महिन्यातील व्यवस्थापन या बाबीसुद्धा दुधातील घटकांचे प्रमाण ठरविण्यास कारणीभूत असतात.
  • दुधातील फॅट व एसएनएफ वाढीसाठी उपाययोजना

  • वर्षातून चार वेळेस सर्व जनावरांचे जंतनिर्मूलन करावे, त्यामुळे पचलेले सर्व अन्नघटक जनावरास उपलब्ध होतील
  • जनावरांना रोज संतुलित आहार द्यावा.
  • ४०० किलो वजनाच्या दुभत्या गायीस एका दिवसाला २० ते २५ किलो हिरवी एकदल वैरण किंवा मुरघास (उदा. मका, संकरीत नेपिअर, कडवळ, बाजरी, न्युट्रीफीड, शुगरग्रेझ), ७ ते १० किलो हिरवी द्विदल वैरण (उदा. घास, बरसीम, शेवरी, चवळी) व ४ ते ५ किलो वाळलेळी वैंरण सकाळी व संध्याकाळी द्यावी. एकदल वैरणीचा मुरघास केल्यास अधिक फायदेशीर असतो.
  • दूध उत्पादनाच्या प्रमाणात पशुखाद्य कोरडे द्यावे (१ लिटर दुधासाठी ३०० ते ४०० ग्रॅम)
  • दूध उत्पादनाच्या प्रमाणात खनिज मिश्रण द्यावे (१० लिटर दुधासाठी ५० ग्रॅम व त्यापुढील प्रत्येक लिटरसाठी ५ ग्रॅम)
  • हिरवी व वाळलेली वैरण कुट्टी करून एकत्र द्यावी. वाळलेल्या वैरणीमुळे हिरव्या वैरणीचे पचन व्यवस्थित होते व दुधाची गुणवत्ता सुधारते
  • पुरेशी वैरण दिवसातून दोनदा (सकाळी व संध्याकाळी) गव्हाणीत द्यावी म्हणजे मधल्या काळात जनावरास रवंथ करण्यास पुरेसा वेळ मिळेल व अन्नपचन चांगले होईल.
  • कोरडा चारा उपलब्ध नसल्यास हिरवी वैरण कापल्यानंतर सुकवावी व दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी खाऊ घालावी म्हणजे तिच्यातील पाण्याचे प्रमाण कमी होईल
  • धारा काढण्याच्या वेळेस सुरवातीला वासराला दूध पाजावे किंवा शक्यतो संपूर्ण दूध काढल्यानंतर भांड्यात दूध पाजावे.
  • कासेतील सुरवातीच्या दुधात फॅट कमी (१ टक्के) व शेवटच्या दुधात फॅट जास्त (१० टक्के) असते
  • धारा काढण्याच्या वेळेत सारखे अंतर असावे (उदा. सकाळी ६.०० वाजता व सायंकाळी ६.०० वाजता)
  • प्रसूतीनंतर प्रथम चार महिन्यांच्या कालावधीत दहा लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गायीला बायपास फॅट १०० ग्रॅम प्रतिदिन खाऊ घालावे.
  • अॅसिडॉसीसवर उपाय म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने खायचा सोडा व यीस्ट कल्चर द्यावे.
  • पिण्यासाठी योग्य व स्वच्छ पाण्याची २४ तास सोय करावी.
  • वेळापत्रकानुसार जनावराचे विविध आजारांविरुद्ध लसीकरण करावे.
  • गोठामुक्त संचार पद्धतीचा असाव.
  • उन्हाळ्यात गोठ्यात पंखे व फॉगर लावून तापमान कमी करावे.
  • हिवाळ्यात थंड वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या कडेने शेडनेट लावावे.
  • शेड हवेशीर असावे व छताची उंची किमान ८ फूट असावी.
  • जनावरे आनंदी राहतील अशी काळजी घ्यावी.
  • गाभण, आटलेल्या गायीला रोज ५० ग्रॅम खनिज मिश्रण व दीड ते दोन किलो पशुखाद्द्य द्यावे.
  • ज्या गायीच्या दुधात फॅट/ एसएनएफ चे प्रमाण कमी आहे अशा गायीपासून पैदास करतांना अधिक फॅट / एसएनएफ चे गुण असलेल्या वळूच्या रेतमात्रेचा वापर करून कृत्रिम रेतन करावे त्यामुळे पुढच्या पिढीतील जनावरांच्या दुधात फॅट / एसएनएफचे प्रमाण वाढेल.
  • संपर्क ः डॉ. भाऊसाहेब गुंड, ९८२२२७०७६१ (प्रशिक्षण केंद्र प्रमुख, प्रभात डेअरी लि., श्रीरामपूर, जि. नगर)    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com