रेबीज रोगाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज

जनावरांचे वेळेवर लसीकरण करून रेबीज रोगावर पूर्णपणे नियंत्रण अाणता येते.
जनावरांचे वेळेवर लसीकरण करून रेबीज रोगावर पूर्णपणे नियंत्रण अाणता येते.

पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे होणारा रेबीज या रोगाकडे इतर विषाणूजन्य रोगाप्रमाणे एवढे गांभीर्याने पाहिले जात नाही. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मानवाचा किंवा पशूचा जीव जाण्याची शक्यता जास्त असल्यामुळे या रोगाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तरच जागतिक आरोग्य संघटनेचे मिशन झीरो रेबीज ः २०३० हे उद्दीष्ट साध्य करणे शक्य होईल. लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम रेबीजच्या लसीचा शोध लावला. त्यांच्या स्मृतिपीत्यर्थ रेबीज रोगाचे मनुष्य व पशुमध्ये नियंत्रण व जागरूकता निर्माण करून समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो. जनावरांमध्ये प्रामुख्याने गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, घोडे आणि कुत्र्यांमध्ये पिसाळणे ही विकृती कुत्रा चावल्यामुळे होते. कुत्र्याचा कुत्र्यांना किंवा इतर पाळीव प्राण्यांना किंवा माणसाला चावा घेण्याला श्‍वानदंश म्हणता येईल. याच श्‍वानदंशामुळे रेबीज हा विषाणूजन्य आजार होतो. रोगाची कारणे 

  • हा रोग लायसाया विषाणूमुळे होतो.
  • श्वानांचे १०० टक्के लसीकरण करून बचाव करता येणारा हा रोग प्रामुख्याने पिसाळलेल्या जनावराने चावा घेतल्यास, ओरखडल्यास किवा त्यांच्या लाळेचा व आपल्या उघड्या जखमेचा संपर्क आल्यास होतो.
  • वटवाघुळाच्या शरीरामध्ये सुद्धा हे विषाणू आढळतात, म्हणून वटवाघूळ चावल्यामुळेसुद्धा रेबीज होऊ शकतो .
  • रेबीजची लागण झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून व उघड्या जखमेचा, कापलेले बोट ई. चा लाळेशी संपर्क आल्यास रेबीजचा प्रसार होतो.
  • रेबीज होतो कसा? 

  • पिसाळलेले जनावर चावल्यास त्याच्या लाळेद्वारे विषाणू जनावरांच्या मांसपेशीत प्रवेश करून तेथे त्यांची वाढ होते व मज्जातंतूद्वारे शरीरभर पसरतात.
  • पिसाळलेले जनावर प्राणी किवा मनुष्य ह्यांना मेंदूच्या अंतरापासून शरीरावर कुठे चावा घेते, त्यानुसार रेबीज विषाणू चा प्रसार कालावधी अवलंबून असतो.
  • हात किवा पाय यांच्या तुलनेत मानेजवळ अथवा डोक्याला (मेंदूजवळ) चावा घेतल्यास विषाणूचा प्रसार झपाट्याने होतो व रेबीजची लक्षणे दिसू लागतात .
  • मांसपेशीतील मज्जातंतूंमध्ये विषाणू त्यांची संख्या वाढवून मेंदूमध्ये दाह निर्माण करतात आणि लाळग्रंथी मध्ये पोचून लाळ दूषित करतात व असे जनावर दुसऱ्या पशूना अथवा मनुष्यास चावल्यास त्याला रेबीज रोगाचा प्रादुर्भाव होतो. जोपर्यंत पिसाळलेल्या जनावरांवर नियंत्रण येत नाही, तोपर्यंत असे प्रादुर्भावाचे चक्र चालूच राहते.
  • लागण झालेल्या पशूंच्या विविध प्रकारच्या मांसपेशी सैल बनतात उदा. श्‍वसनसंस्थेच्या व जबड्याच्या मांसपेशी सैल झाल्यामुळे जनावरास श्‍वास घेण्यास अडथळा होतो व पाणी पिण्यास असमर्थ होऊन जनावर दगावते.
  • लक्षणे श्वान व इतर जनावरांमध्ये रेबीजची लक्षणे विविध प्रकारांत आढळून येतात.

  • जनावर आक्रमक होते किंवा मंद बनते. श्वान बऱ्याचदा धावत सुटतात व दिसेल त्या पशू व मनुष्यास चावा घेण्याचा प्रयत्न करते.
  • जबड्याच्या स्नायूंना पक्षाघात झाल्यामुळे जबडा बंद करता येत नाही, त्यामुळे जास्त प्रमाणात संसर्गित लाळ गळते.
  • श्वान भूंकण्याचा प्रयत्न करते, पण आवाज बसका व व्यथित रडल्यासारखा येतो, अशावेळी अंधाराचा व अडचणीच्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करते.
  • मेंदू व चेतासंस्थेवर झालेल्या परिणामामुळे जनावरांमध्ये खुंट्या भोवती गोल गोल फिरने, झाडावर किंवा भिंतीवर डोके आपटण्याची लक्षणे दिसून येतात.
  • जनावर आपल्या मालकास ओळख दाखवत नाही व आवाजास प्रतिसाद देत नाही.
  • गळ्याच्या आणि जबड्याच्या मांसपेशी सैल पडल्याने तहान लागूनसुद्धा जनावर पाणी पिण्यास असमर्थ बनते व पाण्याला घाबरते म्हणून यास जलटंका किंवा जलद्वेष असेही म्हणतात.
  • जनावर लाकूड, खडे खाण्याचा प्रयत्न करते व निर्जीव वस्तूंवर किंवा माणसांवर धावून येते.
  • जनावर सतत हंबरते, कान टवकारते व उधळण्याचा प्रयत्न करते.
  • श्वासोच्छवासाला मदत करणारे स्नायू लुळे पडल्यामुळे श्वासोच्छवास बंद पडून जनावर दगावते.
  • प्रतिबंधात्मक उपाय प्रतिबंधात्मक लसीकरण करणे हाच उत्तम पर्याय आहे

  • कोणताही कुत्रा चावल्यास खबरदारी म्हणून लगेच प्रतिबंधात्मक उपाय करावेत. 
  • चावा घेतलेली जखम धावत्या/नळाच्या पाण्यात साबणाने स्वच्छ धुवावी. 
  • जखमेवर संसर्ग टाळण्यासाठी हळद किंवा आयोडीन लावावे.
  • जखमेवर पट्टी बांधू नये व जखमेस टाके मारू नये .
  • रेबीज प्रतिबंधात्मक लस पशूंना कुत्रा चावलेल्या दिवशी, तिसऱ्या, सातव्या, चौदाव्या, अठ्ठावीसाव्या व नव्वदाव्या दिवशी पशुवैद्यकाकडून तर मनुष्यास नजीकच्या सरकारी दवाखान्यात नेवून टोचून घ्यावी.
  • घ्यावयाची काळजी

  • कुत्रा चावलेल्या जनावरांवर १०-१२ दिवस लक्ष ठेवावे.
  • संशयित अथवा रेबीज झालेले जनावर इतर जनावरांपासून वेगळे बांधावे.
  • संसर्गित जनावरांचा चारा, पाणी वेगळे ठेवावे.
  • संसर्गित जनावरांच्या नैसर्गिक स्रावांच्या (लाळ, लघवी, डोळ्यातील पाणी) संपर्कात स्वतः आणि इतर जनावरांना येऊ देऊ नये
  • दगावलेल्या जनावराचे मल-मूत्र, चारा, पाणी यांची योग्य ती विल्हेवाट लावावी.
  • पाळीव कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधात्मक लस वयाचे ३ महिने होताच टोचून घ्यावी व वार्षिक डोस निर्धारित तारखेत द्यावा.
  • रेबीज रोगाचे नियंत्रण व उच्चाटन : भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर अटकाव आणण्यासाठी त्यांची नसबंदी करणे आवश्यक आहे. शाळा व महाविद्यालयात जाऊन रेबीज रोग, लसीकरण व त्याबद्दल उपाय योजनाची जागरूकता निर्माण करणे.

  • पाळीव प्राण्यांचे लसीकरण वेळेवर करून रेबीज रोगावर पूर्णपणे नियंत्रण अाणता येते.
  • पाळीव प्राण्यांची स्थानिक प्रशासन संस्थेमध्ये नोंदणी करून त्याचे लायसंस (पाळीव परवाना) काढून घ्यावा.
  • संपर्क ः डॉ. शिवकुमार यंकम, ७७०९३९७०१७ (पशू विज्ञान व पशू संवर्धन विस्तार शिक्षण विभाग, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाणा)    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com