जनावरांच्या दातांचे आजार अन् उपचार

दातांच्या अनियमित झिजेमुळे जबड्यामध्ये चारा जमा होऊन फुगलेले गाल.
दातांच्या अनियमित झिजेमुळे जबड्यामध्ये चारा जमा होऊन फुगलेले गाल.

जनावरांची निवड करताना किंवा खरेदी करताना कास, सड, दुधाची रक्तवाहिनी यांची पाहणी आपण नेहमी सूक्ष्म व काळजीपूर्वक करतो. परंतु, जनावराचे दात या गोष्टीला आपण दुय्यम स्थान देतो. दातांची पाहणी फक्त वयोमानाचा अंदाज लावण्यासाठी न करता आजारपण व रोगांच्या निदानासाठी करता येतो. म्हणून जनावरे विकत घेताना दात तपासून घेणे गरजेचे आहे. साधारणतः माणसांच्या दाताप्रमाणे जनावरांच्या दातांमध्ये पटाशीचे दात, उपदाढा, दाढा असे प्रकार असतात. तर रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये जसे गाय, म्हैस, शेळी मेंढी इ.मध्ये सुळे दात नसतात. वरच्या जबड्यात गाय वर्ग प्राण्यात दात नसतात त्याऐवजी कडक भाग असतो ज्याला डेंटल पॅड असे म्हणतात. दुधाचे दात अठराव्या महिन्यापासून पडण्याची सुरुवात होते. ती किमान पाच वर्षांपर्यंत सुरू राहते. पटाशीच्या मध्य दातापासून दात बदल व्हायला सुरुवात होते. पटाशीच्या दातांची पाहणी ओठ खाली ओढून आपण करू शकतो.

उपदाढा व दाढा यांचे निरीक्षण करण्यासाठी मुख्य करून लाकडी अथवा लोखंडी तोंड पाहण्यासाठी बनवलेले चिमटे किंवा ग्याग् (gag) वापरू शकता. खालच्या जबड्याच्या पटाशीचे दात व उपदाढामध्ये असलेल्या जागेत बोट घालून जबडा उघडणे शक्य आहे. पण, आपले बोट दातात सापडल्यास मोठी इजा होण्याची शक्यता जास्त असते. जनावरातील दातांचे आजार १) पटाशीच्या दातांची अतिरिक्त झीज होणे जनावर वाळू युक्त किंवा खडकाळ जमिनीवरील खुरट्या गवतावर सतत चरल्याने पटाशीच्या दातांची झीज होण्याची शक्यता असते. तसेच वयस्कर जनावरांमध्ये हा आजार दिसून येतो. अशा जनावरांना मोकळ्या कुरणावर चरताना खुरटे गवत खाताना त्रास होतो. परिणामी जनावरांची उत्पादन क्षमता कमी होऊ शकते. ही जनावरे उंच गवत, कडबा, मुरघास मात्र चांगल्या प्रकारे खाऊ शकतात. म्हणून अशा जनावरांना मोकळ्या रानात चरावयास सोडू नये. शक्य तेवढे कापून हिरवे गवत, कडबा घालावा जेणेकरून त्यांची उत्पादन क्षमता कायम राहील. २) दातांचा संसर्ग दाताचे व त्या सभोवतालच्या उतींना संसर्ग होऊन दात हालू लागतात किंवा पडू शकतात. संसर्गामुळे दाताचे मूळ ढिले पडतात व हालू लागतात. त्यामुळे त्या दाताच्या मुळांचा आकार मोठा दिसू लागतो. जनावराचे दूध घटते. अशा वेळी जनावरास मऊ लुसलुशीत गवत, मुरघास इ. खायला द्यावे. त्रासदायक असलेले दात पशुवैद्यकांच्या सल्ल्याने काढून घ्यावे, तसेच योग्य प्रतिजैवक वापरून संसर्गाकरिता उपचार करावे. ३) दाढांची अनियमित झीज गाय वर्ग जनावरास खालच्या आणि वरच्या जबड्यात प्रत्येकी तीन असे सहा जोड्या अशा बारा दाढा असतात, तर तेवढ्याच उपदाढा असतात. चारा गिळण्यापूर्वी चावणे व रवंथ करणे या मध्ये त्यांची अत्यंत गरज असते. त्यामुळे दातांची अनियमित झीज झाली असल्यास जनावरे चारा योग्य रीतीने खाऊ शकत नाहीत. तसेच तोंडामध्ये जखमा, अल्सर होऊ शकतात. जनावरे सतत लाळ गाळतात, खाताना चारा तोंडातून खाली पडतो. चारा दाढा व गालाच्यामध्ये साठवल्याने गाल फुगलेला दिसतो. हा जमा झालेला चारा काढल्या नंतरही चारा पुन्हा जमा होत राहतो. ही लक्षणे जरी चेहऱ्याच्या पक्षाघातासारखी दिसत असली, तरी हा चेहऱ्याचा पक्षाघात नाही ही शेतकरी बंधूंनी समजून घ्यावे. चेहऱ्याच्या पक्षाघातात गालाबरोबर कान खाली पडतात आणि ओठ एका बाजूस झुकतात. वयस्कर जनावरामध्ये हा प्रकार जास्त आढळतो; परंतु ८ ते ९ वर्षांच्या गायीं व म्हशींमध्येसुद्धा हा प्रकार आहे. उपचार म्हणून वाढलेल्या दातांच्या कडा पशुवैद्यक यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाने कानशीने गालाला इजा होणार नाही, अशा घासून घ्याव्यात. तोंडामध्ये झालेल्या जखमांना ग्लिसरीन लावावे. तसेच वयस्कर जनावरांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी. ४) जन्मजात जबड्यातील दोष गुणसूत्रामुळे शरीराच्या वाढीच्या काळात जबड्याच्या काही भागांची वाढ होत नाही. त्यामुळे त्याचा आकार बदलून विचित्र आकार असलेला जबडा नवजात वासरामध्ये दिसून येतो. ५) पोपट तोंड यामध्ये वासराचा वरचा जबडा हा खालच्या जबड्यापेक्षा जास्त लांब असतो. त्याचा आकार हा पोपटाच्या चोची प्रमाणे दिसतो. ६) वराह तोंड यामध्ये जनावरचा खालचा जबडा हा वरच्या जबड्यापेक्षा लांब असतो. पटाशीचे दात वाढल्याने जनावरास चरावयास त्रास होतो. ७) अॅक्टिनोमायकोसीस अॅक्टिनोमायकोसीस बोवीस या जिवाणूमुळे हा आजार होतो. पक्के दात पडल्यानंतर किंवा तोंडात झालेल्या खोल जखमांमुळे हे जिवाणू प्रवेश करतात. यामुळे जबड्यास प्रचंड सूज येते. त्यानंतर जखमांमधून पू येण्यास सुरुवात होते. चारा खाताना तसेच रवंथ करताना जनावराला खूप त्रास होतो. या आजारामध्ये तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून उपचार घेतल्यास हा रोग बरा होतो. तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जखमेची शुश्रूषा करावी. ८) जबड्याचा/ दाताचा अस्थिभंग : जोराच्या धडकेने अथवा इतर कारणामुळे जोराचा आघात झाल्यास दाताचे किंवा जबड्याचा अस्थिभंग (फ्रॅकचर) होण्याची शक्यता असते. अशा वेळी येणारा रक्तस्राव थांबविण्याकरिता बर्फाने शेकवावे व त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. जबडा तुटला असल्यास शस्त्रक्रियेद्वारे उपचार शक्य आहे. फक्त दात तुटला असल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने उपचार करावेत. अशा जनावरास चारा चावण्यासाठी त्रास होऊ शकतो. त्यामुळे नरम चारा द्यावा. तसेच ‍शल्यचिकित्सा झाल्यास जखमांबरोबर आहाराची काळजी घ्यावी. संपर्क ः डॉ. सत्यवान अगिवले, ०९२२३५७६१९७ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर, जि. लातूर) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com