रोडे यांचे संत्र्याचे अत्याधुनिक क्लिनिंग, वॅक्सिंग, ग्रेडिंग युनिट

निलेश रोडे यांचे संत्रा ग्रेडिंग युनीट
निलेश रोडे यांचे संत्रा ग्रेडिंग युनीट

दर्जेदार संत्रा उत्पादनासोबतच संत्र्याचे ग्रेडिंग, व्हॅक्सिन आणि पॅकिंग युनिटची उभारणी करून संत्रा उत्पादकांना जादा दर मिळवून देण्यासाठी सालबर्डी (ता. मोर्शी, जि. अमरावती) येथील नीलेश व शैलेश या रोडे बंधूंनी उच्च तंत्रज्ञानावर आधारीत संत्र्याचे क्लिनिंग, वॅक्सिंग व ग्रेडिंग करणारे अत्याधुनिक युनिट उभारले आहे. प्रति तास सहा टन संत्र्यावर या अनुषंगाने प्रक्रिया होते. रोडे बंधू स्वतःकडील संत्रा उत्पादनासह सुमारे एक हजार शेतकऱ्यांकडून संत्रा घेतात. त्याद्वारे मूल्यवर्धित झालेल्या या संत्र्याने किलोला ५ ते ७ रुपये अधिक दर मिळवीत सुपर मार्केटस व बांगलादेशात बाजारपेठ तयार केली आहे.   महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर असलेले सालबर्डी सातपुडा पर्वतरांगांत वसले आहे. या भागातील जमीन संत्रा शेतीसाठी प्रसिद्ध आहे. येथील फळांचा रंग आणि दर्जाही उत्कृष्ट असतो. याच शिवारात नीलेश रोडे यांची सुमारे २५ एकर शेती आहे. त्यांचे वडील सुरेशराव हरिभाऊ रोडे यांनी ३० वर्षांपूर्वी पाच एकर शेती खरेदी केली. त्यात संत्रा लागवड करण्यात आली होती. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी टप्प्याटप्प्याने शेतीचा विस्तार केला. वडिलांच्या निधनानंतर नीलेश व शैलेश या बंधूंनी शेतीचे व्यवस्थापन पाहण्यास सुरवात केली. संत्रा बागेचे सेंद्रिय व्यवस्थापन रोडे यांची नागपुरी संत्र्याची सुमारे २८०० झाडे आहेत. बागेचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करण्यावर त्यांचा भर असतो. जीवामृत, शेणखत, निंबोळी व एरंडी ढेप या घटकांचा वापर केला जातो. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली आहे. फळांची गुणवत्ताही सुधारली आहे. प्रक्रिया उद्योग प्रसिद्ध नागपुरी संत्र्याची टिकवण क्षमता तशी कमी म्हणजे साधारण परिस्थितीत सात ते आठ दिवसच आहे. संत्र्यावरील साल पातळ असल्याच्या परिणामी हे घडते. त्यामुळे राज्याच्या अन्य भागात हा संत्रा पाठविताना किंवा निर्यात करताना मर्यादा येतात. संत्रा फळांवर वॅक्सिंग केल्यास त्याची टिकवण क्षमता व चमकदारपणा वाढू शकतो, असे नीलेश सांगतात. मोर्शीचा परिसर संत्रा उत्पादनात प्रसिद्ध असला तरी या भागात त्यावर प्रक्रिया करणारे युनीट उभारले गेलेले नव्हते. रोडे बंधूंनी ही उणीव दूर केली. त्याकरीता जुनी यंत्रणा एका शेतकऱ्याकडून खरेदी केली. या युनिटकरिता ९० बाय ४५ फूट आकाराचे शेड उभारण्यात आले. त्यासाठी २७ लाख रुपयांचा खर्च आला. तालुक्‍यातील खासगी तत्त्वावरील हे पहिलेच युनिट असावे. शेतकऱ्यांना उपलब्ध केली बाजारपेठ सालबर्डी परिसरातील शेतकऱ्यांद्वारे संत्रा थेट व्यापाऱ्यांना विकण्यात यायचा. वॅक्सिंग, ग्रेडिंगसारखी प्रक्रिया त्यावर होत नसे. या प्रक्रियेत दरही समाधानकारक मिळत नसत. मार्केटमध्ये ३० रुपये प्रति किलो दर असेल त्या वेळी सात ते दहा रुपये किलोने व्यापारी खरेदी करायचे. अशा शेतकऱ्यांसाठी रोडे यांचे युनिट महत्त्वाचे ठरले. आता त्यापुढे जाऊन रोडे यांनी नवे अत्याधुनिक युनिट स्थापन केले आहे. त्याचाही शेतकऱ्यांना फायदा होतो आहे. असे आहे अत्याधुनिक युनिट

  • एकूण प्रकल्प परिसर- जुना व नवा मिळून- १६ हजार चौरस फूट
  • सुमारे एक हजार शेतकऱ्यांसोबत संत्रा घेण्यासाठीचे नेटवर्क.
  • स्वतःकडील संत्र्याचेही होते मूल्यवर्धन.
  • या प्रक्रियेच होते क्लिनिंग, वॅक्सिंग व ग्रेडिंग व पॅकिंग.
  • आधीच्या उद्योगाची क्षमता प्रति तास तीन टन होती. आता ती सहा टन अशी आहे.
  • यात संगणकीय तंत्रज्ञानाची जोडही दिली आहे.
  • आधुनिक ऑप्टिकल सेन्सर यंत्रणा यात आहे. त्यामुळे फळांचा आकार ‘सेट’ केल्यानंतर त्याच आकाराची फळे यंत्रातून बाहेर पडतात. त्यामुळे मजुरांमार्फत वेगळ प्रतवारी करण्याची गरज भासत नाही. फळांचा एकसमान आकार असल्याने पॅकिंगदेखील सोपे होते.
  • नव्या युनिटसाठी प्रोजेक्ट कॉस्ट- सुमारे दोन ते अडीच कोटी.
  • पैकी एक कोटी रुपयांचे कर्ज. त्यासाठी स्वतःच्या तीन शॉपी व काही शेत गहाण ठेवले.
  • प्रक्रियेतील काही बाबी यंत्रातील ब्रशची स्वच्छता होते. त्यानंतर पाण्याचा फवारा मारला जातो. स्पंजच्या मदतीने फळ पुसण्यात येते. फॅनच्या मदतीने त्यावरील पाणी वाळविले जाते. त्यावर फूड ग्रेड वॅक्सचा वापर (कोटिंग) होतो. त्यानंतर संत्रा ग्रेडिंग युनिटमध्ये येतो. सध्या युनिटच्या ठिकाणी १४ कामगार आहेत. सोबतच पॅकिंगसाठी २२ कामगारांची आवश्‍यकता भासते. कोरूगेटेड बॉक्‍सऐवजी क्रेटचा वापर कोरूगेटेड बॉक्‍समध्ये तुलनेने फळ सडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले. हे नुकसान टाळण्यासाठी नीलेश प्लॅस्टिक क्रेटमध्येच पॅकिंग करतात. दहा किलोच्या कोरूगेटेड बॉक्‍ससाठी ३४ ते ३८ रुपयांचा खर्च होतो. क्रेटमध्ये २५ किलो संत्रा बसतो हा क्रेट १०० ते ११० रुपयांना मिळतो. त्यामुळे क्रेटचा पर्याय फायदेशीर ठरत असल्याचे नीलेश सांगतात. मूल्यवर्धनातून झाला फायदा नीलेश यांना मूल्यवर्धनाचा फायदा मिळू लागला आहे. किलोला ५ ते ७ रुपये दर अधिक मिळू लागला आहे. बराचसा माल विविध सुपर मार्केटला जातो व काही माल बांगलादेशात मध्यस्थांमार्फत जातो. सध्या किलोला २८ ते ३२ रुपये दर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आयात-निर्यात परवाना निनीलेश यांच्याकडे आहे. नव्या अद्ययावत प्रकल्पाच्या उभारणीनंतर या भागातील संत्र्याच्या निर्यातीसाठीदेखील प्रयत्न करण्याचा रोडे बंधूंचा मानस आहे. उभारली शेतकरी कंपनी रोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागपूर संत्रा या विषयाला केंद्रस्थानी ठेवून शेतकरी कंपनीही स्थापन केली आहे. त्याचा संत्रा उत्पादकांचा अधिक फायदा होणार असल्याचे नीलेश यांनी सांगितले. संपर्क- नीलेश रोडे- ९४२०७२१०१७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com