नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
यशोगाथा
निर्यातक्षम गुणवत्तेच्या पेरूचे उत्पादन
सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील कृषिभूषण मनोहर मारुती साळुंखे यांनी विविधांगी पीकपद्धती व बाजारपेठांचा अभ्यास याद्वारे आपली शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. मोठ्या आकाराच्या वजनी पेरूचे एकरी १० ते १२ टनांपर्यंत उत्पादन ते घेत आहेत. निर्यातक्षम पेरूची आखाती देशांत निर्यात होत असून, त्यायोगे चांगला दरही मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. उत्कृष्ट व्यवस्थापन, सातत्याने प्रयोगशीलता व प्रत्येक बाबीचा बारकाईने अभ्यास ही साळुंखे यांची वैशिष्ट्ये सांगता येतात.
सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील कृषिभूषण मनोहर मारुती साळुंखे यांनी विविधांगी पीकपद्धती व बाजारपेठांचा अभ्यास याद्वारे आपली शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. मोठ्या आकाराच्या वजनी पेरूचे एकरी १० ते १२ टनांपर्यंत उत्पादन ते घेत आहेत. निर्यातक्षम पेरूची आखाती देशांत निर्यात होत असून, त्यायोगे चांगला दरही मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. उत्कृष्ट व्यवस्थापन, सातत्याने प्रयोगशीलता व प्रत्येक बाबीचा बारकाईने अभ्यास ही साळुंखे यांची वैशिष्ट्ये सांगता येतात.
पुणे- बंगळूर महामार्गावर साताऱ्यापासून नजीक आले पिकातील नागठाणे हे प्रसिद्ध गाव आहे. अनेक पिकांत मास्टर असलेले गावातील कृषिभूषण मनोहर साळुंखे यांची राज्यभरात ओळख आहे. हलक्या व मध्यम स्वरूपाच्या १६ एकरांत आले, वांगी, पपई, टोमॅटो, हरितगृहामधील जरबेरा तसेच अन्य पिकांचे यशस्वी प्रयोग त्यांनी घडवले आहेत. बाजारपेठांची मागणी व बदलती शेती यांचा सखोल अभ्यास करून पीकपद्धतीत बदल हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
पेरूचा प्रयोग
साळुंखे यांची पूर्वी द्राक्षबाग होती. समाधानकारक उत्पादन मिळत होते. मात्र वातावरणामुळे अनेक समस्यांना समोरे जावे लागे. अखेर बाग काढणे भाग पडले. सविस्तर अभ्यासातून त्यांना पेरूचा पर्याय मिळाला. या पिकावर मग लक्ष केंद्रित केले. २०१३ मध्ये लागवडीचा श्रीगणेशा केला. उत्कृष्ट व्यवस्थापन, छाटणी, बहर व तंत्राची जोड देत हे पीक साळुंखे यांनी यशस्वीपणे टिकवले आहे.
पेरू शेतीतील ठळक बाबी
लागवड व्यवस्थापन टप्पा
- सुमारे एक किलो वजन होऊ शकणाऱ्या छत्तीसगड भागातील पेरू वाणाची लागवड.
- सोलापूर येथून प्रतिनग १४० रुपये दराने रोपे आणली.
- उत्पादनक्षम क्षेत्र- तीन एकर, नवी लागवड- सहा एकर
- लागवड अंतर- पाच बाय सव्वादोन मीटर, एकरी सुमारे ४०० झाडे
- रोपे लहान असताना आले, कोबी, फ्लॅावर आदी पिके घेत भांडवली खर्च कमी केला.
- लागवडीनंतर दोन वर्षांनी पहिला, त्यानंतर पुढील दोन वर्षांत तीन बहर घेतले.
- बहरावेळी सेंद्रिय खत, कंपोस्ट, पालापाचोळा यांचा गादीवाफ्यावर वापर.
- एका ओळीत ठिबकच्या तीन लॅटरल्स. त्याचे कारण म्हणजे साधारण तीन मीटर बेड आहे. एक लॅटरल साधारण एक मीटर कव्हर करते. एकसमान पाणी देणे हा मुख्य उद्देश.
- फुलोरा अवस्थेत मधमाश्या येण्याचा काळ. त्या वेळी फवारण्या टाळल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आल्याने परागीकरण झाले.
- झाडाचे आकारमान, वय यानुसार फळांची संख्या मर्यादित
- करपा, देवी, ब्लॅक स्पॉट या रोगांचे निरीक्षण आणि परीक्षण. प्रतिबंधक फवारणीवर भर
- छाटणी करताना कुशल मजूर तसेच दर्जेदार कातऱ्यांचा उपयोग
- शेती, घर असे मिळून १६ युनिटस सीसीटीव्ही वापर
- महावितरण कंपनीसोबत सौरऊर्जेसाठी करार करणार
- एकरी खर्च- (पेरू) साडेचार ते पाच लाख रु.
उत्पादन टप्पा
- सुरवातीच्या काळात एकरी सहा टन व बाग जशी मोठी होत गेली तसे हे उत्पादन ८, १० व सध्या १२ टनांपर्यंत पोचले आहे.
- साधारण एक चौरस फुटाला अर्धा किलो फळ असे नियोजन
मार्केट व दर टप्पा
- एकूण उत्पादनातील सुमारे ६० ते ७० टक्के उत्पादन- निर्यातक्षम
- व्यापाऱ्यांमार्फत आखाती देशांत निर्यात.
- त्याला किलोला १२० ते १३० रुपये दर
- पुणे, मुंबई व स्थानिक बाजारपेठात हाच मिळालेला दर- ६० ते ७० रुपये.
निर्यातीची गुणवत्ता
- पेरू लिंबूच्या आकाराचा झाल्यानंतर त्यास फोम आणि बॅगिंग. यामुळे फळमाशी, वटवाघूळ यांच्यापासून संरक्षण. फळांवर डागही पडत नाहीत, निर्यातीसाठी हा पेरू योग्य ठरतो.
- तोडणी करताना देठ ठेवण्यात येतो. यामुळे पाच ते आठ दिवस टिकणारा पेरू पंधरा दिवसांपर्यंत टिकू शकतो.
- फळांची तीन प्रकारांत प्रतवारी. त्यामुळेही उत्तम दर मिळण्यास मदत
- फळे व्यवस्थित राहण्यासाठी दहा किलो बॉक्स पॅकिंग
भाजीपाला पिकांसाठी कायमस्वरूपी स्ट्रक्चर
- भाजीपाला पिकांवरही कायम भर. यासाठी ५० गुंठ्यांत लोखंडाचे कायमस्वरूपी स्ट्रक्टर
- ‘व्ही’ आकाराच्या अँगलला दोन्ही बाजूस तीन तारा. यात दोन सरींत आठ फूट तर दोन अँगलमध्ये पाच फूट अंतर. त्यामुळे मशागत चांगली करता येते.
- या क्षेत्रात काकडी, कारले दोडका, टोमॅटो, वांगी ही पिके
- सध्या भरताच्या वांग्याचे उत्पादन सुरू आहे. दर चांगला असून, १५ किलो बॉक्स पॅकिंग करून पाठवले जात आहे.
साळुंखे यांची वैशिष्ट्ये
- शेतातील सर्व प्रकारची टिप्पणे ठेवतात. यामुळे कधी काय वापरले, जमा-खर्च, फायदा, व्यापारी यांची माहिती राहते.
- सातत्याने वाचन, इंटरनेटचा वापर.
- बाजारभाव व बाजारपेठा यांवर बारकारईने लक्ष. त्याद्वारे लागवडीचे नियोजन
- कोणत्याही एका पिकांवर विसंबून न राहाता विविध पिके घेतात. यामुळे आर्थिक जोखीन कमी होते.
- रासायनिक व सेंद्रिय शेतीचे ७-३० असे गुणोत्तर
सन्मान
- राज्य शासनाचा कै. वसंतराव नाईक कृषिभूषण
- गुजरात राज्य सरकारकडून श्रेष्ठ किसान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
- बंगळूर येथील कृषी विद्यापीठाचा प्रयोगशील शेतकरी, ‘आरसीएफ’चा प्रगतिशील शेतकरी, प्रीतिसंगम ज्ञान प्रबोधनी आदर्श शेतकरी, जिल्हास्तरीय सेवागिरी कृषिभूषण आदी पुरस्कारांनीही सन्मानित
- माजी राज्यपाल के. शंकरनारायण, कृषी सचिव, अधिकारी व असंख्य शेतकऱ्यांची भेट
सहकार्य
साळुंखे यांना पत्नी सौ. सुनीता, थोरले बंधू आप्पासाहेब, त्यांच्या पत्नी सौ. सुवर्णा, मुले व कुशल कामगारांची मोठी मदत. कृषी विभाग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचेही मोलाचे सहकार्य.
संपर्क- मनोहर साळुंखे - ९८२२६०३०७५
फोटो गॅलरी
- 1 of 91
- ››