खानदेशातील आवार प्रगतीवर स्वार

आवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी ओळखले जाणारे गाव आहे. गावाच्या विकासासाठी व ग्रामस्थांच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. पद्धतशीर सामूहिक नियोजनातून कोविडच्या दुसऱ्या लाटेला रोखल्याने दुसऱ्या लाटेत गावात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही.
आवार गावात ठिबकच्या साह्याने जोमात वाढलेले कापूस पीक.
आवार गावात ठिबकच्या साह्याने जोमात वाढलेले कापूस पीक.

आवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी ओळखले जाणारे गाव आहे. गावाच्या विकासासाठी व ग्रामस्थांच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. पद्धतशीर सामूहिक नियोजनातून कोविडच्या दुसऱ्या लाटेला रोखल्याने दुसऱ्या लाटेत गावात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही.   आवार (ता. जि. जळगाव) हे तापी नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. गाव शिवारात काळी कसदार जमीन पाहण्यास मिळते. लोकसंख्या सुमारे ७५० पर्यंत आहे. पूर्वहंगामी कापसाखाली गावात २४५ हेक्टरपैकी ८० टक्के क्षेत्र असते. उर्वरित क्षेत्रात सोयाबीन असते. सुमारे २० ते २५ हेक्टर क्षेत्र दादर ज्वारी जोमात यावी यासाठी खरिपात नापेर ठेवले जाते. कापसाची डिसेंबरमध्ये काढणी झाल्यानंतर रब्बीत दादर ज्वारी, गहू व मका आदी पिके घेण्यात येतात. रब्बीत ज्वारीखाली क्षेत्र अधिक असते. त्याचे एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन शेतकरी घेतात. कापसाची एकरी उत्पादकता नऊ क्विंटल आहे. अतिवृष्टीत मात्र पिकाची हानी गेली दोन वर्षे झाली आहे. हलक्या, उताराच्या जमिनीतही कापसाची ठिबकवर लागवड करून चांगले उत्पादन शेतकरी साध्य करतात. कापूस, ज्वारी यांची व्यापारी थेट गावात येऊन खरेदी करतात. कापसाला गेली दोन वर्षे सरासरी पाच हजार रुपये, तर दादर ज्वारीला सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. शेतकरी व महिला गट सक्रिय गावात ११ महिला गट सक्रिय आहेत. एक गट गावात स्वस्त धान्य वितरण दुकान चालवितो. काही शेळीपालन करतात. सप्तशृंगी शेतकरी गट दरवर्षी रब्बीमध्ये सुमारे पाच ते आठ हेक्टरमध्ये ओवा पीक घेतो. हे मसाला पीक गावात अनेक वर्षे शेतकरी घेत आहेत. एकरी दोन ते अडीच क्विंटल त्याचे उत्पादन मिळते. विक्री थेट जागेवर किंवा गावातच केली जाते. दोन वर्षांपासून प्रतिक्विंटल ११ हजार रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. राजेंद्र हरी चौधरी, सतीश राजाराम चौधरी, शंकर वना चौधरी, आनंदा सुखराम चौधरी, गलू सीताराम चौधरी आदी शेतकरीही गटांद्वारे सक्रिय आहेत. ते रब्बीत बीजोत्पादनही करतात. कृषी सहायक भारत पाटील शेतकऱ्यांना जमीन सुपीकतेसह विविध योजना, माहिती यांबाबत मार्गदर्शन करीत असतात. जमीन सुपीकता निर्देशांक व अन्य बाबींबाबत ग्रामपंचायतीत फलक लावला आहे. पर्यावरणपूरक ग्रामपंचायत गावात ग्रामपंचायतीची इमारत कमकुवत झाल्याने मुख्य चौकात गावचावडीमध्ये ग्रामपंचायत सुरू करण्यात आली. या इमारतीची दुरुस्ती झाली. सन १९६० च्या दशकातील लाकूड, चुना व माती यांचा वापर करून इमारत उभारली आहे. तिची व्यवस्थित देखभाल केली जाते. ही पर्यावरणपूरक टुमदार इमारत लक्ष वेधून घेते. गावातील उपक्रम गाव तापी नदीकाठी असल्याने पाण्याची समस्या नाही. प्रत्येक घरात नळाला तोटी बसवून पाण्याचा अपव्यय टाळण्यावर भर दिला आहे. ८० टक्के रस्ते व चौकांचे काँक्रिटीकरण झाले आहे. गाव हागणदरीमुक्त आहे. सार्वजनिक शौचालयांचा वापर केला जातो. महिलांसाठी आणखी सार्वजनिक शौचालयांची मागणी करण्यात आली आहे. दारूबंदीची १०० टक्के अंमलबजावणी केली जाते. युवकांसाठी व्यायामशाळेची उभारणी करण्याचा प्रयत्न आहे. गेली ५९ वर्षे राम मंदिर महोत्सव, महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला जातो. कोविड संकटामुळे कार्यक्रम गेल्या वर्षी झाला नाही. ज्येष्ठांचा सत्कार गावातील १०० टक्के ज्येष्ठांना (गरजू) निराधार निवृत्ती वेतन योजनेतून लाभ मिळवून देण्यात आला. प्रति महिना एक हजार रुपये वेतन त्यांना मिळते. कुठलाही शेतजमीन, निवडणुकांचा वाद गावात नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या हस्ते ज्येष्ठांचा सत्कार झाला. त्यासाठी तत्कालीन सरपंच राजेंद्र चौधरी यांनी पुढाकार घेतला. एका राष्ट्रीयीकृत बँकेने गावाला दत्तक घेतले असून, आर्थिक सुविधा, मार्गदर्शन गावातच उपलब्ध करून दिले. जळगाव जिल्हा बँक, जळगाव तालुका फळे व भाजीपाला संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणी आवारच्या ग्रामस्थांनी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. गावातील तीन युवक शिक्षण व नोकरीनिमित्त युरोपीय देशांत स्थलांतरित झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेची सुसज्ज इमारत आहे. त्यात ‘आरओ’ पाण्याची व्यवस्था आहे. आदर्श अंगणवाडी आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत बचाव कोविडच्या पहिल्या लाटेत गावातील काही कुटुंबांतील सदस्य आजारी पडले. त्यांना खासगी रुग्णालयांत उपचार घ्यावे लागले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने दुसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी आशा स्वयंसेविकांच्या साह्याने जनजागृती सुरू केली. कोविडच्या नियमांचे पालन गावचावडीसह मुख्य चौकापर्यंत केले जाईल याकडे सतत लक्ष दिले. गावातील ज्येष्ठांनीही सहकार्य केले. लसीकरणात सुरुवातीपासून सहभाग घेतला. ज्येष्ठांमध्ये ६० टक्के मंडळीचे लसीकरण पूर्ण झाले आहे. युवकही त्यासाठी पुढे येत आहेत. परिणामी, गावात दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण आढळला नाही. गाव लहान असल्याने कोविडसंबंधीचे नियोजन यशस्वी झाल्याचे ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी सांगतात. धामणगाव (ता. जळगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने लसीकरणासंबंधी मदत केली. तसेच जनजागृतीत हातभार लावला. मास्क व सॅनिटायझर वाटपही शक्य त्या वेळी करण्यात आले. बाहेरून येण्यासाठी लोकांना काही दिवस बंदी करण्यात आली. लग्नसमारंभ स्थगित करण्यात आले. कोविडसंबंधीच्या तपासणीलाही ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. प्रतिक्रिया गावाने शेतीच्या विकासासाठी सतत नवे प्रयोग केले. कापूस उत्पादनात गाव आघाडीवर आहे. गावाला तापी नदीच्या पुराचा धोका असतो. तो कमी करण्यासाठी प्रशासनाने मदत करण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीची नवी इमारत, सांडपाणी साठवणुकीसाठी कृत्रीम तलावही तयार करायचा आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सहकार्याची गरज आहे. - गोकूळ सपकाळे, ९६३७०७९०१० सरपंच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com