योग्य व्यवस्थापनातून कमी होते मिथेन वायूचे प्रमाण

जनावरांना दिला जाणारा चारा कोणत्या प्रतीचा अाहे यावरही मिथेन वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण ठरते.
जनावरांना दिला जाणारा चारा कोणत्या प्रतीचा अाहे यावरही मिथेन वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण ठरते.

जनावरे खाल्लेला चारा रवंथ करतात. खाद्य खाताना रवंथ करणारी जनावरे तोंडावाटे आणि शेणाबरोबर मिथेन वायू बाहेर सोडतात. जागतिक स्तरावर १/३ मिथेन वायू प्राण्यांद्वारे वातावरणात सोडला जातो. रवंथ करणाऱ्या जनावरांपासून होणारे मिथेन वायूचे उत्सर्जन कमी केले जाऊ शकते.   औद्योगीकरणात वाढ झाल्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड तसेच इतर दूषित वायूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत अाहे, त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. मिथेन वायूचा वातावरणावर होणारा परिणाम हा कार्बन डायऑक्साइड वायूमुळे होणाऱ्या परिणामांपेक्षा खूप जास्त असतो. कार्बन डायऑक्साइड अाणि मिथेन वायू सूर्यकिरणांचे शोषण करून तापमान वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत अाहे. पाळीव प्राण्यांद्वारे मिथेन वायूचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते. भारतात गायी, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे त्यांच्यापासून उत्सर्जित होणाऱ्या मिथेन वायूचे प्रमाणही जास्त आहे.   जनावरांनी खाल्लेल्या चाऱ्याच्या पचनादरम्यान मिथेन वायूची निर्मिती होते. जनावरांच्या तोंडावाटे अाणि शेणावाटे बाहेर पडणारा मिथेन वायू एक महत्त्वाचा ऊर्जा स्राेत असून कार्बन डायअाॅक्साईड, नायट्रस ऑक्साईड, यासारखाच एक हरितगृहातील वायू आहे. ज्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत अाहे. कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेत २१ पट जास्त शक्तीने मिथेन वायू सूर्यापासूनच्या उष्णतेला धरून ठेवतो व जागतिक तापमान वाढीस मदत करतो. मिथेन हा ज्वलनशील, पाण्यावर तरंगणारा अाणि जळल्यानंतर विषारी घटक सोडणारा वायू असून वातावरणामध्ये ९-१५ वर्षे राहू शकतो. भारतात एकूण मिथेनचे उत्पादन १) शेती ः ६०-१०० टेराग्रॅम/वर्ष  २) रवंथ करणारी जनावरे ः ८० टेराग्रॅम/वर्ष ३) बायोमासचे ज्वलन ः ४० टेराग्रॅम/वर्ष  ४) जनावरांच्या उत्सर्जित पदार्थांपासून ः २५ टेरा ग्रॅम /वर्ष  रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये मिथेनची निर्मिती

  •  मिथेन हा रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटामध्ये (रुमेन) आंबावण्याच्या प्रक्रियेने एक दुय्यम उत्पादन म्हणून तयार होतो.
  • मिथेनॉजेनिक बॅक्टेरिया (जिवाणू) व प्रोटोझोआ हे  पोटामध्ये तयार होणाऱ्या हायड्रोजनचे रूपांतर मिथेनमध्ये करतात.  
  • मिथेन हा आंबावण्याच्या प्रक्रियेत तयार होणारा शेवटचा पदार्थ आहे.
  • जनावराच्या रुमेनमध्ये सुमारे ६५ टक्के कार्बन डायऑक्साइड व २५-२७ टक्के मिथेन तयार होतो.एकूण ऊर्जेच्या ८-१० टक्के ऊर्जा ही मिथेन वायुच्या रूपात वाया जाते.
  • प्रत्येक १०० ग्रॅम कार्बोहायड्रेट (ऊर्जा) पासून प्रत्येकी ४.५ ग्रॅम मिथेन तयार होतो. यामध्ये गायी- २५० लीटर/दिवस, म्हैस- २५० लीटर / दिवस, मेंढी- ४० लीटर / दिवस, शेळी- ३० लीटर / दिवस मिथेन वायू तयार करतात.
  • मिथेनॉजेनिक सूक्ष्मजीव हे सेल्युलोजवर अवलंबून असतात. पोटामध्ये (रुमेन) तयार होणाऱ्या प्रोपीओनीक ॲसिड व मिथेनचे प्रमाण हे एकमेकांच्या विरोधी असते. म्हणजेच जर मिथेनचे प्रमाण जास्त असेल तर प्रोपीओनीक ॲसिडचे प्रमाण कमी असते व मिथेनचे प्रमाण कमी असेल तर प्रोपीओनीक ॲसिडचे प्रमाण जास्त असते.
  • मिथेन वायूनिर्मितीसाठी कारणीभूत घटक

  • जनावरांच्या आहारात जेवढे जास्त तंतुमय (फायबरयुक्त) पदार्थ तेवढ्या जास्त प्रमाणात मिथेन वायूची निर्मिती होते. कारण, फेरमंटेशनसाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे मिथेनची निर्मितीही जास्त होते.
  • द्विदल वनस्पतींपासून कमी प्रमाणात तर एकदल वनस्पतींपासून जास्त प्रमाणात मिथेन तयार होतो. पशुखाद्यामुळे प्रोपीओनीक ॲसिड वाढते त्यामुळे मिथेनची निर्मिती कमी होते. कुट्टी केलेल्या चाऱ्यातूनही मिथेनचे कमी प्रमाणात उत्सर्जन होते.
  • जसे जनावरांचे वय वाढत जाते तसा मिथेन कमी तयार होतो.
  • संकरित व कमी दूध देणारी जनावरे जास्त मिथेन उत्सर्जित करतात. उन्हाळ्यात हिवाळ्यापेक्षा जास्त मिथेन तयार होतो.
  • मिथेन उत्सर्जनामुळे होणारे दुष्परिणाम  

  • कार्बन डायऑक्साईडपेक्षा २१ पटीने जास्त तापमान वाढवून जागतिक तापमान वाढीस मदत करतो.
  • महत्त्वाचा हरितगृहातील वायू असून ऑक्सिजनची जागा घेऊन त्याचे प्रमाण कमी करतो.
  • दूध उत्पादन कमी करतो.
  • त्वचेचा कॅन्सर होण्यास कारणीभूत आहे.
  • मानवी आरोग्यास घातक असून प्रतिकारशक्ती कमी करतो.
  • उपाययोजना

  • जनावरांना चारा कुट्टी करून द्यावा.
  • संकरितच्या जनावरांच्या तुलनेत देशी जनावरे कमी मिथेन तयार करतात.
  • शेणापासून बायोगॅस तयार करणे बायोगॅसपासून तयार होणाऱ्या वायूपासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. त्यामुळे इंधनाशिवाय वीजनिर्मिती करता येते.
  • जनावरांना दिला जाणारा चारा कोणत्या प्रतीचा अाहे यावरही मिथेन वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण ठरते. म्हणजे गव्हाच्या तुसापेक्षा बरसीम जास्त दिल्याने ५-४१ टक्क्यांपर्यंत मिथेनचे उत्सर्जन कमी होते. जनावरांच्या अाहारात द्विदल वनस्पतींचा समावेश केल्यानेही १५-२१ टक्क्याने मिथेनचे उत्सर्जन कमी होते.
  • संपर्क ः डॉ. अमोल आडभाई, ८८०५६६०९४३ (राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाणा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com