agriculture story in marathi, Milind Dubbewar has succeed in sapota farming | Agrowon

कष्टपूर्वक नियोजनबध्द विकसित केली चिकूबाग

माणिक रासवे
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

परभणी येथील मिलिंद डुब्बेवार यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून पडीक जमिनीत सुधारणा करत अठरा एकरांत नियोजनबद्ध चिकूबाग विकसित केली आहे. व्यवस्थापनासोबतच जमीन सुधारणा, यांत्रिकीकरणावर भर देत त्यांनी शेती कष्टपूर्वक किफायतशीर करण्याचा प्रयत्न केला आहे.

परभणी येथील मिलिंद डुब्बेवार यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून पडीक जमिनीत सुधारणा करत अठरा एकरांत नियोजनबद्ध चिकूबाग विकसित केली आहे. व्यवस्थापनासोबतच जमीन सुधारणा, यांत्रिकीकरणावर भर देत त्यांनी शेती कष्टपूर्वक किफायतशीर करण्याचा प्रयत्न केला आहे.
 ..
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर हे मिलिंद डुब्बेवार यांचे मूळ गाव आहे. मात्र ते परभणी येथे स्‍थायिक झाले आहेत. त्यांचे वडील दत्तात्रय भारतीय स्टेट बॅंकेच्या सेवेत होते. वाणिज्य शाखेची पदवी संपादन केल्यानंतर मिलिंद यांनी परभणी शहरात मंगल कार्यालय सुरु केले. मात्र शेतीची आवडही जोपासल्याने १९९९ मध्ये परभणी शहरापासून १५ किलोमीटरवरील पेडगाव शिवारात वीस एकर जमीन खरेदी केली. मित्र मंडळी, काही आप्तेष्टांना शेतीत गुंतवणूक करण्याचा हा निर्णय पसंत पडला नाही. तरीही मिलिंद यांचा आत्मविश्‍वास आणि उत्साह काही कमी झाला नाही.

शेतीचा विकास
पेडगाव लघु तलावाच्या परिसरात घेतलेली ही जमीन अनेक वर्षांपासून पडीक होती. झाडे- झुडपे वाढली होती मशागती करून ती लागवडयोग्य बनविली. जमिनीची मोजणी करून प्रत्येकी दोन एकरमध्ये दहा भागांत विभागणी केली. दोन एकर क्षेत्र आखाडा, शेतमाल साठवणुकीसाठी गोदाम, शेततळे यांसाठी राखीव ठेवले.

शेवगा शेतीचा पहिला प्रयोग
सुमारे ७५ फूट खोल विहीर खोदली. त्यास चांगले पाणी लागले. पहिल्या वर्षी (१९९९) पाच एकर ऊस, दहा एकरांत ८ बाय ८ फुटावर शेवगा (कोइमतूर वाण) लागवड केली. शेतीची चांगली देखभाल केल्यानंतर मिळालेल्या उत्पादनाची फळे- भाजीपाला मार्केटमध्ये विक्री केली. सरासरी २५ ते ४० रुपये प्रति किलो दर मिळून हंगामात चांगले उत्पन्न मिळाले. जमिनीत गुंतवलेले काहीसे भांडवल त्यातून निघण्यास मदत झाली. मग आत्मविश्वास वाढला. उत्साहात आणखीन भर पडली.

चिकू फळबाग

  • जोखीम कमी करण्याच्या दृष्टीने फळपिकांची लागवड करण्याचे निश्चित केले. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. परभणी येथील प्रयोगशाळेत माती परिक्षण करून घेतले.
  • अहवालानुसार चिंच, आंबा, चिकू यांची शिफारस करण्यात आली. मात्र बहुवार्षिक तसेच तुलनेने कमी खर्चात व कमी पाण्यावर किफायतशीर उत्पादन देणारे पीक म्हणून चिकूची निवड केली.
  • सन २००० च्या सुमारास कालीपत्ती जातीच्या चिकूची ३५० झाडे लावली. चार वर्षांनी दुसऱ्या टप्प्यात
  • १३ एकरांत ५५० झाडांची लागवड केली. आज एकूण १८ एकरांत चिकूची डेरेदार ९०० झाडे उभी असून पंधरा वर्षांपासून उत्पादन मिळत आहे.

व्यवस्थापन

  • बुरशीजन्य ठिपके, पाने गुंडाळणारी अळी यांच्या नियंत्रणासाठी नुकसान पातळी ओलांडण्यापूर्वी वेळीच शिफारशीनुसार व्यवस्थापन करण्यात येते.
  • दुपारी बारा वाजता पडणाऱ्या झाडाची सावली ते बुंध्यापासूनच्या अंतरावर खड्ड्यात नत्र, स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या शिफारशीत मात्रा अनुक्रमे जानेवारी आणि ऑगस्टमध्ये दिल्या जातात. आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्येही दिली जातात. त्यामुळे फळांचा दर्जा सुधारण्यास मदत होते. ठिबकद्वारे पाणी दिले जाते.

यांत्रिकीकरणावर भर
संपूर्ण क्षेत्र फळपिकांखाली आहे. त्यामुळे बैलजोडीचे काम राहिले नाही. पूर्वी आंतरमशागतीची कामे मजुरांकरवी करून घेत असत. आता केवळ दोन सालगडी आहेत. रोटरी टिलर, ब्रश कटर आदी अवजारांद्वारे बागेतील गवत काढून टाकण्यात येते. बुंध्याभोवतीची माती मोकळी केली जाते. मजुरीच्या खर्चात बचत केली आहे.

जमीन सुधारणा
बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी ठराविक अंतरावर घातलेल्या दोन बांधांमध्ये चर खोदले आहेत. त्यामुळे मातीचा सुपीक थर पावासाच्या प्रवाहात वाहून जात नाही. झाडाची पानगळ झाल्यानंतर जमिनीवर त्याचे आच्छादन तयार होते. रोटाव्हेटरव्दारे ही पाने जमिनीत गाडून टाकली जातात. शिवाय दोन ते चार वर्षांतून एकदा झाडांच्या दोन ओळींत धैंचा लागवड करून हिरवळीचे खत म्हणून उपयोग केला जातो. यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे. फळांची प्रत सुधारली आहे.

सिंचन स्रोतांचे बळकटीकरण
मंडळ कृषी अधिकारी संजय पामे, कृषी सहाय्यक प्रशांत देवकर, तत्कालीन मंडळ कृषी अधिकारी बी.एस.शिलार, के.एम. जाधव यांचे मार्गदर्शन मिळते. दुष्काळी वर्षांत उन्हाळ्यात विहिरींचे पाणी कमी झाल्यामुळे शेजारील शेतकऱ्यांकडील विहिरीचे पाणी विकत घेऊन फळबाग वाचविली होती. सिंचनाची जोखीम करण्यासाठी २०१६ मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत ५० लाख लिटर क्षमतेच्या शेततळ्याची उभारणी केली.

थेट शेतातून विक्री....
फेब्रुवारी ते मे या कालावधीत चिकूचा हंगाम असतो. संपूर्ण अठरा एकर बागेतून सरासरी ७५ ते ८० टन उत्पादन मिळते. परभणी येथील व्यापाऱ्यांशी दरवर्षी विक्रीचा करार केला जातो. यंदा प्रति किलो १३ रुपये दर मिळाला.

करवंदांचे कुंपण व अतिरिक्त उत्पन्न
संपूर्ण २० एकरांतील शेताच्या बांधांवर २०१६ मध्ये हिरव्या आणि गुलाबी करवंदाची लागवड केली.
त्यामुळे वन्य प्राण्यांपासून चिकूबागेचे संरक्षण होत आहे. जुलै, ऑगस्टमध्ये करवंदाचा हंगाम असतो.
गेल्यावर्षी ५० क्विंटल उत्पादन मिळाले. नागपूर, मुंबई, पुणे यासह अन्य राज्यातील बाजारपेठेत विक्री केली. त्यास २५ ते ३० रुपये प्रति किलो दर मिळाला. इंडिया मार्ट या संकेतस्थळावरील माहितीमुळे केरळातील ग्राहकांनी मागणी करून खरेदी केली. यंदा ८० क्विंटल उत्पादनाची हैदराबाद येथील मार्केटमध्ये विक्री केली. लॉकडाऊनमुळे प्रति किलो २० रुपये दर मिळाले.

संपर्क- मिलिंद डुब्बेवार-९४२२९२४९०


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
बिजोत्पादनातून ‘गौरीनंदन’ची उलाढाल...नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (ता. नेवासा) येथील...
पूरक व्यवसायातून स्वयंपूर्णतेचा धडादुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि परसबागेतील...
परसातील ‘ग्रामप्रिया’ कोंबडीपालन...औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील काही...
‘व्हर्जिन कोकोनट ऑइल’ अन सुकवलेली पावडरसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील अभिजित...
अभ्यासू, प्रयोगशील द्राक्षबागायतरांचे...महाराष्‍ट्रातील द्राक्ष बागायतदार अत्यंत...
कष्टपूर्वक नियोजनबध्द विकसित केली...परभणी येथील मिलिंद डुब्बेवार यांनी व्यावसायिक...
यांत्रिकीकरणातून होताहेत आदिवासी आर्थिक...पालघर जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी पाड्यांतील...
पंडागे कुटुंबाची भाजीपाला शेतीत कुशलतापारंपरिक पिकांच्या जोडीने कानशिवणी (जि. अकोला)...
शेळीपालन, मळणीयंत्र व्यवसायातून बसवली...पडसाळी (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथील...
शाळेबरोबरच शेतीमध्येही उपक्रमशीलजळगाव येथील शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांनी आपले...
महिला बचत गटांची दुग्धव्यवसायात भरारीखडकूत गावातील बचतगटांना महिला आर्थिक ...
शेतीला मिळाली शेळीपालनाची साथशिंदेवाडी(ता.करवीर,जि.कोल्हापूर) येथील पंकज...