agriculture story in marathi, moringa farming, integrated farming, pawarwadi, malegaon, nasik | Agrowon

शंभर एकरांत सुधारित तंत्राने शेवग्याची किफायतशीर शेती !

मुकूंद पिंगळे
शुक्रवार, 17 मे 2019

स्मार्ट पीक पध्दतीचे नियोजन 
महेश पवार म्हणाले, की शेवग्याच्या विक्रीसाठी आम्हाला बाजारपेठेत जाण्याची गरज पडत नाही. मुंबई, चेन्नई, तमिळनाडू आदी भागांतील व्यापारीच जागेवर येऊन खरेदी करून जातात. शेवगा पिकाचा आम्हाला सुमारे १० वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. आमच्यापासून प्रोत्साहीत होऊन तालुक्यात सुमारे सातशे एकरांवर शेवगा लागवड झाली असावी. या शेतकऱ्यांना देखील बांधावरच मार्केट मिळाले आहे. पूर्वी आमच्याकडे ९० एकरांपर्यंत डाळिंब लागवड होती. गारपीट, कमी मिळत असलेले दर, खर्च आदी बाबी पाहता हे पीक तितके फायदेशीर राहिलेले नाही. त्यामुळे त्याचे क्षेत्र कमी करीत आणले आहे.  सन २००८ मध्ये आमच्याकडे केवळ तीन एकर शेवगा होता. आज नव्या व जुन्या लागवडीसह ते १२० एकरांपर्यंत पोचते आहे. 

नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी (ता. मालेगाव) येथील पवार कुटुंबीयांनी प्रयोगशील व अभ्यासू वृत्ती, जिद्द. चिकाटीतून १२५ एकर शेतीचा विकास साधला आहे. पैकी तब्बल १०० एकरांवर सुधारित तंत्राद्वारे शेवग्याची फायदेशीर शेती केली आहे. अशा प्रकारचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असावा. जोडीला उत्कृष्ठ जलव्यवस्थापन, पीक फेरपालट, सेंद्रिय-जैविक पद्धतींचा वापर, संयुक्त कुटुंबाचे बळ आदी गुणवैशिष्ट्यांच्या आधारे त्यांनी उभारलेले शेतीचे मॉडेल समस्त शेतकऱ्यांसाठी आदर्शवत असेच आहे. 

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हा कायम दुष्काळाच्या छायेत असलेला जिल्हा. पण, प्रतिकुलता हीच संधी मानून तालुक्यातील शेतकरी विविध प्रयोग करीत काळाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. तालुक्यातील पवारवाडी येथील पवार कुटुंबाची १२५ एकर शेती आहे. विशेष म्हणजे उच्चशिक्षित असलेले हे कुटुंब आहे. सध्याच्या पिढीतील पाचही भाऊ शेतीत आहेत. पैकी सर्वात ज्‍येष्ठ असलेले अरुण यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून प्राध्यापकाची नोकरी सुरूही केली. पण, नोकरीत मन रमले नाही. वडिलोपार्जित ३० एकरांत आधीच्या पिढीने ७५ एकरांपर्यंत क्षेत्र वाढवले. त्यानंतर या पिढीने हे क्षेत्र १२५ एकरांपर्यंत नेले. 

प्रयोगशील वृत्तीचे पवार  
पारंपरिक शेतीत मिळणारे मर्यादित उत्पादन, रासायनिक शेतीमुळे वाढलेला खर्च, अत्यल्प उत्पन्न यांमुळे शेती परवडत नव्हती. त्यानंतर पवार यांनी सकारात्मक दृष्टीकोन रुजवत सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू केले. त्यात यश मिळत गेले. देशी जनावरांचा गोठा, आधुनिक गांडूळखत प्रकल्प, दशपर्णी, जीवामृत युनिट असे प्रयोग सुरू झाले. कांदा, मका, ऊस या पारंपरिक पिकांऐवजी डाळिंब, आले, जोजोबा, शतावरी, पेरू, हळद, द्राक्ष यांसारख्या नगदी पिकांची लागवड केली. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेडनेटमध्ये शिमला मिरची, टोमॅटो, काकडी यांचे तर प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर करीत कलिंगड व खरबुजाचे यशस्वी उत्पादन घेतले.  भाजीपाल्यात वांग्याच्या खुंटावर सिमला मिरची कलम (ग्राफ्टिंग) व कोहळा वेलीवर कलम करून कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेत परिसरात वेगळ्या प्रयोगाला चालना दिली. सन २०१३ व २०१४ साली सलग दोन वर्षे गारपीट झाली. सन २०१२, २०१५ भीषण दुष्काळी परिस्थिती राहिली. यात मोठे नुकसान झाले. 

पवार कुटुंबाची शेवगा आधारित शेती  
वारंवार उद्‌भवणारी नैसर्गिक आपत्ती, पाणीसंकट, खर्च, बाजारपेठेत पीकनिहाय मागणी व दर या सर्व बाबींचा विचार करून शेवगा हे प्रमुख पीक निवडले. तब्बल १०० एकर शेवगा. असा राज्यातील एकमेव प्रयोग असावा. 

 • स्वतंत्र शेवगा- ७० एकर 
 • शेवगा व डाळिंब- मिश्र- १८ एकर
 • शेवगा व लिंबू मिश्र- १२ एकर
 •  नवीन शेवगा- २० एकर
 • आले- ५ एकर

कामांचे आदर्श नियोजन 
पवार कुटुंबातील प्रमुख पाच सदस्य एकूण शेतीचे नियोजन करतात. एखाद्या कंपनीप्रमाणे व्यक्तिनिहाय जबाबदाऱ्या ठरवून दिल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे

 •  पीक संरक्षण, फवारणी, खते व्यवस्थापन- मोहन 
 •  सिंचन व्यवस्थापन- अभिजित 
 •  मजूर व शेती देखरेख- अरुण व महेश 
 •  विक्री व्यवस्था व बाजारपेठ- अनिल 

 एखादी व्यक्ती कामानिमित्त बाहेरगावी असेल तर त्याच्या अनुपस्थितीत अन्य व्यक्तीकडे संबंधित जबाबदारी देण्यात येते.

शेवग्याविषयी 
तमिळनाडू राज्यातील दिंडीगुल जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेवग्याचे निवड पद्धतीने वाण (ओडीसी प्रकारचे) विकसित केले आहे. त्याची लागवड केली आहे. सघन लागवड पद्धतीचा वापर. लागवड ५ बाय ५ फूट, १० बाय ५ फूट अशी केली आहे.  एकरी सुमारे एकहजार झाडे बसतात. 

बाजारपेठेसाठी छाटणी तंत्राचा वापर
महेश म्हणाले, की बाजारपेठेत कोणकोणत्या महिन्यांत शेवग्याला मागणी असते, कोठून केव्हा किती माल येतो व दर काय असतात त्याचा पूर्ण अभ्यास केला. त्यानुसार बाजारात शेवगा आणण्यासाठी छाटणी व बहर तंत्राचा वापर केला. पारंपरिक शेवगा उत्पादनात शक्यतो एक बहार घेतला जातो. पवार मात्र दोनवेळा छाटणी व बहार तंत्रांचा वापर करतात.

 • एक- जुलै छाटणी. शेवगा नोव्हेंबरला सुरू होतो. 
 • दुसरा बहार- एक मार्च दरम्यान छाटणी. मे मध्यावतीत माल सुरू
 • राज्यासह दक्षिणेकडून मागणी असलेल्या व शेवग्याचा तुटवडा जाणवणाऱ्या काळात विक्रीचे नियोजन. 

 मार्च-एप्रिलमध्ये शेवग्याचे दर पडतात. मात्र उत्पादन अधिक मिळत असल्याने त्याचा फायदा उत्पन्न दुप्पट मिळते. सध्या वापरात असलेला वाण कमी कालावधीत येणारा आहे. जुलै छाटणी हंगामात तो पाच महिन्यांत पक्व होतो तर उन्हाळी हंगामात त्यासाठी ७५ दिवस लागतात. त्याच्या या वैशिष्ट्यामुळे बाजारपेठेत वेळेवर माल आणणे शक्य होते.   

उत्पादन व दर

 • नोव्हेंबर हंगाम- उत्पादन एकरी पाच टन, दर ४० ते ५० रुपये प्रतिकिलो
 • मे हंगाम- उत्पादन- १२ ते १४ टन, दर- ३० ते ४० रुपये
 • उत्पादन खर्च- एकरी ७० हजार रु. (दोन्ही बहार धरून)        

 सुमारे १० वर्षांचा विचार करता सरासरी दर किलोला ३० ते ४० रुपये राहिला आहे.  

अन्य पीकवाण

 • डाळिंब (१८ एकर)- भगवा, गणेश, आरक्ता
 • उत्पादन- एकरी १५ टनांपर्यंत 
 • लिंबू (१२ एकर)- वाण- बालाजी (निवड पध्दतीचे), फुले सरबती
 • उत्पादन- एकरी ९ ते १० टन  
 • आले ( ३ एकर)- उत्पादन एकरी १५ ते २० टन 

प्रभावी जलव्यवस्थापन 
पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असताना पवार कुटुंबीयांनी दोन बंधारे तयार केले. विहीर पुनर्भरण व स्वखर्चातून डोंगर उतारावर बंधाऱ्याच्या माध्यमातून जलसंधारण साधले. पाणी साठविण्यासाठी तीन शेततळ्यांची निर्मिती केली. त्यात एकूण सात कोटी लिटर पाणी साठवले जाते. यातून उपलब्ध पाण्याची क्षमता वाढली आहे. एका शेततळ्याची निर्मिती डोंगराच्या शेजारी एका उंच टप्प्यावर केली आहे. यामुळे पाणी उच्च दाबाने विद्युत मोटारी विरहीत शेतीसाठी देण्यात येते. उपलब्ध पाण्याची बचत करण्यासाठी १०० टक्के ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. 

मडका सिंचन (डिफ्युजर) तंत्र 
दोन झाडांच्या मधोमध मडका सिंचन कार्यान्वित केले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत फळबागा यशस्वीरित्या जगविणे शक्य झाले आहे. मडक्याची क्षमता तीन लिटर आहे. त्यातून हळूहळू पाणी पाझरते. मुळांजवळ पसरते.  शेवग्याची छाटणी झाल्यानंतर टाकाऊ काड्यांचे यंत्राद्वारे बायोमास तयार केले जाते. झाडांच्या मुळाजवळ त्याचे आच्छादन केले जाते. या प्रयत्नांमुळे बाष्पीभवन कमी होते. पाण्याची ४० ते ५० टक्के बचत होते.

गारपिटीत टिकून राहणारा शेवगा 
महेश म्हणाले, की डाळिंब, द्राक्षे किंवा तत्सम पिकांचे गारपिटीत मोठे नुकसान होते. आमच्या भागात तर सातत्याने गारपीट होतच असते. शेवग्याला त्याचा मार कमी बसतो. पुन्हा फुटवे येतात. त्यादृष्टीनेही शेवग्याचे महत्व असल्याचे महेश म्हणाले. 

सेंद्रिय शेवगा पाच एकर 
एकूण शेवगा क्षेत्रापैकी पाच एकर क्षेत्र सेंद्रिय शेतीसाठी ठेवले आहे. सुपरमार्केटमधील एका प्रसिद्ध कंपनीला हा शेवगा पुरवला जात आहे. त्यासाठी १० टक्के प्रिमियम दरही मिळतो. शेवग्यासह डाळिंबाची देखील व्यापाऱ्यांमार्फत जर्मनी, मलेशिया व आखाती देशांमध्ये निर्यात होते. 

सेंद्रिय काॅँग्रेसमध्ये सहभाग 
दोन वर्षांपूर्वी भारतात झालेल्या जागतीक सेंद्रिय काॅँग्रेसमध्ये महेश यांची निवड झाली होती. त्यात सेंद्रिय शेतीचे स्वतंत्र दालन व चर्चासत्रे यांचा लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 

शेतीची वैशिष्ट्ये 

 • कुटुंबामध्ये एकूण २५ सदस्य. सर्वजण एकत्र राहतात. सर्व सदस्य उच्च शिक्षित. पूर्णवेळ शेतीकामात सक्रीय. 
 •  पीक फेरपालट, एकात्‍मिक पीक संरक्षण, सेंद्रिय निविष्ठांचा अधिक वापर. 
 • घरीच गांडूळखत पाच टन प्रतिमहिना या प्रमाणात तयार केले जाते. बायोडायनॅमिक खतही घरीच बनवले जाते.  राष्ट्रीय सेंद्रिय शेती संशोधन केंद्र, गाझियाबाद यांच्या पुढाकाराने विकसित झालेल्या ‘वेस्ट डीकंपोझर’ घटकाचा वापर. 
 • कामगंध सापळे, सेंद्रिय घटकांचा पुनर्वापर, जीवाणू खते, रासायनिक कीडनाशके व खतांचा संतुलित वापर. 
 •  पाणीसाठा वाढविण्यासाठी यशस्वी जलसंधारण.
 • एकाच पिकावर अवलंबून न राहता बहुपीक पद्धतीचा अवलंब करून अधिक उत्पन्न.
 • डाळिंब व शेवगा पिकात उत्तम परागीभवनासाठी मधुमक्षिकापालन केले आहे. यात २५ पेट्या सुमारे 
 • ४० एकरांत ठेवल्या आहेत. त्यातून सुमारे १० ते २० टक्के उत्पादन वाढ मिळणे शक्य झाल्याचे महेश सांगतात. 
 • शेततळ्यातील स्वच्छता ठेवण्यासाठी मत्स्यपालन.
 • शेतीसोबत पशुपालन. शेणाचा खतांसाठी वापर.
 • सेंद्रिय घटकांचा दरवर्षी वापर. 
 • शेतीविषयक सुमारे ८०० पुस्तकांचा संग्रह. ॲग्रोवनचे पहिल्या दिवसापासूनचे वाचक.
 • सौर ऊर्जा व बायोगस अपारंपरिक ऊर्जेचा घरगुती वापर. याद्वारे पाणी गरम करणे, स्वयंपाक आदींसाठी सिलिंडरची गरज कमी केली. त्यावरील खर्चही वाचवला. 

स्वतःसह अन्य शेतकऱ्यांची प्रगती 
पवार कुटुंबीयांनी शेतीत प्रगती करून परिसरातील शेतकरी संघटित केले आहेत. त्यांना सोबत घेऊन गंगापुत्र शेतकरी गटाची निर्मिती केली. परिसरातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी कुटुंब प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना शेवगा लागवडीपासून ते विक्रीपर्यंतचे मार्गदर्शन अरुण व महेश करतात. रासायनिक खतांवरील अधिक खर्च व जमिनीचा होणारा ऱ्हास ओळखून त्यांनी अवशेषमुक्त शेतीची कास धरली आहे. त्याचा ते प्रसारही करीत असतात. कृषी विभाग, विविध तज्ज्ञांच्या ते कायम संपर्कात असतात. पुढील काळात प्रक्रिया उद्योगातील संधी निर्माण करून स्थानिकांनी रोजगार मिळवून देण्यासाठी हे कुटुंब प्रयत्नशील आहे. 

  प्रमाणपत्रे 

 • मूळ जर्मनी येथील कंपनीच्या भारतीय संस्थेकडून सेंद्रिय शेती 
 • ''आत्मा’ विभागाच्या पुढाकाराने सामूहिक सेंद्रिय प्रमाणीकरण
 • युरोप खंडात निर्यातीसाठी ग्लोबलगॅप तसेच जर्मनीत सेंद्रिय माल निर्यातीसाठी प्रमाणपत्र 

  मान्यवरांच्या भेटी 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), शेर-ए-काश्मीर कृषी विद्यापीठ (श्रीनगर) येथील शास्रज्ञ, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, कृषिमंत्री, कृषी आयुक्त व अधिकारी, देशभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेताला भेटी दिल्या आहेत.  

 सन्मान 

 • अरुण यांना २००९ चा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ व २०१६ चा ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’
 •  आत्मा यांच्या वतीने २०१३ मध्ये महेश यांना आदर्श युवा शेतकरी पुरस्कार 
 •  गावातील ५० शेतकऱ्यांचा गट तयार करून उल्लेखनीय शेवगा उत्पादन व विक्री केल्याबद्दल  आत्मा यांच्या वतीने २०१७ साली गंगापुत्र शेतकरी गटास ‘आदर्श शेतकरी गट पुरस्कार’, मनुष्यबळ विकास अकादमी(मुंबई) यांच्या वतीने ‘राष्ट्र एकात्मता फेलोशिप प्रतिमारत्न पुरस्कार’

 पीकपद्धती व बाजारपेठा नियोजन 
महेश म्हणाले, की शेवग्याच्या विक्रीसाठी आम्हाला बाजारपेठेत जाण्याची गरज पडत नाही. मुंबई, चेन्नई, तमिळनाडू आदी भागांतील व्यापारीच जागेवर येऊन खरेदी करून जातात. शेवगा पिकाचा आम्हाला सुमारे १० वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. आमच्यापासून प्रोत्साहीत होऊन तालुक्यात सुमारे सातशे एकरांवर शेवगा लागवड झाली असावी. या शेतकऱ्यांना देखील बांधावरच मार्केट मिळाले आहे. पूर्वी आमच्याकडे ९० एकरांपर्यंत डाळिंब लागवड होती. गारपीट, कमी मिळत असलेले दर, खर्च आदी बाबी पाहता हे पीक तितके फायदेशीर राहिलेले नाही. त्यामुळे त्याचे क्षेत्र कमी करीत आणले आहे. त्याऐवजी शेवग्याचे मात्र वाढवले आहे. सन २००८ मध्ये आमच्याकडे केवळ तीन एकर शेवगा होता. सन २०११ मध्ये त्याचे क्षेत्र ३३ एकरांवर पोचले आणि आज नव्या करणाऱ्या व जुन्या लागवडीसह ते १२० एकरांपर्यंत पोचते आहे. 

संपर्क-  महेश पवार, ७२१८९८३४३१


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरेल :...मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध हटवले...
‘स्वाभिमानी’चा मोर्चा स्थगितसातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कऱ्हाडला...
संत्रा पट्ट्यातून ‘किसान रेल’ सुसाटनागपूर : संत्रा वाहतुकीकरिता रेल्वेचा स्वस्त आणि...
संत्रा आंबिया बहाराला ४२ कोटींची भरपाईअमरावती : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या...
केळी उत्पादकांची लूट थांबवा, अन्यथा...गिरगाव, जि. हिंगोली : राज्यातील अन्य...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः बंगालच्या उपसागराच्या आग्नेय व नैऋत्य...
शेतकऱ्यांनी पकडले सोयाबीन चोरअमरावती : घराच्या अंगणात ठेवलेले ३१ पोते सोयाबीन...
शासकीय खरेदीला प्रारंभ; कापूस दरात...जळगाव ः खानदेशात शासकीय कापूस खरेदी सुरू होताच...
सहकारी संघाकडूनही गाईच्या दूधदरात कपात नगर ः लॉकडाउन झाल्यानंतर दुधाची मागणी कमी झाली...
पशुखाद्य दरात वाढसांगली ः अतिवृष्टीमुळे पशुखाद्य तयार होणाऱ्या...
दुग्ध व्यवसायातून अल्पभूधारक शेतकऱ्याची...वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये कुटुंबाचा...
पशुपालनाने दिली आर्थिक प्रगतीला साथकोळन्हावी (ता. यावल, जि. जळगाव) येथील देवानंद...
तोतया व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादकांची...नाशिक : सध्या मागणीच्या तुलनेत सध्या कांद्याची...
गांडूळ खताने घातले उत्पन्नवाढीस खतपाणीसासवड, जि. पुणे ः वीटभट्टीच्या धंद्यात उधारी...
नियमित कर्जफेड करणारे शेतकरी...कोल्हापूर ः जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार नियमित...
ग्रामीण भागात नऊ लाख घरे बांधणार ः हसन...मुंबई : राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच...
विदर्भाच्या काही भागांत थंडीपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाले...
कारखाने भाडेतत्त्वावर देणाऱ्या समितीत...पुणे : आजारी साखर कारखाने व त्यांच्या अब्जावधी...
पानांचे दर दबावात; उत्पादकांना फटकासांगली : गेल्या आठ महिन्यांपासून बाजारपेठेत...
खानदेशात ‘सीसीआय’कडून २५ हजार क्विंटल...जळगाव ः खानदेशात कापूस महामंडळाकडून (सीसीआय)...