अथक प्रयत्न, संघर्षातून  प्रयोगशील शेतीचा आविष्कार 

कष्टाचे चीज झाले अत्यंत आर्थिक गरीब परिस्थितीतून भोरकडे बंधू पुढे आले. या प्रवासात आईने कष्टाची शिकवण दिली. त्यामुळेच नोकरी सोडून तिघे बंधू शेतीकडे वळले. अपयशे पचविली. शेतीतील उत्पन्नातून १० एकर जमीन खरेदी करीत वडिलोपार्जित १० एकरांत भर घातली. छपरात राहणाऱ्या कुटुंबाचे बंगल्याचे स्वप्न पूर्ण झाले. शेतीच्या बळावरच मुलांना उच्च शिक्षण दिले. कृषी विभागाने ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ देऊन श्रावण भोरकडे यांना सन्मानित केले आहे.
आपल्या आईसोबत अरुण, श्रावण व विक्रम हे भोरकडे बंधू. तसेच दोडक्याचे उत्पादन
आपल्या आईसोबत अरुण, श्रावण व विक्रम हे भोरकडे बंधू. तसेच दोडक्याचे उत्पादन

पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून २० एकरांत भाजीपाला, डाळिंब, कापूस, ऊस अशी बहुविध पीक पद्धती पिंपळगाव जलाल (जि. नाशिक) येथील भोरकडे बंधूंनी फुलवली आहे. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आईने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत मुलांना मोठे केले. पुढे तिघे बंधू नोकरीत असताना आईने शेतीचे महत्त्व ओळखून आपल्या मुलांना शेती करण्यासाठी घरी बोलवले. अनेक संघर्ष, अपयशे पचवित या बंधूंनी प्रयोगशील शेती घडवत आईचे स्वप्न पूर्ण केले आहे.  नाशिक जिल्ह्यातील येवला हा दुष्काळी तालुका आहे. तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे पोपट भोरकडे यांची दहा एकर कोरडवाहू शेती होती. आपल्या तिन्ही मुलांच्या हाती शेतीची जबाबदारी येण्याच्या दरम्यानच त्यांचे निधन झाले. आईने हिंमतीने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. मुलांना मोठे केले. तिघे भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करू लागले. पण, नोकरीपेक्षाही शेतीच खऱ्या अर्थाने जगवेल हाच मंत्र आईने त्यांना दिला. मग तीनही मुले शेती करण्यासाठी घरी परतली.  सुरवातीला अनेक अडचणी आल्या. पण, कुठेही न थांबता अपयशातून हे भाऊ मार्ग काढत राहिले. शेतीत उल्लेखनीय यश मिळवताना नियोजन, व्यवस्थापन व स्वतःमधील अनेक गुण त्यांना उपयोगी पडले.  भोरकडे यांच्या शेती- प्रगतीची वैशिष्ट्ये 

  • दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे व्यवस्थापन 
  • बहुविध पीक पद्धतीचा वापर 
  • गरजेनुसारच रासायनिक खतांचा वापर. गोपालकांकडून दरवर्षी ४० ट्रॅक्टर शेणखताची खरेदी 
  • संयुक्त कुटुंब पद्धतीत १३ सदस्यांचा एकोपा. तिघा भावांवर स्वतंत्र जबाबदाऱ्या. थोरले बंधू अरुण आर्थिक व्यवहार, मधले श्रावण पीक व्यवस्थापन, नवे तंत्रज्ञान तर धाकटे बंधू विक्रम वाहतूक, विक्रीची जबाबदारी सांभाळतात 
  • कमी खर्चातून अधिक उत्पन्न 
  • विविध तंत्रज्ञानाचा अभ्यास, प्रशिक्षणात सहभाग. प्रयोगशील शेतकऱ्यांकडे भेटी 
  • पिकांची निवड करताना आवक, बाजारभावाचा अभ्यास 
  • उत्पादन घेताना खर्चाची बाजू तपासून अधिक नफा कसा मिळेल याचा विचार 
  • तज्‍ज्ञ, कृषी अधिकारी यांच्या कायम संपर्कात 
  • जमीन पुनर्भरण  वडिलोपार्जित शेती खळगट, क्षारयुक्त, कोरडवाहू होती. मिळणारे उत्पन जेमतेम असे. मग खोदाईचे काम सुरू असताना पोयट्याची माती आणून शेतात पसरवली. जमिनीचा पोत सुधारला. कमवलेला पैसे शेतीत गुंतवून शेतीच्या प्रत्येक रुपयाचा मोल जाणले. त्याचे रूपांतर यशस्वी शेतीत केले.  सिंचन सुविधा, पीक पद्धतीत बदल  पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने जवळच अंतरावर विहीर खोदून पाणी पाइपलाइनद्वारे शेतात आणले. सन २०१२ मध्ये एकरात शेततळे उभारले. त्याची साठवणक्षमता सव्वा कोटी लिटर आहे. प्रत्येक थेंबाचा अचूक वापर हा शेती व्यवस्थापनाचा मुख्य गाभा आहे. प्रत्येक पिकाला किती पाणी आवश्यक आहे याचा अचूक बांधतात. एकूण शेतीत ९० टक्के ठिबकचा वापर केला आहे. पाण्याची बचत होण्यासाठी प्लॅस्टिक मल्चिंगसह पीक अवशेष, पालापाचोळा या जैविक मल्चिंगचा वापर होतो. सिंचनाची सुविधा झाल्यानंतर एक एकर डाळिंब बाग लावली. पीकपद्धतीत बदल करून किफायतशीर उत्पन्न घेण्यास सुरवात झाली. यातून मनोबल वाढले. प्रयोगशीलता रुजण्यास सुरवात झाली.    दोडक्यातून सुधारले अर्थकारण 

  • सात वर्षांपासून या पिकात सातत्य. या पिकात मास्टर 
  • त्यातून अर्थकारण सुधारण्यास गती 
  • नोव्हेंबर, मार्च, जून अशा तीन हंगामात लागवड 
  • मार्च हंगाम ठरतो सर्वात फायदेशीर 
  • पीक कालावधी- बी लावल्यापासून ते काढणीपर्यंत साडेपाच महिने 
  • अर्थकारण (एकरी) 
  •  उत्पादन- सरासरी १० टन, पावसाळ्यात कमी 
  • दर- किलोला १० ते ४० रु. 
  • उत्पादन खर्च- ७० हजार रु. 
  • प्रतवारी महत्त्वाची  कांदा, डाळिंब, वाल तसेच प्रत्येक मालाची प्रतवारी होते. त्यामुळे दरांत अधिक सुधारणा होते. त्यामुळे येवला, कोपरगाव व राहाता बाजारात व्यापाऱ्यांकडून अधिक मागणी होते. आज भोरकडे यांनी दोडका पिकात परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे ती त्यामुळेच.  दुष्काळी स्थितीतही सध्याची पिके 

  • डाळिंब – ३ एकर 
  • ऊस – २ एकर 
  • दोडका – १ एकर, नवी लागवड – २० गुंठे 
  • भोपळा – १ एकर 
  • ब्रोकोली – २ एकर 
  • वाल – १५ गुंठे 
  • अन्य पिके- वांगी, मेथी, टरबूज, खरबूज 
  • अन्य उत्पादन-एकरी- (प्रातिनिधीक) 

  • हिरवी मिरची - १४ टन 
  • कांदा- १४ टन. 
  • कापूस- १४ ते १५ क्विंटल, कमाल २४ क्विंटल 
  • विक्री व्यवस्था 

  • येवला, अंदरसूल, कोपरगाव व राहाता येथे विक्री. मागणीनुसार नाशिकमध्ये 
  • सन २०१२ ते २०१५ या तीन वर्षांत निर्यातदारामार्फत हिरवी मिरचीची जर्मनीत निर्यात 
  •   नव्या प्रयोगांचा अवलंब 

  • शेतीपुरते मर्यादित न राहाता रेशीमशेती व मत्स्य शेतीचे प्रयत्न 
  • शेततळ्यात कटला, राहू आदी मत्स्यबिजांचा वापर, आत्तापर्यंत एक लाख रुपयांची मासेविक्री 
  • डाळिंब शेतीत चंदनाची तर शेताच्या बांधाला बांबूची लागवड 
  • ॲग्रोवनचे वाचक  ॲग्रोवन हा भोरकडे यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामधील यशोगाथा, तंत्रज्ञानाची माहिती, हवामान अंदाज, बाजारभाव यांचे ते आकलन करतात.  आगामी योजना 

  • विषमुक्त शेतीचा मानस. यासाठी ‘सीड मदर’ राहीबाई पोपरे यांच्याकडून विविध देशी भाजीपाला व फळांच्या बिया खरेदी केल्या आहेत. 
  • सेंद्रिय शेती प्रमाणीकरणासह परिसरातील शेतकऱ्यांचे संघटन करणार. 
  • संपर्क- श्रावण भोरकडे- ९९२२३०३२५४ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com