बहुवीध पीक पद्धतीमुळे दुष्काळातही प्रगती 

कलिंगड लागवड जाधव पाच वर्षांपासून सातत्याने दोन एकरांवर कलिंगड लागवड करतात. उन्हाळ्यात कलिंगड विक्रीसाठी यावे यासाठी साधारण फेब्रुवारीमध्ये लागवड होते. येणाऱ्या मे महिन्यात रमजान सुरू होणार असून, या काळात कलिंगड बाजारात विक्रीसाठी आणण्यासाठी आठ मार्च रोजी लागवड केली आहे. ठिबक व मल्चिंग तंत्राचा वापर त्यासाठी केला आहे. सध्याच्या तीव्र उन्हातही जमिनीतील ओलावा त्यामुळे टिकून राहात आहे.
 रमजानचे उद्दिष्ट समोर ठेवून मल्चिंगवर घेतलेले कलिंगड.
रमजानचे उद्दिष्ट समोर ठेवून मल्चिंगवर घेतलेले कलिंगड.

लातूर जिल्ह्यातील तेलगाव (ता. अहमदपूर) येथील भागवत व देवानंद या जाधव बंधूंनी वडिलोपार्जित शेती चांगल्या पद्धतीने विकसित केली आहे. ऊस, आले, कलिंगड, भाजीपाला पिके अशी विविधता ठेवत तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड करीत त्यात ते पारंगत झाले आहेत. विशेष म्हणजे पाण्याची टंचाई असलेल्या या भागात छोटा कॅनॉल, विहीर पुनर्भरण, ठिबक यांद्वारे पाण्याचे व्यवस्थापनही काटेकोर केले आहे.  लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात असलेल्या तेलगाव येथे भागवत व देवानंद या जाधव बंधूंची २५ एकर शेती आहे. त्यांचे वडील पूर्वीपासून उसाची लागवड करीत होते. दोन्ही भावडांकडे शेतीची सूत्रे आल्यानंतर त्यांनी शेतीत अमूलाग्र बदल घडवून आणण्यास सुरवात केली. देवानंद हे शिक्षकी पेशा सांभाळत पूर्णवेळ शेती करणाऱ्या आपल्या भावाला शेतीत पूर्णपणे मदत करतात. एकमेकांच्या समन्वयातूनच दोघांनी आदर्श शेती साकारली आहे.  पिकांची विविधता जपली  जाधव बंधू शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात. फक्त एका पिकावर अवलंबून न राहता ते आपल्या २५ एकरांत आले, ऊस, कलिंगड, सोयाबीन, तूर, टोमॅटो, कोबी, चवळी, वरणा, कोथिंबीर अशी विविधता ठेवतात. एखाद्या पिकाने दगा दिला तर त्यातील नुकसान दुसऱ्या पिकातून निघत असल्याने आज त्यांची शेती फायद्याची झाली आहे. पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन व मार्केटचा अभ्यास करीत ते पिकांची निवड करतात. या बाबीमधूनच शेतीतील जोखीम कमी केली आहे.  आले पिकात हातखंडा  गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने आले पिकाचे उत्पादन ते घेत आहेत. वडिलांनी सुरू केलेली लागवड पुढे दोन्ही मुलांनी सुरू ठेवत नवीन तंत्राची भर घातली. पिकातील गमक, बारकावे ते शिकत गेले. आज या पिकात त्यांनी मास्टरी मिळवली असून, अन्य शेतकऱ्यांनाही ते मार्गदर्शन करतात.  ठळक बाबी 

  •  दरवर्षी सुमारे दोन एकरांत लागवड 
  • दरवर्षी फेरपालट 
  • गादीवाफा व ठिबक सिंचनाचा वापर. 
  • घरचेच बेणे वापरले जाते. बेणे प्रक्रिया करूनच लागवड 
  • उत्पादन, उत्पन्न  एकरी सुमारे १०० ते ११० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे जाधव सांगतात. एकरी खर्च दीड ते दोन लाख रुपये येतो. नांदेड मार्केटमध्ये विक्री होते. दरवर्षी जूनमध्ये काढणी होते. या दर चांगला मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. आल्यास सहा हजार ते त्यापुढील दर मिळतो. जूनमध्ये हा दर १४ हजार रुपयांपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. यंदाच्या दुष्काळात हे पीक तारेल असे जाधव सांगतात.  आल्यात कोथिंबिरीचे आंतरपीक  आले लागवडीनंतर गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूस कोथिंबिरीची लागवड होते. जुलैमध्ये कोथिंबिरीस  चांगला दर मिळत असल्याचा त्यांचा आजवरचा अनुभव आहे. दरवर्षी कोथिंबिरीचे पीक सुमारे ४० हजार ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना देते. त्यातून आले पिकातील खर्च कमी होतो. सव्वा महिन्याचे कोथिंबिरीचे पीक किलोला २५ ते ३५ रुपये दर मिळवून देते.  सौरपंपाने भारनियमनावर केली मात  शेतीतील सर्वांत मोठी अडचण वीजभारनियमन आहे. पिकांना आवश्यक असलेल्या काळात पाणी न मिळाल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. यावर उपाय म्हणून जाधव यांनी २०१६ मध्ये पाच एचपी क्षमतेचा सौरपंप विहिरीवर बसवला. त्यामुळे भारनियमनाच्या त्रासातून सुटका झाली असून, पिकांना पाणी देण्यासाठी रात्र जागून काढावी लागत नाही. या पंपाची किंमत सुमारे दोन लाख रुपये असून, अनुदान मिळाल्याने ३३ हजार रुपयेच मोजावे लागल्याचे जाधव म्हणाले.  उसाचे उत्पादन   पूर्वी म्हणजे १९९५ च्या सुमारास १५ एकरांपर्यंत उसाची लागवड असायची. आता पाण्याची उपलब्धता पाहून हे क्षेत्र आठ एकर व यंदा तर दोन एकरांवरच आले आहे. योग्य व्यस्थापनातून एकरी ८० टन उत्पादनापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.  कलिंगड लागवड  जाधव पाच वर्षांपासून सातत्याने दोन एकरांवर कलिंगड लागवड करतात. उन्हाळ्यात कलिंगड विक्रीसाठी यावे यासाठी साधारण फेब्रुवारीमध्ये लागवड होते. कलिंगडास किलोस चार रुपयांपासून उन्हाळ्यात कमाल १२, १५ रुपयांपर्यंतही दरांचा फायदा मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. विक्री जागेवत किंवा नांदेड मार्केटला करतात. येणाऱ्या मे महिन्यात रमजान सुरू होणार असून, या काळात कलिंगड बाजारात विक्रीसाठी आणण्यासाठी आठ मार्च रोजी लागवड केली आहे. ठिबक व मल्चिंग तंत्राचा वापर त्यासाठी केला आहे. सध्याच्या तीव्र उन्हातही जमिनीतील ओलावा त्यामुळे टिकून राहात आहे.  भाजीपाला व अन्य लागवड - ठळक बाबी 

  • वर्षभर दीड ते दोन एकरांत टोमॅटो 
  •  या वर्षी दीड एकरातील टोमॅटोस ४०० रुपयांपासून पुढे दर मिळाला. खर्च वजा जाता यंदा दुष्काळातही या पिकाने चांगले सावरले. 
  • दरवर्षी कोबीतूनही ५० हजार रुपयांच्या पुढे उत्पन्न मिळते. 
  • दहा गुंठ्यांत चवळी, वरणा यांची लागवड. परिसरातील आठवडी बाजारात विक्री 
  • सोयाबीन, तूर व रब्बीचे क्षेत्र - साडेचौदा एकर 
  • सुमारे २५ एकरांत ठिबक 
  • पाण्याची उपलब्धता  शेताजवळून छोटा तलाव जातो. त्यातील पाणी विहिरीत घेतले जाते. सुमारे ६२ फूट विहिरीचा घेर तर खोली ६० फूट आहे. सध्या ४५ फुटांवर पाणी आहे. विहिरीचे पुनर्भरण केले जाते. त्याच्या बाजूस मातीने खणून व दगड टाकून पाणी झिरपण्याची व्यवस्था केली आहे.  ॲग्रोवनने शिकवली प्रयोगशीलता  आम्ही दोघे बंधू ॲग्रोवनमधील यशोगाथा नित्यनियमाने वाचतो. त्यावर चर्चाही करतो. यातूनच आम्हाला एका पिकावर अवलंबून न राहता अन्य पिकांचे प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली. त्यात यशही आले आहे, असे भागवत यांनी सांगितले.  संपर्क -  भागवत जाधव - ८२०८५९९१९१   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com